अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणुकीच्या खर्चात अफरातफर केल्याबद्दल गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाल्यानंतर जगभरात त्याची चर्चा होताना दिसत आहे. देश छोटा असो वा मोठा, त्या देशातील राष्ट्रपती आणि पंतप्रधानपदावरील व्यक्तीबाबत एखादा अनुचित प्रकार घडल्यास जगभरात त्याची चर्चा होते. पाकिस्तानच्या इतिहासात मात्र एका राष्ट्रपतीपद आणि पंतप्रधानपद भूषविलेल्या व्यक्तीला फासावर लटकविण्यात आले होते. ४४ वर्षांपूर्वी ४ एप्रिल १९७९ रोजी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती व पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. भुट्टो यांच्या मनात भारताबद्दल बराच आकस होता. त्यांची भाषणे आणि कृतीतून भारताबद्दलचा अविश्वास आणि शत्रुत्वाची भावना अनेकदा दिसून आली. भारताविरोधात हजारो वर्षे युद्ध सुरू ठेवू, अशी वल्गना करणाऱ्या भुट्टोंचा अंत मात्र अतिशय करुण होता.

भुट्टो यांच्या ऑपरेशन जिब्राल्टर आणि ऑपरेशन ग्रॅण्ड स्लॅममुळे भारत – पाकिस्तानदरम्यान १९६५ चे युद्ध छेडले गेले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी भारताविरोधात हजारो वर्षे युद्ध करत राहू, अशी घोषणा केली होती. १९४३ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी भुट्टो यांनी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांना पत्र लिहून, “हिंदू कधीही आपल्यासोबत एकत्र राहू शकत नाहीत. आपल्या कुराण आणि प्रेषित यांचे ते सर्वात मोठे शत्रू आहेत,” असे म्हटले होते. एका दशकानंतर भुट्टो यांनी पाकिस्तानमधील मोक्याच्या जागा पटकवल्या. भारत आणि हिंदूंशी असलेले हाडवैर पुढे त्यांच्या अनेक निर्णयांमधून दिसले.

Nawaz Sharif on Pm Narendra Modi
Nawaz Sharif on Pm Narendra Modi: “पुढची ७५ वर्ष वाया…”, मोदींचा उल्लेख करत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे मोठे विधान
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
External Affairs Minister S Jaishankar reprimanded Pakistan China on terrorism
इस्लामाबादमधून भारताचे पाकिस्तान, चीनला खडेबोल; दहशतवाद, सार्वभौमत्व, शेजारधर्मावरून परराष्ट्रमंत्र्यांची टोलेबाजी
s jaishankar meets pakistan pm shehbaz sharif
Video: अवघ्या २० सेकंदांची भेट, जुजबी चर्चा आणि भेट संपली; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी अत्यल्प चर्चा!
Shahbaz Sharif and S Jaishankar 16
जयशंकर, शरीफ भेट; एससीओ परिषदेनिमित्त पाकिस्तानच्या पंतप्रधानांतर्फे मेजवानीचे आयोजन
no india pakistan bilateral talks during sco meet says s Jaishankar
पाकिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा नाही : जयशंकर
S jaishankar
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर पाकिस्तानात जाणार, सुषमा स्वराज यांच्यानंतर शत्रू राष्ट्रात जाणारे पहिले मंत्री!
Defence Minister Rajnath Singh
“…तर भारताने पाकिस्तानला आयएमएफपेक्षा जास्त पैसा दिला असता”; राजनाथ सिंह यांचे विधान चर्चेत!

भारताविरोधात भुट्टो यांनी घेतलेल्या भूमिका आणि त्यांचा अंत याबाबत घेतलेला हा आढावा.

ऑपरेशन जिब्राल्टर आणि भारताचे चोख प्रत्युत्तर

ऑगस्ट १९६५ मध्ये पाकिस्तानने ३० हजार सैनिकांना जम्मू-काश्मीरच्या भारतीय हद्दीत घुसवून या भागातील मुस्लीम जनतेला भारत सरकारविरोधात उभे करण्याची योजना आखण्यात आली होती. या योजनेला ऑपरेशन जिब्राल्टर असे नाव देण्यात आले होते. भारतीय लष्कराला या योजनेचा सुगावा लागल्यानंतर पाकिस्तानच्या या आगळिकीला वेळीच रोखले गेले. त्याच वेळी ऑपरेशन ग्रॅण्ड स्लॅमद्वारे पाकिस्तानने अखनूर पूल ताब्यात घेतला होता. जम्मू आणि काश्मीरला जोडणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या अशा या पुलावर ताबा मिळविल्यामुळे भारतासमोर आव्हान उभे राहिले होते. भारतात त्या वेळी लालबहादुर शास्त्री पंतप्रधानपदावर होते आणि सरंक्षणमंत्री होते महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाण. पाकिस्तानच्या या आगळिकीला उत्तर देण्यासाठी युद्ध सुरू करण्याचा धाडसी निर्णय लालबहादुर शास्त्री यांनी घेतला. भारतीय सैन्याने पंजाब प्रांतातून पाकिस्तानमध्ये शिरकाव करत थेट लाहोरपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पाकिस्तानने युद्धातून माघार घेतली.

चीन युद्ध आणि नेहरूंच्या निधनामुळे भारत कमकुवत असल्याचा कयास

झुल्फिकार अली भुट्टो ऑपरेशन जिब्राल्टरचे पुरस्कर्ते होते. १९६२च्या भारत-चीन युद्धात भारताची झालेली पीछेहाट, त्यानंतर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन आणि देशांतर्गत विषय यामुळे भारत कमकुवत असल्याचा भुट्टो यांचा समज झाला होता. भारत पुन्हा सावरण्याच्या आधी काश्मीरवर सैन्याच्या मदतीने ताबा मिळविण्याचा पाकिस्तानचा विचार होता. कार्नेज इंडियाचे (आंतरराष्ट्रीय विषयांवर संशोधनात्मक लेख प्रकाशित करणारे संकेतस्थळ) संचालक रुद्र चौधरी यांनी २०१५ मध्ये द इंडियन एक्स्प्रेसशी बोलत असताना या युद्धाची माहिती दिली. ते म्हणाले, भुट्टो यांनी पडद्यामागे राहून ही रणनीती आखली होती. काश्मीरमधील बंडखोरी पाकिस्तानसाठी फलदायी ठरू शकते, यासाठी राष्ट्रपती आयुब खान यांचीदेखील त्यांनी मनधरणी केली होती. मात्र हे युद्ध आपल्यावरच उलटेल याची जराही कल्पना आयुब खान आणि भुट्टो यांना नव्हती.

आमच्या बचावासाठी भारतासोबत हजारो वर्षे युद्ध करू

१९६५ च्या युद्धात भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यानंतर त्याच संध्याकाळी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भुट्टो यांनी भारताविरोधात गरळ ओकळी. आपला डाव उलटा पडल्याचे लक्षात आल्यानंतर भुट्टो यांनी भारत हा सर्वात मोठा राक्षस आणि आक्रमणकारी देश असल्याची टीका या परिषदेत केली होती. “भारताने आमच्यावर युद्ध लादले असून आम्ही त्याचे प्रत्युत्तर देऊच. पण ४५ कोटी लोकसंख्या असलेला देश १० कोटी लोकसंख्या असलेल्या देशावर कशा प्रकारे उघड अत्याचार करतोय, हेदेखील जगाला आज दिसत आहे. एका मोठ्या देशाने छोट्या देशाचे केलेले दमन यातून दिसत आहे. पण आम्ही आमच्या प्रतिष्ठेसाठी लढा देऊ, पाकिस्तानसाठी संघर्ष करू, कारण आम्ही शेजारी देशाच्या आक्रमणाचे बळी आहोत.”

हे वाचा >> प्रिय ‘भारत-पाकिस्तान’ युद्ध परवडणारे नाही, भुट्टो यांनी दाखवला युद्धाचा चेहरा

काश्मीरबाबत बोलत असताना ते म्हणाले, “जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाही आणि कधीही नव्हता. जम्मू आणि काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील वादग्रस्त भूभाग आहे. जम्मू आणि काश्मीरचा सर्वाधिक भाग पाकिस्तानचा आहे. जम्मू आणि काश्मीरच्या लोकांशी आमचे रक्ताचे नाते आहे. आमची संस्कृती, इतिहास, जगण्याच्या पद्धती सर्व काही एक आहे. आमच्या बचावासाठी आम्ही भारतासोबत हजारो वर्षे युद्ध करत राहू. भारत आपले संकल्प आणि आश्वासने विसरला असला तरी पाकिस्तान आपले संकल्प सोडणार नाही.”

झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी जाहीर

१९६५ च्या युद्धानंतर झुल्फिकार अली भुट्टो यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपतीपद आणि पंतप्रधानपद भूषविले. २० डिसेंबर १९७१ ते १३ ऑगस्ट १९७३ या काळात ते राष्ट्रपती होते. राष्ट्रपतीपद सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. १४ ऑगस्ट १९७३ पासून ते ५ जुलै १९७७ पर्यंत ते या पदावर होते. भुट्टो त्यांच्या काळातील पाकिस्तानचे सर्वात मोठे नेते मानले जात होते. पण १९७७ साली लष्करप्रमुख मोहम्मद झिया-उल-हक यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने बंडखोरी करून सत्ता ताब्यात घेतली. यानंतर लगेच भुट्टो यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्याची हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. १८ मार्च १९७८ रोजी लाहोर उच्च न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. भुट्टे यांनी सर्वोच्च न्यायालयात या शिक्षेला आव्हान दिले, पण सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली. तब्बल ३२३ दिवस रावळपिंडीच्या तुरुंगात काढल्यानंतर ३ एप्रिल १९७९ च्या मध्यरात्री भुट्टो यांना फासावर लटकविण्यात आले.

भुट्टो यांना फाशी दिल्याच्या ३९ वर्षांनंतर, २०१८ साली, झुल्फिकार अली भुट्टो हे निर्दोष असल्याचे पाकिस्तानने मान्य केले. सिंध उच्च न्यायालयाने त्यांना शहीद हा दर्जा देऊन त्यांच्या नावापुढे ही उपाधी लावण्याचे निर्देश दिले. भारताशी हाडवैर बाळगून आयुष्य काढणाऱ्या भुट्टो यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झाले होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थलांतरित झाले.