Pahalgam terror attack पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत हादरला. याबाबत भारतासह जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तपासात पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या सात दहशतवाद्यांपैकी काही दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर येताच भारत सरकारने पाकिस्तानविरोधात सिंधू जल करार स्थगित करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी, अटारी बॉर्डर तत्काळ बंद करणे, अशा मोठ्या घोषणा केल्या आहेत.

अधिकृतपणे पाकिस्तानने या हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचे सांगितले आहे. परंतु, सुरुवातीच्या तपासात पाकिस्तानचा यात समावेश असल्याची माहिती आहे. त्यामागील कारण काय? पाकिस्तान संकटात असूनही त्याने हा हल्ला का केला? या हल्ल्यामागील त्यांचा हेतू काय? याविषयी २००४ ते २००६ पर्यंत भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत असलेल्या श्याम सरन यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत एकूण परिस्थितीविषयीची माहिती दिली.

पाकिस्तानची सद्य परिस्थिती काय?

अफगाणिस्तानच्या भूमिकेबाबतीत पाकिस्तान वर्षानुवर्षे अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. पाकिस्तानच्या पाठिंब्याशिवाय अफगाणिस्तानात युद्ध किंवा शांतता प्रस्थापित होणे शक्य नव्हते. परंतु, २०२१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली आणि अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारा फायदा संपला. ही माघारदेखील पाकिस्तानच्या आर्थिक संकटासाठी कारणीभूत आहे. आखाती देशांनीही पाकिस्तानला मदत करण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानला वारंवार मदत करावी लागत असल्याने आणि त्या बदल्यात पाकिस्तानकडून या देशांना फार काही मिळत नसल्याने त्यांनी मदत करणे नाकारले आहे.

अफगाणिस्तानातील तालिबान राजवटही पाकिस्तानच्या विरोधात असल्याचे चित्र आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

चीनदेखील पाकिस्तानबद्दल साशंक आहे. चीनकडून त्यांच्या प्रमुख बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा भाग म्हणून पाकिस्तानमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करण्यात आले आहेत. परंतु, असे असले तरी पाकिस्तानमधील चीनचे अनेक प्रकल्प आजही रखडलेल्या स्थितीत आहेत. याचे कारण म्हणजे पाकिस्तान सुरक्षेची आश्वासने पूर्ण करण्यात अक्षम ठरला आहे. गेल्या काही वर्षांत बलुची दहशतवाद्यांनी अनेक चिनी अभियंते आणि प्रकल्पात सहभागी असलेल्या चिनी अधिकाऱ्यांच्या हत्या केल्या आहेत. चीन पाकिस्तानचा सर्वांत मोठा आश्रयदाता आहे. मात्र, अलीकडील काही घटनांमुळे दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत.

अफगाणिस्तानातील तालिबान राजवटही पाकिस्तानच्या विरोधात आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या प्रदेशांमध्ये नागरिक आणि लष्करी कर्मचाऱ्यांवर अनेक हल्ले झाले आहेत. तसेच पाकिस्तानची सीमा इराणला लागून आहे; मात्र त्यांचेही संबंध फारसे चांगले नाहीत. गेल्या आठवड्यात इराणच्या सिस्तान-बलुचेस्तान प्रांतात एका बलुची अतिरेकी संघटनेकडून आठ पाकिस्तानी स्थलांतरित कामगारांच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आल्या होत्या.

पाकिस्तानचे पश्चिमेकडील शेजाऱ्यांशीही तणावपूर्ण संबंध आहेत. अनेक विश्लेषक असेही सांगतात की, पाकिस्तानची भारताला लागून असलेली सीमा सध्या सर्वांत शांत आहे. एकूणच सांगायचे झाल्यास पाकिस्तानची गाडी सध्या रुळांवर नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था मंदीच्या स्थितीत आहे आणि त्यांची सुरक्षा परिस्थितीही बिघडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानकडे अधिक दुर्लक्ष केले जाते.

पाकिस्तानच्या दृष्टीने, भारत पाकिस्तानला एकाकी पाडत असून, त्यांच्या एकूण परिस्थितीचा गैरफायदा घेत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

भारताविषयी पाकिस्तानचा समज

पाकिस्तानच्या दृष्टीने, भारत पाकिस्तानला एकाकी पाडत असून, त्यांच्या एकूण परिस्थितीचा गैरफायदा घेत आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी भारत सरकारने कलम ३७० रद्द करणे आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला, हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. भारत जम्मू-काश्मीरला उर्वरित देशाशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या मुद्द्यावर पाकिस्तानच्या भूमिकेचा विचार करण्यात आलेला नाही.

गेल्या काही वर्षांत काश्मिरी लोकांच्या अर्थव्यवस्थेत आणि दैनंदिन जीवनात स्थिरता आली आहे. सत्ताधारी व्यवस्थेबद्दल त्यांचे काहीही मत असले तरी या प्रदेशातील शांत आणि स्थिर परिस्थितीचा फायदा त्यांना होत आहे. मोठ्या संख्येने पर्यटक काश्मीरला भेट देत आहेत. हादेखील मुद्दा महत्त्वाचा आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स सध्या भारताच्या अधिकृत दौऱ्यावर होते. मात्र, त्यांचा प्रवास केवळ भारतापुरता मर्यादित होता आणि त्यांनी आपल्या दौऱ्यात पाकिस्तानला भेट दिली नाही. भारत इतर इस्लामिक देशांशीही आपले संबंध सुधारताना दिसत आहे. पहलगाममधील हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या अधिकृत दौऱ्यावर असताना झाला. यात हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सौदी अरेबिया भारताबरोबरच्या युद्धांमध्ये, विशेषतः १९७१ मध्ये पाकिस्तानचा चांगला मित्र राहिला आहे.

हताश झालेल्या पाकिस्तानचा डाव?

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याकडे दुर्लक्ष येणार नाही किंवा नाकारता येणार नाही. गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे वारंवार द्वि-राष्ट्र सिद्धांताबद्दल बोलले आहेत. जनरल मुनीर यांनी १५ एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे झालेल्या पाकिस्तानी अधिवेशनात सांगितले, “आपले धर्म वेगळे आहेत, आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. आपण दोन राष्ट्रे आहोत; आपण एक राष्ट्र नाही.” त्यांनी असेही म्हटले आहे की, पाकिस्तान हा एक देश आहे, ज्याची स्वतंत्र ओळख आहे आणि म्हणूनच त्याचे जगात स्वतःचे स्थान आहे आणि याकडे दुर्लक्ष करता येणार नाही किंवा त्याला कमी लेखता येणार नाही.

मुख्य म्हणजे जनरल मुनीर यांनी आपल्या विधानांमध्ये काश्मीरचा उल्लेख केला. “आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. काश्मीर आमची नाजूक नस होती आणि राहील, आम्ही ते विसरणार नाही. आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांना त्यांच्या संघर्षात एकटे सोडणार नाही,” असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानांनंतर हा हल्ला झाल्याने यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानला भागीदार न मानल्यास काश्मीर स्थिर होऊ शकत नाही आणि भारताचे एकात्मतेचे धोरण पाकिस्तानला अस्वीकार्य आहे. या हल्ल्याच्या स्वरूपात असा संदेश देण्याचा डाव पाकिस्तानचा असू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स भारतात असताना हा हल्ला झाला आहे. या हल्ल्याची वेळ सांगते की, हा संदेश केवळ भारतासाठी नसून जगासाठी देण्याचा पाकिस्तानचा हेतू होता. पाकिस्तानला जगाला हे दाखवायचे आहे की अजूनही या प्रदेशात त्याचे महत्त्व आहे. त्याच्याकडे सुरक्षा परिस्थिती निर्माण करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे एकूणच जगावर परिणाम होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी पाकिस्तानशी संवाद साधण्याशिवाय पर्याय नाही.

पाकिस्तानचा असा समज असला तरी जगभरातून पाकिस्तानवर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत आणि जगभरातील देशांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्तानसाठी चर्चेत येणेदेखील महत्त्वाचे आहे. मग वाईट पद्धतीने का असो. त्यांना आशा आहे की, यामुळे त्यांचे देशांशी अधिक संबंध निर्माण होतील. सध्या एकट्या पडलेल्या पाकिस्तानसाठी नकारात्मक संबंधही महत्त्वाचे आहेत.

भारताचे पुढचे पाऊल काय असेल?

भारताचे पहिले काम असेल आणि ते म्हणजे नेमकी कुठे चूक झाली याचा तपास करणे. सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली का? भविष्यात या स्वरूपाचे हल्ले कसे रोखता येतील? पर्यटक भीतीशिवाय काश्मीरमध्ये प्रवास करू शकतील यासाठी काय करता येईल? या प्रश्नांची उत्तरे शोधणे भारतासाठी महत्त्वाचे असेल. काश्मीरमध्ये पूर्वीसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही, याचेही मूल्यांकन आवश्यक आहे. आता, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकाकी पडेल, असा प्रयत्न भारताकडून करण्यात येईल. भारताने पाकिस्तानशी संवाद साधावा. कारण- ३,००० किलोमीटर लांबीच्या सीमा असलेल्या शेजाऱ्याला पूर्णपणे वेगळे केले जाऊ शकत नाही. पाकिस्तानचा नक्की विचार काय, त्यासाठी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल.

भारताला हे समजून घेणेदेखील महत्त्वाचे आहे की, पाकिस्तान एक नसून, पाकिस्तानी सत्ता आहे, निवडून आलेले सरकार आहे आणि पाकिस्तानचे लोकही आहेत. तेथील प्रत्येक घटकाशी वेगळ्या पद्धतीने व्यवहार करणे आवश्यक आहे. भारताचे लष्कराशी संबंध बिघडले असले तरी त्यांनी इतरांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. मुख्य म्हणजे पाकिस्तान आणि काश्मीरबाबत भारताचे धोरण काश्मीरमधील लोकांभोवती आणि प्रदेशाच्या विकास व स्थिरतेभोवती केंद्रित असणे महत्त्वाचे आहे. काश्मीरच्या प्रगतीत या हल्ल्यांमुळे व्यत्यय येणार नाही, याबाबत भारताला अधिक सतर्क राहावे लागेल.