१९६४ साली झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण जगाला हादरवले होते. या अपघातात प्रवाशांसह संपूर्ण ट्रेन समुद्रात वाहून गेली होती. तमिळनाडूच्या रामेश्वरममधील बेटाला मुख्य भूभागाशी रेल्वेने जोडणाऱ्या पुलावरून रेल्वेगाड्या आणि पुलाखालून जहाजे जातात. रामनवमीला (६ एप्रिल) नवीन पंबन पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. नवीन पंबन पुलाला तांत्रिक चमत्कार म्हणून गौरवले जात आहे. परंतु, जुन्या पंबन पुलावर झालेला रेल्वे अपघात अजूनही लोक विसरू शकलेले नाहीत. पंबन पुलावर रेल्वेचा अपघात झाला तेव्हा नक्की काय घडले होते? चक्रीवादळामुळे कसा घडला होता अपघात? जाणून घेऊ.
पंबन पूल
पंबन पूल हा तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम येथील एक सागरी रेल्वे पूल आहे. नवीन पूल शतकानुशतके जुन्या मूळ पंबन पुलाची जागा घेणार आहे आणि तो भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सागरी पूल म्हणून ओळखला जाणार आहे. या पुलाला अभियांत्रिकी चमत्कार मानले जात आहे. हा पूल बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे आणि त्याला पॉलिसिलॉक्सेन पेंट देण्यात आला आहे. कोणत्याही सागरी परिस्थितींना तोंड देता येईल, अशा पद्धतीने या पुलाचे डिझाइन केले गेले आहे.
हा पूल ३८ वर्षे देखभालीशिवाय आणि कमीत कमी देखभालीसह ५८ वर्षे टिकेल, असा रेल्वे अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यात स्वयंचलित इलेक्ट्रो-मेकॅनिकल लिफ्ट सिस्टीम आहे. त्यामुळे पूल १७ मीटरपर्यंत उंच होण्यास मदत होईल आणि जहाजांना मार्ग मिळू शकेल. जुना पूल १९१४ मध्ये ब्रिटिशांनी बांधला होता. १९६४ च्या भयानक त्सुनामीदरम्यानही जुना पूल स्थिर राहिला होता; मात्र त्यावरील प्रवाशांनी भरलेली रेल्वे वाहून गेली होती. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हा नवीन पूल रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्याचा पुरावा आहे.
जुना पंबन पूल
जुन्या पंबन पुलाचे बांधकाम १९११ मध्ये सुरू झाले आणि १९१४ मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आयला होता. त्या काळात हा भारतातील पहिला समुद्री पूल होता. ब्रिटिशांद्वारे हा पूल मुख्यतः व्यापारासाठी बांधण्यात आला होता. जुन्या पुलावर बेस्क्युल सेक्शन होता. त्यामध्ये शेरझर रोलिंग लिफ्ट स्पॅन होता. त्याच्या मदतीने जहाजाला मार्ग तयार करून देण्यासाठी पुलाला उंच केले जायचे. हा पूल कमी उपलब्धता असताना बांधण्यात आल्याने एक तांत्रिक चमत्कार मानला जातो. २०१० मध्ये वांद्रे-वरळी सागरी लिंक सुरू होईपर्यंत हा भारतातील सर्वांत लांब सागरी पूल होता.
१९६४ चे चक्रीवादळ आणि रेल्वे अपघात
२३ डिसेंबर १९६४ च्या रात्री पंबन बेटावर भयंकर स्वरूपाची त्सुनामी आली. ६५३ पंबन-धनुषकोडी पॅसेंजर रात्री ११ वाजता पूल ओलांडून रामेश्वरमहून धनुषकोडीकडे जात होती. या रेल्वेला एकूण सहा डबे होते. धनुषकोडी हे इंडो-सिलोन वाहतुकीचे रेल्वेस्थानक होते. मंडपमपासून बेटापर्यंत पोहोचण्यासाठी पंबन पुलाद्वारे समुद्र पार करावा लागतो. त्याच्या पलीकडे पंबन रेल्वेस्थानक आहे. तेथे दोन रेल्वेलाइन्स आहेत. एक रेल्वेलाइन ईशान्येकडे रामेश्वरमला जाते आणि दुसरी पूर्वेकडे धनुषकोडीकडे जाते. त्याच्या दक्षिण दिशेला मन्नारचे आखात आहे. परंतु, त्सुनामी आली तेव्हा रेल्वे त्याच्या गंतव्य स्थानावर पोहोचू शकली नाही आणि पूर्णपणे समुद्रात वाहून गेली. सकाळ झाली तेव्हा केवळ रेल्वेचे इंजिन दिसत होते.
“भीषण स्वरूपाच्या वादळी परिस्थितीमुळे धनुषकोडी किंवा रामेश्वरममधील कोणतेही रेल्वे कर्मचारी बाहेर जाऊन रेल्वे अपघाताचा अंदाज घेऊ शकत नव्हते. तेथील कॉलनी आणि यार्डासह संपूर्ण परिसर समुद्राच्या पाण्याखाली गेला होता. स्टेशनची इमारत ही एकमेव पाणी न शिरलेली जागा होती. सकाळी ६ वाजता वादळ शांत झाले आणि कर्मचारी बाहेर पडले. मात्र, कर्मचाऱ्यांना रामेश्वरमच्या चहुबाजूंनी केवळ पाणीच दिसले. २४ डिसेंबर १९६४ रोजी सकाळी काही कर्मचाऱ्यांना इंजिनाच्या चिमणीतून पाणी बाहेर पडत असल्याचे दिसले,” असे रेल्वे सुरक्षा आयोगाच्या (सीआरएस) अहवालात म्हटले आहे. हा अहवाल १९६७ मध्ये प्रसिद्ध झाला होता.
मृतांचा नेमका आकडा कधीही समोर आला नाही. परंतु, या अहवालात असे नमूद केले आहे की, या रेल्वेमध्ये १०० ते ११० प्रवासी व १८ रेल्वे कर्मचारी होते आणि त्या सर्वांनी या अपघातात आपले प्राण गमावले. काहींचा असाही अंदाज आहे की, हा आकडा २५० च्या जवळपास होता. या त्सुनामीत जुन्या पंबन पुलाचे मोठे नुकसान झाले. तसेच शेरझर स्पॅन सोडून १४६ स्पॅनपैकी १२६ स्पॅन वाहून गेले आणि पुलाचे दोन खांबही वाहून गेले.
‘मेट्रो मॅन’ श्रीधरन यांच्याद्वारे पुलाचा जीर्णोद्धार
भारताचे दिग्गज अभियंता ई. श्रीधरन यांना ‘मेट्रो मॅन ऑफ इंडिया’, असेही म्हटले जाते. त्यांच्याचद्वारे पंबन पुलाचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यांनी २०२१ मध्ये एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “मी माझ्या मूळ गावी ख्रिसमसची सुट्टी घालवत होतो. त्यावेळी मला एक संदेश मिळाला. त्यावेळी रेल्वे मंत्रालयाने असा पवित्रा घेतला की, आम्ही पूल जीर्णोद्धार करणार नाही. कारण- जीर्णोद्धाराचे काम खूप मोठे आणि खर्चीक असेल. तसेच रस्ता बांधकामाचाही प्रस्ताव होता. रामेश्वरमशी विशेष जिव्हाळा असलेल्या उत्तर भारतातील खासदारांनी पुलाचा जीर्णोद्धार करावा, असा आग्रह धरला. सहा महिन्यांत हा जीर्णोद्धार व्हावा, असे त्यांचे म्हणणे होते. महाव्यवस्थापकांनी तीन महिन्यांची वेळ निश्चित केली होती; परंतु मी केवळ ४६ दिवसांत पुलाच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले.”
परंतु, याचे श्रेय श्रीधरन यांनी एका मच्छीमाराला दिले. श्रीधरन आणि रेल्वे अधिकारी पुलाच्या पुनर्बांधणीसाठी देशभरातून गर्डर आणण्याची योजना तयार करीत होते. त्याच काळात एके दिवशी एका मच्छीमाराने त्यांना सांगितले की, त्याला घटनास्थळापासून जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावर एक गर्डर पडलेला दिसला. ही त्यांच्यासाठी एक मोठी प्रगती होती. समुद्राच्या तळातून सर्व गर्डर बाहेर काढण्यासाठी त्यांनी मोठी योजना आखली. त्यामुळे सर्व १२६ गर्डर परत मिळवण्यात यश आले आणि ४६ दिवसांत पुलाची पुनर्बांधणी करणे शक्य झाले.
नवीन पूल
जुन्या पुलाने एका शतकाहून अधिक काळ व्यापार आणि तीर्थक्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली. देखभाल आणि इतर आव्हानांमुळे नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन पंबन पूल हा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिज आहे. जहाजे जाण्यास परवानगी देणारी या पुलाखालील लिफ्ट यंत्रणा केवळ पाच मिनिटे आणि ३० सेकंदांत पूर्ण होते. जुन्या पंबन पुलाखाली असणारी यंत्रणा अधिक वेळखाऊ आणि अधिक श्रमकेंद्रित होती. या कॅन्टिलिव्हर प्रणालीमध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. नवीन पूलाची २.०८ किलोमीटर लांबीची ही रचना जुन्या पंबन पुलापेक्षा तीन मीटर उंच आहे. रेल्वे मंत्रालयाच्या मते, हा पूल १८.३ मीटरच्या ९९ स्पॅनसह बांधण्यात आला आहे. या पुलाच्या मध्यभागी ७२.५ मीटरचा उभ्या लिफ्ट स्पॅन आहे. या पुलावर दोन रेल्वे ट्रॅक आहेत. जड मालवाहू गाड्या तसेच वंदे भारत सारख्या सेमी हाय-स्पीड रेल्वे त्यावरून जाऊ शकतील.