पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू असताना सापडलेल्या एका तळघरामध्ये काही मूर्ती आढळून आल्या आहेत. साधारणपणे पाच ते सहा फूट खोल अशा या तळघरामध्ये पुरातत्त्व विभागाला विष्णूच्या दोन मूर्ती, महिषासुरमर्दिनीची एक मूर्ती, तसेच पादुका व दोन छोट्या मूर्ती आढळून आल्या आहेत. त्यासोबतच काही जुनी नाणीदेखील आढळली आहेत. या मूर्ती साधारणपणे सोळाव्या शतकातील असू शकतील. परंतु, अधिक अभ्यासाअंतीच निष्कर्ष मांडता येतील, असे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, या संपूर्ण घटनाक्रमानंतर अनेक प्रकारचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या नव्या मूर्ती सापडण्याचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे? त्याचा वारकरी परंपरेशी काही संबंध आहे का, तसेच उघड झालेल्या तळघरासंदर्भात केल्या जाणाऱ्या दाव्यांची सत्यासत्यता काय आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधणे महत्त्वाचे ठरते.

हेही वाचा : पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडारातील चावीचे गूढ; रत्नभांडारात दडलंय तरी काय?

Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभची पुराणकथा, इतिहास आणि ज्योतिषशास्त्र काय सांगते?
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Suvarnadurga Fort marathi news
दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा; जिल्हा प्रशासनाकडून पाहणी

“सापडलेल्या मूर्तींचा आणि विठ्ठल देवतेचा सहसंबंध नाही”

पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे यांनी सापडलेल्या मूर्तींबद्दल माहिती देताना सांगितले, “सापडलेल्या तळघरामध्ये दोन मूर्ती विष्णू रूपातील आहेत. त्यातील एक मूर्ती वेंकटेशाची असण्याची शक्यता आहे. या दोन मूर्तींशिवाय तिसरी एक मूर्ती महिषासुरमर्दिनीची आहे. तसेच हात जोडलेल्या स्त्रीरूपातील देवतेची एक मूर्ती सापडली आहे. एक संगमरवरातील देवीची मूर्ती आहे. तिच्या हातात कोणतीही आयुधे नसल्याने ती कशाची आहे, हे अद्याप निश्चित सांगता येत नाही. तसेच भग्न झालेल्या पादुका आणि काही नाणीही सापडली आहेत. या संदर्भात अनेक प्रकारचे दावे-प्रतिदावे केले जात असले तरीही मूर्तिशास्त्रानुसार त्यांचा अभ्यास केल्याशिवाय खात्रीशीरपणे काहीही दावा करणे चूक ठरेल.” दुसरीकडे संत साहित्याचे अभ्यासक व संत तुकाराम महाराजांचे वंशज सदानंद मोरे यांनी हे मूर्ती सापडण्याचे प्रकरण काही विशेष नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “मंदिराच्या परिसरात आणि मंदिरात अशा अनेक मूर्ती आणलेल्या असतात, ठेवून दिलेल्या असतात. काही वेळा त्या भग्न पावतात, काही विसर्जित केल्या जातात, तर काही तशाच राहतात. बरेचदा भग्न झालेल्या मूर्ती पाण्यात विसर्जित करण्याऐवजी अशा प्रकारे ठेवून दिल्या जातात. त्यामुळे वैयक्तिकरीत्या मला ही गोष्ट फार गंभीर घेण्यासारखी वाटत नाही.” पुढे त्यांनी सापडलेल्या मूर्तींचा विठ्ठलाशी आणि वारकरी परंपरेशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की, “या सापडलेल्या मूर्तींचा विठ्ठलाशी काहीही संबंध नाही. कारण- विष्णूची २४ रूपे आहेत. या रूपांचा चेहरामोहरा सारखाच असतो. विष्णूच्या रूपातील मूर्तीच्या चार हातांमध्ये शंख, चक्र, गदा व पद्म ही चार आयुधे असतात. विविध रुपांमध्ये या आयुधांचा क्रम वेगवेगळा असतो. त्यांच्या क्रमावरून हा कोणत्या रूपातील विष्णू आहे, ते निश्चित केले जाते.” पुढे ते म्हणाले, “सापडलेल्या मूर्तींपैकी दोन मूर्ती चतुर्भुज आहेत. मात्र, विठोबा नेहमी द्विभुज असतो. त्यामुळे सापडलेल्या मूर्तींचा आणि विठोबाचा काहीही संबंध नाही. त्याचे एक कारण म्हणजे विठ्ठल ‘चोविसावेगळा’ (विष्णूच्या चोविस रुपांहून वेगळा) आहे; किंबहुना त्यांच्यापेक्षा भारी आहे, असे वर्णन संतांनीच करून ठेवलेले आहे. त्यामुळे, या सापडलेल्या मूर्तींचा आणि विठ्ठलाचा काहीही संबंध नाही.” या मूर्ती तळघरात कशा आल्या असतील, या संदर्भात बोलताना ते म्हणाले, “या मूर्ती कुठून आल्या, कशा आल्या या संदर्भात काहीही सांगता येणार नाही. कारण- पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील सगळ्याच मूर्ती काही मूळच्या नाहीत. काही लोकांनी काही मूर्ती आपापल्या फायद्यासाठीही नंतर आणून ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ- विठ्ठलाचा आणि नवग्रहांचा काहीही संबंध नसतानाही त्या मूर्ती तिथे आहेतच. मात्र, अशा मूर्तींचा विठ्ठलाशी आणि वारकरी परंपरेशी काडीचाही संबंध नाही, असे माझे मत आहे.”

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे संवर्धनाचे काम सुरु असताना सापडलेले तळघर | Pandharpur vitthal mandir Vishnu ancient idols myths and facts
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे संवर्धनाचे काम सुरु असताना सापडलेले तळघर

विठ्ठल मूर्ती लपवण्यासाठी तळघराचा वापर?

पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सापडलेल्या तळघराबद्दल अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत. मध्ययुगामध्ये आक्रमकांपासून बचाव करण्यासाठी विठ्ठलमूर्ती या सापडलेल्या तळघरामध्ये वारंवार लपवली जात असावी, असा एक दावा प्रामुख्याने करण्यात येत आहे. पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती हलवून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे प्रसंग याआधी इतिहासात अनेकदा घडले आहेत. या घटनांबद्दल प्रख्यात संशोधक रा. चिं. ढेरे यांनी ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या संशोधनात्मक ग्रंथात लिहिले आहे, “मुसलमानांच्या आक्रमणाच्या प्रसंगात विठ्ठलमूर्ती पंढरपुराबाहेर नेऊन ठेवावी लागल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. शके १५८१ (इ.स. १६५९) मध्ये अफजलखानाची स्वारी झाली असताना पंढरपुरावर संकट कोसळले होते. त्यानंतर इ.स. १६९५ पासून चार-पाच वर्षे औरंगजेबाची छावणी पंढरपुराजवळ ब्रह्मपुरी येथे होती. त्या काळातही क्षेत्र आणि देव संकटात असल्याचे उल्लेख मिळतात. या दोन घटनांच्या मधल्या काळातही अनेकदा असे संकट प्रसंग उद्भवले होते आणि तेव्हा देवमूर्ती माढे, चिंचोली, गुळसरे, देगाव इत्यादी जवळच्या गावांमध्ये हलवली गेली होती. एकदा तर बडव्यानेच मुद्दाम मूर्ती पळवून नेऊन, लपवून ठेवून स्वार्थ-साधनासाठी दर्शनोत्सुक भक्तांची अडवणूक (Blackmailing) केली होती.” पुढे रा. चिं. ढेरे यांनी अफजलखानाच्या स्वारीवेळी विठ्ठलमूर्ती पंढरपुराहून २० मैल दूर असलेल्या माढे या गावी नेल्याचे आणि अफजलखानाचा वध झाल्यानंतर ती परत पंढरपुरात आणल्याचे नमूद केले आहे. थोडक्यात, विठ्ठलमूर्ती याआधी अनेकदा जागेवरून हलवली गेली असल्याने ती मंदिरातीलच या तळघरामध्ये कधीतरी लपविली गेली असावी, हा तर्क नाकारता येत नाही. या संदर्भात बोलताना सदानंद मोरे म्हणाले, “या तळघरामध्ये विठ्ठलमूर्ती कधीतरी लपवली गेली असेल, ही शक्यता नाकारता येत नाही. कारण- याआधी विठ्ठलमूर्ती अनेकदा जागेवरून हलवली गेली आहे. त्यामुळे आणीबाणीच्या काळात याच तळघरात विठ्ठलमूर्ती लपवली गेलेली असू शकते. कदाचित आता सापडलेल्या मूर्तीही आधी मंदिरात ठेवल्या गेल्या असतील आणि अशा प्रकारचे आक्रमण झाल्यानंतर त्या या तळघरामध्ये ठेवण्यात आल्या असतील. नंतर या मूर्ती बाहेर काढायचे राहून गेले असेल, अशीही शक्यता नाकारता येत नाही.”

श्रीविठ्ठल - एक महासमन्वय या संशोधनपर ग्रंथाचे लेखक प्रख्यात संशोधक रा. चिं. ढेरे' | Pandharpur vitthal mandir Vishnu ancient idols myths and facts
श्रीविठ्ठल – एक महासमन्वय या संशोधनपर ग्रंथाचे लेखक प्रख्यात संशोधक रा. चिं. ढेरे’

वेंकटेशाची मूर्ती सापडल्याने श्रीविठ्ठल-श्रीवेंकटेश समधर्मी असल्याचे अधोरेखित?

संशोधक रां. चि. ढेरे यांनी आपल्या ‘श्रीविठ्ठल – एक महासमन्वय’ या ग्रंथामध्ये विठ्ठल आणि दक्षिणेतील तिरुपती बालाजी या दोन देवतांमधील सहसंबंध अधोरेखित केला आहे. त्यांनी ग्रंथामध्ये म्हटले आहे, “श्रीविठ्ठल आणि श्रीवेंकटेश हे दोन्ही समधर्मी देव आहेत. दोघेही विष्णूच्या पुराणप्रसिद्ध अवतारांशी अथवा रूपांशी संबंध नसणारे तरीही विष्णुरूप पावलेले आहेत. साऱ्या दक्षिण भारतात पुरातन विष्णुरूपांहून अधिक लोकप्रियता लाभलेले आहेत. विठ्ठल ‘बाळकृष्ण’ मानला जातो; तर वेंकटेश ‘बालाजी’ या नावाने ओळखला जातो. विठ्ठलाची पत्नी राधेचे निमित्त सांगून दिंडीरवनात रुसून बसलेली; तर वेंकटेशाची पत्नी भृगूने केलेला अपमान पतीने सोसल्यामुळे चिडून प्रथम करवीरात आणि नंतर तिरुचारनूरमध्ये वेगळी राहिलेली.” हे दोन्ही देव कधी काळी एकच लोकदेव होते, असा दावा करीत त्यांनी पुढे असे म्हटले आहे, “या दोन्ही देवतांच्या साम्याचा जो जो वेध घेत राहू, तो तो आपण अशा निष्कर्षाप्रत येऊ की, हे दोन देव आज वेगळ्या नामांनी, रूपांनी आणि चरित्रांनी दोन वेगळ्या स्थानी नांदत असले, तरी ते मूलत: एकाच लोकदेवाचे, भिन्नस्थानीय विकासक्रमांत भिन्न बनत गेलेले उन्नत आविष्कार आहेत. वेंकटेश हा विठ्ठलाप्रमाणेच शस्त्रहीन, मौनी आहे आणि डावा हात कटीवर ठेवून, उजव्या हाताने भक्तांना वर प्रदान करीत राहिला आहे. श्रीविठ्ठलाच्याही दोन चतुर्भुज मूर्ती आढळल्या असून, उजवा हात वरद मुद्रेत आणि डावा हात कंबरेवर ठेवलेला अशा ध्यानाच्या त्याच्या मूर्ती दक्षिणेत ज्ञात झाल्या आहेत.” पंढरपूरच्या मंदिरात आता सापडलेल्या विष्णूच्या दोन मूर्तींमधील एक मूर्ती वेंकटेशाची असण्याची शक्यता आहे, असे विलास वहाणे यांनी म्हटले आहे. तिचे वर्णन रा. चिं. ढेरे यांनी केलेल्या वर्णनाशी हुबेहूब जुळणारे आहे. विठ्ठल मंदिरात वेंकटेशाच्या मूर्ती सापडल्याने या दोन्ही देवांमधील ऋणानुबंध अधिक अधोरेखित झाले आहेत का, या प्रश्नावर सदानंद मोरे म्हणाले, “रा. चिं. ढेरे यांनी मांडलेला हा सिद्धांत मला मान्य नाही. कारण- असे सिद्धांत कोणत्याही देवतेशी जोडता येऊ शकतात. त्यामुळे वेंकटेशाची मूर्ती विठ्ठल मंदिरात सापडते, या घटनेची एवढी दखल घेण्याची गरज मला वाटत नाही.”

अस्सल विठ्ठलमूर्ती सापडल्याचा दावा खोटा

तळघरामध्ये सापडलेल्या मूर्तींमध्ये विठ्ठलाची अस्सल मूर्ती सापडल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, हा दावा निखालस खोटा असल्याचे ह.भ.प. बाबुराव महाराज वाघ यांनी म्हटले. ते म्हणाले, “पंढरपूर येथील तळघरात विठ्ठलाची प्राचीन मूर्ती सापडल्याचा अपप्रचार होत आहे. सापडलेल्या मूर्तींशी पांडुरंगाच्या मूर्तीचा काहीही संबंध येत नाही. कारण- पांडुरंगाची मूर्ती अनेक नसून एकच आहे. वारकरी सांप्रदायिक संतांनी ज्या मूर्तीचे वर्णन केलेले आहे, ती हीच मूर्ती आहे. वारकरी संप्रदायातील लोकांची जी श्रद्धा आहे, तिला कुठेतरी ठेच लागेल, असे वर्तन कोणीही करू नये.” याआधीही विठ्ठलमूर्तीच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. रा. चिं. ढेरे यांनी, १९८१ मध्ये पंढरपूरमधील विठ्ठलमूर्ती ही आद्य विठ्ठलमूर्ती नसून माढे येथील मंदिरातील विठ्ठलमूर्ती आद्य आहे, असा दावा केला होता. त्यामुळे संशोधक, वारकरी आणि सामान्य जनतेत खळबळ माजली होती. स्कांद पांडुरंग माहात्म्यातील विठ्ठल वर्णनानुसार, मूर्तीच्या वक्षस्थळावरील कूटमंत्र हे आद्य मूर्तीचे लक्षण असल्याचा सिद्धांत ढेरे यांनी मांडला होता. हा कूटमंत्र माढे येथील विठ्ठलमूर्तीच्या छातीवर आढळतो. मात्र, तो आद्य विठ्ठलमूर्तीवर आढळत नसल्याने माढे येथील मूर्तीच खरी असल्याचा दावा त्यांनी केला होता. डॉ. सदानंद मोरे यांनी अनेक पुरावे देऊन ढेरे यांच्या या संशोधनाचा साधार प्रतिवाद केला होता. रा. चिं. ढेरे यांनी सदानंद मोरे यांचा प्रतिवाद मान्य करत आपला दावा मागे घेतला होता. आताही तळघरात सापडलेल्या नव्या मूर्तींमध्ये अस्सल विठ्ठलमूर्ती सापडल्याची माहिती खोटी असून, अशा अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे मत विठ्ठल मंदिर समितीने व्यक्त केले आहे.

तळघरात सापडलेली विष्णूरुपातील मूर्ती | Pandharpur vitthal mandir Vishnu ancient idols myths and facts
तळघरात सापडलेली विष्णूरुपातील मूर्ती

हेही वाचा : तीन दशके सत्तेत असलेल्या आफ्रिकन काँग्रेस पक्षाची निवडणुकीत पडझड; दक्षिण आफ्रिकेवर काय होणार परिणाम?

अज्ञात देवतेची मूर्ती संत कान्होपात्राची?

सापडलेल्या मूर्तींपैकी स्त्रीरूपातील एक मूर्ती संत कान्होपात्रा यांची असल्याचा दावा केला जात आहे. संत कान्होपात्रा या पंधराव्या शतकातील प्रसिद्ध संत कवयित्री होत्या. त्यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोके ठेवून प्राण सोडले होते. त्यामुळे सापडलेली ती मूर्ती संत कान्होपात्रा यांची असावी का, याबाबत बोलताना सदानंद मोरे यांनी म्हटले, “ही मूर्ती कान्होपात्रांची असू शकते; मात्र असेलच असे काही सांगता येत नाही. ती कुठल्याही देवीची मूर्ती असू शकते. या संदर्भात लोक उगाच तर्क करत बसतात. तर्क करण्याचा हक्क असला तरी निश्चित पुरावे मिळाल्याशिवाय काहीही दावा करणे चुकीचे ठरेल.” या संदर्भात पुरातत्त्व विभागाचे विलास वहाणे म्हणाले, “अज्ञात देवीची मूर्ती अद्याप ओळखता आलेली नाही. कोणतीही मूर्ती ओळखायला त्या मूर्तीच्या हातांमध्ये असलेली आयुधे आणि त्या देवतेचे वाहन यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. या दोन गोष्टी असल्या, तर निश्चितपणे देवतेची ओळख पटते. मात्र, या दोन्हीही गोष्टी नसतील आणि स्त्रीरूपातील देवता असेल, तर अधिक अभ्यास करावा लागतो. पुरातत्त्व अभ्यासामध्ये तर्काने निष्कर्ष काढले जात नाहीत. त्यामुळे ही मूर्ती संत कान्होपात्रांची आहे, असा काही दावा करता येणार नाही. अशाच प्रकारची मूर्ती इतर एखाद्या ठिकाणी सापडली, तर मग दोन्हींचा सहसंबंध लावून काहीतरी निष्कर्ष काढता येऊ शकतात.”

तळघरात सापडलेल्या पादुका, हात जोडलेल्या देवतेची मूर्ती आणि काही नाणी तसेच इतर वस्तू | Pandharpur vitthal mandir Vishnu ancient idols myths and facts Basement Of Shree Vitthal Temple
तळघरात सापडलेल्या पादुका, हात जोडलेल्या देवतेची मूर्ती आणि काही नाणी तसेच इतर वस्तू

सोळाव्या शतकातील मूर्ती कशावरून?

या मूर्ती सोळाव्या शतकातील असाव्यात, असा दावा पुरातत्त्व विभागाने केला आहे. या संदर्भात बोलताना विलास वहाणे म्हणाले, “सापडलेल्या मूर्तींची घडणावळ पाहता, या मूर्ती सोळाव्या शतकातील असू शकतील, असा अंदाज बांधता येतो. तेराव्या-चौदाव्या शतकातील यादवकालीन मूर्तींची एकूण घडण आणि सतराव्या-अठराव्या शतकातील मराठा साम्राज्याच्या काळातील मूर्तींची वैशिष्ट्ये आणि घडण वेगवेगळी असते. या दोन्हीही काळाच्या मधल्या संक्रमणावस्थेतील कालावधीतील या मूर्ती असाव्यात, असा अंदाज त्यांच्या वैशिष्ट्यांवरून बांधता येतो. त्यामुळे एकंदरीत त्या सोळाव्या शतकातील असतील, अशी शक्यता वाटते.” पुढे ते म्हणाले, “मूर्तींची छायाचित्रे पाहून मूर्तींसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मात्र, मूर्तिशास्त्रानुसार ती मूर्ती वाचणे, तिचा संदर्भ पाहणे गरजेचे असते. आम्ही आता दिलेली माहितीही प्राथमिक अंदाज आहे, असेच आम्ही सांगितले आहे. मूर्ती सापडल्याक्षणी तिच्याबद्दल इत्यंभूत माहिती देणे हे शिलालेख वाचण्याइतके सोपे नाही. मूर्ती वाचताना तिची सगळी लक्षणे विचारात घ्यावी लागतात. मंदिरात असलेल्या मूर्ती आणि मंदिराच्या तळघरात सापडलेल्या मूर्ती या दोन्हींच्या शैली पडताळून पाहाव्या लागतील. त्यानंतर मग ऐतिहासिक संदर्भ तपासावे लागतील. सध्या तरी मूर्तिशास्त्रानुसारच या मूर्तींचा काळ ठरवला जाईल. त्यासाठी मूर्तिशास्त्रज्ञांची मदत घेऊ.”

मूर्ती १९५० नंतर ठेवण्यात आल्याची अधिक शक्यता

सापडलेल्या तळघरामध्ये या मूर्ती १९५० नंतर ठेवण्यात आलेल्या असू शकतात, असा दावा पुरातत्त्व विभागाचे विलास वहाणे यांनी केला. ते म्हणाले, “सध्या तळघरातील माती चाळायचे काम बाकी आहे. त्यातील काही नाणी ब्रिटिश राजवटीमधील आहेत. १९२० आणि त्यानंतर १९७० पर्यंत जी नाणी आपण वापरत होतो, ती सगळी नाणी तिथे आढळली आहेत. १९५४ चे चार आण्याचे नाणेही सापडले आहे. याचा अर्थ असा काढता येऊ शकतो की, १९५४ पर्यंत तळघर उघडले गेले होते. त्यानंतर या मूर्ती तिथे ठेवण्यात आलेल्या असू शकतात. हा एक मोठा पुरावा आहे. आणखी थोडा अभ्यास केल्यानंतर जे नाणे अलीकडच्या सालाचे प्राप्त होईल, त्यानुसार या तळघराच्या ज्ञात असण्याबद्दलही निश्चित साल सांगता येईल.” पुढे ते म्हणाले, “आधीचे बडवे अथवा जुने-जाणते लोक या तळघराबद्दल अधिक ठामपणे माहिती देऊ शकतात. मात्र, अद्याप तरी कुणी या तळघराबद्दल आधीपासून माहिती असण्याबद्दल काहीही भाष्य केलेले नाही. आम्ही लहानपणी या तळघरात जात होतो वा आमचे वडील जात होते, अशा स्वरूपाची माहिती बडवे मंडळींपैकी कुणी दिली, तर याबद्दल अधिक बोलता येऊ शकते. मात्र, तळघराच्या प्रवेशद्वाराची रचना पाहता, वारंवार आत-बाहेर करता येत नाही. खाली उतरण्यासाठी कोणताही मार्ग नाही. तसेच वर फरशी टाकून तळघराचा मार्ग बंद करण्यात आला होता. उघडझाप करण्याचीही सोय नव्हती. त्यामुळे आतमध्ये एकदाच मूर्ती ठेवून नंतर ते बंद केले असण्याची शक्यता अधिक आहे. त्यानंतर ते विस्मरणात गेले असावे अथवा एखाद्या फार जुन्या व्यक्तीला माहीतही असेल.”

तळघरात सापडलेली विष्णू रुपातील मूर्ती | Pandharpur vitthal mandir Vishnu ancient idols myths
तळघरात सापडलेली विष्णू रुपातील मूर्ती

हेही वाचा : पांडवांची राजधानी ‘इंद्रप्रस्थ’ खरंच अस्तित्त्वात होती का?

तळघराचा रस्ता एका बडव्याच्या घरापर्यंत जात असल्याची अफवा?

तळघर सापडल्यानंतर तिथून एक मार्ग एका बडव्यांच्या घरापर्यंत अथवा चंद्रभागा नदीपर्यंत जात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, हा दावा खोटा ठरवत तळघरासंदर्भात माहिती देताना विलास वहाणे म्हणाले, “हे तळघर मी आतून पाहिले आहे. ते पूर्णत: आतून बंद आहे. तिथून कोणताही मार्ग कुठेही जाताना दिसत नाही. तळघर न बघताच काहीही दावे बाहेर करण्यात येत आहेत.”

सापडलेल्या मूर्तींवर पुढे काय प्रक्रिया होईल?

सापडलेल्या मूर्तींसंदर्भातील अभ्यास समोर यायला किती वेळ जाईल, या संदर्भात विलास वहाणे म्हणाले, “तळघरातील माती चाळणे आणि त्यातून सापडलेल्या नाण्यांचा अभ्यास करण्यास आठ-दहा दिवस जातील. सापडलेल्या मूर्ती आम्ही कालच धुऊन स्वच्छ केल्या आहेत. आज समितीच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाईल. सापडलेल्या मूर्तींवर समितीचा अधिकार असल्याने त्या मंदिरात ठेवून, त्यांचा अभ्यास करायचा की त्या पुरातत्त्व विभागाकडे द्यायच्या, याचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल. आम्ही घेतलेले फोटो आणि मूर्तींच्या मोजमापांवरून संशोधनाच्या कामास सुरुवात केली आहे. याबाबतचे संशोधन लोकांसमोर यायला दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागेल.”

Story img Loader