अशी अनेक प्रकरणे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात बाळाचा जन्म अतिरिक्त हात-पाय किंवा अतिरिक्त अवयवांसह होतो. हा एक आनुवंशिक विकार आहे. वैद्यकीय भाषेत या विकाराला ‘पॅरासिटिक ट्विन’ असे म्हटले जाते. उत्तर प्रदेशातील उन्नावमधील अशाच एका १७ वर्षांच्या मुलाला शस्त्रक्रियेनंतर नवा जन्म मिळाला आहे. आतापर्यंत त्याला त्याच्या अविकसित जुळ्या भावाबरोबर जीवन जगावे लागले. मात्र, दिल्लीतील एम्समधील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे त्याला नवा जन्म दिला आहे.
गेली १७ वर्षे या किशोरवयीन मुलाची थट्टा केली गेली. वेगळे दिसण्यामुळे त्याच्याकडे लोक विचित्र नजरेने पाहायचे. मात्र, आता शस्त्रक्रियेनंतर त्याला या गोष्टींचा सामना करावा लागणार नाही. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथील डॉक्टरांनी त्याच्या धडाशी जोडलेले अतिरिक्त अवयव काढून टाकले आहेत. परंतु, ‘पॅरासिटिक ट्विन’ म्हणजे नक्की काय आहे? अतिरिक्त अवयवांसह बाळाचा जन्म कसा होतो? नेमके हे प्रकरण काय? त्याविषयी जाणून घेऊ.
‘पॅरासिटिक ट्विन’ म्हणजे काय?
‘पॅरासिटिक ट्विन’ ही एक दुर्मीळ स्थिती. जेव्हा जुळ्या बाळाचा विकास होणे थांबते, तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते. या स्थितीत अविकसित जुळ्या बाळाचे अतिरिक्त अवयव जिवंत जुळ्या बाळाशी जोडलेले राहतात. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, निरोगी विकसित जुळे बाळ त्याच्या अविकसित जुळ्याचे अतिरिक्त हातपाय, अवयव किंवा ऊतक घेऊन जन्माला येते. त्यांना त्यांच्या जन्मानंतर वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते आणि अनेक शारीरिक, मानसिक आव्हानांचाही सामना करावा लागतो. अशी प्रकरणे का उद्भवतात हे अजून संशोधकांना पूर्णपणे ज्ञात झालेले नाही.

परंतु, संशोधक दोन मुख्य सिद्धान्तांचा म्हणजेच फिजन व फ्युजन अशा दोन थेअरींचा संदर्भ देतात. फिजन थेअरीनुसार, जर फलित अंडी पूर्णपणे विभक्त झाली नाहीत, तर जोडलेली जुळी मुले जन्माला येतात. जेव्हा जोडलेल्या जुळ्यातील गर्भांपैकी एकाचा विकास थांबतो तेव्हा ‘पॅरासिटिक ट्विन’ ही स्थिती निर्माण होते. “फ्युजन थेअरीनुसार, विकासादरम्यान दोन स्वतंत्र फलित अंडी वाढतात किंवा एकत्र येतात. जेव्हा या दोन फलित अंड्यांपैकी एक विकसित होणे थांबते; परंतु त्याच्या जुळ्यांशी जोडलेले राहते तेव्हा ‘पॅरासिटिक ट्विन’ ही स्थिती निर्माण होते, असे क्लीव्हलँड क्लिनिकनुसार स्पष्ट करण्यात आले आहे. ही स्थिती अत्यंत दुर्मीळ आहे. जागतिक स्तरावर दर १० लाख जन्मांमागे एक मूल, अशा स्थितीत जन्माला येते.
एम्सच्या डॉक्टरांनी कशी केली दुर्मीळ शस्त्रक्रिया?
दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी उत्तर प्रदेशमधील एका किशोरवयीन मुलावर ही दुर्मीळातील दुर्मीळ शस्त्रक्रिया केली आणि त्याच्या शरीरावरील अविकसित जुळ्या मुलाचे अतिरिक्त अवयव आणि श्रोणी (पेल्वीस) काढून टाकले. दोन टप्प्यांतील ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अडीच तास लागले. पहिल्या भागात पॅरासिटिक अवयव काढून टाकणे समाविष्ट होते आणि दुसर्या टप्प्यात मुलाच्या शरीराच्या आतील भागात शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणात, किशोरवयीन मुलाचे खालचे हातपाय, नितंब आणि त्याच्या जुळ्याचे बाह्य जननेंद्रिय, असे अंदाजे १५ किलो वजनाचे अवयव त्याच्या पोटाशी जोडलेले होते, असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे.
शस्त्रक्रिया करणारे मुख्य शल्यचिकित्सक डॉक्टर असुरी कृष्णा यांनी तज्ज्ञांच्या टीमचे नेतृत्व केले. त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, त्यांच्यासमोर सर्वांत मोठे आव्हान म्हणजे जिवंत आणि जुळ्या यांच्यातील ऊती वेगळे करणे. त्यांना रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंची जाळी वेगळी करावी लागली, तसेच छातीजवळील ऊती, आतडे व यकृत वेगळे करावे लागले. विशेष म्हणजे पॅरासिटिक अवयवांना वेदना, स्पर्श व तापमानात बदल जाणवू शकतो. “त्याच्या ओटीपोटात आणि पाठीमागे एक सामान्य आतडी आणि मूत्राशय कार्य करीत होते. त्याला इतर कोणतीही मोठी आरोग्य समस्या नव्हती. रेडिओलॉजिस्ट, अॅनेस्थेटिस्ट व प्लास्टिक सर्जनसह डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली.
बीबीसीशी बोलताना डॉ. कृष्णा म्हणाले की, पहिले काम म्हणजे पॅरासिटिक आणि हा मुलगा एकमेकांशी कसे जोडलेले आहेत याचा शोध घेणे. स्कॅनमध्ये असे दिसून आले की, पॅरासिटिक जुळे मुलाच्या छातीच्या हाडांशी जोडलेले होते आणि त्या अवयवांना छातीतील रक्तवाहिनीतून रक्तपुरवठा होत होता. “आम्ही पॅरासिटिक अंगाला रक्तपुरवठ्याचे मूल्यांकन करण्यासाठी सीटी अँजिओग्राफी केली आणि असे आढळले की, ते अंतर्गत स्तन धमनीच्या एका शाखेद्वारे पुरवले जाते. त्यामुळे परिस्थिती अधिक आव्हानात्मक झाली. सीटी स्कॅनदरम्यान त्याच्या ओटीपोटात एक मोठा सिस्टिक मासदेखील आढळून आला,” असे रेडिओलॉजिस्ट डॉ. अंकिता अग्रवाल यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
‘बीबीसी’च्या वृत्तानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान मुलाचा रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी झाला. कारण- त्याचे ३० ते ४० टक्के रक्त पॅरासिटिक जुळ्यांमध्ये वाहून गेले. परंतु, डॉक्टरांनी त्याला या परिस्थितीसाठी तयार केले आणि त्याला त्वरित स्थिर केले. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या भागात, डॉक्टरांनी किशोरवयीन मुलाच्या पोटातील सिस्टिक मासा आसपासच्या अवयवांमधून काढून टाकला. डॉक्टर कृष्णा यांच्या मते, मुलाच्या वयामुळे शस्त्रक्रिया करणे कठीण होते. “जागतिक वैद्यकीय साहित्यात पॅरासिटिक जुळ्या मुलांची केवळ ४० ते ५० प्रकरणे नोंदवली गेली आहेत,” असे त्यांनी बीबीसीला सांगितले. डॉ. कृष्णा म्हणाले की, पुरेसे वैद्यकीय साहित्य नसल्यामुळे डॉक्टरांच्या टीमला शस्त्रक्रियेसाठी त्यांच्या कौशल्य आणि ज्ञानावर अवलंबून राहावे लागले.
१७ वर्षीय मुलाचा नवा जन्म
१७ वर्षे शारीरिक आणि भावनिकरीत्या त्रस्त असलेल्या या मुलाची अखेर या त्रासातून सुटका झाली आहे. लोक अनेकदा त्याच्याबद्दल गैरसमज करून घ्यायचे आणि त्यामुळे त्याला एकटेपणा जाणवत होता. त्याने त्याचे बालपण एकट्याने घालवले. त्याने स्थानिक डॉक्टरांशी सल्लामसलत केली; परंतु त्यांनी त्याला सांगितले की, अंग काढून टाकणे घातक ठरू शकते, कारण- दोन्ही अंगांशी एक हृदय जोडलेले आहे. त्याला शालेय शिक्षणातही संघर्ष करावा लागला. त्याला केवळ आठवीपर्यंत शाळा शिकता आली. त्यानंतर त्याने शिक्षण सोडले, असे त्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
किशोर आता बरा आहे आणि रुग्णालयात दाखल केल्यापासून चार दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, डॉक्टरांनी सांगितले की, मुलाला कोणतीही अतिरिक्त आरोग्य समस्या नव्हती. आठवीच्या वर्गात शाळा सोडावी लागलेल्या किशोरने पुन्हा अभ्यास सुरू करण्याचे ठरविले आहे. “मी कुठेही प्रवास करू शकत नव्हतो किंवा कोणतीही शारीरिक क्रिया करण्यात मला अडचणी यायच्या. परंतु, आता मला समोर एक नवीन जग दिसत आहे. मला अभ्यास करण्याची आणि नोकरी मिळण्याची आशा आहे,” असे मुलाने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.