पालक कदाचित हे मान्य करणार नाहीत पण हो, पालकांचं आपल्या अपत्यांपैकी एखाद्या मुलावर जरा जास्तच प्रेम असतं. मुलगा आहे की मुलगी, लहान आहे की मोठं तसंच मूल किती हट्टी आहे, चिडकं आहे तामसी आहे… अशा विविध कारणांमुळे ते आपल्या अनेक अपत्यांपैकी काही अपत्यांवर विशेष मर्जी दाखवतात, हे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. “एका मुलावर प्रेम करायचं व दुसऱ्याचा द्वेष करायचा या बद्दल आपण बोलत नाहीयोत. तर एखादं मूल काही कारणांमुळे खूप आवडणं नी एखाद्या मुलाशी न पटणे किंवा एखाद्या मुलाबरोबर जरा जास्तच वेळ घालवणे, त्याच्यावर जरा जास्तच माया करणे असा हा प्रकार आहे,” ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीचे सह-प्राध्यापक व लेखक अलेक्झांडर जेनसेन यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले.

‘पालकांची मुलीवर जास्त माया असते – मेटा एनालिसिस ऑफ जेंडर अँड अदर प्रेडिक्टर्स ऑफ पॅरेंटल डिफरेन्शिअल ट्रिटमेंट’ हा अभ्यास नुकताच जर्नल सायकोलॉजिकल बुलेटिनमधून प्रसिद्ध झाला आहे.
पालकांच्या अशा वेगवेगळ्या अप्रोचविषयी संशोधकांनी ३० केस स्टडीजचा आणि १४ प्रकाशित न झालेल्या डेटासेटचा अभ्यास केला. यामध्ये दक्षिण अमेरिका आणि पश्चिम युरोपमधून १९ हजारांपेक्षा जास्त जण सहभागी झाले होते.
पालक आपल्या मुलांशी कशाप्रकारे वागतात याचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी काही मुद्दे ठरवले होते. पालकांना त्यांचं आवडतं अपत्य कोणतं हे विचारण्यापेक्षा त्यांच्याकडून ठोस माहितीची विचारणा केली गेली.

वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, पालकांकडून याबाबत माहिती गोळा करण्यासाठी काही प्रश्न त्यांना विचारले गेले.

  • एखाद्या अपत्यासोबत संवाद साधताना पालकांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे का?
  • कोणत्या अपत्यासोबत पालक जास्त वेळ घालवतात?
  • असं अपत्य आहे का ज्याला जास्त आपुलकी, प्रेम मिळतं?
  • जास्त आर्थिक गुंतवणूक आहे का?
  • गृहपाठामध्ये जास्त मदत लागते का?

जेनसेन यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितल्याप्रमाणे, संशोधकांनी मुलांनाही असेच प्रश्न विचारले.
तुमच्या भावंडांपैकी कोणासोबत पालक जास्त वेळ घालवतात?

अभ्यास काय सांगतो?

संशोधकांना या अभ्यासातून असे आढळून आले की पालक मुलींना जास्त माया करतात. कदाचित हे इतर संस्कृतीमध्ये किंवा कुटुंबांमध्ये खरं नसेलही. जेनसेन यांनी सांगितल्याप्रमाणे, काही जुन्या अभ्यासांमधून असा अंदाज आलेला आहे की वडिलांचा ओढा हा मुलाकडे असतो आणि आईचा ओढा हा मुलीकडे असतो. तर आम्हालाही याच अनुषंगाने उत्तरं अपेक्षित होती. पण इथे तर वडील मुलींनाही तेवढीच माया करतात असं दिसून आलं आहे.
नवीन अभ्यासातून असे दिसून आले की कुटुंबातल्या मोठ्या अपत्याला आपुलकी, माया मिळतेच. शिवाय त्यांना जास्त स्वातंत्र्यही मिळतं. मोठं भावंडं म्हणूनही त्यांना जास्त स्वातंत्र्य मिळतं असं जेनसेन यांनी सांगितलं.
दुसरीकडे, पालकसुद्धा जी मुलं त्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐकतात आणि प्रामाणिकपणे सांगितलेल्या गोष्टींचं पालन करतात त्यांच्यावर जास्त माया करतात.

हे का गरजेचं आहे?

आधीच्या अभ्यासातून असे आढळले की ज्या मुलांना कमी माया, आपुलकी मिळते किंवा त्यांच्याकडे कमी प्रमाणात लक्ष दिलं जातं, त्यांचा एकंदर जडण घडणीवरही आणि एकंदर शालेय किंवा वैयक्तिक कामगिरीवरही परिणाम होतो. काही वेळा ते नैराश्यातून जातात किंवा रागीट स्वभावाची होतात. परिणामी त्यांना शाळेतही त्याचा त्रास होऊ शकतो. संशोधकांना अशी अपेक्षा आहे की त्यांचे हे अनुमान थेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ते किंवा कौटुंबिक सल्ले देणारे तज्ज्ञ यांना जास्त उपयुक्त ठरतील. अशाने मुलांशी वागताना काय काळजी घ्यावी किंवा मुलांशी कसा संवाद साधावा याबाबत त्यांना पालकांना मदत करता येऊ शकतो.

जेनसेन यांनी असेही म्हटले की प्रत्येक पालक आपल्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने हाताळणार आहे. मात्र आम्ही आमच्या मुलाला वेगळ्या पद्धतीने सांभाळतो, मी फारच गडबड केलेली आहे असं म्हणत पालकांनी या अभ्यासाकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पाहू नये. पालकांनी असा अनुमान न काढता उलट याकडे लक्ष द्यावं की काही वेळा वेगवेगळ्या पद्धतीने वागणूक देणं हे अडचणीचं ठरू शकतं असंही त्यांनी म्हटले.

Story img Loader