Paris Olympics 2024 क्रीडाविश्वातील सर्वांत मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यंदा फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होत आहेत. यंदाचे ऑलिम्पिक अगदी उद्घाटन सोहळ्यापासूनच वेगळे ठरणार आहे. ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या स्टेडियमऐवजी सीन नदीवर उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे १८ दिवस चालणाऱ्या या स्पर्धांत विविध विक्रम रचले जाणे, पदकांची लयलूट होणे, नवे तारे उदयास येणे आणि प्रस्थापितांकडून वर्चस्व सिद्ध केले जाणे अपेक्षित आहे. याच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑलिम्पिकला नक्की कधी सुरुवात?

ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (२६ जुलै) होणार असला, तरी काही खेळांच्या स्पर्धांना बुधवारपासून (२४ जुलै) सुरुवात झाली आहे. यात फुटबॉल, रग्बी सेव्हन्स, हँडबॉल आणि तिरंदाजी या खेळांचा समावेश आहे. भारतासाठी ऑलिम्पिकची सुरुवात तिरंदाजीपासून होणार आहे. तिरंदाजीत भारताकडून पुरुषांमध्ये तरुणदीप राय, प्रवीण जाधव आणि धीरज बोम्मादेवरा, तर महिलांमध्ये दीपिका कुमारी, अंकिता भाकट आणि भजन कौर या सहभाग नोंदवतील.

हेही वाचा…INS ब्रह्मपुत्रा पुन्हा वापरात येणार की मोडीत निघणार?

यंदा किती पदकांची लयलूट?

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांत ३२ क्रीडा प्रकारांत मिळून तब्बल ३२९ सुवर्णपदकांची लयलूट होणार आहे. यापैकी ३९ पदके ही ऑलिम्पिकच्या शेवटून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार, १० ऑगस्टला दिली जाणार आहेत. पॅरिस येथे होत असलेल्या ऑलिम्पिकच्या ३४व्या पर्वात पदक मिळवण्याची पहिली संधी नेमबाजांना मिळणार आहे. शनिवार, २७ जुलैला नेमबाजीच्या एअर रायफल प्रकारातील मिश्र सांघिक गटात पदकाची फेरी होणार आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधील अखेरचे पदक हे महिला बास्केटबॉलमध्ये रविवार, ११ ऑगस्टला दिले जाणार आहे.

कोणत्या नव्या खेळांचा समावेश?

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये केवळ एका नव्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. हा खेळ म्हणजे ‘ब्रेकिंग’. न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स येथे १९७० च्या काळात हा नृत्यप्रकार निर्माण झाला. मात्र, पुढे जाऊन त्याला खेळाचे स्वरूप प्राप्त झाले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अगदी अखेरच्या टप्प्यात ‘ब्रेकिंग’च्या स्पर्धा होणार आहेत. महिलांची स्पर्धा ९ ऑगस्ट, तर पुरुषांची स्पर्धा १० ऑगस्टला होईल. दोन्ही विभागांत प्रत्येकी १६ स्पर्धकांचा सहभाग असेल. बेसबॉल/सॉफ्टबॉल आणि कराटे या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळल्या गेलेल्या क्रीडा प्रकारांना यंदाच्या स्पर्धांतून वगळण्यात आले आहे. स्पोर्टस क्लाइंबिंग खेळात अधिक पदके दिली जाणार आहे. कयाकिंगमधील ‘क्रॉस’ प्रकाराचे ऑलिम्पिक पदार्पण होणार आहे.

हेही वाचा…Kathmandu Plane Crash: नेपाळमध्ये विमान अपघातांचे प्रमाण सर्वाधिक का आहे?

मॅस्कॉट म्हणून चक्क हॅट!

पॅरिस ऑलिम्पिकसाठी मॅस्कॉट अर्थात शुभंकर म्हणून ‘फिर्जियन हॅट’ची निवड करण्यात आली आहे. याला ‘लिबर्टी हॅट’ असेही संबोधले जात आहे. लाल रंगाच्या या हॅटला फ्रान्सच्या इतिहासात विशेष महत्त्व प्राप्त आहे. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून या हॅटकडे पाहिले जाते. त्यामुळे फ्रान्सच्या इतिहासाला वर्तमानाशी जोडण्याचा प्रयत्न ऑलिम्पिकच्या आयोजकांकडून करण्यात आला आहे.

रोख पारितोषिक दिले जाणार का?

ऑलिम्पिक स्पर्धा हौशी या परंपरेत मोडतात. येथे कधीही रोख पारितोषिक दिले जात नाही. मात्र, जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने आता वेगळी भूमिका घेण्याचे धाडस दाखवले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपासून जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने ‘ट्रॅक अँड फिल्ड’ प्रकारातील प्रत्येक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला रोख ५० हजार डॉलर पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला आहे. रिले शर्यतीसाठी ५० हजार डॉलरचे पारितोषिक चार जणांत वाटून देण्यात येईल. रौप्य आणि कांस्यपदक विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यास २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपासून सुरुवात होईल.

हेही वाचा…विश्लेषण : ठाणे, मुंबई, नवी मुंबईला ‘चौथी मुंबई’ जोडण्यासाठी नवा रस्ता? काय आहे हा प्रकल्प? 

रशियाच्या खेळाडूंना प्रवेश मिळणार?

युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि त्यांना मदत करणाऱ्या बेलारूसवर क्रीडाक्षेत्रात बंदी घालण्यात आली. ऑलिम्पिकमध्ये ही बंदी कायम असली, तरी रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना या स्पर्धांत खेळता येणार आहे. मात्र, ते आपल्या देशाच्या ध्वजाखाली न खेळता, वैयक्तिक तटस्थ खेळाडू (एआयएन) म्हणून खेळणार आहेत. तसेच ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात या खेळाडूंना सहभाग घेता येणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओसी) स्पष्ट केले आहे.

हेही वाचा…विश्लेषण : ‘कोटा फॅक्टरी’ला घरघर? कोचिंग शहरातील विद्यार्थी संख्या घटण्याची कारणे कोणती?

सीन नदीत भव्य उद्घाटन…

सीन नदीच्या ३.७ मैल पात्रात ऑलिम्पिकचे उद्घाटन होईल. गारे देऑस्टरलिझ येथून उद्घाटन मिरवणुकीला सुरुवात होईल. नॉत्र दाम कॅथेड्रल, कन्सीर्गेरी पॅलेस अशा अनेक वास्तूंवरून ही मिरवणूक आयफेल टॉवरपाशी संपेल. फ्रान्स आणि जागतिक इतिहासातील १२ घटनांचे सादरीकरण उद्घाटन सोहळ्यात होणार आहे. ते नेमके कसे असेल, यावेळी गोपनीयता बाळगली जात आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमान्युएल माक्राँ आणि पॅरिसच्या महापौर अॅनी हिगाल्डो यांनाही फार माहिती देण्यात आलेली नाही. थॉमस जॉली हे फ्रान्समधील रंगकर्मी सोहळ्याचे दिग्दर्शक आहेत. १० हजार खेळाडूंची ९० बोटींमधून परेड होईल. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री ११ वा.) सोहळ्यास सुरुवात होईल आणि तो साडेतीन तास चालणे अपेक्षित आहे. पॅरिस शहरात त्यावेळी सुरक्षेसाठी ५० हजार पोलीस सज्ज असतील. पंधराव्या लुईच्या कन्येच्या विवाहानंतर म्हणजे तब्बल २८५ वर्षांनी सीन नदीमध्ये अशा प्रकारे ‘तरंगता’ समारंभ होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris 2024 historic olympic opening on seine river new events and unique highlights print exp psg
Show comments