२०१८ च्या लैंगिक छळ प्रकरणात मोहाली न्यायालयाने मंगळवारी पाद्री बाजिंदर सिंग याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मोहाली न्यायालयाने आरोपीची दया याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने निर्णय देताना म्हटले की, जी व्यक्ती स्वतःला धार्मिक नेता म्हणते, ती त्याच्यावर श्रद्धा करणाऱ्या लोकांविरुद्ध असा गुन्हा करू शकत नाही. पाद्री बाजिंदर सिंग लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेचे वकील अनिल सागर म्हणाले, “ते आध्यात्मिक नेते म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांचे अनुयायी त्यांना ‘पापाजी’ म्हणतात. जेव्हा अशी व्यक्ती असे कृत्य करीत असेल, तर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. आम्ही त्यांना दिलेल्या शिक्षेबाबत समाधानी आहोत. त्याला शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात राहावे लागेल.” नेमके हे प्रकरण काय आहे? बाजिंदर सिंगवर काय आरोप आहेत? बाजिंदर सिंग नक्की कोण आहे? त्याविषयी जाणून घेऊ.
बाजिंदर सिंग दोषी
पाद्री बाजिंदरला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३२३ (शारीरिक इजा) व ५०६ (धमकी)अंतर्गत दोषी ठरविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात मोहाली न्यायालयाने २०१८ च्या लैंगिक छळ प्रकरणात पाद्री बाजिंदर सिंगला दोषी ठरवले होते. निकालावर प्रतिक्रिया देताना, या प्रकरणातील पीडितेने म्हटले, “बाजिंदर मानसिक रोगी आहे आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही तो गुन्हा करील म्हणून तो तुरुंगातच राहावा, अशी माझी इच्छा आहे. आज अनेक मुलींचा (पीडितांचा) विजय झाला आहे. आमच्यावर हल्ल्याची शक्यता असल्याने मी डीजीपींना आमची सुरक्षा वाढविण्यात यावी, अशी विनंती करतो.”
सात वर्षांनी प्रकरणाचा निकाल
पीडित महिलेच्या पतीने सात वर्षे हा खटला लढला. त्यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले. “आम्ही या खटल्यासाठी सात वर्षे संघर्ष केला. तो (दोषी) न्यायालयाची दिशाभूल करायचा आणि परदेश दौरे करायचा, तर न्यायालयाच्या आदेशांनी त्याला तसे करण्याची परवानगी दिली नाही. माझ्यावर खोटे एफआयआर दाखल करण्यात आले, आमच्यावर हल्ला झाला, मी सहा महिने तुरुंगात घालवले आणि नंतर मी त्याला शिक्षा व्हावी यासाठी दृढनिश्चय केला. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास होता. मला त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी इच्छा आहे. सहा आरोपी होते; त्यापैकी पाच जणांवरील खटला रद्द करण्यात आला आहे आणि पाद्री बजिंदरला दोषी ठरविण्यात आले आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो,” असे ते म्हणाले.

पीडितेचे वकील अनिल सागर यांनी योग्य शिक्षेची गरज असल्याचे सांगितले. “बलात्काराच्या गुन्ह्यासाठी प्रकरणाच्या परिस्थितीनुसार १०-२० वर्षांची शिक्षा आहे. या प्रकरणात, मी जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, अशी प्रार्थना करतो. कारण- ही व्यक्ती धर्माच्या नावाखाली लोकांना फसवीत आहे. त्याला योग्य ती शिक्षा देणे महत्त्वाचे आहे. मला आशा आहे की, यानंतर अशा गुन्ह्यांना सामोरे जाणाऱ्या मुली पुढे येऊन आवाज उठवतील आणि अत्याचारांबद्दल बोलतील,” असे ते म्हणाले.
२०१८ मधील प्रकरण काय?
२०१८ मध्ये झिरकपूर पोलिस ठाण्यात एका महिलेने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. दाखल केलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीत महिलेने आरोप केला होता की, बाजिंदर सिंगने तिला परदेशात नेण्याचे आमिष दाखवले आणि मोहालीच्या सेक्टर ६३ मधील त्याच्या निवासस्थानी तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ तयार केला. तिने आरोप केला की, बाजिंदरने त्याच्या मागण्या मान्य न केल्यास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली होती. ही घटना प्रार्थना सत्रानंतर घडली.
पीडित महिलेने दावा केला की, तिच्यासह इतरांबरोबरही गैरवर्तन आणि शारीरिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणावर बोलताना पोलीस उपायुक्त मोहित कुमार अग्रवाल म्हणाले, “पीडित महिला आणि इतर तीन ते चार लोकांनी आम्हाला सांगितले आहे की, प्रार्थना सत्र झाल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले आणि त्यांना मारहाण करण्यात आली. महिलेने तक्रार दाखल केली आहे आणि तिचा जबाबही नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल.”
पाद्री बाजिंदर सिंग कोण आहे?
धार्मिक मेळाव्यांमध्ये कर्करोग आणि एड्ससारख्या आजारांवर नाट्यमयरीत्या उपचार करणाऱ्या बाजिंदर सिंग याची ‘मेरा येशू-येशू’ गाण्याची इन्स्टाग्राम रील मोठ्या प्रमाणात शेअर केली जाते. बाजिंदर सिंगच्या यूट्यूब चॅनेलवर ३.७४ दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत. सोशल मीडियावर सिंग याचे बाजिंदर सिंग मिनिस्ट्री नावाचे पेज आहे. त्यावर त्याची आध्यात्मिक प्रतिमा सादर केली जाते.
त्याचा जन्म १९८२ मध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांची सरकारी नोकरी होती. सिंगने त्याच्या बालपणीविषयी बोलताना असा दावा केला आहे की, शालेय शिक्षण सुरू असताना त्याला काही नकारात्मक शक्तींनी छळले होते, ज्यामुळे तो नैराश्यात गेला होता. त्याच्याबरोबर काम करणाऱ्या काही सहकाऱ्यांनी सांगितले की, सिंग हा हरियाणाच्या यमुनानगरमधील एका जाट कुटुंबातील आहे. त्याने १५ वर्षांपूर्वी हत्येच्या एका गुन्ह्यात तुरुंगवास भोगला. त्यावेळीच त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला.
त्याच्या पेजवर असेदेखील सांगण्यात आले आहे की, तुरुंगवासाच्या काळात त्याने नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार केला होता. त्याने केलेल्या दाव्यानुसार त्याने अनेक देवतांची नावे घेतली; परंतु त्याला कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यानंतर त्याची भेट ख्रिश्चन धर्माची ओळख करून देणाऱ्या एका पाद्रीशी झाली. सिंग याचा दावा आहे की, दैवी दृष्टान्तांमुळे त्याची निर्दोष मुक्तता झाली. सिंग याचे सेवाकार्य कायम वादात राहिले आहे. त्याच्यावर आर्थिक फसवणुकीपासून लैंगिक गैरवर्तनापर्यंतचे आरोप करण्यात आले आहेत.