पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाची व्याप्ती किती?
पेण शहर आणि परिसरात गणेशमूर्ती बनवणाऱ्या ५५० हून अधिक कार्यशाळा आहेत. इथे दरवर्षी सुमारे ३५ लाख गणेशमूर्ती तयार केल्या जातात. यातून जवळपास ८० कोटी रुपयांची उलाढाल होते आणि २३ ते २४ हजार लोकांना वर्षभर रोजगार उपलब्ध होतो. राज्यातील गणेशमूर्तींपैकी ५० टक्के एकट्या पेणमध्ये तयार होतात.
यावर्षी नेमके झाले काय?
गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच पेणमध्ये पुढच्या वर्षीसाठी गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू होते. शाडूची माती आणि पीओपी अशा दोन माध्यमांतून ३५० हून अधिक प्रकारच्या मूर्ती इथे तयार केल्या जातात. त्यात पीओपीच्या गणेशमूर्तींचे प्रमाण अधिक असते. यावर्षी जवळपास १० लाख गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत. पण आता पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात आल्याने, या तयार गणेशमूर्तींचे करायचे काय हा प्रश्न मूर्तिकारांना पडला आहे. त्यांनी गणेशमूर्ती व्यवसायासाठी बँकांकडून कर्जे घेतली आहेत. गणेशमूर्तींची विक्री झाली नाही, तर कर्जाची परतफेड करणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे हा व्यवसाय आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यावसायिकांना वाटत आहे.
पीओपी गणेशमूर्तींवर बंदी का घातली?
केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार २०१० साली पर्यावरणपूरक सण, उत्सव साजरे करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. २०२० साली त्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या गेल्या. यानुसार नैसर्गिक जलस्राोतांमध्ये पर्यावरणपूरक नसलेल्या मूर्तींच्या विसर्जनावर निर्बंध लागू केले गेले. त्यांचे पालन न झाल्यामुळे पर्यावरणवादी संस्था न्यायालयात गेल्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांना संबंधित नियमावलीचे काटेकोर पालन करावेच लागेल, आणि तिची अंमलबजावणी व्हायलाच हवी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाकडून पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदीबाबत पावले उचलली गेली आहेत.
कठोर भूमिका घेण्यामागची कारणे ?
केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाच्या मार्गदर्शक सूचना, सुधारित मार्गदर्शक सूचना, गणेशमूर्ती कशा असाव्यात याबाबत पर्याय या कशाचीच अंमलबजावणी झाली नाही. मूर्तिकारांचे नुकसान होऊ नये म्हणून पाच वर्ष नियमांचे काटेकोर पालन करण्याकडे दुर्लक्ष केले गेले. तरीही पीओपी गणेशमूर्ती बनवणे सुरूच राहिल्याने, न्यायालयाने नाराजी व्यक्त करून कठोर धोरण स्वीकारले आहे.
ही पीओपी बंदी महाराष्ट्रापुरती आहे का?
पीओपीच्या गणेशमूर्तींवर फक्त महाराष्ट्रातच निर्बंध आहेत, असा मूर्तिकारांचा आक्षेप आहे. शेजारील गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पीओपीच्या गणेशमूर्तींवर कुठलेच निर्बंध नसल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाची नियमावली ही संपूर्ण देशासाठी लागू आहे. महाराष्ट्रातील पर्यावरणवादी संघटनांनी या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने, न्यायालयात दाद मागितल्यामुळे, न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू झाली आहे.
पीओपी मूर्तींवरील बंदी उठेल का?
पेणमध्ये जवळपास दहा लाख पीओपीच्या गणेशमूर्ती तयार झाल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे राज्य सरकारकडून तात्पुरता दिलासा मिळेल आणि तयार मूर्ती बाजारात विकता येईल अशी आशा मूर्तिकारांना आहे. या संदर्भात राज्यभरातील गणेशमूर्तिकारांनी राज्य सरकारशी मुंबईत विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा केली. यावेळी पीओपी मूर्ती बंदीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील मूर्तिकार संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर पीओपीच्या गणेशमूर्तींचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
पीओपीच्या गणेशमूर्तीमुळे खरेच प्रदूषण होते का?
पीओपीचे नैसर्गिकदृष्ट्या विघटन होत नाही. नदी तलावात विसर्जन केल्यास दीर्घकाळ ते तसेच राहते. पीओपीमधील सल्फेट हा घटक जल परिसंस्थेवर परिणाम करू शकतो. मातीमध्ये पीओपी मिसळल्यास मातीचा पोत बिघडतो, मातीची पोषण मूल्य कमी झाल्याने उत्पादकतेवर परिणाम होतो. त्यामुळे पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन करू नये असे सांगितले जाते. मात्र मूर्तिकार वापरतात त्या पीओपीमुळे प्रदूषण होते हे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने या संदर्भात अभ्यास करून निर्णय घेणे आवश्यक आहे, असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे.
harshad.kashalkar@expressindia.com