अपस्माराच्या (एपिलेप्सी) रुग्णांना कधीही येणारे झटके ही मोठी समस्या असते. यामुळे या रुग्णांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होतो. आता या रुग्णांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. अपस्माराच्या रुग्णाच्या डोक्यात न्यूरोस्टिम्युलेटर उपकरण बसविण्याचा प्रयोग यशस्वीपणे करण्यात आला आहे. या उपकरणातून मेंदूच्या आतमध्ये इलेक्ट्रिक सिग्नल सोडले जातात. त्यामुळे एका रुग्णाला दिवसा झटके येण्याचे प्रमाण तब्बल ८० टक्क्यांनी कमी झाले. अपस्माराच्या रुग्णांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडविणारा हा प्रयोग ठरणार आहे.

झटक्यांमुळे होणारा जीवघेणा त्रास काय असतो?

ब्रिटनमधील ओरान नोल्सन या १३ वर्षीय मुलावर हा प्रयोग करण्यात आला. ओरानला वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अपस्माराचा त्रास सुरू झाला. त्याला दररोज अपस्माराचे झटके येत होते. त्याचे झटक्यांचे प्रमाण २४ पासून १०० पर्यंत होते. झटका आल्यानंतर तो जमिनीवर कोसळून त्याचे शरीर अतिशय जोरात हलत असे आणि नंतर तो बेशुद्ध होई. काही वेळा त्याची श्वसनक्रिया बंद पडल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्याची वेळ येत असे. ओरान हा गतिमंद असून, त्याला सर्वाधिक त्रास अपस्माराच्या झटक्यांचा होता. त्याला अपस्माराचे झटके सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच त्याने आधी शिकलेली सर्व कौशल्ये गमावली. या आजारपणामुळे त्याच्यापासून बालपण हिरावले गेले होते.

हेही वाचा : TISS मध्ये १०० कर्मचाऱ्यांच्या नोकरकपातीचा निर्णय अखेर मागे; नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेत नेमकं काय चाललंय?

नेमका प्रयोग काय केला गेला?

तीव्र अपस्माराचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी कॅडेट हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यात ग्रेट ऑरमाँड स्ट्रीट हॉस्पिटल, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, किंग्ज कॉलेज हॉस्पिटल आणि युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ओरानच्या कवटीत पिकोस्टिम न्यूरोस्टिम्युलेटर बसविण्यात आला. ब्रिटनमधील ॲम्बर कंपनीने हा न्यूरोस्टिम्युलेटर बनविला आहे. हे उपकरण बसविलेला तो पहिलाच रुग्ण ठरला. लंडनमधील ग्रेट ऑर्मंड स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल ८ तास ही शस्त्रक्रिया चालली.

पिकोस्टीम कसे कार्य करतो?

अपस्माराचा झटका हा मेंदूतील असाधारण विद्युत घडामोंडीमुळे येतो. पिकोस्टीम न्यूरोस्टिम्युलेटर मेंदूत विद्युत प्रवाह सातत्याने सोडतो. यामुळे असाधारण विद्युत प्रवाहांना अडथळा निर्माण होतो अथवा ते रोखले जातात. ओरानच्या मेंदूच्या थलॅमस भागात दोन इलेक्ट्रोड बसविण्यात आले. यात त्रुटीची शक्यता एक मिलिमीटरपेक्षाही कमी होती. या इलेक्ट्रोडची टोके न्यूरोस्टिम्युलेटरला जोडण्यात आली. या न्यूरोस्टिम्युलेटरचा आकार ३.५ चौरस सेंटिमीटर असून, त्याची जाडी ०.६ सेंटिमीटर आहे. ओरानच्या कवटीचा काही भाग काढून तिथे न्यूरोस्टिम्युलेटर बसविण्यात आला.

हेही वाचा : प्राचीन ‘विद्वान योद्धा’ आता भारतीय लष्करात; काय आहे नेमकी ही संकल्पना?

रुग्णावर परिणाम काय झाला?

ओरानवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला बरे होण्यास एक महिन्याचा अवधी देण्यात आला. त्यानंतर न्यूरोस्टिम्युलेटर सुरू करण्यात आला. न्यूरोस्टिम्युलेटर सुरू करण्यात आल्यानंतर त्याची जाणीवर ओरानला होत होती. वायरलेस हेडफोनच्या सहाय्याने तो न्यूरोस्टिम्युलेटर चार्ज करू शकतो. त्यामुळे टीव्ही पाहत असतानाही त्याला ही चार्जिंगची प्रक्रिया अगदी सहजपणे पार पाडता येते. त्याला अपस्माराचा झटका येण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. दिवसा कधी त्याला अपस्माराचा झटका आल्यास तो खाली पडत नाही, कारण त्याबद्दल आधीच त्याला संकेत मिळालेले असतात. याचबरोबर रात्रीच्या वेळीचे झटकेही अगदी कमी आणि सौम्य झाले आहेत.

फायदा काय आहे?

अपस्माराचा त्रास असलेल्या लहान मुलांमध्ये असा न्यूरोस्टिम्युलेटरचा प्रयोग आधीपासून करण्यात येतो. तो छातीत बसवून नंतर तो वायरच्या सहाय्याने मेंदूशी जोडला जातो. आता थेट मेंदूमध्ये तो बसविण्यात आला आहे. यामुळे मेंदूच्या आतील क्रिया अधिक अचूकपणे कळण्यास मदत होत आहे. अपस्माराचा तीव्र त्रास असलेल्या रुग्णांच्या मेंदूतील क्रिया तपासून स्टिम्युलेटरद्वारे त्यावर प्रभावीपणे उपचार शक्य होत आहेत. यामुळे रुग्णाच्या प्रकृतीतील गुंतागुंत कमी होण्यास मदत होत आहे. कवटीत न्यूरोस्टिम्युलेटर बसविल्यामुळे शस्त्रक्रियेनंतरचा संसर्ग आणि उपकरण बंद पडणे, या दोन्ही गोष्टी टाळण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

हेही वाचा : नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकर अनुयायांचे आंदोलन का?

भविष्यात काय घडू शकते?

न्यूरोस्टिम्युलेटर अपस्माराचे झटके पूर्णपणे रोखू शकेल, या दिशेने संशोधकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मेंदूच्या क्रियेतील बदल तातडीने जाणून घेऊन अपस्माराचा झटका येण्यास प्रतिबंध होईल, असा उद्देश यामागे आहे. यासाठी लवकरच वैद्यकीय चाचण्या सुरू केल्या जाणार आहेत. ओरानवर सध्या करण्यात आलेले उपचार हे अपस्मार पूर्णपणे बरे करणारे नाहीत. मात्र, अपस्माराचा त्रास कमी करणारे ठरल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यामुळे अपस्माराचे झटक येणाऱ्या रुग्णांचे आयुष्य सुसह्य करणारे हे संशोधन ठरणार आहे.

sanjay.jadhav@expressindia.com