Peru Fisherman Lost at Sea : ‘लाइफ ऑफ पाय’ हा चित्रपट अनेकांनी बघितला असेल. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या चित्रपटात एक तरुण मुलगा ‘रिचर्ड पार्कर’ हा खोल समुद्रात एका बोटीवर वाघाबरोबर अडकून पडतो. त्याच्या जीवनाच्या संघर्षाची गाथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात असाच काहीसा प्रसंग पेरू येथील एका मच्छीमाराच्या जीवनात घडल्याचा दावा केला जात आहे. पेरूच्या मार्कोना शहरात राहणारे ६१ वर्षीय मच्छीमार मॅक्सिमो नापा कॅस्ट्रो हे ७ डिसेंबर २०२४ रोजी समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मात्र, खराब हवामानामुळं त्यांची बोट भरकटली आणि ते खोल समुद्रात अडकले.
बोटीवर कोणतंही रेडिओ उपकरण आणि संपर्काचं साधन नसल्यानं त्यांचा मुख्य भूमिशी संपर्क तुटला. जवळपास ९५ दिवस ते समुद्रातच राहिले. ११ मार्च २०२५ रोजी उत्तर पेरूच्या किनाऱ्याजवळ इक्वेडोरच्या जहाजानं कॅस्ट्रो यांची सुटका केली. ‘firstpost’च्या वृत्तानुसार, कॅस्ट्रो जेव्हा समु्द्रकिनाऱ्यावर आले, तेव्हा ते भुकेनं आणि तहानेनं व्याकूळ झालेले होते. १५ दिवसांपासून त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच नाजूक झालेली होती. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचार घेतल्यानंतर कॅस्ट्रो यांनी त्यांच्याबरोबर घडलेला प्रसंग माध्यमांना सांगितला.
कॅस्ट्रो यांनी सांगितला थरारक प्रसंग
स्थानिक माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कॅस्ट्रो म्हणाले, “७ डिसेंबर २०२५ रोजी मी दक्षिण पेरूमधील किनारी शहर मार्कोना येथून दोन आठवड्यांच्या मासेमारीसाठी खोल समुद्रात गेलो. प्रवासाच्या दहा दिवसांनंतर, खराब हवामानामुळं माझी बोट समुद्रात भरकटत गेली. बोटीचे इंधन संपल्यानंतर काहीच सुचत नव्हतं. त्यातच बोटीवर कोणतंही रेडिओ उपकरण आणि दळवळणाचं साधन उपलब्ध नव्हतं. माझ्याबरोबर मोबाइल असूनही त्याचा मला फायदा झाला नाही, कारण खोल समुद्रात मोबाइलला नेटवर्क नव्हते. त्यातच बोटीचं इंजिन बंद पडल्यानं मोबाइलची चार्जिंगही संपून गेली.”
आणखी वाचा : Pakistan Terrorists : पाकिस्तानमध्ये कुणाची दहशत? भारताच्या कट्टर शत्रूंना कोण संपवतंय?
बोटीतील अन्न पाणीही संपलं
पुढे बोलताना कॅस्ट्रो म्हणाले, “कुणीतरी आपल्या मदतीला येईल याची आस मला लागली होती. परंतु, आठवडाभराचा कालावधी लोटला, तरीही मला मदत मिळाली नाही. विशेष म्हणजे, या आठ दिवसांत माझ्या बोटीच्या काही अंतरावरूनच लहान-मोठी जहाजं गेली. मी त्यांना मदतही मागण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्यापर्यंत माझी आर्त हाक पोहोचली नाही. महिनाभरात माझ्या बोटीवर असलेलं अन्न पाणीही संपलं, ज्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली. जिवंत राहण्यासाठी मला झुरळं, पक्षी, कच्चे मासे आणि समुद्रातील कासवं खावी लागली.”
कीटक खाऊन भागवली उपजीविका
कॅस्ट्रो म्हणाले, “माझ्यासाठी एक तास हा एक महिन्यासारखा होता. बोटीवरील पिण्याचं पाणीही संपलं होतं. समुद्रातील पाणी पिण्यायोग्य नसतं म्हणून मी बोटीवर साचलेलं पावसाचं पाणी पिऊन तहान भागवत होतो. भूक लागली तर पोट भरण्यासाठी कीटक आणि पक्षी खावे लागत होते. या काळात मी एक कासवही खाल्लं”, असंही कॅस्ट्रो यांनी माध्यमांना सांगितलं. ते म्हणाले, “शेवटचे १५ दिवस माझ्यासाठी सर्वात कठीण होते, कारण या काळात मला काहीही खायला मिळालं नाही. लवकरच माझा मृत्यू होणार असं मला वाटत होतं. परंतु, कुटुंबीयांचा चेहरा आठवून मी जगण्याची आशा सोडली नाही.”
‘कुटुंबीयांच्या आठवणीनं मला जिवंत ठेवलं’
“कुटुंबाच्या आठवणींनी मला जिवंत राहण्याचं धाडस दिलं. मला माझ्या आईसाठी जगायचं होतं. तिला डोळे भरून पाहावं अशी इच्छा होत होती. मला एक छोटी नातही असून तिचा चेहरा नेहमी माझ्यासमोर यायचा. त्यांच्या आठवणीत मी कित्येकवेळा रडलो असेल याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. मी माझ्या आईबद्दल विचार करायचो आणि स्वतःला म्हणायचो की मला परत जायचं आहे. मी जीवनाची लढाई इतक्या लवकर हरू शकत नाही”, असंही कॅस्ट्रो यांनी माध्यमांना सांगितलं.
कॅस्ट्रोला शोधण्यासाठी कुटुंबीयांची विनंती
दोन महिने झाले तरी मुलगा समुद्रातून परत आला नसल्याने कॅस्ट्रो यांचे कुटुंब चिंतेत होते. त्यांच्या आई एलेना पाणावलेल्या डोळ्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “माझा मुलगा हरवला आहे, अशी तक्रार मी पेरूमधील नौदलाकडे दाखल केली. त्यांनी आम्हाला सहकार्य करत अनेक दिवस कॅस्ट्रोचा शोध घेतला. मात्र, त्यांना तो कुठेही आढळून आला नाही. कदाचित कॅस्ट्रोची बोट समुद्रात उलटली असेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल, असा अंदाज नौसैनिकांनी बांधला होता. परंतु, आम्ही आशा सोडली नव्हती. कॅस्ट्रो परत येईल असं आम्हाला नेहमी वाटायचं.”
कॅस्ट्रोच्या मुलीची भावनिक पोस्ट
या काळात कॅस्ट्रो यांच्या मुलीनेही फेसबूक तसेच इतर समाजमाध्यमांवर आपले वडील हरवल्याची पोस्ट शेअर केली. ती म्हणाली की, माझे वडील ७ डिसेंबरपासून समुद्रात मासेमारीसाठी गेलेले आहेत, ते अजूनही परत आलेले नाहीत. आम्हाला त्यांची खूपच काळजी वाटत आहे. कुटुंबीयांसाठी प्रत्येक दिवस हा वेदना वाढवणारा ठरत आहे. माझ्या वडिलांच्या आठवणीत आईनेही खाणं-पिणं सोडलं आहे. कृपया प्रत्येकाने माझ्या वडिलांना शोधण्यास आमची मदत करावी, अशी विनंती कॅस्ट्रो यांच्या मुलीने समाजमाध्यमांवर केली.
कॅस्ट्रोच्या शोधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न
दरम्यान, कॅस्ट्रोच्या कुटुंबीयांची आर्त हाक पेरू सरकारपर्यंत पोहोचली. ६१ वर्षीय कॅस्ट्रोचा शोध पुन्हा घ्यावा, अशी विनंती स्थानिक प्रशासनानं नौदलकडे केली. त्यानंतर अनेक हेलिकॉप्टर्स आणि नौदलांच्या जहाजांनी खोल समुद्रात कॅस्ट्रोच्या बोटीचा शोध घेणं सुरू केलं. आठ दिवसांच्या शोधकार्यानंतर पेरूव्हियन समुद्रकिनाऱ्यापासून अंदाजे ११०० किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात कॅस्ट्रोची बंद पडलेली बोट आढळून आली. ११ मार्च रोजीच इक्वेडोरच्या एका मासेमारी बोटीनं कॅस्ट्रोची सुटका केली आणि त्याला सुरक्षित समुद्रकिनाऱ्यावर आणलं.
वैद्यकीय अधिकारी काय म्हणाले?
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जेव्हा कॅस्ट्रो यांना नुएस्ट्रा सेनोरा डे लास मर्सिडीज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तेव्हा त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. डिहायड्रेशन आणि तीव्र थकवा असल्यानं त्यांना आपण कुठे आहोत, याची जाणीव नव्हती. ते बेशुद्ध अवस्थेत होते. आम्ही त्यांच्यावर उपचार केले असून आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी माध्यमांना दिली. त्यानंतर कॅस्ट्रो यांना भेटण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना परवानगी देण्यात आली. जवळपास ९५ दिवसांनी लेकाची भेट झाल्यानंतर कॅस्ट्रो यांच्या आईनं हंबरडा फोडला होता. चार दिवसांपूर्वीच १४ मार्च रोजी कॅस्ट्रो यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
कॅस्ट्रो अन्न पाण्याशिवाय कसे जगले?
दरम्यान, कॅस्ट्रो हे ९५ दिवस समुद्रात अन्नपाण्याशिवाय कसे राहू शकतात, असा प्रश्न पेरूमधील काही व्यक्तींनी उपस्थित केला. कदाचित ते खोटं बोलत असावे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. याबाबत नॅशनल जिओग्राफिकशी बोलताना ड्यूक विद्यापीठातील वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. क्लॉड पियान्टाडोसी म्हणाले, “आम्ही कॅस्ट्रोच्या शरीराची पूर्णत: तपासणी केली आहे. त्यातून हे स्पष्ट होतं की, ते दोन-तीन महिन्यांपासून समुद्रात अडकून पडले असावे. खोल समुद्रात आढळणाऱ्या बहुतेक पदार्थांचे अंश त्यांच्या शरीरात आढळून आले आहेत.”
२०१४ मध्येही समुद्रात अडकला होता मच्छीमार
“समुद्रातील दुर्मीळ कासवं, पक्षी आणि कच्चे मासे खाण्यास सुरक्षित आहेत, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वं मिळतात. कॅस्ट्रोने नकळत ते खाल्ले, परंतु ते त्यांच्यासाठी पोषण ठरले, असंही डॉ. क्लॉड यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, समुद्रात मच्छीमार अडकून पडल्याची ही काही पहिलीच घटना नाही. २०१४ मध्येही पॅसिफिक महासागरात जोस साल्वाडोर अल्वारेंगा हा मच्छीमार तब्बल १३ महिने अडकून पडला होता. या काळात त्याच्या बोटीने तब्बल आठ हजार किलोमीटर प्रवास केला. बोटीवरील अन्न पाणी संपल्यामुळे अल्वारेंगानेही पावसाचे पाणी, समुद्रातील पक्षी आणि कच्चे मासे खाऊन आपली उपजीविका भागवली होती. एका व्यापारी जहाजाने त्याची १३ महिन्यांनंतर सुटका केली होती.