भूतदया असणे हा एक चांगला गुण आहे. यातूनच अनेक जण प्राण्यांना खाऊ-पिऊ घालतात. प्राण्यांना काही झाले की, अतीव वेदनेने स्वत: तडफडतात. बरेच जण घरी कुत्रा-मांजर, असे पाळीव प्राणी पाळतात. अशा प्राण्यांवर अनेकांचा फारच जीव असतो. अमेरिकेचा विचार केल्यास, जवळपास दोन-तृतीयांश घरांमध्ये एक तरी पाळीव प्राणी आहे. पाळीव प्राणी घरामध्ये बाळगण्याचे प्रमाण हल्ली फारच वाढले आहे. १९८८ पासून हे प्रमाण चक्क ५६ टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती अमेरिकन पेट प्रॉडक्ट्स असोसिएशनने दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील लोकांनी २०२२ मध्ये १३६.८ अब्ज डॉलर्स इतकी रक्कम आपल्या पाळीव प्राण्यांवर खर्च केली आहे. २०२१ मध्ये त्यांनी केलेल्या खर्चाचे हेच प्रमाण १२३.६ अब्ज डॉलर्स इतके होते. थोडक्यात पाळीव प्राण्यांवर खर्च करण्याचे अमेरिकेतील प्रमाण वाढलेले आहे. युरोपमधील अंदाजे ९१ दशलक्ष घरांमध्ये एक तरी पाळीव प्राणी असतोच असतो. गेल्या दशकभरामध्ये या आकडेवारीत २० दशलक्षांची भर पडली आहे. भारताचा विचार करायचा झाल्यास, २०११ मध्ये १० दशलक्ष असणाऱ्या पाळीव प्राण्यांची संख्या २०२१ मध्ये ३१ दशलक्षांवर गेली आहे.

हेही वाचा : पंतप्रधान एका तर राष्ट्राध्यक्ष दुसऱ्याच पक्षाचा! फ्रान्समध्ये ‘कोहॅबिटेशन’ची अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय होईल?

पाळीव प्राण्यांचे हे प्रमाण तर वाढत चालले आहेच; त्या शिवाय त्यांची काळजी घेण्याच्या पद्धतींमध्येही बदल होत चालला आहे. त्यामुळे घरातले पाळीव प्राणी गरजेपेक्षा जास्त ‘माणसाळले’ जात आहेत. त्यांना प्राणी म्हणून कमी आणि घरातलाच एखादा सदस्य असल्यासारखे वागवले जात आहे. इतके की, अगदी पाळीव प्राण्यांचेही विविध ब्युटी प्रॉडक्ट्स आणि खानपानाचे पदार्थ बाजारात मिळू लागले आहेत. त्यांचाही भलामोठा बाजार आता उभा राहिला आहे. अमेरिकेमध्ये ठिकठिकाणी किमान मुख्य शहरांमध्ये तरी पाळीव प्राण्यांना लागणाऱ्या वस्तू पुरविण्यासाठीचे एक तरी दुकान (पेट स्टोअर) असतेच असते. अशा पेट स्टोअर्सची साखळीही आता बाजारामध्ये उभी राहिली आहे. ‘ऑल द बेस्ट’ नावाच्या पेट स्टोअर साखळी दुकानांचे मालक अॅनी मॅकॉल म्हणाले, “मांजर आणि कुत्र्यांना उपयोगी पडतील अशा वस्तू आणि खेळण्यांना अधिक मागणी आहे. बरेच प्राणी एकटेपणामध्ये वेळ घालवतात. तेव्हा या प्राण्यांचा उत्साह वाढविणे आणि त्यांना आलेला कंटाळा घालविणे हेच या खेळण्यांचे उद्दिष्ट आहे.”

प्राण्यांना माणसाळवणे धोक्याचे?

मात्र, पाळीव प्राण्यांना माणसासारखे वागविण्याबाबत पशुवैद्यक आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करताना दिसतात. या प्रकारची कृती अतिशयोक्त आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. जितके आपण प्राण्यांना माणसासारखे वागवू, तितके प्राण्यांचे आपल्यावरील अवलंबित्व वाढून, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न वाढण्याची चिंता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. थोडक्यात, अशा प्रकारे प्राण्यांना पाळल्याने त्यांच्यामध्ये वर्तणूक आणि वागणुकीसंदर्भात समस्या वाढीस लागू शकतात. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया स्कूल ऑफ व्हेटर्नरी मेडिसीन येथे ‘प्राणी कल्याण आणि नैतिकता’ या विषयाच्या प्राध्यापक जेम्स सर्पेल यांनी म्हटले, “आपण आता प्राण्यांना फक्त आपल्या कुटुंबाचा भागच म्हणून नव्हे, तर आपल्या मुलांसारखेच वागवतो आणि वाढवतो. मात्र, अडचण अशी आहे की, कुत्रा आणि मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची अगदी मुलाप्रमाणे काळजी घेतली जाते. याचा परिणाम असा होत आहे की, हे प्राणी त्यांचे स्वत:चे प्राण्यासारखे वागणेच विसरत चालले आहेत. त्यांचे नैसर्गिक वागणे कमी कमी होत चालले आहे.”

असे पालन निसर्गाच्या विरोधात

या सगळ्याचा परिपाक म्हणून पाळीव प्राण्यांच्या प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. अमेरिकेतील सर्वांत लोकप्रिय कुत्र्याची प्रजात म्हणजे फ्रेंच बुलडॉग होय. कुत्र्याची ही प्रजाती माणसाशी चटकन मैत्री करू शकते. म्हणूनच या प्रजातीच्या कुत्र्यांना लाडाने पाळण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, आता या प्रजातीला श्वासोच्छ्वास घेण्यासहित इतर अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. कारण- एकच त्यांना प्राण्यांसारखे नैसर्गिकरीत्या न वाढविता माणसासारखे वाढवले जात आहे. मात्र, हा मुद्दा फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नाही. आपण या प्राण्यांमध्ये आणि त्यांच्या सभोवतालच्या सहसंबंधांमध्येही बदल घडवून आणत आहोत. पक्ष्यांच्या शिकारीच्या चिंतेमुळे बऱ्याच मांजरांना आता त्यांचे संपूर्ण आयुष्य घराच्या आत घालवावे लागते. १९७० च्या दशकाच्या अखेरीपर्यंत बरेचसे कुत्रे त्यांच्या आयुष्याचा बराचसा काळ घराबाहेर घालवायचे. एकतर ते घराच्या अंगणात वा परसबागेत असायचे अथवा ते घराच्या आसपास निवांत इकडे-तिकडे भटकायचे. मात्र, आता ही परिस्थिती बदलली आहे. प्राणी आणि मानवी संबंधांवर अभ्यास असलेल्या बायोएथिस्ट जेसिका पियर्स यांनी म्हटले, “आता शहरात कुत्र्यांनी मोकळेपणाने फिरणेदेखील अनैसर्गिक मानले जात आहे. पाळीव प्राण्यांना बंदिस्त ठेवण्याचे प्रमाण अधिकाधिक वाढतच चालले आहे. त्यांना घराच्या कुंपणाच्या आत इलेक्ट्रॉनिक कॉलर्स घालून ठेवले जाते. त्यामुळे आजकालच्या कुत्र्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याआधी कुत्र्यांना गाडी धडकून अपघात होण्याचा वगैरे धोका असायचा. मात्र, तरीही ते त्यांना मिळणारे स्वातंत्र्य मनमुरादपणे उपभोगू शकायचे.” याबाबत बोलताना प्राध्यापक जेम्स सर्पेल यांनी म्हटले, “थोडक्यात, कुत्र्यांनी कुत्र्यासारखे वागावे, असे त्यांच्या मालकांना वाटत नाही.”

हेही वाचा : डेटा ते डायपर सगळंच महागलं! केनियाच्या लोकांनी ‘या’ कायद्यामुळे पेटवली संसद

ना आपल्यासाठी चांगले, ना त्यांच्यासाठी!

हल्ली जिथे माणसांना प्रवेश आहे, तिथे कुत्र्यांना सहज प्रवेश मिळताना दिसतो. मानवी वातावरण असलेली ठिकाणे जसे की घर, हॉटेल, दुकाने, कार्यालये, उद्याने इत्यादी ठिकाणी कुत्री सहजपणे येऊ शकतात. असे असूनही त्यांच्या स्वातंत्र्यामध्ये वाढ झाली आहे, असे चित्र नाही. उलट त्यांचे स्वातंत्र्य घटल्याचेच चित्र आहे. पाळीव प्राण्यांना अशा प्रकारे सातत्याने बंदिवासात ठेवल्याने त्यांच्यातील एकटेपणा वाढत जातो. त्यामुळे त्यांच्याच चिंता, आक्रमकता आणि नैराश्य यांसारखे मनोविकारही वाढीस लागतात, असे सर्पेल यांनी म्हटले. सध्याच्या पाळीव प्राण्यांपैकी ६० टक्के प्राणी हे लठ्ठपणाला बळी पडले आहेत. त्यांना पाळण्यासाठीचा खर्चही वाढला आहे. त्यामध्ये पशुवैद्यकीय सुविधा, पेट सीटर्स, पेट स्टोअर्स यांसारख्या बाबी वाढतच चालल्या आहेत. आधुनिक पाळीव प्राण्यांच्या मालकीमध्ये पशुवैद्यकीय शुल्क, पाळीव प्राणी व बोर्डिंग यासारख्या उच्च खर्चाचा समावेश होतो. २०२३ मध्ये शेल्टर ॲनिमल्स काउंटने नोंदविल्यानुसार, असाध्य रोगाने जर्जर झालेल्या ३,५९,००० कुत्र्यांना वेदनारहित मरण देण्यात आले. पियर्स म्हणाले, “वास्तव असे आहे की, आपण पाळीव प्राण्यांशी फारच सलगी केली आहे. त्यांना पाळण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे आणि त्यामध्ये बदलही होत चालले आहेत. ही परिस्थिती त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठीही फारशी चांगली नाही.” संशोधक अलेक्झांड्रा होरोविट्झ यांनी म्हटले, “प्राण्यांना माणसाळवण्याच्या प्रक्रियेमध्ये संतुलन ठेवणे गरजेचे आहे. प्राण्यांचे नैसर्गिक जगणे, तसेच ठेवून त्यांच्याकडून मानवी वातावरणात जगण्याच्या अपेक्षा केल्या पाहिजेत. मानवी इतिहासामध्ये माणसाने सर्वांत आधी कोणत्या प्राण्याला माणसाळवले असेल, तर तो म्हणजे कुत्रा होय. मात्र, आता त्यांचेच स्वातंत्र्य धोक्यात आले आहे.”

कुत्र्या-मांजरांना त्यांचे स्वातंत्र्य द्या

अलेक्झांड्रा होरोविट्झ म्हणाल्या, “भटके कुत्रे आणि पाळीव कुत्रे यांच्या राहणीमानात फरक पडतो. जगातील ९० कोटी कुत्रे भटके आहेत. हे खरे आहे की, त्यांना उपजीविकेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न भिडतो; मात्र, तरीही त्यांचे स्वत:चे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ते उपभोगू शकतात. त्यामुळे असेच स्वातंत्र्य पाळीव प्राण्यांनाही मिळायला हवे. कुणाचीही सामाजिक सुरक्षितता धोक्यात न आणता, त्यांना शक्य तितके स्वातंत्र्य दिले पाहिजे. पाळीव प्राण्यांना केवळ मानवी इच्छांच्या अधीन करणे कुणासाठीच योग्य ठरणार नाही.” स्कँडिनेव्हियन देश कॅव्हॅलियर किंग चार्ल्स स्पॅनियलसारखा रोग होऊ शकणाऱ्या कुत्र्यांच्या विशिष्ट जातींच्या प्रजननावर बंदी घालत आहेत. स्वीडनमध्ये पाळीव प्राण्यांना घरात एकटे सोडण्यास मनाई आहे. स्वीडन आणि फिनलंडमध्ये प्राण्यांना घरामध्येच ठेवणे बेकायदा आहे.