साडी नेसण्याची आवड प्रत्येकाला असते. भारतातील पारंपरिक कपड्यांमध्ये साडीला एक मोठे स्थान आहे. देशभरातील सर्व वयोगटातील आणि संस्कृतींच्या महिलांचा साडी हा आवडता विषय आहे. अगदी परदेशी नागरिकांनाही साडीची भुरळ पडते. परंतु, अलीकडील एका संशोधनात साडी नेसण्याशी संबंधित एक धोका समोर आला आहे. हा महिलांसाठी अगदीच चिंतेचा विषय आहे. बीएमजे केस रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात कंबरेभोवती साडी गुंडाळल्यामुळे त्वचेचे विकार होऊ शकतात आणि कर्करोगाचा एक दुर्मीळ प्रकार म्हणजेच ‘पेटिकोट कर्करोग’ किंवा ‘साडीचा कर्करोग’ होऊ शकतो, असे नमूद करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहवालात दोन आश्चर्यकारक प्रकरणांचा तपशील दिला आहे, ज्यात वृद्ध महिलांचा समावेश आहे. त्यांना अनेक दशकांपासून दररोज साडी नेसल्यानंतर हा दुर्मीळ कर्करोग झाला आहे. काय आहे ‘पेटिकोट कर्करोग’? त्याचा धोका नक्की कशामुळे उद्भवतो? महिलांमध्ये याचे प्रमाण वाढण्याचे कारण काय? याविषयी करण्यात आलेला नवीन अभ्यास काय सांगतो? त्याविषयी जाणून घेऊ.

हेही वाचा : ‘PM Internship Scheme’ काय आहे? योजनेसाठी पात्रता काय? बेरोजगार तरुणांना या योजनेचा कसा मिळणार लाभ?

‘पेटिकोट कर्करोग’ कशामुळे होतो?

‘Marjolin’s ulcers’ नावाच्या स्थितीला बोलचालीत ‘पेटिकोट कर्करोग’ असे संबोधले जाते. साडी नेसताना जेव्हा पेटिकोट कमरेला खूप घट्ट बांधला जातो तेव्हा ही स्थिती उद्भवते. बोरिवली येथील एचसीजी कॅन्सर कॅन्ट्रेमधील मेडिकल ऑन्कोलॉजीच्या सल्लागार डॉ. दर्शना राणे यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला सांगितले की, “साडीचा कर्करोग नावाची दुर्मीळ, परंतु लक्षणीय स्थिती दररोज साडी नेसणाऱ्या महिलांना प्रभावित करू शकते. ही अनोखी स्थिती सहसा मध्यभागी किंवा कंबरेच्या रेषेत आढळते.” त्यांनी पुढे सांगितले, “जेव्हा हा दोर ओटीपोटात एकाच पातळीवर सतत बांधला जातो, तेव्हा त्वचारोग (त्वचेची जळजळ) होऊ शकते आणि त्या भागात अल्सर तयार होऊ शकते; ज्याला मार्जोलिनचा व्रणदेखील म्हणतात.” संशोधनात असे म्हटले आहे की, कंबरेवर येणारा हा सततचा दाब त्वचेला पातळ करू शकतो, ज्यामुळे अल्सरेशन होऊ शकते आणि ते कर्करोगाचे लक्षण असू शकते.

अलीकडील प्रकरणे

अनेक दशके घट्ट बांधलेल्या साड्या नेसल्यानंतर वृद्ध स्त्रियांना हा दुर्मीळ त्वचेचा कर्करोग झाल्याची अनेक प्रकरणे डॉक्टरांनी नोंदवली आहेत. अलीकडील एका प्रकरणात, एका ७० वर्षीय महिलेला कमरेच्या उजव्या बाजूला एक व्रण दिसून आला. सतत पेटिकोट बांधत राहिल्याने त्वचेवर दबाव निर्माण झाला आणि त्वचेला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्यामुळे त्या भागात अल्सर झाले आणि वैद्यकीयदृष्ट्या ‘स्क्वॅमस सेल कार्सिनोमा’ म्हणून निदान झाले. “मी अनेक दशकांपासून साडी नेसत आले आहे, मात्र मला हे लक्षात आले नाही की ते माझ्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. त्वचेतील हा बदल वेदनादायक असून हा त्वचेचा कर्करोग असल्याचे निदान झाले आहे,” असे महिलेने ‘इंडिया टुडे’ला सांगितले. ही नवीन किंवा वेगळी प्रकरणे नाहीत. ‘द टेलिग्राफ’च्या म्हणण्यानुसार, अशाच घटना गेल्या काही वर्षांमध्ये समोर आल्या आहेत. एक प्रकरण चेन्नईमध्ये, दुसरे २०१४ मध्ये बंगळुरूमध्ये आणि आणखी अलीकडील प्रकरण २०२० मध्ये मुंबईत नोंदवले गेले आहे.

एका प्रकरणात ६० वर्षीय महिलेचा समावेश होता, जिने लुगडं नेसलं होतं. हा एक पारंपरिक साडीचा प्रकार असून त्यात पेटिकोट घातला जात नाही. लुगडं थेट कमरेला बांधलं जातं. असे असले तरी या महिलेच्या कमरेवरदेखील व्रण दिसून आले आणि तिच्या कमरेच्या भागात गाठी तयार झाल्या. ही स्थिती केवळ महिलांपुरती मर्यादित नाही, धोतर घालणाऱ्या पुरुषांनाही याचा तितकाच धोका असतो. पॅथॉलॉजिस्ट वसंत खानोलकर यांनी आठ पुरुषांमध्ये हा आजार आढळल्यानंतर याचे वर्णन ‘धोतीचा कर्करोग’ असे केले.

पेटिकोट कर्करोगाची लक्षणे काय?

भारतातील उष्ण आणि दमट हवामानात, विशेषतः ग्रामीण भागात, या स्थितीचा धोका अधिक आहे. “पेटिकोट कॉर्डपासून होणारा त्रास भारतातील उष्ण आणि दमट हवामानामुळे अधिक तीव्र होतो; विशेषत: ग्रामीण भागात जेथे आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत किंवा अगदी प्रवेशयोग्य नाहीत. घट्ट बांधलेल्या दोरीभोवती अनेकदा घाम आणि धूळ साचून खाज सुटते आणि व्रण येतात,” असे डॉ. दर्शना राणे यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, “दुर्दैवाने, दुर्गम भागात राहणाऱ्या स्त्रिया सौम्य प्रमाणात दिसून येणार्‍या लक्षणांकडे लक्ष देत नाहीत आणि वैद्यकीय मदत घेत नाहीत, त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडते.”

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर आंध्र प्रदेशमधील या गावाला विकासाची अपेक्षा, गावात ट्रम्प यांच्या विजयाचा जल्लोष; कारण काय?

काय काळजी घ्याल?

पेटिकोट खूप घट्ट बांधणे टाळा, विशेषत: जर तुम्हाला त्वचारोगाची लक्षणे दिसली, जसे की त्वचेच्या रंगात बदल दिसत असेल तर. त्यासह रुंद कमरबंद असलेला पेटिकोट वापरल्याने कंबरेभोवती दाब अधिक समान रीतीने वितरित होण्यास मदत होऊ शकते. तुम्ही ज्या ठिकाणी पेटिकोट कमरेला बांधता, ते स्थान वेळोवेळी बदला. प्रवाह चांगला होण्यासाठी हे आवश्यक आहे. तसेच आजार टाळण्यासाठी स्वच्छता राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कंबरेचा भाग नियमितपणे स्वच्छ करा, विशेषतः जर तुम्ही घराबाहेर काम करत असाल तर. कारण त्या भागात धूळ आणि घाम साचतो, तसेच त्वचेवर जळजळ जाणवत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petticoat cancer that doctors are warning indian women against rac