न्यूयॉर्क कोर्टाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘हश मनी’ प्रकरणात ३४ गुन्ह्यांसाठी दोषी ठरवल्यानंतर त्यांचे समर्थक आणि उजव्या विचारसरणीचे अमेरिकी लोक राष्ट्रध्वज उलटा (वरील बाजू खाली, खालील बाजू वर) फडकावत आहेत. समाजमाध्यमांवर अशा प्रकारच्या छायाचित्रांचा पूर आला आहे. काय अर्थ आहे याचा?
सुरुवात कुठे झाली?
न्यूयॉर्क शहरात ट्रम्प टॉवर्सबाहेर अशा प्रकारचा किमान एक उलटा ध्वज दिसला. डोनाल्ड ट्रम्प यांची सून आणि ‘रिपब्लिकन नॅशनल कमिटी’च्या सह-अध्यक्ष लारा ट्रम्प आणि त्यांच्या सर्वात मोठा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनीही उलट्या ध्वजाची प्रतिमा ऑनलाईन सामायिक केली. तसेच जॉर्जियाच्या रिपब्लिकन प्रतिनिधी आणि ट्रम्प यांच्या दीर्घकालीन सहकारी मार्जोरी टेलर यांनीही त्याचे अनुसरण केले.
हेही वाचा >>>ठाणे : फलाट क्रमांक पाचवरून रेल्वे वाहतूक सुरू, लोकलला फुलांच्या माळा घालत मोटरमन आणि प्रवाशांचे स्वागत
अलिकडील घटना कोणती?
अमेरिकेचा ध्वज उलट्या पद्धतीने फडकावण्यास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते. ६ जानेवारी २०२१ रोजी व्हर्जिनिया राज्यातील अलेक्झांड्रिया येथे सुप्रीम कोर्टाचे जस्टिस सॅम्युएल अलितो यांच्या निवासस्थानाबाहेर अमेरिका ध्वज उलटा फडकावण्यात आला होता. ट्रम्प यांच्या समर्थकांनी २०२० च्या निवडणूक निकालाचे प्रमाणपत्र थोपवण्यासाठी ‘कॅपिटल हिल’वर हल्ला केला होता. त्याच्या निषेधार्थ अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ही कृती केली होती. ट्रम्प यांचे समर्थक निवडणुकीत घोटाळा झाल्याचे आरोप करत ‘कॅपिटल हिल’वर चालून आले होते, त्यावेळी त्यांनी अमेरिकेचा ध्वज उलटा धरला होता. त्याचाच प्रतीक म्हणून वापर करत जस्टिस सॅम्युएल अलितो यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
अमेरिकेत ताजे लोण कसे पसरले?
ट्रम्प समर्थक उजव्या विचारसरणीचे राजकीय विश्लेषक आणि समाजमाध्यमांवर लाखो फॉलोअर असलेले माध्यमकर्मी, तसेच सामान्य अमेरिकी नागरिक त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उलटा ध्वज फडकावल्याची छायाचित्रे प्रसिद्ध करत आहेत. त्यांच्यामध्ये फॉक्स न्यूज चॅनेलचे गाय बेन्सन आणि केटी पावलिच, पुराणमतवादी विचारांसाठी प्रसिद्ध असलेले टॉक शोचे निवेदक ग्रॅहम ॲलन आणि ओवेन श्रॉयर आणि विविध कारस्थानांचे सिद्धांत मांडणारे अतिउजवे आणि “स्टॉप द स्टिल” रॅलीचे आयोजक अली अलेक्झांडर यांचा समावेश होता.
हेही वाचा >>>विश्लेषण: हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांसाठी परवाने लागू करावेत का?
उलट ध्वज सर्वात आधी कधी वापरला गेला?
अठराव्या शतकामध्ये सर्वात प्रथम अमेरिकी खलाशांनी आपत्ती दर्शवण्यासाठी अमेरिकेचा ध्वज उलटा करून लावला होता अशी माहिती इतिहासकार टिमोथी नाफ्ताली यांनी ‘रॉयटर्स’ला दिली. तेव्हापासून त्याचा अमेरिकेतील डाव्या आणि उजव्याही विचारसरणीच्या लोकांनी आपत्ती, त्रास, संताप, निषेध अशा विविध भावना दर्शवण्यासाठी याचा प्रतीक म्हणून वापर करण्यास सुरुवात केली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात अमेरिकेतील गुलामगिरीविरोधातील मोहिमेदरम्यान याचा पुन्हा एकदा जोरकसपणे वापर करण्यात आला होता. तसेच गेल्या शतकाच्या साठीच्या दशकात व्हिएतनाम युद्धाविरोधातील कार्यकर्तेही अमेरिकेचा ध्वज उलटा फडकावून आपला रोष व्यक्त करत असत. कोलंबिया विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स’ येथे अध्यापन करणाऱ्या प्रा. नाफ्ताली यांनी सांगितले की, जेव्हा व्हिएतनाम युद्धाच्या विरोधातील निदर्शक ध्वज उलटा करत असत किंवा जाळत असत तेव्हा रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आणि नेते सामान्यपणे त्या कृतीचा निषेध करत असत.
ट्रम्प समर्थकांकडून अन्य कोणत्या मार्गाने निषेध?
ट्रम्प यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर ताबडतोब त्यांचे समर्थक समाजमाध्यमांवर सक्रिय झाल्याचे दिसले. समाजमाध्यमांवर निषेधाच्या अन्य मार्गांमध्ये, काही नेटिझन्सनी या निकालाचा उल्लेख युद्धाची घोषणा किंवा येणाऱ्या गृहयुद्धाचे चिन्ह म्हणून केला. तसेच काही जणांनी ‘एक्स’वर ‘आरआयपी अमेरिका’ म्हणून आपली नाराजी व्यक्त केली. बऱ्याच जणांनी रोमशी तुलना करत हा अमेरिकेचा शेवट असल्याचे किंवा अमेरिकेची व्यवस्था कोसळत असल्याचा दावा केला. रिपब्लिकन पक्षाचे माजी इच्छुक उमेदवार विवेक रामस्वामी यांनीही रोमनचे साम्राज्य याच प्रकारे कोसळले होते अशी टीका करत ‘एक्स’वर एक ध्वनिचित्रफित प्रसिद्ध केली.
अमेरिकेची ध्वजसंहिता काय सांगते?
अमेरिकेची ध्वजसंहिता संकेत स्वरूपात आहे. म्हणजेच ती नागरिकांवर कायद्याने बंधनकारक नाही. अतिशय क्लेशदायक घटना असल्याशिवाय अमेरिकेचा ध्वज उलटा करू नये असे या संहितेत नमूद करण्यात आले आहे. मात्र, अनेक दशकांपासून उलटा ध्वज निषेधासाठी वापरला जातो. त्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जात नाही.
nima.patil@expressindia.com