जागतिक पातळीवर सर्वोच्च मानल्या जाणार्‍या नोबेल पारितोषिकांची घोषणा होण्यास सुरुवात झाली. २०२४ चे वैद्यकीय नोबेल पारितोषिक सोमवारी (७ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आले. आता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य व शांतता या विषयांतील पुरस्कारांचीही घोषणा केली जाणार आहे. स्वीडनच्या कॅरिलोन्स्का या संस्थेच्या नोबेल परिषदेकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. आजवर अनेक भारतीयांनाही नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.

भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन, नागरी हक्क नेते मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर व कवी रवींद्रनाथ टागोर या इतिहासातील सर्वांत प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, ज्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी (ज्यांना पाच वेळा नामांकन मिळाले होते) यांसारख्या इतर अनेकांना नामांकन मिळाले होते; परंतु त्यांना कधीही हा पुरस्कार मिळाला नाही. अधिकृत नोबेल वेबसाइटवर वर्णन केल्याप्रमाणे ॲडॉल्फ हिटलरला स्वीडिश संसदपटूंनी शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले होते. नोबेल पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया कशी चालते? विजेत्यांची निवड कोण करते? त्याविषयी जाणून घेऊ.

रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांमध्ये अतुलनीय कार्य करणाऱ्या दिग्गजांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : भारताच्या ‘RuPay’ कार्डची सेवा आता मालदीवमध्येही; इतर कोणकोणत्या देशांत चालतं रुपे कार्ड? त्याचा फायदा काय?

नोबेल पुरस्कारासाठी लोकांची निवड कशी केली जाते?

रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांमध्ये अतुलनीय कार्य करणाऱ्या दिग्गजांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पहिल्या टप्प्यात नामांकनाचा समावेश होतो. शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठांचे प्राध्यापक, वैज्ञानिक, पूर्वीचे विजेते आणि इतर मिळून नामांकने दाखल करतात आणि त्यातून नावांची निवड केली जाते. सर्व सहा पुरस्कारांसाठी वेगवेगळी पात्रता असते. उदाहरणार्थ- राज्यांचे प्रमुख, राष्ट्रीय असेंब्लीचे सदस्य व राष्ट्रीय सरकार हे शांतता पुरस्कारासाठी नामांकने पाठवू शकतात. स्वीडन, डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड व नॉर्वे येथील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील संबंधित विषयांतील स्थायी प्राध्यापक अर्थशास्त्राच्या पुरस्कारासाठी नामांकने पाठवू शकतात. परंतु, सर्वसाधारणपणे सर्व सहा पुरस्कारांसाठी नोबेल समिती असते, जी पुरस्कारासाठी जबाबदार असलेल्या संस्थेद्वारे नियुक्त केली जाते. समितीद्वारे नामांकनासाठी दाखल केलेल्या अर्जांचे मूल्यांकन केले जाते आणि त्यातून नावांची निवड केली जाते. मग विषयतज्ज्ञ असणारे नोबेल संस्थेचे स्थायी सल्लागार निवड केलेल्या नावांचा पुनर्विचार करतात. तज्ज्ञांनी अहवाल सादर केल्यानंतर नोबेल समिती संभाव्य उमेदवारांची चर्चा करते.

गेली १२३ वर्षे हा पुरस्कार दिला जात आहे. ऑक्टोबरमध्ये पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी समिती सप्टेंबरमध्ये निर्णय घेते आणि त्यांच्या निवडीविषयी एकमत साधण्याचा प्रयत्न करते. क्वचित प्रसंगी समितीचे एका नावावर एकमत होत नाही, तेव्हा विजेते ठरविण्यासाठी बहुमत घेतले जाते. नोबेल पारितोषिकांची जबाबदारी पुढील संस्थांकडे आहे, त्यात भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकासाठी रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस, शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकासाठी स्वीडनची कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूट, साहित्यातील नोबेल पारितोषिकासाठी स्वीडिश अकादमी, नोबेल शांतता पुरस्कारासाठी नॉर्वेजियन संसदेने निवडलेल्या पाच व्यक्ती आणि आर्थिक विज्ञान पुरस्कारासाठी रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस यांचा समावेश आहे.

स्वीडनमध्ये जन्मलेले आल्फ्रेड नोबेल हे ३०० हून अधिक पेटंट असलेले एक संशोधक व शास्त्रज्ञ होते. (छायाचित्र-रॉयटर्स)

या संस्थांचाच सहभाग का?

स्वीडनमध्ये जन्मलेले आल्फ्रेड नोबेल हे ३०० हून अधिक पेटंट असलेले एक संशोधक व शास्त्रज्ञ होते. २१ ऑक्टोबर १८३३ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचा विविध भाषांमध्ये हातखंडा होता. ते पेशाने इंजिनीयर व संशोधक होते. त्यांनी आपल्या शोधांद्वारे वैयक्तिक संपत्ती जमा केली होती. त्यांनी आपल्या मृत्युपत्राद्वारे मोठी संपती जागतिक पातळीवरचे पुरस्कार स्थापन करण्यासाठी दान केली होती. त्यांच्या इच्छेने १९०१ मध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले. सर्व क्षेत्रांतील उत्कृष्टतेसाठी हा पैसा वापरला जावा, अशी त्यांची इच्छा होती. विज्ञानातील त्यांची आवड सर्वज्ञात असतानाच, साहित्य आणि तत्त्वज्ञानाकडेही त्यांचा कल होता. नोबेल यांच्या मृत्यूनंतर त्यांचे १५०० हून अधिक ग्रंथसंपदा असलेले खासगी ग्रंथालय सर्वांसाठी खुले होते. शांतता पुरस्काराची स्थापना करण्याची आवड त्यांच्यात कशामुळे निर्माण झाली हे फारसे स्पष्ट नाही. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ स्वेरिगेस रिक्स बँक (स्वीडनची मध्यवर्ती बँक)द्वारे १९६८ मध्ये अर्थशास्त्र पुरस्काराची स्थापना करण्यात आली. बँकेच्या ३०० व्या वर्धापन दिनानिमित्त नोबेल फाउंडेशनने १९६८ मध्ये स्वेरिगेस रिक्स बँकेमार्फत प्राप्त झालेल्या देणगीद्वारे हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा : ‘या’ देशात वाढतोय ‘प्लेजर मॅरेज’चा ट्रेंड; पर्यटकांबरोबर अल्प कालावधीसाठी का केले जाते लग्न?

स्वीडिश संसद नोबेल शांतता पुरस्कार का देते?

याबाबतची खात्री कोणालाच नसल्याचे नोबेल वेबसाइटने म्हटले आहे. एका लेखात नॉर्वेजियन नोबेल समितीचे माजी सचिव व नोबेल संस्थेचे संचालक गेयर लुंडेस्टॅड यांनी लिहिले, “नोबेल यांनी शांततेसाठीचे पारितोषिक का दिले जावे याचे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांनी पुरस्कारासाठी स्वीडनला दिलेले प्राधान्य स्पष्ट करण्यासाठी काही सिद्धांत नोंदवले; जसे की, वैज्ञानिक पारितोषिके स्वीडिश समित्यांद्वारे दिली जाणार असल्याने, शांततेसाठीचे किमान उर्वरित पारितोषिक नॉर्वेजियन समितीकडून दिले जावे, असा त्यांचा मानस असावा. १८९० च्या दशकातील आंतरराष्ट्रीय विवाद बघता, नोबेल यांना शांततेच्या दृष्टिकोनातून नॉर्वेजियन स्टॉर्टिंग (संसद)च्या स्वारस्याची जाणीव झाली असावी. त्यांनी कदाचित नॉर्वेला स्वीडनपेक्षा अधिक शांतताकेंद्रित आणि लोकशाही देश मानले असावे,” असे त्यांनी म्हटले आहे.