कॅनडात टोरांटो विमानतळावर १७ फेब्रुवारी रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजता एक विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर भरकटले नि उलटले. विमानाच्या एका भागाला आग लागली. तरीदेखील सर्व प्रवासी बचावले. या घटनेमागील कारणांचा वेध…
नेमके काय घडले?
डेल्टा एअरलाइन्सचे एक विमान अमेरिकेतील मिनियापोलिस येथून कॅनडातील टोरांटो येथे येत होते. सीआरजे-९०० प्रकारातील हे विमान कॅनडाच्या बम्बार्डिये कंपनीने बनवले होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास टोरांटोतील हिमाच्छादित विमानतळावर विमान उतरू लागले. पण उतरताक्षणी उजवीकडे कलले. काही अंतर भरकटले आणि चक्क उलटले. या दुर्घटनेत विमानाचा उजवा पंख आणि शेपटीचे नुकसान झाले. उलटतानाच विमानाच्या शेपटीकडील बाजूस आग लागली. ती स्थानिक अग्निशमन दलाने तातडीने नियंत्रणात आणली. विमानात ७६ प्रवासी आणि चार कर्मचारी होते. हे सर्व ८० जण बचावले. सर्वांनीच खुर्चीपट्टा (सीट बेल्ट) लावलेला असल्यामुळे विमान उलटत असतानाही प्रवासी इतस्ततः फेकले गेले नाहीत. विमान स्थिरावल्यानंतर सर्वच जण काही काळ वटवाघळासारखे लटकलेल्या अवस्थेत होते. सीट बेल्ट सोडवून प्रत्येकाला बाहेर यावे लागले. डेल्टा एअरलाइन्सच्या अधिकृत आकडेवारीनुसार २१ जणांना किरकोळ इजा झाली. यांतील १९ जणांना प्रथमोपचारानंतर सोडून देण्यात आले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विमान उलटले कसे?

याविषयीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष आणि वैमानिक यांच्यात विमान उतरण्याच्या काही क्षण आधी झालेल्या संभाषणातून तरी ही घटना अचानक घडल्याचेच दिसते, असे वृत्त ‘बीबीसी’ वाहिनीने दिले. विमानतळ भागात त्या दिवशी हिमवृष्टी झाली आणि वारेही वेगवान होते. त्यामुळे धावपट्टी निसरडी होतीच, शिवाय वाऱ्याच्या झोतामुळे विमाने उतरवणे आव्हानात्मक बनले. काही विश्लेषकांच्या मते, डेल्टा एअरलाइन्सच्या वैमानिकाने वाऱ्याच्या दिशेनुसार ‘क्रॅब लँडिंग अॅप्रोच’चा अवलंब केला असावा. या प्रकाराने खेकड्याच्या आडव्या चालीनुसार विमान वाऱ्याच्या दिशेने किंचित वळवले जाते आणि उतरण्याच्या काही क्षण आधी धावपट्टीच्या दिशेनुरूप वळवले जाते. ज्या ठिकाणी वेगाने वारे वाहतात, तेथे ही पद्धत सामान्य मानली जाते. टोरांटोत त्या वेळेस ताशी ६१ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. प्रस्तुत विमान उतरवले जात असताना उजव्या बाजूकडील चाकावर प्रथम उतरले. अतिरिक्त भारामुळे ते चाक निखळले असावे. त्यामुळे उजवा पंख जमिनीवर घासला जाऊन तुटला आणि यातून विमान उलटले असावे. अर्थात अशा प्रकारे विमान लँडिंगच्या वेळी उलटण्याचा प्रकार दुर्मिळ मानला जातो, यावर बहुतेक विश्लेषक, आजी-माजी वैमानिकांचे मतैक्य दिसून येते.

हवामान कारणीभूत?

टोरांटो आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये हिमवर्षाव आणि वादळी वारे वाहात आहेत. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी घडली त्याच्या दोनच दिवस आधी विमानतळ परिसरात ८.७ इंच हिमाच्छादन नोंदवले गेले. प्रचंड वेगाने वारे आणि हिमवर्षाव हे दोन्ही घटक वैमानिकांसाठी विशेषतः विमान उतरवताना कसोटीचे ठरत असतात. सीआरजे-९०० सारखी विमाने अशा हवामानात संचार करण्याच्या दृष्टीने सुसज्ज बनवली गेली आहेत. काही वेळा अतितीव्र हवामान परिस्थिती होते तेव्हा विमानतळ तात्पुरता बंद केला जातो. टोरांटोमध्ये तशी परिस्थिती नव्हती. आणखी एका वृत्तानुसार, धावपट्टीकडे विमान येत होते त्यावेळी मार्गात हवेच्या उसळप्रवाहाचा (एअर बम्प) इशारा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून वैमानिकाला देण्यात आला होता. परंतु तो फार धोकादायक वाटला नसावा म्हणून असेल किंवा परिस्थिती हाताळण्याबाबत विश्वास वाटला असावा म्हणून असेल, वैमानिकाने तरीही विमान उतरवण्याचा निर्णय घेतला असावा.

प्रवासी बचावले कसे?

अशा प्रकारच्या घटनेमध्ये अनेक किंवा सगळे प्रवासी बचावणे विविध घटकांवर अवलंबून असते. साऱ्या बाबी जुळून याव्या लागतात. विमानाची रचना हे पहिले कारण होते. अशा आणीबाणीत विमानाचा पंख विलग व्हावा हे अध्याहृत असते. त्यामुळे विमानाचे ‘धड’ (फ्युसलाज) एकसंध राहते आणि आतील प्रवाशांना कमीत कमी झळ पोहोचते. प्रवाशांच्या आसनांची रचना अशा पद्धतीने असते, जेणेकरून आघातानंतरही प्रवासी कोणत्याही वस्तूंवर आदळणार नाहीत. याशिवाय सीट बेल्ट हा घटक अत्यंत निर्णायक ठरला. सीट बेल्टबद्ध असल्यामुळे प्रवासी विमान उलटत असताना आसनावरून फेकले गेले नाहीत. याशिवाय विमानातील कर्मचारी, विमानतळावरील आपत्ती निवारण कक्ष यांनीही तातडीची हालचाल करून प्रवाशांना विमानातून त्वरित बाहेर काढले. विमानाने पेट घेटला नाही ही बाबही महत्त्वाची ठरली. 

आसनांच्या रचनेमुळे..?

सीआरजे-३०० सारख्या विमानांमध्ये आसनांची रचना हा प्रवाशांच्या सुरक्षा व्यवस्थेमधील महत्त्वाचा घटक असतो. गुरुत्वाकर्षण बलाच्या १६ पट अधिक प्रतिप्रवेग (deceleration) सोसण्याची ताकद या आसनांमध्ये असते. विमान प्रचंड वेगाने उडते. लँडिंग आणि टेक-ऑफच्या वेळी हा वेग अधिक असतो. अशा वेळी अचानक आघाताने हा वेग शून्यावर येतो, त्यावेळी तो धक्का प्रवाशांपर्यंत पोहोचून नये अशा रीतीने आसने बनवली जातात. खुर्चीचे पाय विमानाच्या पृष्ठभागाला अशा पद्धतीने घट्ट बसवलेली असतात, जेणेकरून पुढे-मागे हालचाल आणि आजू-बाजूला हालचाल अधिकाधिक नियंत्रित होईल. या संरचनेमुळे प्रवासी सर्वाधिक सुरक्षित त्यांच्या आसनांमध्येच असतात. आघातामुळे प्रवाशांचे डोके आणि पाय पुढील आसनावर कमी तीव्रतेने आदळावेत अशीही रचना असते. या सर्व सुरक्षा उपायांची काटेकोर चाचणी होत असते. टोरांटोमधील दुर्घटनेत अशा अनेक घटकांमुळे प्रवासी सुरक्षित राहिले.