अनिश पाटील
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात रेव्ह पार्ट्यांचे आयोजन होते. सहाजिकच या काळात अमलीपदार्थांची तस्करीही वाढते. अमलीपदार्थ विरोधी यंत्रणांचीही त्यावर करडी नजर असते. या पार्ट्यांचे नियोजन डिसेंबर पूर्वीच सुरू होते. मागणी वाढल्यामुळे अमलीपदार्थांच्या किमतीही वाढतात. या संपूर्ण व्यवहार कसा चालतो, त्यावर कारवाई होते का अशा मुद्द्यांचा आढावा.
पार्ट्यांपर्यंत अमलीपदार्थ पोहोचतात कसे?
नववर्षाच्या पूर्वसंध्येचा आयोजित अनेक पार्ट्यांमध्ये अमली पदार्थाचा वापर केला जातो. त्याची तयारी डिसेंबरच्या आधीपासूनच सुरू होते. समाजमाध्यमे, डार्क वेब यांच्या माध्यमातून या पार्ट्यांची नोंदणी केली जाते. केल्या काही वर्षांत मुंबईसारख्या महानगरांवर अमलीपदार्थ विरोधी यंत्रणांची करडी नजर असल्यामुळे शहरांऐवजी शहरांना लागून असलेल्या गावांमध्ये अशा पार्ट्यांचे आयोजन केले जाते. पण ठरावीक व्यक्तींनाच तेथे प्रवेश दिला जातो. अमलीपदार्थ विरोधी यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आंतरराष्ट्रीय तस्कर मानवविरहित पर्यायांचा वापर करत आहेत. त्यासाठी कुरियर, आंतरराष्ट्रीय टपाल, डार्क वेब अशा माध्यमांचा वापर केला जातो. स्थानिक बाजारात अमलीपदार्थ पोहचवण्यासाठी समाज माध्यमांवरील गटांमध्ये एक संकेतांक वापरून पार्टीचे आयोजन केले जाते. तरुणाईला आकर्षण असलेल्या संकेतस्थळांच्या माध्यमातून पार्ट्यांचे आयोजन होत आहे. या पार्टीत कोकेन, केटामाइनसारखे अमलीपदार्थ विकले जातात. त्यावर तरुण पिढी लाखो रुपयांची उधळते. काही पंचतारांकित हॉटेल्समध्ये अमलीपदार्थांचे व्यवहार होतात. त्याचबरोबर मोठ-मोठ्या ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेन्ट किंवा कुरिअरच्या माध्यमातून तस्कर हे अमलीपदार्थ पार्टीत आणतात.
हेही वाचा >>>विश्लेषण : कापूस उत्पादन घटूनही भाव कमी का?
व्यवहार कसा चालतो?
या कार्यपद्धतीमध्ये सर्व व्यवहारांसाठी तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. बिटकॉईनसारख्या कूट चलनाच्या सहाय्याने अमली पदार्थांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होतो. अमली पदार्थ खरेदी-विक्री व्यवहार दिसतो, तितका सोपा नाही. डार्क- आणि डीप अशा दोन प्रकारात हा व्यवहार होतो. इंटरनेटवरील या तस्करांच्या संकेतस्थळावर सदस्य व्हावे लागते. कूट चलनाच्या मोबदल्यात सदस्यत्व मिळते. कूट चलनातील बिटकॉईनची किंमत ३६ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. या संकेतस्थळावर सदस्य होण्यासाठी बिटकॉईन खरेदी करावी लागतात. मात्र, नुसते कूट चलन खरेदी करूनही सदस्य केले जाईल याची कोणतीही खात्री नसते. जोपर्यंत अमली पदार्थांच्या खरेदीसाठीच सदस्यत्व घेण्यत येत असल्याची खात्री तस्करांना पटत नाही, तोपर्यंत सदस्यत्व मिळत नाही. डार्क नेटवर असे क्रमांक व संकेतस्थळाचे दुवे (लिंक्स) उपलब्ध आहेत. त्यामार्फत मेसेंजरद्वारे अमलीपदार्थ मागवले जाऊ शकतात. त्याची रक्कमही कूट चलनामार्फत दिली जाते. या कोणत्याही व्यवहारात विक्रेत्याचा प्रत्यक्ष सहभाग नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या वितरणासाठी कुरियर, पोस्ट सेवेचा वापर होत असल्यामुळे ग्राहक व विक्रेता यांच्यात कोणाताही संबंध उरत नाही. परिणामी आरोपींपर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य होते.
टपालामार्फतही तस्करी होते का?
आंध्र प्रदेशातून खासगी टपाल संस्थांमार्फत (कुरिअर) ऑस्ट्रेलियात एफिड्रीनच्या तस्करीचा मार्ग एनसीबीने हुडकून काढला आहे. एनसीबीने यापूर्वी केलेल्या पाच कारवायांमध्ये कुरिअरमार्फत ऑस्ट्रेलियात पाठवण्यात येत असलेले अमलीपदार्थ जप्त केले होते. त्यात १० किलोपेक्षा जास्त एफिड्रीन जप्त करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांमध्ये एफिड्रीन व मेथा एमफेटामाईन या अमलीपदार्थांना मागणी आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातील काही तस्कर कुरिअरमार्गे ऑस्ट्रेलियात एफिड्रीन पाठवतात. यावर्षीही एनसीबीने डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात पाठवण्यात येणाऱ्या एम्फेटामाईनसह प्रतिबंधीत गोळ्यांचा साठा पकडला होता. त्याची किंमत तीन कोटी रुपये होती.
हेही वाचा >>>चीन पुन्हा अणूचाचणी करण्याच्या तयारीत? ‘लोप नूर’मध्ये नेमकं काय घडतंय? जाणून घ्या…
नववर्षांपूर्वी अमलीपदार्थांच्या किमतीत वाढ का होते?
वर्षभर स्थिर असणाऱ्या अमलीपदार्थांच्या किमती डिसेंबर महिनाअखेरीस १५ ते २५ टक्क्यांनी वाढतात. या काळात अमलीपदार्थांना मोठी मागणी असते. तसेच अमलीपदार्थ यंत्रणाही मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यामुळे या काळात तस्करीत अधिक जोखीम असेल. त्यामुळे किमतीत वाढ होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशभरात गोव्याव्यतिरिक्त, हिमाचल प्रदेश येथील कुल्लू व्हॅली रेव्ह पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. बेंगळुरू हे रेव्ह हॉटस्पॉट म्हणूनही उदयास आले आहे. पुणे, मुंबईसह इतर मोठ्या शहरांमध्येही रेव्ह पार्ट्या पकडल्या गेल्या आहेत. त्यामुळे सध्या शहरांपासून दूर, समुद्रात अशा पार्ट्यांचे आयोजन केले जाते.
तपास यंत्रणा काय करत आहेत? नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या अनधिकृत पार्ट्या, अमलीपदार्थांचा वापर रोखण्यासाठी यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. केंद्रीय यंत्रणांसह मुंबई पोलिसही संशयित हालचालींवर विशेष लक्ष ठेऊन आहेत. गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावर ४८ तासांत २१ कोटी रुपयांचे कोकेन महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) जप्त केले. नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या रेव्ह पार्ट्यांवर करडी नजर असलेल्या मुंबई पोलिसांनी या वर्षभरात सुमारे साडेचारशे कोटींचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे चारशे कोटींहून अधिक किमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी वर्षभरात सुमारे चार हजार ८०० कोटी रुपयांचे अमलीपदार्थ नष्ट केले आहेत. याशिवाय अमलीपदार्थ विरोधी पथकाने नुकताच काश्मिरी चरसचा कोट्यावधींचा साठा जप्त केला होता.