भक्ती बिसुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानवाला होणारे बुरशीजन्य आजार नवीन नाहीत. नुकत्याच येऊन गेलेल्या करोना महासाथ काळात करोनातून बरे झालेल्या कित्येक रुग्णांचा म्युकरमायकोसिस नामक बुरशीजन्य आजाराने मृत्यू झाल्याचे आपण अद्याप विसरलो नाही. मात्र, वनस्पतीला होणाऱ्या विषारी बुरशीचा संसर्ग कोलकाता येथील एका संशोधकाला झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. सदर संशोधक ६१ वर्षीय असून बुरशीशी संबंधित विषयावरील संशोधनासाठी त्याने अनेक वर्षे स्वत:ला वाहून घेतले आहे. वनस्पतीला होणारा बुरशीविकार मानवाला झाल्याचे हे जगातील पहिलेच ज्ञात उदाहरण असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यानिमित्ताने हे विश्लेषण.

घटना काय?

कोलकाता येथील ज्या व्यक्तीला वनस्पतींना होणाऱ्या विषारी बुरशीचा संसर्ग झाला आहे, ती व्यक्ती ६१ वर्षीय संशोधक असून वनस्पती बुरशीशास्त्राचे संशोधक आहेत. संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून विघटन होत चाललेले पदार्थ, विविध ज्ञात-अज्ञात मश्रुम्स आणि फंगी नामक एका बुरशीवर त्यांचा अभ्यास सुरू होता. घसा खवखवणे, खोकला, प्रचंड थकवा, घशाचा दाह, आवाजातील घोगरेपणा, भूक मरणे अशा लक्षणांनी त्यांना ग्रासले होते. एक गळूही रुग्णाला झाले होते. हे गळू शस्त्रक्रिया करून काढून त्याची तपासणी करण्यात आली. त्यांच्या पूर्वीच्या आरोग्याबाबत माहिती घेतली असता त्यांना कोणत्याही सहव्याधी नव्हत्या. त्यामुळे अर्थातच औषधेही नव्हती. रोगप्रतिकारशक्तीची कोणतीही तक्रार नव्हती. त्यामुळे आजाराचे निदान करण्यासाठी केलेल्या विविध चाचण्या आणि तपासण्यांमधून त्यांना सहसा केवळ वनस्पतींनाच होणाऱ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचे दिसून आले.

विश्लेषण: उष्णतेच्या लाटेमुळे अर्थव्यवस्था मंदावणार?

बुरशीजन्य आजारांवरील औषधांच्या सेवनाने हा रुग्ण बरा झाला असून त्याचा आजार पुन्हा उलटण्याची शक्यता नसल्याचे उपचार करणाऱ्या रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, ‘मेडिकल मायकॉलॉजी केस रिपोर्ट्स जर्नल’ या नियतकालिकाने या रुग्णाची आणि त्याच्या आजाराची ‘केस स्टडी’ म्हणून दखल घेतली आहे.

विषारी बुरशी कोणती?

सतत विघटनशील घटकांच्या सहवासात संशोधनासाठी राहिल्याने हा संसर्ग रुग्णाला झाल्याची शक्यता उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे. ‘काँड्रॉस्टेरिअम परप्युरिअम’ असे या बुरशीचे नाव आहे. या बुरशीचा संसर्ग वनस्पतींना होतो तेव्हा वनस्पतींची पाने चंदेरी होतात. हळूहळू ती फांदी आणि पाठोपाठ पूर्ण झाड सुकून आणि मरून जाते. या बुरशीच्या संसर्गामुळे वनस्पतींना होणारा आजार हा सिल्व्हर लीफ डिसीज म्हणून ओळखला जातो.

मरावे परी ‘खत’रूपी उरावे; दहन किंवा दफन होण्यापेक्षा अमेरिकेतील लोक देहाचे कम्पोस्ट खत का करून घेतायत?

अलीकडे बुरशीचे विविध नवे प्रकार विकसित होत असून त्यांपैकी कोणते किती घातक आणि त्यांचे परिणाम काय याबाबत अद्याप संशोधनाची गरज असल्याचे रुग्णावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर जगभरामध्ये विविध प्रकारच्या बुरशींवर अद्ययावत संशोधन सुरू असतानाही वनस्पतीला संसर्ग करणाऱ्या बुरशीचा मानवामध्ये संसर्ग होण्याची ही पहिलीच ज्ञात घटना आहे, याकडेही बुरशीशास्त्राचे लक्ष वेधण्यात आले आहे.

bhakti.bisure@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plant fungus decease transferred to human being cases in india print exp pmw