How Plastics impact gut health : गरमा गरम जेवण… त्याचा दरवळणारा सुगंध… आपल्याला हवा तो आवडणारा पदार्थ… कडाडून भूक लागली आणि स्वयंपाकाचा कंटाळा आला की, अनेकजण ऑनलाइन जेवण मागवतात. प्रत्येकालाच घरबसल्या ऑनलाइन पदार्थ ऑर्डर करण्याचे जणू व्यसनच लागलें आहे. अन्नपदार्थ्यांची डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या अवघ्या काही मिनिटातच घरी जेवण पाठवतात. मात्र, हे जेवण प्लास्टिकच्या डब्यातून किंवा पिशवीतून आलेलं असतं. ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे. संशोधकांनी नेमकं काय म्हटलं आहे, ते जाणून घेऊ.

प्लास्टिकच्या डब्यातील गरम अन्न आरोग्यासाठी धोकादायक

आजकाल घरपोच अन्नपदार्थ पोहोचवणाऱ्या बऱ्याच कंपन्या प्लास्टिकच्या डब्याचा वापर करतात. त्यातून आलेलं जेवण हृदयविकारासाठी कारणीभूत ठरू शकतं, असा धक्कादायक खुलासा संशोधकांनी केला आहे. चीनमधील संशोधकांनी तीन हजारहून अधिक लोकांवर अभ्यास केला आणि उंदरावरही प्रयोग केले आहे. त्यातून असं समोर आलं की, प्लास्टिकच्या डब्यांमध्ये असलेलं गरमा गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो.

प्लास्टिकमधील गरम अन्नाचा आरोग्यावर कसा परिणाम होतो?

प्लास्टिकच्या डब्यामधील जेवणाचा आरोग्यावर कसा परिणाम होतो हे शोधण्यासाठी संशोधकांनी दोन टप्प्यांचा आधार घेतला. प्रथम, त्यांनी चीनमध्ये तीन हजारांहून अधिक लोक प्लास्टिकच्या डब्याचा जेवणासाठी कितीवेळा वापर करतात आणि याचा हृदयरोगाशी संबंध आहे का याची तपासणी केली. त्यानंतर, उंदरांवर प्रयोग करण्यात आले. प्लास्टिकच्या डब्यातील रसायने बाहेर काढण्यासाठी संशोधकांनी त्यात उकळलेले गरम पाणी टाकले. त्यातून एक विशिष्ठ प्रकारचे रसायन बाहेर आल्यानंतर ते उंदरांना पाजण्यात आले. “अभ्यासातून असे लक्षात आले की, प्लास्टिकच्या डब्यांमधील गरम पदार्थ खाल्ल्यास संबंधित व्यक्तीमध्ये हृदविकाराचा धोका वाढतो”, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा : भारत सरकारचा मोठा निर्णय, अमेरिकन व्हिस्की ५० टक्क्यांनी स्वस्त; बॉर्बन व्हिस्की कशी तयार होते?

प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये कोणकोणती रसायने असतात?

संशोधकांनी प्लास्टिकमधून कोणती रसायने बाहेर पडत आहेत याचे परीक्षण केले नसले तरी, त्यांनी सामान्य प्लास्टिक संयुगे आणि हृदयरोग यांच्यातील महत्वाचा दुवा लक्षात घेतला. शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की, सामान्य प्लास्टिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारची २० हजार रसायने असू शकतात. ज्यापैकी बीपीए (BPA), फ्थॅलेट्स (Phthalates), आणि PFAS (Per- and polyfluoroalkyl substances) यांसारखी बरीच रसायने आरोग्यासाठी घातक आहेत. प्रामुख्याने ही रसायने अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये आढळतात आणि कर्करोगापासून ते प्रजननक्षमतेवर परिणाम करणारी ठरतात.

प्लास्टिकच्या डब्यातील अन्नपदार्थांमुळे आरोग्याचे नुकसान

संशोधनांमध्ये असे आढळले आहे की, ज्या महिलांच्या रक्तात ‘बीपीए’चे प्रमाण जास्त आहे, त्यांचा गर्भपात होण्याची शक्यता तिप्पट असते. याशिवाय अंडाशयाच्या निर्मितीची क्षमताही कमी होते. कारण बीपीए शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनशी बांधले जाते, जे भ्रूण विकास आणि प्रजनन यांसारख्या महत्त्वपूर्ण कार्यांचे नियमन करते. म्हणजेच काय तर बीपीएचे आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्याचप्रमाणे, ज्या पुरुषांमध्ये बीपीएचे प्रमाण जास्त आहे, त्यांच्या शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे आढळून आले आहे. एका अहवालानुसार, भारतातील प्रत्येक व्यक्ती दरवर्षी विविध स्वरुपात सरासरी ११ किलो प्लास्टिकचा वापर करतो.

आतड्यांतील सूक्ष्मजीवांवर होणारा परिणाम

प्लास्टिकच्या संपर्कामुळे मानवी आतड्यातील सूक्ष्मजीव तसेच आतड्यात राहणाऱ्या सूक्ष्मजीवांचा संग्रह कसा विस्कळीत होऊ शकतो आणि रक्ताभिसरण प्रणालीवर त्याचा कसा परिणाम होतो, हेदेखील चिनी अभ्यासात उघड झाले आहे. याचा तपास करण्यासाठी चिनी संशोधकांनी प्लास्टिकच्या डब्यामध्ये वेगवेगळ्या वेळेत १० ते १५ मिनिटं उकळते पाणी टाकले. कारण, प्लास्टिकमधील रसायने गरम पदार्थांच्या संपर्कात आल्यावर खूप लवकर विरघळतात. दरम्यान, संशोधकांनी हे पाणी उंदरांना पाजले आणि त्यांच्या आतड्यातील सूक्ष्मजीव आणि विष्ठेतील चयापचयांचे विश्लेषण केले. समोर आलेले निकाल अतिशय चिंताजनक होते.

हेही वाचा : Whale Swallow Human : व्हेल मासा माणसाला खरंच गिळू शकतो का? 23 वर्षीय तरुण मृत्यूच्या दाढेतून कसा बाहेर आला?

उंदरांवर संशोधन केल्यानंतर काय समोर आले?

संशोधकांनी सांगितले की, उंदरांना प्लास्टिकच्या डब्यातील गरम पाणी पाजल्यानंतर त्यांच्या आतड्यांमध्ये चिंताजनक बदल दिसून आले. याशिवाय आतड्यांमधील रचनेवरही परिणाम झाला, हे बदल अत्यंत घातक होते, ज्यामुळे हृदयविकार आणि आरोग्याच्या इतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. उंदरांच्या हृदयाच्या स्नायूंच्या ऊतींचे परीक्षण केल्यानंतर त्यात लक्षणीय नुकसान आढळून आले. विशेष बाब म्हणजे, प्लास्टिकच्या डब्यातील गरम पाणी एकदाच पिणाऱ्या उंदरांमध्ये आणि चारपाच वेळा पाणी पिणाऱ्या उंदरांमध्ये हृदयाच्या स्नायूंच्या नुकसानीत सांख्यिक दृष्ट्या कोणताही फरक आढळला नाही. यावरून असे स्पष्ट होते की, प्लास्टिकच्या डब्यातून कमी वेळाही गरम पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यावरही हानिकारक परिणाम होऊ शकतात.

कोणकोणत्या भांड्यांमधील अन्नपदार्थ खावे?

नेहमी प्लास्टिकच्या डब्यातून अन्न खाणाऱ्या व्यक्तीने चांगल्या आरोग्यासाठी यापुढे काय करावे, याची माहिती या अभ्यासात देण्यात आली नाही. मात्र, प्लास्टिकच्या डब्यातील गरम अन्नपदार्थ खाणे नेहमीच टाळावे, असा सल्ला संशोधकांनी अनेकांना दिला आहे. प्लास्टिकऐवजी काचेचे भांडे, स्टेलनेस स्टील, किंवा अॅल्युमिनियमचे भांडे यासारख्या वस्तूंचा वापर करावा, कारण या भांड्यांमध्ये हानिकारक रसायने नसतात, असंही संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. प्लास्टिकच्या डब्यात गरम अन्नपदार्थ ठेवण्याऐवजी ते थंड करून ठेवल्यास त्यापासून कोणतेही नुकसान होणार नाही, असंही अभ्यासक म्हणाले.

Story img Loader