पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन तसेच त्यांच्या पत्नी जील बायडन यांच्या भेटीच्या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी त्यांना भारताकडून काही भेटवस्तू दिल्या. याच भेटवस्तूंमध्ये उत्तराखंडाच्या बासमती तांदळाचा समावेश आहे. त्याच निमित्ताने उत्तराखंडाच्या बासमतीचा इतिहास जाणून घेणे समयोचित ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा बासमती तांदूळ

भारताच्या बासमती तांदळाची ख्याती जगभरात आहे. काश्मीर पासून ते दक्षिण भारतापर्यंत भारतात बासमती तांदळाचे उत्पादन घेतले जाते. सफेद, तपकिरी, लाल, काळा, जांभळा अशा वेगवेगळ्या रंगाच्या, सुगंधाच्या, तसेच लहान, मध्यम, लांब आकाराचे दाणे असलेल्या बासमती तांदळाचे उत्पादन घेतले जाते. लाल, काळ्या, सुवर्ण अशा तीन रंगाच्या वेगवेगळ्या जातींचे उत्पादन एकट्या बिहारमध्ये घेतले जाते. एकूणच तांदळाच्या उत्पादनाच्या इतिहासात बिहारचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतातील प्राचीन तांदळाच्या उत्पादनाचे पुरावे मोठ्या प्रमाणात बिहारमध्येच सापडतात. भारतात पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, मध्यप्रदेश, राजस्थानचा काही भाग बासमतीच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. बासमती तांदळात काही औषधी गुणधर्म आहेत. या तांदळात कर्बोदकांचे प्रमाण अधिक असते. जगाला ६५ % बासमती तांदूळ भारत पुरवतो.

आणखी वाचा : विश्लेषण: हिटलरच्या पेन्सिलमध्ये दडलाय इतिहास! कोण होती या हुकुमशहाची प्रेयसी?

भारतातील तांदळाची प्राचीनता

मध्य गंगेच्या खोऱ्यातील उत्तर प्रदेश मधील लहूरदेवा या स्थळावरून तांदळाच्या वापराचे प्राचीन पुरावे उत्खननात सापडले. हा पुरावा इसवी सनपूर्व ६००० वर्षांपूर्वीचा आहे. किंबहुना सिंधू संस्कृतीत भात हा तत्कालीन लोकांच्या जेवणातील मुख्य घटक होता, हे पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाले आहे. वैदिक साहित्यात तांदळाचे वेगवेगळे उपयोग दिले आहे. वैदिक साहित्यात नमूद केल्याप्रमाणे यज्ञाच्या आहूतीमध्ये तांदळाचा समावेश होत होता. महाभारत, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता या ग्रंथात तांदळाच्या काही प्रकारांचे वर्णन दिलेले आहे.

बासमती नावाची व्युत्पत्ती

बासमती या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत. भारतासह बासमतीचे उत्पादन पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बास (वास) म्हणजे सुगंध तर मती म्हणजे बुद्धी-मन. ज्या तांदळाचा सुगंध मनाला- बुद्धीला भावतो तो म्हणजे ‘बासमती’. प्राचीन काळात बासमती तांदूळ हा वासमती म्हणून ओळखला जात होता.

बासमतीचा प्राचीन संदर्भ

बासमती तांदळाचा प्राचीन संदर्भ ऐन- ए- अकबरी मध्ये सापडतो. अकबराच्या ऐन- ए- अकबरी मध्ये लाहोर, मुलतान, अलाहाबाद, अवध, दिल्ली, आग्रा, अजमेर, आणि माळवा, रायसेन, हरियाणा ते पानिपत (कर्नाल, सफिदोन आणि गणोर), जज्जर, रोहतक, गोहाना, हिस्सार, हांसी, मेहम, सिरसा,आणि रेवाडी इत्यादी प्रांतांचा संदर्भ सापडतो. या संदर्भामध्ये या भागात मस्किन (लाल तांदूळ) नावाचा सुगंधी तांदूळ पिकवला जात होता, तसेच हा तांदूळ महाग असल्याचा संदर्भ ऐन- ए- अकबरीत देण्यात आला आहे.

आणखी वाचा : विश्लेषण: चुंबनाची परंपरा नक्की कोणाची? भारताची की मेसोपोटेमियाची? काय सांगतेय नवीन संशोधन ?

देहरादूनचा बासमती

देहरादूनचा बासमती तांदूळ हा त्याच्या सुगंधासाठी तसेच चवीसाठी विशेषच प्रसिद्ध आहे. आज हा तांदूळ उत्तराखंड राज्याची ओळख असला तरी अफगाणिस्तानमधील कुनार प्रांतातून हा तांदूळ १९ व्या शतकात भारतात आला. ब्रिटिशांनी अफगाणिस्तानच्या राजाला हद्दपार केले होते, त्यावेळी त्याचे वास्तव्य देहरादून येथे असल्याने त्याच्या रोजच्या आहारात या तांदळाचा समावेश होत होता. याच काळात या भागात या तांदळाचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. १८४० साली पहिल्या अँग्लो- अफगाण युद्धानंतर ब्रिटिशांनी गझनी व दोस्त मुहम्मद खान (संस्थापक, बरकझाई राजवंश) यांच्यावर विजय संपादन केला होता. १८४२ साली दोस्त मुहम्मद खान यांनी पुन्हा आपले राज्य हस्तगत केले होते. परंतु दुसऱ्या अँग्लो- अफगाण युद्धानंतर दोस्त मुहम्मद खान अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यास यश आले. १८७९ साली दोस्त मुहम्मद खान हे देहरादूनला आले, ते बासमती पुलावाचे भलतेच चाहते होते. त्यांनी अफगाणिस्तान मधला बासमती तांदूळ देहरादूनच्या डून खोऱ्यात आणला. यामुळे स्थानिक तांदळाच्या गुणवत्तेत सुधारणा झाली. त्यामुळे या भागातील बासमतीच्या नावलौकिकाचे श्रेय दोस्त मुहम्मद खान यांना दिले जाते.

लोकसाहित्यातील देहरादूनचा बासमती

असे असले तरी उत्तराखंड व आजूबाजूच्या भागात पूर्वीपासून बासमती तांदळाचे उत्पादन घेतले जात होते, याचे पुरावे स्थानिक लोकसाहित्यातून मिळतात. स्थानिक पौराणिक कथेनुसार शिव व पार्वतीने पृथ्वीतलावर पक्षाच्या रूपाने जन्म घेतला होता. बाली नंदी आणि बाल ईश्वर या नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांच्या विवाहानंतर ते हिमालयात कैलास पर्वतावर स्थायिक झाले. त्यांच्या संवादात जिरा बासमतीचा संदर्भ आला आहे. गढवालमधील जागर नृत्य गाण्यात अर्जुन व वासुदत्ताच्या प्रेमकथेचा संदर्भ येतो. या कथेत अर्जुनाला स्वप्नात नागकन्या वासुदत्ताच्या रूपाचे दर्शन होते. प्रत्यक्ष गाण्यात तिच्या रूपाचे वर्णन करताना बासमती तांदळाचा दाखला देण्यात आला आहे. तिच्यात सोन्याचे तेज आहे, तिचे सौंदर्य स्वर्गीय आहे, ती लोण्यासारखी मऊ, तर बासमती तांदळाच्या तुकड्याप्रमाणे सुंदर आहे, असे वर्णन करण्यात आले आहे.

उत्तराखंडमधील देहरादून येथील तांदूळ जगात इतरत्र कोठेही सापडत नाही, त्यामुळेच तो लवकरच नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच दृष्टिकोनातून उत्तराखंड सरकारने या तांदळाच्या जतनाची मोहीम हाती घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतींना तांदळाच्या स्वरूपात दिलेली भेटवस्तू नक्कीच या तांदळाच्या संवर्धनासाठी मोलाची ठरणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi gift uttarakhand basmati rice to joe biden svs
Show comments