PM Modi in Anuradhapura: भगवान गौतम बुद्धांना ज्या बोधीवृक्षाखाली बोधी अर्थात ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधीवृक्षाच्या फांदीपासून सुरु झालेला भारत-श्रीलंका सांस्कृतिक बंध आज जागतिक व्यासपीठावर अधिक ठळकपणे झळकतो आहे. श्रीलंकेच्या धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचा श्वास असलेल्या अनुराधापुरा या नगरीने १३०० वर्षे राजधानीचं ओझं खांद्यावर वाहिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक भेटीमुळे ही नगरी आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेची प्राचीन राजधानी अनुराधापुरा या ठिकाणाला भेट दिली. भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या २०१९ नंतरच्या पहिल्यावहिल्या श्रीलंका दौऱ्यात अनुराधापुराच्या पवित्र नगरीची भेट हा महत्त्वाचा भाग आहे. हा दौरा ४ एप्रिलपासून सुरु झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ एप्रिल रोजी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुर कुमार डिसानायके यांच्याबरोबर अनुराधापुरा येथे जाणार असल्याचे निश्चित झाले होते. श्री महाबोधी वृक्षाजवळ पूजा केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी अनुराधापुरा रेल्वे स्थानकावर उत्तरेकडील रेल्वेमार्गासाठी सिग्नल प्रणालीचे उद्घाटन केले. या निमित्ताने अनुराधापुरा या प्राचीन नगरीच्या समृद्ध इतिहासाचा घेतलेला हा आढावा.
अनुराधापुरा– एक समृद्ध इतिहास

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

अनुराधापुरा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. हे स्थळ जवळपास एक हजार वर्षांहून अधिक काळ श्रीलंकेच्या राजधानीचे ठिकाण होते. उत्तर-मध्य प्रांतात वसलेली ही प्राचीन नगरी धार्मिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक संबंधांचं हे जिवंत प्रतीक मानलं जातं.

अनुराधापुराची स्थापना

अनुराधापुरा या नगरीची स्थापना इ.स.पू. ६ व्या शतकात राजा विजयाचा मंत्री असलेल्या अनुराधाने केली होती. इ.स.पू. ३७७ मध्ये राजा पांडुकाभयाने येथे आपली राजधानी स्थापन केली. तेव्हापासून म्हणजेच इ.स.पू. ३७७ पासून ते इ.स. १०१७ पर्यंत अनुराधापुरा ही नगरी श्रीलंकेच्या वेगवेगळ्या राजांनी राजधानीचे ठिकाण म्हणून निवडली होती. राजा कश्यप पहिल्याने इ.स. ४७३ मध्ये आपली राजधानी सिगिरियाला हलवली आणि तेव्हा काही काळ अनुराधापुरा राजधानीचे ठिकाण नव्हते. मात्र इ.स. ४९१ मध्ये कश्यपाच्या मृत्यूनंतर अनुराधापुरा पुन्हा राजधानीचे ठिकाण झाले. अनुराधापुरा बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते.

देवनांपियतिस्स

इ.स.पू. ३ ऱ्या शतकात भारतातून बौद्ध धर्म श्रीलंकेत गेला. सम्राट अशोकाने इ.स.पू. २५० च्या सुमारास बौद्ध धर्म स्वीकारला, धर्माच्या प्रसारासाठी त्याने त्याचा पुत्र महेंद्र याला श्रीलंकेत पाठवले होते. त्यावेळी देवनांपियतिस्स हे अनुराधापुराचे राजा होते. अशोक आणि देवनांपियतिस्स हे दोघं मित्र असल्याचं मानलं जातं. देवनांपियतिस्स यांनी मिहिंतले येथे बौद्ध धर्म स्वीकारला. नंतर सम्राट अशोकाने आपली कन्या संघमित्रा हिला काही भिक्षुणींसह श्रीलंकेत पाठवलं. असं मानलं जातं की, संघमित्रा बोधगया येथील बोधी वृक्षाची एक फांदी बरोबर घेऊन गेली होती. बोधगया येथील या वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्याचं मानलं जातं. ही फांदी अनुराधापुरा येथे लावण्यात आली आणि आजही ती हजारो अनुयायांना आकर्षित करते. यानंतर बौद्ध धर्म संपूर्ण श्रीलंकेत पसरला आणि सिंहली समाजावर त्याचा खोल प्रभाव पडला.

प्राचीन स्तूप, विहार तसेच इतर प्राचीन अवशेषांनी समृद्ध असलेले अनुराधापुरा हे श्रीलंकेतील अनेक प्रसिद्ध बौद्ध स्थळांचं केंद्र आहे. येथील जेतवनरमैया स्तूप हा मुळात १२२ मीटर उंच होता. हा ३ ऱ्या शतकात बांधण्यात आलेला जगातील सर्वात उंच स्तूप होता. राजा दुतुगेमुनू यांनी इ.स.पू. १४० मध्ये बांधलेला रवणवेलीसाया स्तूप १०३ मीटर उंच आहे आणि त्याची परिघरेषा २९० मीटर इतकी आहे. १९ व्या शतकात हा स्तूप भग्न अवस्थेत होता. परंतु, २० व्या शतकाच्या सुरुवातीला तो पुन्हा मूळ रूपात आणण्यात आला. अबयगिरी डगबा या स्तूपात एकेकाळी भगवान बुद्धांच्या दाताचे अवशेष ठेवण्यात आले होते. सध्या हा पवित्र दात कँडी शहरातील एका मंदिरात ठेवण्यात आला आहे. अनुराधापुरातील इतर प्राचीन महत्त्वाच्या वास्तूंमध्ये इसुरुमुनिया विहार, थेरवाद शाळा आणि कुट्टम पोकुना (जुळे तलाव) यांचा समावेश होतो.

अनुराधापुराचा ऱ्हास

एकेकाळी श्रीलंकेची संपन्न राजधानी असलेली अनुराधापुरा नगरी इ.स. ९९३ मध्ये भारताच्या राजा राजेंद्र चोल पहिल्याच्या आक्रमणात उद्ध्वस्त झाली. चोल राजाने अनुराधापुराचा शेवटचा राजा महिंद पाचवा आणि त्याच्या कुटुंबाला बंदी केलं होतं. याचबरोबर इ.स. १०१७ मध्ये या पवित्र नगरीचा इतिहास संपुष्टात आला. महिंद यांना भारतात नेण्यात आलं आणि तिथेच इ.स. १०२९ मध्ये त्यांचं निधन झालं. यानंतर राजधानी पुढे पोलोन्नरुवा येथे हलवण्यात आली आणि सुमारे १३०० वर्षे राजधानी राहिलेली अनुराधापुरा काहीशी विस्मरणात गेली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi in anuradhapura the rich history of sri lankas ancient capital svs