आज भारतातून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. हार्वर्ड, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज इत्यादी काही जगप्रसिद्ध विद्यापीठं आहेत. परंतु असा एक काळ होता, ज्यावेळी परदेशातून भारतात शिकण्यासाठी विद्यार्थ्यांची रांग लागत असे. प्राचीन भारतात नालंदा, तक्षशिला, वल्लभी इत्यादी काही प्रसिद्ध विद्यापीठं होती. याच प्रसिद्ध विद्यापीठांच्या यादीतील नालंदा या प्राचीन विद्यापीठाच्या परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या विद्यापीठाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी आज (१९ जून) राजगीर बिहारला केले. त्याच निमित्ताने प्राचीन नालंदा विद्यापीठाविषयी जाणून घेणे नक्कीच समयोचित ठरणारे आहे.
अधिक वाचा: केनिया सरकार करणार १० लाख भारतीय कावळ्यांचा संहार; काय आहे नेमकं प्रकरण?
प्राचीन नालंदा विद्यापीठ
प्राचीन नालंदा विद्यापीठ बिहार राज्यातील राजगीरच्या उत्तरेस ११·२७ कि.मी. अंतरावर होते. या विद्यापीठाची स्थापना इसवी सनाच्या पाचव्या शतकात झाली. या विद्यापीठाच्या स्थापनेचे आणि संवर्धनाचे श्रेय गुप्तवंशाच्या सहा राजांकडे जाते. नालंदा हे जगाच्या इतिहासातील पहिल्या काही आंतराष्ट्रीय विद्यापीठांपैकी एक मानले जाते. प्राचीन नालंदा विद्यापीठाचे भग्न अवशेष आजही आपण पाहू शकतो. हे प्राचीन बौद्ध शिक्षणाचे केंद्र होते. बौद्ध विद्वानांनी आणि राजांनी या विद्यापीठाला संरक्षण दिले होते. त्यात पाल वंशीय राजांचा उल्लेख करणे महत्त्वाचे ठरते. अनेक परकीय प्रवाशांनी त्यांच्या नोंदीत या विद्यापीठाचा उल्लेख केला आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
ऐतिहासिक संदर्भांनुसार या विद्यापीठाची स्थापना गुप्त घराण्यातील राजा कुमारगुप्त याच्या कालखंडात झाली. या विद्यापीठात सुमारे १०,००० विद्यार्थी अध्ययनासाठी तर २००० विद्वान अध्यापनासाठी होते. याविषयीची माहिती आपल्याला चिनी प्रवासी ह्युएन त्सांग याच्या नोंदीत सापडते. पुरातत्त्वीय उत्खननात या स्थळावर एक सील/ शिक्का सापडला होता. त्यावरूनच या विद्यापीठाची स्थापना गुप्त कालखंडात झाल्याचे समजते.
विद्यापीठाची रचना
नालंदा विद्यापीठाच्या सुमारे दीड किमी. लांब व पाऊण किमी. रुंद क्षेत्रात विद्यापीठाची भव्य इमारत व वसतिगृह होते. याशिवाय सुसज्ज ग्रंथालयासाठी रत्नसागर, रत्नोदय व रत्नरंजक अशा आणखी तीन सुंदर इमारती होत्या. या ग्रंथालयाच्या विभागात धर्मगंज म्हणत. निवासासाठी ४,००० व अभ्यासासाठी १,००० खोल्या होत्या. ८,५०० विद्यार्थी व १,५०० शिक्षक होते. प्रत्येक दिवशी शंभर व्याख्याने होत. येथे राहणाऱ्यांना निवास, भोजन, कपडालत्ता, औषधोपचार व शिक्षण विनामूल्य असे. हा सर्व खर्च दान दिलेल्या १०० खेड्यांच्या उत्पन्नातून व इतर देणग्यांतून चाले (संदर्भ: मराठी विश्वकोश).
भव्य नालंदा ग्रंथालय
या विद्यापीठातील ग्रंथालयाची ख्याती सर्वदूर पसरलेली होती. नालंदा विद्यापीठाच्या ग्रंथालयात विविध विषयांवरील ग्रंथ, हजारो हस्तलिखितांचा संग्रह होता. तरीही बौद्ध तत्त्वज्ञानाच्या ग्रंथांसाठी हे संग्रहालय प्रसिद्ध होते. सुलतानाच्या आक्रमणानंतर हे ग्रंथालय जवळपास तीन महिने जळत होते.
विषयांची विविधता
नालंदा हे जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठ मानले जाते. सात शतकांहूनही अधिकची कारकीर्द या विद्यापीठाने गाजवली. बौद्ध धर्माचे भिन्न संप्रदाय, जैन धर्म, ब्राह्मणी धर्म व इतर धर्म त्याचप्रमाणे योग, व्याकरण, साहित्य, तर्कशास्त्र, शब्दविद्या, चिकित्साविद्या, गणित, ज्योतिष, चित्रकला, शिल्पशास्त्र, मंत्रविद्या, दंडनीती, वेदविद्या इ. विषय शिकविण्याची व्यवस्था इथे होती.
परदेशी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय
विद्यापीठाच्या कीर्तीमुळे देशातील कानाकोपऱ्यांतून व चीन, कोरिया, तिबेट इ. देशांतूनही तेथे विद्यार्थी येत. द्वारपंडित घेत असलेली प्रवेशपरीक्षा अत्यंत कडक असे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शेकडा २० ते ३० टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळे. विद्यापीठाने आर्यदेव, सिलभद्र, कर्णमती, स्थिरमती, गुणमती, बुद्धकीर्ती, शांतरक्षित, कमलशील इ. विद्वानांची मालिका निर्माण केली. न्यायशास्त्र ही या विद्यापीठाची मोठी देणगी आहे.
विद्यापीठाचा ऱ्हास
गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर पाल वंशीय राजांनी आणि बौद्ध मठांनी या विद्यापीठाला संरक्षण दिले. परंतु नंतरच्या कालखंडात बौद्ध धर्माच्या ऱ्हासानंतर या विद्यापीठाने आपले वैभव गमावले. इसवी सन ११९० साली बख्तियार खिलजी नावाच्या एका सुलतानाने हे विद्यापीठ जाळून उध्वस्त केलं. यामुळे विद्यापीठाच्या मालमत्तेचे भयंकर नुकसान झालं, अतिशय मौल्यवान, दुर्मिळ ग्रंथ संपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. असे मानले जाते की, या विद्यापीठातील ग्रंथसंपदा जवळपास तीन महिने जळत होती.
पुनरुज्जीवन
आधुनिक काळात विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. २००६ साली माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी या विद्यापीठाच्या पुनर्जीवनाचा अधिकृत प्रस्ताव दिला होता. बिहार विधानसभेला संबोधित करताना ते म्हणाले होते, ‘ “[ नालंदाचे ] भूतकाळातील वैभव पुन्हा मिळवण्यासाठी… निवडक आशियायी देशांच्या भागीदारीत बोधगया नालंदा इंडो-एशियन इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंगची स्थापना करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे”. २००७ साली नालंदाची पुनर्स्थापना करण्याच्या प्रस्तावाला फिलीपाईन्समधील मंडाउ येथे पूर्व आशिया शिखर परिषदेत मान्यता देण्यात आली. २००९ च्या पूर्व आशिया शिखर परिषदेत, हुआ हिन, थायलंडमध्ये या समर्थनाची पुनरावृत्ती करण्यात आली. या प्रस्तावाला भारता व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, ब्रुनेई दारुसलाम, कंबोडिया, चीन, इंडोनेशिया, लाओस, मॉरिशस, म्यानमार, न्यूझीलंड, पोर्तुगाल, सिंगापूर, दक्षिण कोरिया, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाम या १७ देशांनी या विद्यापीठाच्या पुनर्निर्मितीसाठी मदत केली आहे. २०१३ साली, प्रसिद्ध वास्तुविशारद बी वि दोशी यांच्या वास्तुशिल्प कन्सल्टंट्सने प्रस्तावित केलेल्या कॅम्पससाठीचा मास्टरप्लॅन निवडला गेला.
नालंदा विद्यापीठाने २०१४ साली १५ विद्यार्थ्यांच्या तुकडीला स्कूल ऑफ हिस्टोरिकल स्टडीज आणि स्कूल ऑफ इकोलॉजी अँड एन्व्हायर्नमेंटल स्टडीजमध्ये प्रवेश दिला होता. याविषयीचे वर्ग राजगीर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले होते. बिहार सरकार संचालित हॉटेल तथागत हे विद्यार्थ्यांसाठी तात्पुरते वसतिगृह म्हणून वापरण्यात आले. प्राध्यापकांमध्ये सहा शिक्षकांचा समावेश होता. नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन २००७ पासून या प्रकल्पाशी जोडले गेले होते. ते या विद्यापीठाचे पहिले कुलपती झाले.
निष्कर्ष
प्राचीन नालंदा विद्यापीठाची स्थापना कुमारगुप्ताने इसवी सन पाचव्या शतकात केली. तो गुप्त वंशाचा महान राजा होता. हे विद्यापीठ भारतातील शिक्षणाचे सर्वात मोठे केंद्र होते आणि शेजारील देशांतील शेकडो विद्वानांनी या विद्यापीठाला भेट दिली होती. इ.स.पू. ११ व्या शतकात खिलजीच्या आक्रमणामुळे विद्यापीठ उद्ध्वस्त झाले. आणि आज अनेक देशांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर, भारताच्या बिहार राज्यात नुकतेच प्राचीन विद्यापीठ पुन्हा स्थापित करण्यात आले आहे.