Rani Durgavati’s 500th birth anniversary मध्य प्रदेश येथे भाजपा सरकारचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सहा दिवसाच्या ‘राणी दुर्गावती गौरव यात्रांचे’ आयोजन केले आहे. २२ जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या यात्रांचे उदघाटन केले. राणी दुर्गावती हिला मुघलांच्या विरोधात लढताना वीरमरण आल्याने तिच्या स्मरणार्थ या यात्रांचे आयोजन करण्यात आलेले होते. या यात्रांची सुरूवात बालाघाट, छिंदवाडा, सिंगरामपूर (दमोह जिल्हा), धौहनी आणि उत्तरप्रदेश मधील कालिंजर किल्ला या ठिकाणांवरून झाली. आणि या सर्व यात्रा २७ जून रोजी शहडोल (मध्यप्रदेश) येथे पोहोचल्या. विशेष म्हणजे या यात्रांची सांगता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होती. तसेच पंतप्रधान मोदी यांनी राणी दुर्गावतीच्या ५०० व्या जयंती निमित्त तिच्या आयुष्यावर चित्रपट काढणार असल्याचे आज मध्य प्रदेश येथे घोषित केले. याशिवाय राणीच्या स्मरणानिमित्त एक चांदीचे नाणे व पोस्टाचे तिकीट काढणार असल्याचेही घोषित केले आहे. त्यानिमित्ताने राणी दुर्गावतीचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे ठरावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाची निवडणूक खेळी

देशभरातील मोठ्या आदिवासी समाजापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणून भाजपा या यात्रांकडे पाहत असल्याचा आरोप होत आहे. २०२१ मध्ये देखील, आदिवासी क्रांतिकारक नेत्याच्या जयंती निमित्त ‘तंट्या भिल्ल गौरव यात्रा’ भाजपाने आयोजित केली होती; तसेच अनेक सार्वजनिक जागा आणि संस्थांना आदिवासी नेत्यांची नावे देण्यात आली होती. मध्य प्रदेशात या वर्षअखेरीस निवडणुका होणार आहेत आणि तेथील आदिवासी लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या २१% इतकी आहे. सर्व भारतीय राज्यांमध्ये एकट्या मध्य प्रदेश मध्ये मोठया संख्येने आदिवासी समाज स्थायिक आहेत. म्हणूनच या यात्रांकडे भाजपाची निवडणूक खेळी म्हणून पाहिले जात आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : भारतात आयात होत होता… अमेरिकन बर्फ! का, कशासाठी?

कोण होती राणी दुर्गावती?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या राणीचा गौरव ‘भारतीय आत्मनिर्धाराचे प्रतीक’ म्हणून केला आहे. राणी दुर्गावतीचा जन्म इसवी सन १५२४ मध्ये महोबाच्या चंदेला घराण्यात झाला असे अभ्यासक मानतात. राणी दुर्गावतीचे वडील रथा आणि महोबाचे राजा ‘सालबहन’ (शिलवाहन) हे होते. १० व्या शतकात मध्यप्रदेश येथील खजुराहो मंदिर समूहाच्या बांधकामाची सुरुवात चंदेल घराण्यांनीच केली होती. भारतीय इतिहास आणि कला या दोन्हींमध्ये चंदेल घराण्याचे मोठे योगदान आहे. परंतु राणी दुर्गावती ही स्वतःच्या कर्तृत्त्वासाठी ओळखली जाते. प्रचलित कथांनुसार तिने खुद्द मुघल सम्राट अकबर व त्याचा सेनापती असफ खान यांच्याशी लढा दिला होता.

राणी दुर्गावतीचा विवाह

राणी दुर्गावतीचा विवाह हा स्वयंवर पद्धतीने झाला होता. तत्कालीन समाजात आपल्या जातीच्या बाहेर जाऊन प्रेम व लग्न करणारी कर्तृत्त्ववान राणी म्हणून तिचा गौरव केला जातो. राणी दुर्गावतीचा विवाह दलपत शहा याच्याशी झाला होता. दलपत शहा गढ़ा-कटंगा राज्याचा (गोंड) राजा ‘संग्राम शहा यांचा पुत्र होता. या गोंड राजाच्या साम्राज्यात नर्मदा खोरे आणि उत्तर मध्य प्रदेशातील काही भाग समाविष्ट होत होता. किंबहुना संग्राम शहा याच्याच कारकिर्दीत त्याने हे भाग आपल्या राज्याला जोडले होते. म्हणूनच गोंड जमातीच्या सर्वात शक्तिशाली राजांपैकी एक म्हणून त्याला ओळखले जाते. राणी दुर्गावती आणि दलपत शहा यांच्या अनेक प्रेमकथा प्रसिद्ध आहेत. एका कथेनुसार हे दोन प्रेमी प्रथम महोबाच्या मनिया देवी मंदिरात आणि नंतर कालिंजर किल्ल्याजवळ भेटले होते. १९६० च्या दशकातील ‘महाराणी दुर्गावती’ या सुप्रसिद्ध साहित्यिक वृंदावन लाल वर्मा लिखित पुस्तकात याचा संदर्भ सापडतो. स्थानिक लोक गीतांमध्ये राणी दुर्गावतीच्या शौर्यगाथेसोबत तिच्या प्रणयाचेही संदर्भ दिले जातात.

लोकसाहित्यातील संदर्भ: ‘गढ़ मंडला के दलपती राजा प्रेमे प्यारी लगाई/ बडे प्रतापी राजा वे दुर्गा से शादी रचयी/ मुघलो से वो लडी लराई कभी हर ना मानी/ लरते लारते नारई नाला पाहुच गई’

(भावार्थ : ‘गढ़ मंडलाचा शक्तिशाली राजा दलपती राजा प्रेमात होता आणि त्याने दुर्गाशी लग्न केले/ तिने मुघलांशी लढा दिला आणि हार मानण्यास नकार दिला/ लढत लढत ती नराई नाल्याला पोहोचली’).

लोकस्मृतीमध्ये, गोंड राणीचे प्रेम आणि युद्ध या दोन्हीसाठी स्मरण केले जाते. तिने राजकुमाराची मोहक स्वप्ने पाहिली तरीही, किशोरवयीन दुर्गावतीला माहीत होते की त्यांचे प्रेम किती अशक्य आहे. एक राजपूत आणि राजकुमारी या नात्याने तिला तिच्याकडून काय अपेक्षित आहे हे खूप चांगले समजले होते. अखेरीस तिच्या वडिलांनी मंजूर केलेल्या आणि आमंत्रित केलेल्या पाहुण्यांमधूनच तिचा नवरा निवडायचा होता. तिच्या वडिलांना दलपत सोबतचा विवाह मान्य नव्हता. वडिलांचा विरोध असताना तिने दलपत सोबत पळून जाऊन विवाह केला. या सारखे काव्यात्मक वर्णन राणी दुर्गावती व दलपत शहा यांच्या प्रेमाविषयी स्थानिक कथा-काव्यामध्ये आढळते.

राणी दुर्गावती एक राज्यकर्ती

दुर्गावतीला विवाहानंतर काही वर्षातच वैधव्य प्राप्त झाले. तिने आपला मुलगा बीर नारायण याला गादीवर बसवून मोठ्या जोमाने आणि धैर्याने देशावर राज्य केले. प्रसिद्ध इतिहासकार सतीश चंद्रा यांनी त्यांच्या ‘मध्ययुगीन भारत’ या पुस्तकात तिचे वर्णन “एक उत्तम लक्ष्य साधणारी, बंदूक, धनुष्य आणि बाण वापरण्यात कुशल” असे केले आहे. ती वाघांची शिकार करण्यात इतकी तरबेज होती की, वाघ दिसल्याचे लक्षात येताच त्याला गोळी मारल्याशिवाय ती पाणी पीत नसे, अशा तिच्या विषयीच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

आणखी वाचा: विश्लेषण: Cultural Genocide – एखाद्या संस्कृतीच्या इतिहासातील पाऊलखुणा पुसून टाकणं शक्य असतं का?

गढ़ा-कटंगावर मुघलांचा हल्ला

भारताच्या इतिहासात १६ वे (इसवी सन १५५६-७६ दरम्यान) शतक हे मुघलांच्या विस्तारासाठी प्रसिद्ध आहे. या काळात मुघलांनी अकबराच्या अधिपत्याखाली आपला साम्राज्य विस्तार केला होता. याच साम्राज्यविस्ताराचा भाग म्हणून अकबराने माळव्याचे राज्य जिंकून घेतले. राणी दुर्गावतीचे राज्य माळव्याच्या शेजारील राज्य होते. सरकारी नोंदींनुसार राणी दुर्गावतीने जवळपास १६ वर्षे राज्य केले. इतर राज्यांशी व्यापारही केला. याचे पुरावे चलनाच्या स्वरूपात सापडतात. अनेक सार्वजनिक कामे केली. जबलपूरजवळ एका मोठ्या सार्वजनिक जलाशयाचे बांधकाम केले, म्हणूनच हा तलाव राणीताल (राणीचे टाके) म्हणून ओळखला जातो. अबुल फझल याने अकबरनाम्यात तिचे वर्णन केलेले आहे. या वर्णनानुसार ‘ती सुंदर, कृपाशाली, पुरुषांसारखे धैर्य आणि शौर्य बाळगणारी होती. तिच्या राज्यात सुबत्ता नांदत होती. म्हणूनच लोकांनी सोन्याची नाणी व हत्तीच्या रूपात कर भरला होता.’

मुघल आक्रमण

दुर्गावती राणीच्या राज्याची कीर्ती ऐकून अलाहाबादचा मुघल गव्हर्नर असफ खान यानेही १० हजार घोडदळासह गढ़ा-कटंगावर हल्ला केला होता, असे इतिहासकार चंद्रा नमूद करतात. परंतु इतर काही अभ्यासक हे आक्रमण अकबराच्याच सांगण्यावरून करण्यात आले होते, असे मानतात. किंबहुना याच काळात राणीला सिंहासनावरून पदच्युत करण्यासाठी काही स्थानिक सत्ताधाऱ्यांचाही पुढाकार होता. यामुळे राणी दुर्गावतीला आपल्या राज्याचा त्याग करून लहान सैन्य बळासह वनात स्थलांतर करावे लागले होते. राणी आपल्या सैन्यासह घनदाट वनात ‘नर्रे’ या ठिकाणी थांबली. व येथेच मुघलांविरुद्धच्या लढाईची योजना रचली. मुघल सैनिकांना या वनातील निसर्गाच्या काठिण्य पातळीची कल्पना नव्हती, याच संधीचा फायदा घेवून राणीने मुघलांविरुद्ध गोंड ही पहिली लढाई जिंकली. हे खरे असले तरी दुर्दैवाने नंतरच्या लढाईत तिचा पराभव झाला. हे युद्ध जवळपास दोन महिने चालले. याच लढाईत तिचा मुलगा मारला गेला, तीही जखमी झाली होती. परंतु मुघलांच्या हाती सापडू नये यासाठी तिने स्वतः खंजीर खुपसून वीरमरण पत्करले. या युद्धाचा तपशील अबुल फजल याने दिला आहे. या युद्धानंतर संग्राम शाह यांच्या धाकट्या मुलाने अकबराचे अधिपत्य स्वीकारले, म्ह्णून अकबराने असफ खान याला जिंकलेला प्रदेश त्याला सुपूर्त करण्यास सांगितला.

राणीच्या बलिदानानंतर एका शतकानंतर रामनगर शिलालेख (मध्यप्रदेश) कोरण्यात आला होता. या शिलालेखात गोंड वंशावळ दिली आहे, त्यात राणी दुर्गावतीचा संदर्भ सापडतो. या शिलालेखात लक्ष्मीचा अवतार असा तिचा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. दलपत शाह व त्याची पत्नी दुर्गावती हे उत्तम जोडपे असल्याचा आणि त्यांच्या विवाहाचा संदर्भ यात देण्यात आला आहे.

आणखी वाचा : विश्लेषण: हिटलरच्या पेन्सिलमध्ये दडलाय इतिहास! कोण होती या हुकुमशहाची प्रेयसी?

इतिहास आणि सध्याचे राजकारण

सध्याच्या राजकारणात दुर्गावतीच्या राष्ट्रभक्तीचा निवडणूक मोहीम म्हणून वापर केला जात आहे. स्थानिक आदिवासी समाजाला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी भाजपाने ही मोहीम हाती घेतल्याचे तज्ज्ञ सांगतात. या स्पर्धेत काँग्रेसही मागे नाही, २४ जून रोजी काँग्रेस नेते कमाल खान यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून राणीच्या कर्तृत्त्वाचे स्मरण केले. आणि तसेच “आमचे आदिवासी बांधव हा आमचा अभिमान असल्याचे राणीने सिद्ध केले,” असे त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मध्यप्रदेशमध्ये या वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेच्या २३० जागांपैकी ४७ जागा अनुसूचित जमातीच्या (एसटी) सदस्यांसाठी राखीव आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने या आधी दिलेल्या वृत्तानुसार, एकूण आदिवासी लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकसंख्या भिल्ल समाजाची आहे. त्यानंतर गोंड समाज सर्वाधिक आहे. मध्यप्रदेश मधील १.५३ कोटी आदिवासी लोकसंख्येपैकी ३४ टक्के लोकसंख्या गोंड समाजाची आहे. मंडला, दिंडोरी, अनुपपूर, यांसारख्या मध्यप्रदेशच्या पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये गोंड मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहेत. त्यामुळेच मतदानाच्या दृष्टीकोनातून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. २०२१ मध्ये, गोंड राजा संग्राम शाह म्हणजेच राणी दुर्गावतीचे सासरे यांच्या नावाने आदिवासी कला आणि संस्कृतीसाठी काम करणाऱ्या संस्थेला ५ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसेच अलीकडेच भोपाळच्या हबीबगंज स्टेशनचे नामकरण गोंड राणी कमलापती हिच्या नावे करण्यात आले आहे. एकुणात, हा सारा निवडणूक ‘बाजार’ असल्याची टीका होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi rani durgawati yatra history of durgawati svs