पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आठवड्यात दक्षिण-पूर्व आशियातील दोन देश ब्रुनेई आणि सिंगापूरला भेट दिली. पहिल्या टप्प्यात ब्रुनेईला भेट दिल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात मोदींनी सिंगापूरला भेट दिली. ब्रुनेई दारुसलाम या आग्नेय आशियाई राष्ट्राला भेट देणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. ब्रुनेई हा भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाचा आणि इंडो-पॅसिफिक व्हिजनचा एक भाग आहे. जगातील सर्वाधिक काळ राज्य करणारे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्याबरोबर मोदींनी व्यापार, संरक्षण, अंतराळ आणि सांस्कृतिक संबंधांवर चर्चा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदींच्या सिंगापूर दौऱ्यात सेमीकंडक्टर, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य आणि कौशल्य विकास यांसारख्या विषयांच्या महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे नवनिर्वाचित पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्यात भारत-सिंगापूर सेमीकंडक्टर इकोसिस्टम भागीदारीवरील सामंजस्य करार झाला. त्यामुळे पंतप्रधान मोदींची ही भेट भारतातील विकासासाठी खूप फायद्याची ठरेल, असे संगितले जात आहे. या भेटीचे महत्त्व जाणून घेऊ.

पंतप्रधान मोदींच्या सिंगापूर दौऱ्यात सेमीकंडक्टर, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य आणि कौशल्य विकास यांसारख्या विषयांच्या महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : मोबाइल फोनमुळे वाढतोय ब्रेन कॅन्सरचा धोका? ‘डब्ल्यूएचओ’च्या अभ्यासातून सत्य समोर

सेमीकंडक्टर चिप्स करार (SemiConductor Chips)

क्षेपणास्त्रांपासून मोबाइल फोनपर्यंत आणि कारपासून संगणकापर्यंत प्रत्येक गोष्टीत सेमीकंडक्टर चिप्सचे महत्त्व लक्षात घेता, सिंगापूरबरोबरच्या कराराचे भौगोलिक-सामरिक आणि भौगोलिक-आर्थिक महत्त्व आहे. करोना संकटादरम्यान या चिप्सच्या पुरवठ्यातील अडथळा, तैवान आणि दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या आक्रमक हालचालींमुळे भू-राजकीय तणाव उद्भवला. त्यानंतर भारताने स्वतः सेमीकंडक्टर चिप तयार करण्याचा निर्णय घेतला. जागतिक चिप उद्योगावर फारच कमी देशांतील कंपन्यांचे वर्चस्व आहे आणि भारत या उच्च-तंत्रज्ञानाच्या आणि महागड्या क्षेत्रात उशिराने का होईना पण प्रवेश करत आहे.

२०२१ मध्ये भारताने ७६ हजार कोटी रुपयांची ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन’ योजना सुरू केली. फेब्रुवारीमध्ये मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर-संबंधित प्रकल्पांना मंजुरी दिली आणि सुमारे १.२६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जोडली. त्याच महिन्यात सरकारने टाटा समूह आणि तैवानच्या पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (पीएसएमसी) यांच्यात सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट स्थापन करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली. मंत्रिमंडळाने योजनेंतर्गत चार असेंब्ली युनिट्ससह पाच सेमीकंडक्टर युनिट्सना आतापर्यंत मान्यता दिली आहे.

पंतप्रधान मोदींचा सिंगापूर दौरा भारतातील विकासासाठी खूप फायद्याची ठरेल, असे संगितले जात आहे. (छायाचित्र-पीटीआय)

सिंगापूर आणि सेमीकंडक्टर उद्योग

सिंगापूरमध्ये सेमीकंडक्टर उद्योग विकसित आहे. सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांच्या दूरदृष्टीमुळे हा उद्योग देशात लवकर सुरू करण्यात आला होता. ख्रिस मिलरच्या ‘चिप वॉर : द फाईट फॉर द वर्ल्डस मोस्ट क्रिटिकल टेक्नॉलॉजी (२०२२)’ मध्ये यामागील कथा सांगण्यात आली आहे. ली कुआन यू यांनी १९७३ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना सांगितले की, त्यांना आपल्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आहेत. त्यानंतर सिंगापूर सरकारने देशात टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स आणि नॅशनल सेमीकंडक्टर्स तयार करण्यासाठी समर्थन दिले. आज सिंगापूर जागतिक सेमीकंडक्टर उत्पादनात सुमारे १० टक्के योगदान देते, तसेच जागतिक वेफर फॅब्रिकेशनमध्ये पाच टक्के योगदान देते (सिलिकॉन वेफर हा अल्ट्रा प्युअर सिलिकॉनचा एक तुकडा आहे, जो सामान्यत: आठ ते १२ इंच व्यासाचा असतो. त्यावर चिप्स कोरल्या जातात) आणि देशातील एकूण सेमीकंडक्टर उपकरणांचे उत्पादन २० टक्के आहे.

जगातील १५ सेमीकंडक्टर कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांनी सिंगापूरमध्ये आपली दुकाने थाटली आहेत. देशाच्या आर्थिक वाढीमध्ये सेमीकंडक्टर क्षेत्राचा मोठा वाटा आहे. सिंगापूरचे सेमीकंडक्टरशी निगडीत प्रत्येक विभागांमध्ये योगदान आहे. त्यात इंटिग्रेटेड सर्किट (आयसी) डिझाइन, असेंब्ली, पॅकेजिंग आणि चाचणी, वेफर फॅब्रिकेशन आणि कच्च्या मालाचे उत्पादन, यांचा समावेश आहे. १९६० आणि ७० च्या दशकात अमेरिकन चिप निर्मात्यांनी कमी कामगार खर्च आणि पुरेसे कुशल कामगार मिळवण्यासाठी दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये सेमीकंडक्टरचे उत्पादन सुरू केले.

सिंगापूरमधील सेमीकंडक्टर प्लांट ३७४ हेक्टर परिसरात पसरला असून त्यात चार वेफर फॅब्रिकेशन पार्कचा समावेश आहे. इथे सरकार गुंतवणूकदारांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते. या क्षेत्रातील प्रतिभा विकसित करण्यासाठी सिंगापूरची विद्यापीठे मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स आणि आयसी डिझाइनसारखे कोर्सेस करण्याचा सल्ला देतात. या व्यवसायात पुरवठ्यातील अडथळे दूर करण्यावर सिंगापूरने लक्ष केंद्रित केले आहे. कारण अमेरिका आणि चीन यांच्यातील शत्रुत्व पाहता, हे मोठे आव्हान मानले जात आहे.

-२०२२ मध्ये तैवानच्या युनायटेड मायक्रोइलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशनने सिंगापूरमधील सेमीकंडक्टर फॅबसाठी पाच अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली. यावर्षीपासून ही योजना सुरू होण्याचा अंदाज आहे.

-सप्टेंबर २०२३ मध्ये ग्लोबल फाउंड्रीजने सिंगापूरमध्ये चार अब्ज डॉलर्सच्या फॅब्रिकेशन प्लांटचे उद्घाटन केले. हे प्लांट ‘२८ एनएम’ नोड तंत्रज्ञानावर आधारित विशेष चिप्स तयार करण्यास सक्षम आहे.

-जून २०२४ मध्ये एनएक्सपी सेमीकंडक्टर आणि टीएसईएमआय सी-समर्थित ‘ वॅनगार्ड इंटरनॅशनल सेमीकंडक्टर कोर्प’ने एका प्लांटसाठी ७.८ अब्ज डॉलर्सच्या संयुक्त उपक्रमाची घोषणा केली. त्यात ऑटोमोटिव्ह, औद्योगिक, ग्राहक आणि मोबाइल बाजार विभागांसाठी ४० ते १३० एनमी चिप्स तयार केल्या जातील. २०२७ मध्ये याचे उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.

भारतासमोरील आव्हाने आणि संधी

भारताच्या दृष्टिकोनातून, सिंगापूरचा सेमीकंडक्टर उद्योग २८ एनएम किंवा त्याहून अधिक एनएमचे नोड तयार करू शकते; ज्याचा वापर कार आणि औद्योगिक उपकरणांमध्ये केला जातो. सिंगापूरमधील उद्योग एआय सेक्टरमध्ये वापरल्या जाणाऱ्या हाय-एंड लॉजिक चिप्स तयार करण्यासाठी सुसज्ज नाही. उत्पादन खर्च वाढत असल्याने काही सेमीकंडक्टर कंपन्या सिंगापूरच्या बाहेर कमी किमतीच्या आणि कामगार केंद्रित योजनांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतासह अनेक देश देशांतर्गत सेमीकंडक्टर उद्योग तयार करण्यावर काम करत असल्याने, सिंगापूरमधील उद्योग दबावाखाली येऊ शकतात, विशेषत: वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि देशातील जमीन आणि कामगारांच्या मर्यादित संख्येमुळे.

हेही वाचा : बलात्काराच्या दोषींना थेट फाशी; पश्चिम बंगाल विधानसभेत मंजूर झालेले अपराजिता विधेयक काय आहे? राज्यं राष्ट्रीय कायद्यात बदल करू शकतात का?

प्रतिभा विकासामध्ये आणि सेमीकंडक्टर औद्योगिक पार्क्स (ज्याला सिंगापूरमध्ये वेफर फॅब पार्क म्हणतात) व्यवस्थापित करण्यासाठी ज्ञान वाटपाच्या दृष्टिकोनातून दोन्ही देशांतील करार महत्त्वपूर्ण आहेत. भारतातील मुबलक जमीन आणि श्रम खर्च, या दोन गोष्टींमुळे सिंगापूरमधील सेमीकंडक्टर कंपन्या त्यांच्या विस्तारीत योजनांसाठी भारताचा विचार करू शकतात. भारताला स्वत:चा सेमीकंडक्टर उद्योग विकसित करण्यासाठी सिंगापूरमधील सेमीकंडक्टर उपकरणे आणि मटेरियल निर्मात्यांबरोबर भागीदारी करण्यासही वाव आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi singapore visit significant for india semiconductor market rac