“माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी देशातील आणि देशाबाहेरील लोकांनी संगनमत करून सुपारी दिली आहे,” असे मोठे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. १ एप्रिल) केले. यानंतर विरोधकांकडून पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. भोपाळ येथे वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर राणी कमलापती रेल्वे स्थानकात झालेल्या कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी हे वक्तव्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सुपारी’ शब्दाचा उल्लेख केल्यामुळे, पुन्हा एकदा हा शब्द चर्चेत आला आहे. मराठी भाषेत खाण्याच्या सुपारीचा उल्लेख वेगळ्याच अर्थाने होऊ लागला, ज्याचा इतिहास अतिशय रंजक असा आहे. मुंबईच्या अंडरवर्ल्ड गुन्हेगारीत वापरला जाणारा हा शब्द आज निरनिराळ्या अर्थांनी वापरला जाऊ लागला आहे. त्यासंबंधी घेतलेला हा आढावा.
पंतप्रधान भोपाळमधील भाषणात म्हणाले की, ‘‘आपल्या देशातील काही लोकांनी २०१४ पासून माझी प्रतिमा मलिन करण्याचा दृढनिश्चय केला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या लोकांना ‘सुपारी’ (कंत्राट) दिली आहे. त्यांना काही लोक देशातून पाठिंबा देत आहेत, तर काही देशाबाहेरून काम करत आहेत. हे लोक सातत्याने माझी प्रतिमा खराब करण्याचा आणि माझ्यावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न करत आहेत.’’ कपिल सिब्बल यांनी मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटले की, पंतप्रधानांनी देशातील आणि देशाबाहेरील काही लोकांवर कंत्राट दिल्याचा आरोप केला आहे. आम्हाला त्यांची नावे कळली पाहिजेत. ते व्यक्ती, संस्था किंवा देश असोत. त्यांची नावे गुप्त राहता कामा नयेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आम्हाला संधी द्या.
अनेक भारतीय भाषांमध्ये सुपारी हा शब्द आलेला आपण ऐकला आहे. विशेषतः चित्रपटांमधून एखाद्याला मारण्याची सुपारी दिली जाते किंवा एखादे काम फत्ते करण्यासाठी सुपारी या शब्दाचा वापर झालेला आहे. फक्त हत्याच करण्यासाठीच नाही तर एखाद्याला कलंकित करणे, बदनाम करणे, अपमानित करणे किंवा राजकीय आणि वैचारिक विरोधकांना छळण्यासाठी ‘सुपारी’ दिल्याचे सर्रास ऐकायला मिळते.
मागच्या वर्षी केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी ‘द न्यू यॉर्क’ टाइम्सशी बोलताना काही माध्यमांना ‘सुपारीबाज मीडिया’ असे संबोधले होते. इस्रायलची सायबर सिक्युरिटी कंपनी एनएसओ ग्रुपकडून ‘पेगासस’ नामक हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर सरकारने विकत घेतले, असा आरोप काही माध्यमांनी केला होता. त्यावर व्ही. के. सिंह यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली.
सुपारी शब्दाचा वापर कसा सुरू झाला?
एरवी पान किंवा तंबाखूसोबत चघळण्यासाठी वापरण्यात येणारी ‘सुपारी’ ही कंत्राट या शब्दाशी समरूप कशी झाली?
मुंबई पोलीस दलातून निवृत्त झालेले सहायक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी सुपारी या शब्दाचा गर्भितार्थ कसा बदलत गेला, याबद्दल माहिती दिली. ढोबळे यांनी सत्तराच्या दशकात पोलीस दलात प्रवेश केला होता. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लग्न जमविण्यासाठी पाहुणे मंडळी एकत्र जमतात, तेव्हा त्याला पान-सुपारीचा कार्यक्रम म्हणत असत. यावरूनच पान-सुपारीकडे एखादी गोष्ट ठरविण्यासाठीची वचनबद्धता या अर्थाने पाहिले जाऊ लागले. सुपारी हा शब्द एखादा सौदा, देवाणघेवाण यांचा व्यवहार पक्का करणारा सांकेतिक शब्द बनला. याचा उलगडा करून सांगताना ते म्हणाले, ग्रामीण भागात एखाद्या गवंड्याला घर बांधण्याचे कंत्राट मिळाले, तर तो सहजपणे म्हणतो की, ‘कामाची सुपारी मिळाली आहे.’
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अनेक तरुण मुंबईच्या पोलीस दलात भरती झाले होते. या तरुणांनी आपल्यासोबत गावाकडची भाषादेखील आणली, असे ढोबळे यांनी सांगितले. त्याचदरम्यान मुंबईत संघटित गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. मुंबईत गँगवॉर ही सामान्य बाब झाली होती. त्याच वेळी सुपारी हा शब्द प्रचलित झाला. ‘अमुक एकाची सुपारी तमुक गँगने दिली,’ अशी वाक्यरचना ऐकल्यानंतर लगेच कळत होते की, एखाद्याला मारण्याचे कंत्राट कोणत्यातरी गँग किंवा एखाद्या गुंडाला दिलेले आहे.
पत्रकार आणि लेखक एस. हुसैन झैदी यांनी त्यांच्या ‘डोंगरी टू दुबई : सिक्स डेकेड्स ऑफ मुंबई माफिया’ या पुस्तकात सुपारी या शब्दाच्या उगमाबद्दल रंजक माहिती दिली आहे. माहिम परिसरात फार पूर्वी मेहामी नावाची जमात होती. झैदी यांनी सांगितल्याप्रमाणे, या जमातीच्या प्रमुखास ‘भीम’ म्हटले जायचे. जेव्हा एखादी अवघड मोहीम फत्ते करण्याची आवश्यकता निर्माण व्हायची, तेव्हा या ‘भीम’कडून सर्वांना माहिम किल्ल्यावर आवतण दिले जायचे. जमातीमधील योद्धे ‘भीम’च्या निमंत्रणावरून किल्ल्यावर जमत असत. खानपान झाल्यानंतर ‘भीम’कडून मोहिमेची माहिती दिली जायची. एका ताटात पान व त्यावर सुपारी आणि इतर वनस्पती ठेवून ते सर्व योद्ध्यांच्या मध्यभागी ठेवले जात असे. जो योद्धा हे पान उचलेल, त्याच्यावर मोहीम पार पाडण्याची जबाबदारी निश्चित केली जात असे.
अंडरवर्ल्डमध्ये सुपारी कशी प्रचलित झाली?
मुंबईत ८० आणि ९०च्या दशकांत गुन्हेगारीने टोक गाठले होते. मुंबईच्या रस्त्यांवर राजरोसपणे खून पडत होते. ज्याला कुणाला प्रतिस्पर्ध्याला संपवायचे आहे, त्याने अंडरवर्ल्ड टोळीला सुपारी दिली की काम झाले. सुपारीची (कंत्राट) किंमत हे ज्याला मारायचे आहे, त्या व्यक्तीवरून ठरत असे. सुपारीचे पैसे हप्त्यांमध्ये दिले जायचे. काम झाल्यानंतर सुपारीचे पूर्ण पैसे दिले जायचे. सुपारी देणाऱ्या व्यक्तीकडून ज्याला मारायचे आहे, त्याची सर्व माहिती दिली जायची, विशेष म्हणजे त्याचे येण्या-जाण्याचे मार्ग आणि वेळ माफियांना सांगितली जायची.
सुपारी मिळाल्यानंतर माफिया ज्या व्यक्तीला मारायचे आहे, त्याच्या हालचालींवर पाळत ठेवत असत. संबंधित व्यक्तीच्या हालचालींचे निरीक्षण केल्यानंतर सुपारी वाजवली जात असे. काम पूर्ण झाल्यानंतर पोलिसांची धरपकड आणि माफियांच्या विरोधी टोळीकडून प्रतिहल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे सुपारी घेणारे लगेचच काही दिवस भूमिगत व्हायचे. नव्वदच्या दशकात मुंबई पोलिसांवर माफिया टोळ्यांशी संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते. मुंबईतील दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन या दोन प्रतिस्पर्धी टोळ्यांनी पोलिसांना हाताशी धरून एकमेकांच्या टोळ्यांतील गुंडांना चकमकीत ठार केले.
पहिली सुपारी कधी दिली गेली?
झैदी यांनी लिहिलेल्या पुस्तकात पहिली सुपारी १९६९ मध्ये दिली गेली होती, असा उल्लेख आहे. गँगस्टर हाजी मस्तान याने रिअल इस्टेट माफिया युसूफ पटेल याला मारण्यासाठी पाकिस्तानच्या दोन गुंडांना १० हजार रुपयांची सुपारी दिली होती. पण पटेल यांच्या सुरक्षा रक्षकांनी ती विफल ठरवली.
पत्रकार जे. डे यांनी त्यांच्या ‘खल्लास : ॲन ए टू झेड गाईड टू द अंडरवर्ल्ड’ या पुस्तकामध्ये दाऊद इब्राहिमच्या अनेक सनसनाटी कंत्राटी हत्यांबद्दलच्या घटनांची माहिती आहे. २०११ साली, पत्रकार जे. डे यांचीही कंत्राट घेऊन हत्या करण्यात आली. मोटरसायकलवरून आलेल्या मारेकऱ्याने जे. डे यांच्या घराबाहेर त्यांची हत्या केली.
फेब्रुवारी १९८३ रोजी, अमीरझादा पठाण याला ठार मारण्याची सुपारी बडा राजन टोळीला देण्यात आली होती. मुंबईत अतिशय प्रभावशाली असलेल्या पठाण गँगने दाऊदचा भाऊ शब्बीर कासकरची हत्या केली होती. सुपारी वाजवण्याची जबाबदारी ५० हजारांत डेविड परदेशी नामक गुंडाला देण्यात आली होती. डेविडने मुंबईच्या सत्र न्यायालयात घुसून ६ सप्टेंबर १९८३ रोजी अमीरझादावर गोळ्या झाडल्या.
संगीतविश्वातील आघाडीचे निर्माते गुलशन कुमार यांची सुपारी देऊन केलेली हत्या मुंबई आणि देशभरात गाजली. १२ ऑगस्ट १९९७ रोजी अंधेरी येथील मंदिराबाहेर गुलशन कुमार यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम याने दुबईमधून ही सुपारी दिली होती. यासाठी हल्लेखोरांना २५ लाख रुपये देण्यात आले होते.
मटका किंग सुरेश भगत हे २००८ साली त्यांच्या पाच साथीदारांसह अपघतात मारले गेले. एका ट्रकने सुरेश भगतच्या गाडीला चिरडून टाकले. तपासाअंती कळले की, भगतची पत्नी जया भगत हिने २५ लाखांची सुपारी देऊन भगतचा काटा काढला. त्याच्या कुप्रसिद्ध उद्योग ताब्यात घेण्यासाठी त्याची सुपारी देण्यात आली होती.