पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस थायलंडच्या दौऱ्यावर होते. या भेटीदरम्यान त्यांनी सहाव्या BIMSTEC शिखर परिषदेत सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘भारत आणि थायलंड यांच्यातील ऐतिहासिक संबंधांना सांस्कृतिक आणि अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. बौद्ध धर्माच्या प्रसारामुळे या दोन्ही देशांतील लोकांमध्ये एक नातं निर्माण झालं आहे. अयुथाया ते नालंदा यांच्यातील ज्ञानपरंपरेचा इतिहास दीर्घ आहे. रामायणाच्या कथा थायलंडच्या लोकजीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. संस्कृत आणि पाली भाषांचा प्रभाव आजही थायलंडच्या भाषा आणि परंपरांमध्ये दिसून येतो. माझ्या भेटीदरम्यान १८ व्या शतकातील भित्तीचित्रांवर आधारित एक स्मरणीय टपाल तिकीट जाहीर केल्याबद्दल मी थायलंड सरकारचा आभारी आहे, असेही त्यांनी सांगितले. या भित्तिचित्रांमध्ये रामायणातील प्रसंग दर्शवण्यात आले आहे. याशिवाय थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांनी पंतप्रधान मोदींना ‘वर्ल्ड त्रिपिटक’ या पवित्र ग्रंथांची भेट दिली. रामायण असो किंवा त्रिपिटक यातून थायलंडचा भारताशी असलेला अनुबंध प्रकट होतो. याच पार्श्वभूमीवर थायलंड आणि भारत यांच्यातील असलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बंधाचा घेतलेला हा आढावा.

भारत आणि दक्षिण-आशियातील देशांमध्ये सांस्कृतिक व व्यापारी संबंधांची दीर्घ परंपरा आहे. भारतातील संस्कृत आणि पाली भाषेतील ग्रंथांमध्ये कथाकोश, सुवर्णभूमी (देवतांची भूमी) किंवा सुवर्णद्वीप (सोन्याचं द्वीप) इत्यादी वेगवेगळ्या नावाने या प्रदेशाचा उल्लेख येतो. भारत आणि दक्षिण आशियातील प्राचीन व्यापारी संबंधाचे अस्तित्त्व सांगणारे अनेक पुरावे आहेत. भारतातून मसाल्यांचे पदार्थ, सुवासिक लाकूड यांची निर्यात प्रामुख्याने या भागात होत असे. त्यामुळेच भारतीय व्यापाऱ्यांचा ओढा दक्षिण आशियाकडे अधिक होता. त्यामुळेच भारतीय संस्कृतीचा प्रसार या भागांमध्ये झालेला दिसतो. याच भारत आणि थायलंड ऋणानुबंधामुळे काही युरोपीय आणि आधुनिक इतिहासकारांनी अखंड भारत या संकल्पनेत या भागचा समावेश केल्याचे दिसते.

फ्रेंच संशोधक जॉर्ज कोदेस यांनी दक्षिण आशियातील देशांमध्ये भारतीयकरणाची प्रक्रिया कशी झाली याचा सविस्तर अभ्यास केला. त्यांनीच सर्व प्रथम ‘फरदर इंडिया’ हा शब्दप्रयोग केला. भारतीय संस्कृतीचा प्रसार झालेल्या देशांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता. यात प्रामुख्याने व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस, थायलंड, म्यानमार आणि मलय राज्यांचा समावेश होत होता.

भारत आणि आग्नेय आशियातील संबंधांची परंपरा किमान दोन हजार वर्षे जुनी आहे. याचे पुरावे संस्कृत, जैन, बौद्ध साहित्यातून मिळतात. यात प्रक्रियेत समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापाराने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या व्यापाऱ्यांबरोबर ब्राह्मण पुजारी, बौद्ध भिक्षु, विद्वान आणि दर्यावर्दी लोकांनी भारतीय संस्कृती या भागात पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. यातील अनेक भारतीयांनी स्थानिकांशी विवाह केले.

कोदेस यांनी त्यांच्या १९६८ मधील ‘द इंडियनाइज्ड स्टेट्स ऑफ साउथईस्ट एशिया’ या पुस्तकात लिहिले आहे की, प्रारंभापासूनच या संबंधांमुळे भारतीय राज्यांची निर्मिती झाली. मात्र, ते सावधगिरीने असेही नमूद करतात की भारतीय संस्कृतीच्या दक्षिण-आशियातील प्रसाराची युरोपीय वसाहतवादाशी तुलना करता येणार नाही. २० व्या शतकाच्या सुरुवातीस भारतातील राष्ट्रवादी इतिहासकारांनी दक्षिण-आशियातील प्राचीन भारतीय राज्यांचा उल्लेख ‘भारताची वसाहत’ असा वारंवार केला. उदाहरणार्थ, इतिहासकार आर. सी. मजूमदार यांनी लिहिले की, “हिंदू वसाहतकारांनी त्यांच्या संस्कृती व सभ्यतेची संपूर्ण चौकट स्वतःबरोबर नेली आणि ती स्थानिक अप्रगत लोकांमध्ये रुजवली.” मात्र, अलीकडच्या काळात वसाहतीकरणाच्या सिद्धांताला नाकारण्यात आले आहे. कारण, प्राचीन दक्षिण-आशियातील राज्यांमध्ये आक्रमणाचे किंवा थेट राजकीय प्रभाव याचे फारसे पुरावे आढळत नाहीत. दक्षिण-आशियात उदयास आलेले पहिले भारतीय राज्य म्हणजे फुनान. ते आधुनिक कंबोडियाचे पूर्वरूप मानले जाते. त्याचप्रमाणे लिन-यी हे दक्षिण व्हिएतनाममधील दुसरे राज्य दुसऱ्या शतकात उभे राहिले.

आधुनिक दक्षिण- आशियायी समाजात या सांस्कृतिक संपर्काचा परिणाम दाखवणारे अनेक पुरावे आढळतात. या भागातील थाय, मलय आणि जावानीज स्थानिक भाषांमध्ये संस्कृत, पाली आणि द्राविड भाषांमधील अनेक शब्द मोठ्या प्रमाणावर आढळतात. थाय भाषा दक्षिण भारतातील पल्लव लिपीवरून विकसित झालेल्या लिपीत लिहिली जाते. भारताचा दक्षिण-आशियावर झालेला कदाचित सर्वात महत्त्वाचा प्रभाव हा धर्माच्या क्षेत्रात आहे. शैव, वैष्णव, थेरवाद बौद्ध, महायान बौद्ध आणि नंतर सिंहली बौद्ध धर्माचा या भागात प्रसार झाला. येथील स्थानिक राजकीय आणि प्रशासनिक संस्था व कल्पना, धार्मिक संकल्पना आणि राजसत्तेचा विचार भारतीय परंपरेवर आधारित आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे थायलंडचा राजा हा विष्णूचा अवतार मानला जातो. रामायण आणि महाभारत यांतील प्रसंग कठपुतळीच्या खेळांमधून आणि रंगभूमीवरील कार्यक्रमांमधून नियमितपणे सादर केले जातात. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने पाहता, जावा येथील बोरबोदर स्तूप, कंबोडियामधील अंकोरवाट मंदिर आणि व्हिएतनाममधील माय सोन मंदिर ही या भागावर भारतीय प्रभावाची उत्तम उदाहरणे मानली जातात.

थायलंडशी भारताचे धार्मिक संबंध

प्रारंभिक शतकांत थायलंड सियाम म्हणून ओळखले जात होते. हे फुनान साम्राज्याच्या अधिपत्याखाली होते. इ.स. सहाव्या शतकात फुनान साम्राज्याच्या पतनानंतर हा प्रदेश द्वारावती या बौद्ध राज्याच्या अधिपत्याखाली दिला. दहाव्या शतकात हा भाग ख्मेर साम्राज्याच्या भाग झाला. ख्मेर साम्राज्याचे भारताशी संबंध होते. पुरातत्त्वीय, शिलालेखीय आणि इतर पुरावे यावरून हे स्पष्ट होते की प्राचीन काळापासून किंवा त्याही आधीपासून भारताचा सांस्कृतिक प्रभाव थायलंडमध्ये पोहोचला होता. टकुआ-पा येथे सापडलेल्या तामिळ शिलालेखावरून दक्षिण भारतातील पल्लव प्रदेश आणि दक्षिण थायलंड यांच्यातील व्यापार संबंध सिद्ध होतात. मणिकर्रमम नावाच्या दक्षिण भारतीय व्यापाऱ्यांच्या संस्थेने येथे वसाहत स्थापन केली होती. त्यांनी मंदिर आणि तलाव बांधले होते.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, १३ व्या शतकातील सुखोथाय काळापूर्वी थायलंडमध्ये ब्राह्मणधर्म आणि वैदिक धर्म एकत्र अस्तित्वात होते. द्वारावतीचे मोंग राजे आणि ख्मेर राजवटीने बौद्ध धर्माला आश्रय दिला होता आणि अनेक बौद्ध स्थापत्ये उभारली होती, पण त्याच वेळी त्यांनी वैदिक धर्मातील अनेक प्रथा व परंपराही स्वीकारल्या होत्या. या दोन धर्मांच्या समांतर अस्तित्वाचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे थायलंड हे होय. थायलंड हा बौद्धबहुल देश असला तरी येथे अनेक मंदिरे आहेत जिथे बौद्ध व हिंदू देवतांची एकत्र पूजा केली जाते. गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि शिव इत्यादी प्रसिद्ध हिंदू देवतांबरोबरच भारतातील सामाजिक-धार्मिक परंपरेत आज कमी महत्त्वाच्या असलेल्या इंद्रासारख्या देवतांचीही थायलंडमध्ये पूजन केली जातो.

लेखक एस. एन. देसाई त्यांच्या ‘हिंदुइझम इन थाय लाइफ’ (२००५) या पुस्तकात नमूद करतात की, थायलंडमधील जीवनावर हिंदू परंपरेचा प्रभाव आहे. त्यातही रामायणाचा परिणाम अधिक आहे. थायलंडमध्ये रामायण रामकृती (रामाची कीर्ती) किंवा रामाकीयन (रामाची कथा) या नावाने ओळखले जाते. हे थायलंडमध्ये सामान्य नागरिकांपासून उच्चवर्गापर्यंत सर्वांसाठी सांस्कृतिक अभिव्यक्तीचं माध्यम ठरलं आहे. या महाकाव्याचे प्रसंग बौद्ध मंदिरांच्या भिंतींवर चित्ररूपात साकारले जातात आणि नाट्य व नृत्य स्वरूपात सादर केले जाते. जरी थायलंडमध्ये रामकथेच्या संदर्भात कोणताही पुरातत्वीय पुरावा सापडत नाही, तरी देशातील काही शहरांशी रामाच्या जीवनाशी संबंधित आख्यायिका जोडलेल्या आहेत. मध्य थायलंडमधील अयुथाया हे शहर हे दहाव्या शतकात उदयास आले. अयुथाया श्रीरामाचे जन्मस्थान मानले जाते. देसाई लिहितात की “१३व्या शतकापासून अनेक थाय राजांनी ‘राम’ हा किताब स्वीकारला आणि तो सध्याच्या राजघराण्यात वारसाहक्काने चालत आलेला आहे.”