PM Modi visits Thailand’s Wat Pho temple of Reclining Buddha: वॉट फो हे मंदिर गौतम बुद्धांच्या भव्य आणि निर्वाण स्वरूपातील मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. हे बँकॉकमधील सर्वात पूजनीय आणि ऐतिहासिक मंदिरांपैकी एक आहे. थायलंडमध्ये बँकॉक शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेलं हे मंदिर शयन रूपातील भव्य बुद्धमूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. याच मंदिराला अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या थायलंड दौऱ्यादरम्यान भेट दिली. त्याच पार्श्वभूमीवर या लेखात वॉट फो मंदिराच्या इतिहासाचा घेतलेला हा आढावा.
महत्त्वपूर्ण सांस्कृतिक स्थळ
वॉट फो या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व थाई संस्कृती आणि धर्माच्या जतनाशी निगडित आहे. हे थायलंडमधील पहिले सार्वजनिक विद्यापीठ मानले जाते. या विद्यापीठात साहित्य, विज्ञान आणि पारंपरिक औषधशास्त्र अशा विषयांचे शिक्षण दिले जात होते. त्यामुळेच मंदिराचा समृद्ध इतिहास आणि राजाश्रय यामुळे हे थायलंडमधील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक स्थळ ठरलं आहे.
भव्य बुद्ध मूर्ती/Wat Pho temple of Reclining Buddha
निर्वाण स्वरूपातील बुद्ध वॉट फो मंदिरातील मुख्य आकर्षण आहे. ही भव्य मूर्ती ४६ मीटर लांब आणि १५ मीटर उंच असून ती सोन्याच्या पत्र्याने आच्छादलेली आहे. मूर्तीच्या पायांवर शुभचिन्हे दाखवणाऱ्या शंखमोत्यांच्या आकृती आहेत. बुद्धाचा शांत, समाधानी चेहरा त्यांच्या निर्वाणात प्रवेश करण्याचा क्षण आणि पुनर्जन्माच्या चक्राचा अंत दर्शवतो.
राजा रामाचा आश्रय
वॉट फोचा इतिहास १६ व्या शतकापर्यंत मागे जातो म्हणजेच बँकॉक शहर वसवले जाण्याच्या आधीपासून या मंदिराला इतिहास आहे. प्रारंभी हे वॉट फो-धरम नावाचं एक प्राचीन मंदिर होतं. १७८२ साली चक्री राजवंशाचे संस्थापक राजा राम पहिला यांनी आपली राजधानी बँकॉकला हलवली. त्यानंतर या मंदिराचे पुनर्बांधकाम करून त्याला राजमंदिराचा दर्जा देण्यात आला. नंतरच्या राजांनी, विशेषतः राजा राम तिसऱ्याने या मंदिराचा आणखी विस्तार आणि सौंदर्यवर्धन केलं. त्यामुळे हे मंदिर शिक्षण आणि सांस्कृतिक वारशाचं केंद्र ठरलं.

शैक्षणिक मूल्य
ही मूर्ती राजा राम तिसऱ्याच्या काळात तयार करण्यात आली असून तिचं भव्य रूप आणि बारकावे त्या काळातील कलात्मक उत्कृष्टतेचं उदाहरण आहेत. ही भव्य बुद्ध मूर्ती केवळ एक कलाकृती नसून शांती आणि आध्यात्मिक समाधानाचं प्रतीक आहे. त्यामुळे जगभरातून पर्यटक येथे येतात. वॉट फोचं स्थापत्य हे थाई, चिनी आणि ख्मेर शैलींचं मिश्रण आहे. या मंदिर समूहात एक हजारांहून अधिक बुद्ध मूर्ती आहेत. त्यामुळे हे थायलंडमधील सर्वात मोठ्या संग्रहांपैकी एक मानलं जातं. भिंतींवर काढलेली चित्र बुद्धाचा जीवनप्रवास आणि विविध थाई सांस्कृतिक गोष्टी सांगतात, त्यामुळे या मंदिराला शैक्षणिक मूल्यही प्राप्त झालेलं आहे.
राम नाव लावणारा चक्री राजवंश
थायलंडमधील चक्री राजवंश (Chakri Dynasty) हा त्या देशाच्या सध्याच्या राजघराण्याचा आधारस्तंभ असून या राजवंशाची स्थापना १७८२ साली राजा राम प्रथम (राम प्रथम किंवा राजा फुत्थयोट फा चुलालोक) यांनी केली. आजही हा वंशच थायलंडमध्ये सत्तारूढ असून राजा महा वजिरालोंगकोर्न (राम दशम) हे या वंशाचे वर्तमान सम्राट आहेत. १७८२ साली अयुथया साम्राज्याच्या पतनानंतर राजा राम प्रथम यांनी बँकॉकमध्ये राजधानी स्थापन करून चक्री राजवंशाची स्थापना केली. त्यांनी थाई सांस्कृतिक व धार्मिक परंपरांना पुनरुज्जीवित केलं आणि राम या नावाचा वापर शाही सत्तेसाठी सुरु केला. परकीय आक्रमणांपासून वसाहतीकरण टाळणारा एकमेव दक्षिण आशियाई देश म्हणून थायलंड ओळखला जातो. त्यात चक्री वंशाचा मोठा वाटा आहे.

रामाच्याच नावाचा स्वीकार का केला?
थायलंडवर रामायण या महाकाव्याचा विशेष प्रभाव आहे. थायलंडमध्ये रामायणाचे थाई रूपांतर रामकियन या नावाने प्रसिद्ध आहे.
या कथेतील राम (फ्रा राम) हा एक आदर्श, न्यायप्रिय, शूर व धर्मनिष्ठ राजा मानला जातो. त्यामुळे थाई सम्राटांनी राम हे नाव घेऊन स्वतःला त्या दिव्य आदर्शाशी जोडले. प्राचीन दक्षिण आशियात राजाला देवराजा म्हणजे देवाचा अवतार किंवा प्रतिनिधी मानले जायचे.
राम हे विष्णूचा अवतार असल्यामुळे हे नाव घेतल्याने सम्राटाने आपली सत्ता दैवी, नैतिक आणि धर्माधिष्ठित असल्याचं प्रतिकात्मक ठरवलं. चक्री वंशाचे संस्थापक राजा राम पहिले (फुत्थयोट फा चुलालोक) यांनी रामकियन या महाकाव्याचा पुन्हा अभ्यास करून राजघराण्याला त्या परंपरेशी जोडले. त्यांनी स्वतःचे नाव राम (पहिले) असे ठेवून एक नवी सांस्कृतिक ओळख आणि शिस्तबद्ध राज्यव्यवस्था प्रस्थापित केली.
इतर वास्तू
इतर महत्त्वाच्या वास्तूंमध्ये फ्रा उबोसोत (दिक्षा सभागृह), पहिल्या चार चक्री राजांना समर्पित चार मोठे चेदी (धर्मस्थळातील स्तूप) आणि विविध सभागृहं व मंडप आहेत. या वास्तू त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींसाठी ओळखले जातात. वॉट फो हे आजही थाई कला आणि संस्कृतीचं जिवंत संग्रहालय आहे. यातून देशाच्या आध्यात्मिक वारशाची झलक देतं.

वॉट फो हे थायलंडच्या समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचं साक्षीस्थान आहे. याचा ऐतिहासिक वारसा, बुद्धमूर्ती आणि पारंपरिक औषधशास्त्राच्या संवर्धनातील भूमिका यामुळे हे मंदिर पर्यटकांसाठी एक अर्थपूर्ण अनुभव ठरतो. म्हणूनच भारतीय संस्कृती आणि थायलंड मधील सांस्कृतिक संबंध जपणाऱ्या या मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंड दौऱ्या दरम्यान भेट दिली होती.