Thailand Ramakien: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच थायलंडला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रामाकियन या रामकथेचे भारताच्या भरतनाट्य आणि थायलंडच्या खोन या दोन्ही शैलीतील सादरीकरण पाहिले. इतकंच नाही तर भारत आणि थायलंड यांच्या प्राचीन सांकृतिक आणि ऐतिहासिक अनुबंधावरही भाष्य केले. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय रामकथेचे सादरीकरण करणाऱ्या थायलंडच्या खोन नाट्यनृत्य शैलीविषयी जाणून घेऊ.
खोन या नृत्यनाटय कलेची तुलना थायलंड मधील इतर कुठल्याच कलाप्रकाराशी होऊ शकत नाही. हा नृत्यप्रकार इसवी सनाच्या १३५०–१७६७ या कालखंडात या देशात विकसित झाला. खोन या नाट्यकलेत डौलदार हालचाली, युद्धनृत्याचे सादरीकरण, पारंपरिक विधी, संगीत, निवेदन, गीत आणि कविता यांचा सुरेख संगम आढळतो. त्याचबरोबर खोनचे आकर्षक मुखवटे, दागदागिने आणि भरजरी वेशभूषादेखील तितकेच लक्षणीय आहेत. या कलेत वापरण्यात येणारे मुखवटे तयार करण्यासाठी अत्यंत कुशल कारागिरांची आवश्यकता असते. आजच्या घडीला खोन ही थायलंडमधील सर्वाधिक प्रतिष्ठेची नाट्यकला मानली जाते.
खोन म्हणजे काय?
मुख्यतः खोन हा नाट्यप्रकार आहे. रामाकियन या थाय महाकाव्यातील कथा या नाट्यप्रकारात सादर केली जाते. हे महाकाव्य हिंदू धर्मातील रामायणावर आधारित आहे. कलाकार चेहऱ्यावर मुखवटे धारण करून या नाट्याचे सादरीकरण करतात. या नाट्यप्रकारात फ्रा (राजा/देव), नांग (स्त्रिया), याक (राक्षस), आणि लिंग (वानर) इत्यादी चार प्रकारच्या कलाकारांचा समावेश होतो. पूर्वी सर्व कलाकार मुखवटे घालत असत, परंतु आजच्या काळात फ्रा आणि नांग हे कलाकार पारंपरिक थाय भित्तीचित्रांपासून प्रेरित खास शैलीतील मेकअप करतात. केवळ याक आणि लिंग श्रेणीतील कलाकारच अजूनही पारंपरिक आणि कलात्मक मुखवटे घालतात. खोन हा शब्द पाली भाषेतील क्ल किंवा कोल या संज्ञेपासून तयार झालेला आहे. या नाट्यप्रकारात ढोलाच्या तालावर लयबद्ध सादरीकरण केले जाते. प्रारंभिक कालखंडात खोन हा प्रकार धार्मिक विधीचा भाग होता. यात विष्णूच्या कीर्तीचे वर्णन केले जात असे. या विधीमध्ये प्रेक्षकांचा समावेश नसे. नंतरच्या कालखंडात या कलेत राम सतुतीला प्राधान्य देण्यात आले.
भारतीय संस्कृतीचा प्रभाव
भारतीय संस्कृतीचा प्रभाव दक्षिण आशियात पोहोचल्यानंतर रामायणाची कथा तेथील राजघराण्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली. प्रत्येक देशाने या कथेला आपापल्या परंपरेनुसार वेगवेगळ्या प्रकारे सादर केले. थायलंडमध्ये ही कथा रामाकियन (भगवान रामाची कीर्ती) या नावाने ओळखली जाते. रामायणावर आधारित रंगभूमीवरील विविध सादरीकरणे या संपूर्ण प्रदेशात लोकप्रिय झाली. यामध्ये थायलंडमधील खोन, बर्मामधील यामा झाटडॉ, कंबोडियामधील लखोन खोल आणि लाओसमधील फ्रा लक फ्रा लाम यांचा समावेश होतो. थाय फाउंडेशन या संकेत स्थळावर खोन नृत्यशास्त्राचे गुरु प्रमेथ बुन्याचाय यांनी या कलेत चक-नाक, क्रबी-क्रबोंग आणि नांग याय यांचा समावेश आहे असे म्हटले आहे. चक-नाक ही एक रंगभूमीवरील सादरीकरणाची पद्धत होती. या नाट्यप्रयोगात क्षीरसागराचे मंथन ही पुराणकथा सादर केली जात असे. या पद्धतीत कलाकार देवता आणि राक्षसांच्या भूमिकेत दिसत. खोनवर प्रभाव टाकणारे आणखी एक शास्त्र म्हणजे क्रबी-क्रबोंग. हे हातातील शस्त्रांच्या युद्धकलेचे तंत्र आहे. हे थायलंडच्या मुए थायशी (किक बॉक्सिंग) जवळचे नाते असलेले युद्धशास्त्र आहे. खोनमधील युद्धनृत्यात क्रबी-क्रबोंगचे अनेक घटक ठळकपणे दिसून येतात.

नांग याय म्हणजेच ग्रँड शॅडो पपेट्स ही आणखी एक नाट्यकलेची शैली आहे. यात रामकथा अर्थात रामाकियन सादर करण्यात येते. कथानक, नृत्य आणि संगीत यांचा मिलाफ असलेली ही शैली नंतर खोन नाट्यकलेत सामावली. थायलंडमध्ये भगवान राम या व्यक्तिरेखेचे राजसत्तेशी अतिशय जवळचे नाते आहे. त्यामुळे प्रारंभी खोन हे नृत्यप्रदर्शन फक्त विशेष प्रसंगीच जसे की, राजघराण्यातील अंत्यविधी किंवा दीक्षा समारंभप्रसंगी आयोजित केले जात होते. पुढे ही कला सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाली आणि एक मनोरंजनाचे साधन ठरली.
मुखवटे आणि पोशाख
खोन नृत्यकलेची सर्वात वेगळी आणि उठून दिसणारी वैशिष्ट्ये म्हणजे कलाकारांनी परिधान केलेले भव्य आणि कलात्मक मुखवटे. हे मुखवटे चार प्रमुख व्यक्तिरेखा दर्शवतात फ्रा (राजे/देव), नांग (स्त्रिया), याक (राक्षस), आणि लिंग (वानर) तसेच देवता, ऋषी, प्राणी आणि इतर अनेक रूपांचा समावेश होतो. सर्व खोन मुखवटे पवित्र मानले जातात. धार्मिक विधींमध्ये हे मुखवटे वेदीवर ठेवले जातात आणि देवतांचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांची पूजा केली जाते. कलाकारांनी आपले खोन मुखवटे आदराने आणि काळजीपूर्वक हाताळावे लागतात आणि परिधान करण्यापूर्वी त्यांना वंदन करणे आवश्यक असते. असं मानलं जातं की, मुखवटा घालून नृत्य करताना कलाकार तल्लीन होतात. प्रत्येक खोन मुखवटा आकार, रंग आणि तपशीलांमध्ये वेगळा असतो आणि तो त्या व्यक्तिरेखेच्या शारीरिक रचनेवर, स्थान, प्रतिष्ठा आणि स्वभावावर आधारित असतो. संपूर्ण खोन नाट्यसमूहासाठी १०० पेक्षा अधिक राक्षसांचे मुखवटे आणि ४० पेक्षा अधिक वानरांचे मुखवटे असतात. हे मुखवटे पारंपरिक हस्तकलेतील अनेक कौशल्यांमध्ये प्रावीण्य असलेल्या विशेष प्रशिक्षित कारागिरांकडून तयार केले जातात. एक मुखवटा तयार करायला अनेक महिने लागतात.

खोनचे झगमगते पोशाख आणि दागदागिने देखील दृश्यात्यदृष्ट्या अत्यंत मोहक असतात. हे पोशाख विविध रंगांमध्ये तयार केले जातात, आणि प्रत्येक रंग एका विशिष्ट व्यक्तिरेखेचे प्रतीक असतो. उदाहरणार्थ, भगवान राम आणि इंद्र (युद्धाचे देव) हिरवा रंग, ब्रह्मा (सृष्टीचे देव) पांढरा रंग आणि फ्रा लक (रामाचा भाऊ) पिवळा रंग परिधान करतात. पारंपरिक पोशाखांसाठी वापरले जाणारे कापड हे चांदी आणि सोन्याच्या जरीसह तयार केलेले खास रेशीम असते. आज असे पोशाख विणणारे कारागीर फार थोडे उरले आहेत. या कापडावर भरतकाम केले जाते. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिवणकामात कुशल असलेल्या कलाकारांच्या वेगळ्या समूहाची गरज असते. कपडे तयार झाल्यावर, कलाकारांना ते परिधान करून देण्याचे काम आणखी एका तज्ज्ञ समूहाद्वारे केले जाते. या तज्ज्ञांना नेमकं माहिती असतं की, आतील गाद्या कुठे ठेवायच्या आणि कपड्यांवर टाके कुठे घालायचे जेणेकरून रंगमंचावर पोशाख सैल पडू नये याची ते काळजी घेतात.
एकदा पोशाख परिधान झाल्यावर कलाकार आपापल्या व्यक्तिरेखेनुसार दागदागिने घालतात. प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वतःचा एक खास अलंकारांचा संच असतो. तो कुशल सुवर्णकार आणि रौप्यकार यांच्या हस्ते तयार केलेला असतो. पोशाख कसा गुंडाळला जातो आणि त्यावर वापरलेले दागिने किती बारकाईने तयार केलेले आहेत यावरून त्या व्यक्तिरेखेचा दर्जा आणि स्थान समजते. फ्रा आणि नांग या नर्तकांच्या चेहऱ्याला रंग देण्यासाठी मेकअप करणाऱ्या कलाकारांना बोलावलं जातं. हे कलाकार पारंपरिक थाय चित्रकलेत पारंगत असणे गरजेचं असतं कारण त्यांना मंदिरांच्या भित्तिचित्रांवर दिसणाऱ्या देवतांच्या चेहऱ्यांचे हुबेहूब चित्रण कलाकारांच्या चेहऱ्यावर करावं लागतं. शेवटी असा परिणाम साधला जातो की जणू त्या व्यक्तिरेखा एखाद्या चित्रकथेतून थेट रंगमंचावर उतरलेल्या आहेत.
देहबोली
प्रारंभिक कालखंडात खोन नृत्यप्रदर्शन अनेक अंशी एखाद्या मूकनाट्यासारखे होते. त्यामुळे डौलदार देहबोली हीच भावनांची आणि आशयाची भाषा होती. प्रत्येक व्यक्तिरेखा गटाची स्वतःची खास नृत्यशैली असते. त्यामुळे नर्तकांना त्यांच्या शारीरिक रचना आणि हालचालींच्या क्षमतेनुसार प्रशिक्षणाच्या सुरुवातीलाच विशिष्ट व्यक्तिरेखा दिली जाते.
खोनचे नृत्यशास्त्र पूर्णपणे आत्मसात होण्यासाठी संपूर्ण आयुष्य जावे लागते. प्रशिक्षण लहान वयातच सुरू होते. कारण कलाकारांचं शरीर व्यायामपटूंसारखं तयार केलं जातं. चांगल्या हालचालींसाठी लवचिकता, ताकद आणि बारकावे लक्षात घेण्याची क्षमता आवश्यक असते. युद्धाच्या प्रसंगांमध्ये जेव्हा कलाकार एकमेकांवर चढून युद्धकौशल्य दाखवतात तेव्हा हालचाली अधिक अवघड आणि प्रभावी असतात. चुई चाय हा नृत्यप्रकार अत्यंत कुशल नर्तकांद्वारे सादर केला जातो आणि सौंदर्य व नजाकतीचे प्रतीक मानला जातो. आजच्या खोन सादरीकरणांमध्ये जरी गाणं, निवेदन आणि संगीत यांचा समावेश अधिक प्रमाणात झालेला असला तरीही देहबोली हीच या कलेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. खोनच्या हालचाली वाचण्यात पारंगत प्रेक्षक फक्त नृत्य पाहून संवाद काय आहे हे समजू शकतात.
संगीत, निवेदन आणि गायन
खोनचे संगीत पी फाट या वाद्यवृंदाद्वारे वाजवले जाते. जो मुख्यतः पाई नाय (छोटा ओबो), रणाद एक (मध्यम बाँसच्या पट्ट्यांचे झायलोफोन), रणाद थुम (जाड पट्ट्यांचा झायलोफोन), खोंग वोंग याय (गोल चौकटीत मोठ्या घंटा), खोंग वोंग लेक (लहान घंटा), क्लोंग थाड (मोठे ढोल), ता-पोन (दोन तोंडाचे साजेलेले ढोल), क्रॅप (लाकडी टाळ्या), आणि चिंग (लहान मंजीरी) यांचा समावेश असतो. युद्धाच्या दृश्यांमध्ये क्रॉंग वापरल्या जातात. ज्या सैनिकांच्या पावलांचा आवाज दर्शवतात. प्रसंगानुसार इतर वाद्यही यात समाविष्ट केली जातात. खोनमध्ये वापरली जाणारी गाणी ना फाट म्हणून ओळखली जातात आणि ती पवित्र मानली जातात. ही गाणी विविध भावनांवर आधारित असतात आणि विशिष्ट प्रसंगात वापरली जातात. उदाहरणार्थ, पाया दुएन हे गाणं एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तिरेखा चालताना वाजवलं जातं, तर क्राओ नोक (बाह्य क्राओ) हे गाणं वानरसेना चाल करत असताना वापरलं जातं. खोनच्या संवाद लेखनात निवेदन, गीते आणि संवाद यांचा समावेश असतो. निवेदन निवेदकांद्वारे खास शैलीतील पण सुरांशिवाय केले जाते. या निवेदनांमधील स्वर थायलंडमधील अयुथाया साम्राज्यातील जुने उच्चार दर्शवतात, असं मानलं जातं. निवेदनात निसर्गदृश्यांचे वर्णन, वाहने, सैन्याची चळवळ याबरोबरच एकपात्री संवाद, भावनिक प्रतिक्रिया जसे की रडणं, आक्रोश इत्यादींचाही समावेश असतो. संवाद मुक्तछंदात आणि तात्काळ रचनेतून येतो. चाम उअद (विनोदी व्यक्तिरेखा) हे कलाकार मुख्यतः विनोदी तात्काळ सादरीकरणावर अवलंबून असतात.
गायन
गायन हा एक घटक आहे जो लखोन नाय या आणखी एका उच्च दर्जाच्या नाट्यकलेतून खोनमध्ये सामावला गेला. लखोन नायमध्ये निवेदनाऐवजी सुरेल गायनातून कथाकथन केलं जातं. खोनमधील गायन दोन गायक मंडळांद्वारे सादरीकरण केलं जातं.
पटकथा
रामाकियन महाकाव्य आणि रामायणावर आधारित इतर अनेक साहित्यकृती थायलंडमध्ये प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. मात्र, अयुथाया साम्राज्याच्या १७६७ मधील पतनानंतर बहुतेक ग्रंथ नष्ट झाले. रामाकियनची पुन्हा एकत्रित रचना राजा राम पहिल्याच्या (१७८२–१८०९) कारकिर्दीत करण्यात आली. त्यांनीच बँकॉकमधील वॉट फ्रा काओ (एमराल्ड बुद्ध मंदिर) येथील भित्तिचित्र दालनात रामाकियन चित्रांची मालिका रेखाटण्याचे आदेश दिले. ‘बोट लखोन रूएंग रामाकियन’ (रामाकियनसाठीची नाट्य पटकथा) ही राजा राम पहिल्याने संकलित केलेली आवृत्ती आजवरची सर्वात सुसंगत मानली जाते. आजच्या खोन सादरीकरणांमध्ये मुख्यतः या ग्रंथावर आधारित मजकूर वापरला जातो. इतर प्रसिद्ध कवींनीही खोनसाठी पूरक पटकथा लिहिल्या आहेत. रामाकियनमधील अनेक प्रसंग हे भगवान रामाच्या शौर्यगाथेवर आधारित असतात. या सादरीकरणांचा उद्देश विष्णूच्या अवताराच्या स्तुतीचा असतो आणि म्हणूनच खोनमध्ये मुख्यत्वे चांगल्याने वाईटावर मात केल्याचे संदेश देणारे प्रसंग सादर केले जातात.
खोन आणि विधी
खोन सादर करण्यापूर्वी कलाकारांनी खोन गुरूंना वंदन करणे आवश्यक असते. सादरीकरणाची सुरुवात ‘होम रोँग’ नावाच्या संगीत प्रस्तावनेने होते. यात सर्वप्रथम ‘साथुकर्ण’ हे आदरभाव व्यक्त करणारे गीत वाजवले जाते. हे संगीत वाजताना कोणताही कलाकार, संगीतकार किंवा नर्तक असो त्याने दीप आणि धूप अर्पण करून गुरूंना वंदन करणे आवश्यक असते. जर ते शक्य नसेल, तर डोक्याच्या वर हात जोडून वंदन करण्याची परंपरा आहे. खोन गुरूंमध्ये केवळ जिवंत किंवा मृत मानवी शिक्षकच नव्हे, तर भगवान शंकर, गणेश आणि विष्णू यांचाही समावेश होतो.
होम रोँग झाल्यानंतर ‘बर्क रोँग’ (बेर्ग रोँग) नावाचं पारंपरिक प्रारंभिक नृत्य सादर केलं जातं. या लोकप्रिय नृत्यात भगवान रामाचा सेनापती हनुमान (पांढरं वानर) आणि निलाफट (काळा वानर) यांच्यातील लढाईचा छोटा भाग दाखवला जातो. ‘ख्रॉब ख्रू’ हा विधी खोन नर्तकांसाठी एक दीक्षाविधी आहे. या विधीत गुरू विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ऋषीचा मुखवटा, भैरव मुखवटा आणि सेर्ड (दक्षिण थायलंडचा पारंपरिक मुकुट) असे तीन मुखवटे ठेवतात. जेव्हा विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतात आणि पुढील टप्प्यावर जातात तेव्हा हा विधी पार पाडला जातो. ‘वाई ख्रू’ हा खोनसाठी आणखी एक महत्त्वाचा विधी आहे. हा वार्षिक समारंभ गुरूंना वंदन करण्यासाठी आयोजित केला जातो. कलाकार यावेळी आपल्याकडून झालेल्या चुका क्षम्य कराव्यात अशी प्रार्थना करतात आणि आशीर्वाद मागतात. नवीन विद्यार्थी ‘राम थवाय मुए’ हे नृत्य सादर करून खोनच्या प्रशिक्षणाच्या प्रवासात प्रवेश करतात.

भूतकाळापासून वर्तमानापर्यंत
खोनच्या अनेक शैली आणि सादरीकरण रूपांमध्ये वेळोवेळी बदल झाला आहे. या समृद्ध परंपरेने शाही दरबारातील ‘खोन लुआंग’ पासून उघड्या मैदानावर सादर होणाऱ्या ‘खोन क्लांग प्लांग’, बांबूच्या बाकावर बसून सादर होणाऱ्या ‘खोन नांग राव’, पडद्यासमोर सादर होणाऱ्या ‘खोन ना जॉर’, लखोन नायवर आधारित ‘खोन रोँग नाय’ आणि विशेष नेपथ्य व साहित्य वापरून सादर होणाऱ्या ‘खोन चक’ यांसारख्या विविध रूपांत प्रगती केली. सामान्य लोकांद्वारे तयार झालेलं एक वेगळं रूप म्हणजे ‘खोन सोद’ यात कलाकार मुखवटा उचलून तात्काळ पद्यरचना सादर करतात. दुसऱ्या महायुद्धानंतर खोनची परंपरा जवळपास लोप पावण्याच्या मार्गावर होती. या कलेला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न थायलंडची राणी माता सिरिकित यांच्या नेतृत्वाखाली झाला. त्यांच्या SUPPORT Foundation अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना हस्तकलेतील विविध कौशल्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात आली.