पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची लाओसमध्ये भेट झाली. त्या भेटीनंतर दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांची चर्चा रंगली आहे. दोघेही शुक्रवारी (११ ऑक्टोबर) लाओसच्या व्हिएन्टिनमध्ये असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स (ASEAN) शिखर परिषदेला उपस्थित होते. दोन्ही देशांतील वास्तविक समस्या सोडविण्याची गरज असल्याचे आपण पंतप्रधान मोदींना सांगितले असल्याचा दावा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. मात्र, भारताने दोन्ही देशांतील नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा झाल्याच्या करण्यात येणाऱ्या दाव्यावर नकार दिला. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडत असल्याचे चित्र आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी भारत सरकारचा संबंध जोडला गेला होता. हा आरोप भारत सरकारने हास्यास्पद आणि प्रेरित म्हणून फेटाळून लावला होता. जस्टिन ट्रुडो आणि पंतप्रधान मोदींची भेट चर्चेचा विषय का ठरत आहे? भारत आणि कॅनडाचे संबंध का बिघडले? याबाबत जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदींच्या भेटीबद्दल कॅनडाचे पंतप्रधान काय म्हणाले?

कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (सीबीसी न्यूज)च्या वृत्तानुसार, ट्रुडो यांनी पंतप्रधान मोदींबरोबरच्या बैठकीत विस्तृत चर्चा केल्याची माहिती आहे. दक्षिण पूर्व आशियातील एका पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, “पंतप्रधान मोदींबरोबरच्या चर्चेदरम्यान आम्हाला काही गोष्टींवर काम करण्याची गरज आहे यावर मी जोर दिला. आम्ही ज्याबद्दल बोललो, त्याबद्दल मी तपशिलात जाणार नाही; परंतु मी अनेकदा सांगितले आहे की, कॅनेडियन लोकांची सुरक्षा आणि कायद्याचे रक्षण करणे ही कॅनेडियन सरकारच्या मूलभूत जबाबदाऱ्यांपैकी एक आहे आणि मी तेच करेन.” जूनमध्ये इटलीतील अपुलिया येथे झालेल्या जी -७ शिखर परिषदेच्या वेळी समोरासमोर आल्यानंतर मोदी आणि ट्रुडो यांची ही दुसरी भेट होती.

हेही वाचा : संयुक्त राष्ट्र संघटना शांतता सेना काय आहे? इस्रायल-लेबनॉन सीमेवर तैनात संयुक्त राष्ट्रांच्या सैनिकांवर हल्ला का करण्यात आला?

जून २०२३ मध्ये ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वाराबाहेर झालेल्या निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनीही केला होता. “कॅनडाच्या भूमीवर झालेल्या मृत्यूमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या आरोप मी केला. त्यावर मी ठाम आहे. सरकार म्हणून कॅनेडियन नागरिकांना त्यांच्या घरात आणि त्यांच्या समुदायांना सुरक्षित ठेवण्याची आमची जबाबदारी कायम आहे. त्यांची सुरक्षा या सरकारसाठी प्राधान्य स्थानी आहे,” असे ट्रुडो यांनी ‘सीबीसी न्यूज’ला सांगितले.

गेल्या वर्षी सप्टेंबरपासून भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडत असल्याचे चित्र आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

भेटीविषयी भारताची प्रतिक्रिया काय?

पंतप्रधान मोदी आणि ट्रुडो यांच्यात कोणतीही महत्त्वपूर्ण चर्चा झाली नसल्याचे भारताचे सांगणे आहे. सूत्रांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, जोपर्यंत भारतविरोधी कारवाया सुरू आहेत आणि द्वेष, विसंगती, सांप्रदायिक विसंवाद वाढविण्याचा कट रचणाऱ्यांविरुद्ध कॅनडा सरकारकडून कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध दुरुस्त होऊ शकत नाहीत. . सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी लाओसमध्ये भेटल्यावर एकमेकांना शुभेच्छा दिल्या. भारताची अशी अपेक्षा आहे की, कॅनडामध्ये भारतविरोधी खलिस्तानी कारवाया होऊ दिल्या जाणार नाहीत आणि कॅनडाकडून भारताविरुद्ध हिंसाचार, अतिरेकी आणि दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. संघटित गुन्हेगारी, ड्रग सिंडिकेट व मानवी तस्करी अशा वाढत्या गुन्ह्यांबाबतचा विषय कॅनडासाठीदेखील चिंतेचा ठरू शकतो, असा इशाराही भारताने दिला आहे.

भारत-कॅनडा तणाव

सप्टेंबर २०२३ मध्ये ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत भाषण करताना सांगितले की, भारताने दहशतवादी म्हणून नियुक्त केलेल्या निज्जरच्या हत्येत भारताचा संबंध असल्याच्या आरोपांचा त्यांचे सरकार तपास करीत आहे. १८ जून २०२३ रोजी सरे येथील गुरुद्वाराबाहेर निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नवी दिल्लीत जी-२० शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींबरोबर द्विपक्षीय बैठक घेण्याच्या काही दिवस आधी त्यांचे हे वक्तव्य आले होते. कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांमुळे दोन्ही देशांत मोठा राजनैतिक वाद निर्माण झाला. त्यानंतर कॅनडाने भारताच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आणि भारतानेही कॅनडाच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करून, त्याला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दोन देशांतील तणाव आणखीनच वाढला.

भारताने राजनैतिक उपस्थितीत समानता ठेवण्याचे आवाहन केल्यामुळे कॅनडाला भारतातून आपले ४० राजनैतिक अधिकारी परत बोलवावे लागले. भारताने कॅनेडियन लोकांना व्हिसा देणे तात्पुरते स्थगित केले. भारताने उत्तर अमेरिकन देशांतील आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकावल्याचे कारण देत कॅनडातील आपले वाणिज्य दूतावास तात्पुरते बंद केले. यापूर्वी, कॅनडाच्या एका मीडिया रिपोर्टमध्ये कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजेन्स सर्व्हिस (CSIS) या गुप्तचर संस्थेच्या अहवालाविषयी माहिती देण्यात आली होती. त्यात कॅनडातील २०१९ आणि २०२१ च्या फेडरल निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेप केला गेल्याचा आरोप भारत आणि पाकिस्तानवर करण्यात आला होता. भारताने तो आरोप निराधार असल्याचे सांगून फेटाळला.

हेही वाचा : ७,००० कोटींचे ड्रग्ज रॅकेट पोलिसांनी कसे उद्ध्वस्त केले? दिल्लीसह मुंबईत ७५० किलोहून अधिक अमली पदार्थ आले कुठून?

या आठवड्याच्या सुरुवातीला कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री मेलानिया जोली यांनी त्यांच्या देशाचे भारताबरोबरचे संबंध सध्या तणावपूर्ण असल्याचे वक्तव्य केले होते. ‘सीबीसी न्यूज’नुसार, कॅनडामध्ये निज्जरसारख्या आणखीही हत्येचा धोका असल्याचा दावा त्यांनी केला. शुक्रवारी लाओसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रुडो म्हणाले की, कॅनडाला व्यापारी संबंधांसह विविध लोकांशी संबंध विकसित करण्याची गरज आहे. परंतु, काही वास्तविक समस्या आहेत आणि त्यांचे निराकरण करणेही आवश्यक आहे. आम्ही त्यावरच लक्ष केंद्रित करणार आहोत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modis meet with canada pm justin trudeau two countries relation rac