पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मंत्रिमंडळाचा बुधवारी मेगाविस्तार करण्यात आला. दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या शपथविधीत ३६ नवे चेहरे मंत्रिमंडळात सहभागी झाले. तर दुसरीकडे चार महत्वाच्या पदावरील मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. याशिवाय लक्ष वेधणाऱ्या अशा अनेक महत्वाच्या गोष्टी घडल्या आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोठे बदल

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर रात्री उशिरा खातेवाटप जाहीर करण्यात आलं. गुजरातचे मनसुख मंडाविया हे देशाचे नवे आरोग्यमंत्री असतील तर, माजी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान नवे शिक्षणमंत्री असतील. ज्योतीरादित्य शिंदेंकडे नागरी उड्डाण मंत्रालय देण्यात आलं असून या खात्याची जबाबदारी असणारे हरदीप पुरी यांच्याकडे महत्त्वाचे पेट्रोलियम मंत्रालय देण्यात आलं आहे.
प्रकाश जावडेकर यांचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय अनुराग ठाकूर यांच्याकडे देण्यात आले असून किरण रिजीजू यांच्याकडील क्रीडा खात्याचेही ठाकूर केंद्रीयमंत्री असतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयही सांभाळणार आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकारमंत्रीपद अमित शहा यांच्याकडे देण्यात आले असून, त्यांच्याकडील गृहमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे.

Modi Cabinet Reshuffle: ‘या’ ४३ मंत्र्यांनी घेतली शपथ; पहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

४३ मंत्र्यांनी घेतली शपथ

राष्ट्रपती भवनात एकूण ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ३६ नवे चेहरे सहभागी झाले असून यामधील १५ कॅबिनेट मंत्री, तर २८ राज्यमंत्री आहेत.

१२ मंत्र्यांची गच्छंती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये व्यापक आणि कठोर फेरबदल करताना १२ मंत्र्यांची हकालपट्टी केली. आरोग्यमंत्री हर्षवर्धन, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल-निशंक या बडय़ा मंत्र्यांचीही गच्छंती झाली. हर्षवर्धन, रवीशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर शपथविधीसाठी उपस्थित होते.

Modi Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा चेहरेबदल

यांना डच्चू..

हर्षवर्धन, रमेश पोखरियाल, प्रकाश जावडेकर , रवीशंकर प्रसाद, थावरचंद गेहलोत, संजय धोत्रे, सदानंद गौडा, संतोष गंगवार, देबश्री चौधरी, बाबूल सुप्रियो, प्रताप सारंगी, रतनलाल कटारिया

३६ नवे चेहरे

केंद्रीय मंत्रिमंडळात ३६ नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये ज्योतीरादित्य शिंदे, सर्वानंद सोनेवाल आणि नारायण राणे यांचा समावेश आहे. राज्यसभा खासदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सर्वात प्रथम शपथ घेतली. मंत्रिपदासाठी एक वर्ष ताटकळणारे ज्योतिरादित्य शिंदे, आसामाचे मुख्यमंत्रीपद हिमंत बिस्व-सरमा यांच्याकडे सोपवून दिल्लीत येणारे सर्वानंद सोनोवाल यांनाही स्थान देण्यात आलं.

सात मंत्र्यांची बढती

किरेने रिजिजू, आर के सिंग, हरदीप सिंग पुरी, मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला, जी किशन रेड्डी आणि अनुराग ठाकूर यांनी कॅबिनेट पदाची बढती देण्यात आली आहे.

सात महिलांचा मंत्रिमंडळात समावेश

अनुप्रिया पटेल (उत्तर प्रदेश), शोभा करंदळजे (कर्नाटक), दर्शना जरदोश (गुजरात), मिनाक्षी लेखी (नवी दिल्ली), अन्नपूर्णा देवी (झारखंड), प्रतिमा भौमिक (त्रिपुरा) आणि भारती पवार (महाराष्ट्र) यांनी बुधवारी शपथ घेतली. यासोबत आता मंत्रिमंडळात एकूण नऊ महिला आहेत. यामध्ये निर्मला सीतारमन आणि स्मृती इराणी यांचाही समावेश आहे.

एनडीएच्या मित्रपक्षांचा समावेश

नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयू आणि अपना दललाही सहभागी करुन घेण्यात आलं आहे. सर्वात आश्चर्य म्हणजे चिराग पासवान यांचे काका व लोक जनशक्तीच्या बंडखोर गटाचे प्रमुख पशुपती पारस यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे रामचंद्र प्रताप सिंह यांनाही मंत्रिमंडळात घेण्यात आले असून जनता दल पहिल्यांदाच मोदी सरकारमध्ये सामील झाला आहे.

निवडणूक असणाऱ्या उत्तर प्रदेशातील सात मंत्री

२८ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली अशून यामधील सात मंत्री हे उत्तर प्रदेशातील आहेत. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी निवडणूक होणार असून पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयात प्रत्येकी तीन राज्यमंत्री

केंद्रीय गृहमंत्रालयासाठी तीन राज्यमंत्री असतील यामध्ये व्ही मुरलीधरन, मिनाक्षी लेखी आणि राजकुमार राजन सिंग यांचा समावेश आहे. तर परराष्ट्र मंत्रालयासाठी नित्यानंद राय, अजय कुमार आणि निशीत प्रामाणिक यांना संधी देण्यात आली आहे.

वयोमर्यादा ६१ वरुन ५८ वर

मंत्र्यांची किमान वयोमर्यादा कमी करण्यात आली असून ६१ वरुन ५८ वर आणण्यात आली आहे. मंत्रिमंडळातील १४ सदस्य ५० पेक्षा कमी वयाचे आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi cabinet reshuffle 10 things you need to know sgy