सुनील कांबळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून चार दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञानविषयक अनेक करार अपेक्षित आहेत. मात्र, अनिवासी भारतीयांसाठीची मोदींची २३ जूनची सभा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अनिवासी भारतीय आणि मोदी हे समीकरण घट्ट आहे. अनिवासी भारतीयांमध्ये मोदी किती लोकप्रिय आहेत याची प्रचीती यापूर्वी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, युरोपातील काही देशांमध्ये मोदी दौऱ्यांच्या वेळी आलेली आहे. पुन्हा एकदा अमेरिकेत ‘मोदी शो’ला प्रचंड प्रतिसाद मिळणार असे मानले जात आहे. अनिवासी भारतीयांचा यानिमित्ताने गुणात्मक आणि संख्यात्मक वेध घेणे समयोचित ठरेल.

TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
Image of FASTag logo
राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून FasTag बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!
Ujani dam, desilt Ujani dam, Radhakrishna Vikhe Patil,
उजनी धरणातील गाळ काढण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या अहवालानंतर, जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांचे स्पष्टीकरण
loksatta editorial on school droupout
अग्रलेख : शाळागळतीचे त्रैराशिक!

जगभरात अनिवासी भारतीयांची संख्या किती?

जगभरात विविध देशांतील २८ कोटी दहा लाख लोक आपापले देश सोडून परदेशांत स्थायिक झाले आहेत. त्यात अनिवासी भारतीयांची संख्या सुमारे तीन कोटी आहे. त्यापाठोपाठ मेक्सिकन स्थलांतरित १ कोटी २० लाख, चिनी स्थलांतरित १ कोटी पाच लाख आहेत. सुमारे ४५ लाख भारतीय अमेरिकेत राहतात. ब्रिटनमध्ये १८ लाख ३५ हजार, कॅनडामध्ये ७ लाख २० हजार, आॅस्ट्रेलियामध्ये ५ लाख ७९ हजार भारतीय स्थायिक झाले आहेत. बांधकाम आणि आदरातिथ्य या क्षेत्रांतील भारतापेक्षा अधिक वेतनमानासाठी पश्चिम आशियात जाणाऱ्या भारतीयांची संख्याही मोठी आहे. संयुक्त अरब अमिरातीत ३५ लाख, सौदी अरेबियात ४० लाख भारतीय आहेत. अनिवासी भारतीयांच्या वाढत्या संख्येबरोबर तिथे प्रादेशिक विविधतेचा विस्तार झाल्याचे आढळते. परदेशात स्थलांतर करणाऱ्यांमध्ये भारतातील वंचित जातसमूहांतील नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे. वाॅशिंग्टन डीसीमधील कार्नेगी एन्डोवमेंट फाॅर इंटरनॅशनल पीस या संस्थेने २०२० मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील अनिवासी भारतीयांपैकी १७ टक्के नागरिक मागासवर्गीय होते. अमेरिकेत तेलुगू भाषकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे. २०२२ मध्ये कुशल कर्मचाऱ्यांसाठी अमेरिकेने दिलेले एच१ बी व्हिसा मिळवणारे ७३ टक्के नागरिक भारतीय वंशाचे होते.

किती अनिवासी भारतीय सर्वोच्च स्थानी?

माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रापासून ते राजकारणापर्यंत विविध क्षेत्रांत अनिवासी भारतीयांनी आपला ठसा उमटवला आहे. अॅडोब, आयबीएम, गुगलसारख्या कंपन्यांचे नेतृत्व भारतीय करीत आहेत. हार्वर्ड बिझनेस स्कूलसह अमेरिकेतील पाचपैकी तीन बिझनेस स्कूलच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत. माहिती-तंत्रज्ञान, शिक्षणासह राजकारणातही भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह ब्रिटनच्या हाऊस ऑफ काॅमन्समध्ये भारतीय वंशाचे १९ सदस्य आहेत. आॅस्ट्रेलियाच्या पार्लमेंटमध्ये सहा, अमेरिकी काँग्रेसमध्ये पाच सदस्य भारतीय वंशाचे आहेत. त्यात अमेरिकी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा समावेश आहे. जागतिक बँकेच्या प्रमुखपदी निवड झालेले अजय बंगा यांच्यासह अनेक भारतीयांनी जागतिक स्तरावर कर्तृत्व सिद्ध केले आहे.

अनिवासी भारतीयांबद्दल भारताच्या भूमिकेत बदल?

भारताच्या स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात भारतीयांनी प्रगत देशांमध्ये स्थलांतर केल्याचे दिसते. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडसारख्या देशांमध्ये प्रामुख्याने गुजरात आणि पंजाबमधून अर्धकुशल कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. अमेरिकेने १९६५ मध्ये स्थलांतर कायद्यात दुरुस्ती करून विविध क्षेत्रांतील बुध्दिमत्तेला मुक्तद्वाराचे धोरण अवलंबले. त्यामुळे अमेरिकेबरोबरच, आॅस्ट्रेलिया, कॅनडामध्ये भारतीयांची संख्या वाढू लागली. परदेशांतील भारतीयांबरोबरील नैसर्गिक बंध दृढ करतानाच तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संबंधित देशात हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे दिसते. त्यामुळे सांस्कृतिक आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आवश्यकता असेल इथपर्यंतच त्यांनी अनिवासी भारतीयांशी संवाद मर्यादित ठेवला. माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांतीनंतर परदेशांतील भारतीयांची संख्या फोफावली. ही

वाढलेली संख्या, त्यांची आर्थिक सुबत्ता आदींमुळे अनिवासी भारतीयांचा दबदबा वाढू लागला. त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न नंतर सुरू झाल्याचे दिसते. भारताच्या प्रगतीतील अनिवासी भारतीयांच्या योगदानाची दखल घेत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या काळात ‘प्रवासी भारत दिवस’ हा उपक्रम सुरू झाला. २०१४ नंतर अनिवासी भारतीय समूह मोठ्या प्रमाणात प्रकाशझोतात आला.

मोदींच्या परदेश दौऱ्यांत किती सभा-स्वागत सोहळे?

नऊ वर्षांपूर्वी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ६० देशांचे १०० हून अधिक दौरे केले. अनेक देशांमध्ये त्यांनी अनिवासी भारतीयांच्या मोठमोठ्या सभा घेतल्या. त्यात लंडनच्या वेम्ब्ली स्टेडियमवरील ६० हजार जणांच्या उपस्थितीतील त्यांची सभा सर्वांत मोठी मानली जाते. त्यापाठोपाठ सिडनी (२००००) न्यूयॉर्क (२००००), सिंगापूर (१८०००) मधील सभांचा क्रमांक लागतो. मोदींनी न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर येथे २०१४ मध्ये घेतलेली सभा गाजली होती. आता वाॅशिंग्टनमध्ये २३ जूनला त्यांची सभा होणार आहे. त्यात फक्त निमंत्रितांना प्रवेश आहे.

या भव्य सभा-सोहळ्यांच्या यशाचे गमक काय ?

नरेंद्र मोदींवरील प्रेमापोटी अनिवासी भारतीय उत्स्फूर्तपणे या सभांना उपस्थित असल्याचे चित्र निर्माण होते. मात्र, संबंधित देशांतील भारतीय दूतावास, संघ, भाजपशी संबंधित अनेक संघटना या भव्य सोहळ्यांसाठी काटेकोर नियोजन करतात, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. पूर्वतयारीचा भाग म्हणून सोहळ्याबाबत जनजागृती, संपर्क अभियान राबवले जाते. बहुतेकदा असे सोहळे निमंत्रितांसाठी असतात. सोहळ्यासाठी स्वयंसेवकांची फौज तयार करण्याबरोबरच अनेकदा वाहतूक व्यवस्था केली जाते. या सोहळ्यांचे संबंधित देशासह अनेक ठिकाणी थेट प्रक्षेपण करून जागतिक मंचावर मोदी आणि भारताचा प्रभाव वाढत असल्याचे समाजमनावर ठसवले जाते. अनिवासी भारतीयांनाही मायभूमीशी आपले नाते किती घट्ट आहे, याचे प्रदर्शन करण्याची संधी या सोहळ्यांद्वारे मिळते. मोदीही त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे भरभरून कौतुक करतात. भारतीय जनतेबरोबरच अनिवासी भारतीयांवर मोहिनी घालण्याची कला मोदींनी अवगत केली आहे. देशोदेशी मोदींनी घेतलेल्या अनिवासी भारतीयांच्या सभा-सोहळ्यांमध्ये त्यांचे प्रतिबिंब दिसते. अर्थात, मोदींच्या प्रतिमावर्धनासाठी या सभा- सोहळ्यांचा वापर केला जातो.

Story img Loader