पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ जून रोजी अमेरिकेचा दौरा पूर्ण केल्यानंतर इजिप्त येथे दोन दिवसांचा दौरा केला. अरब प्रांतातील देशामध्ये केलेल्या मोदींच्या या दौऱ्याला खूप महत्त्व आहे. कारण १९९७ नंतर इजिप्तमध्ये द्विपक्षीय दौरा करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तची राजधानी कैरोमधील हेलिओपोलिस कॉमनवेल्थ युद्धस्मारकाला भेट देऊन भारतीय सैनिकांना अभिवादन केले. पहिल्या महायुद्धात लढत असताना इजिप्त आणि पॅलेस्टाईन येथे शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृती या ठिकाणी जतन करण्यात आल्या आहेत. मोदींनी हेलिओपोलिस स्मारकाला दिलेली भेट महत्त्वपूर्ण का आहे? याबद्दल घेतलेला हा आढावा …

हेलिओपोलिस युद्ध स्मशानभूमी

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हेलिओपोलिस युद्ध स्मशानभूमीमध्ये हेलिओपोलिस पोर्ट तौफिक (Port Tewfik) स्मारक आणि हेलिओपोलिस एडन (Aden) स्मारक यांचा समावेश आहे. इजिप्त आणि पॅलेस्टाईन येथे पहिल्या महायुद्धात लढत असताना शहीद झालेल्या चार हजार भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ हेलिओपोलिस पोर्ट तौफिक हे स्मारक उभारण्यात आले आहे. तर, राष्ट्रकुल दलाकडून एडन येथे पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या ६०० सैनिकांच्या स्मरणार्थ हेलिओपोलिस एडन हे स्मारक उभारण्यात आले आहे.

‘स्टेट्समन’ने दिलेल्या बातमीनुसार- हेलिओपोलिस युद्ध स्मशानभूमीची देखभाल राष्ट्रकुल युद्ध स्मशानभूमी आयोगाकडून केली जाते. या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या १७०० सैनिकांचेही स्मारक आहे, अशी माहिती ‘कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशन’च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

हेलिओपोलिस (पोर्ट तौफिक) स्मारकाचे महत्त्व

सुएझ कालव्याच्या दक्षिणेकडे सर्वांत शेवटी असलेल्या पोर्ट तौफिक स्मारकाचे उदघाटन १९२६ मध्ये करण्यात आले. सर जॉन बर्नेट यांनी या स्मारकाची उभारणी केली. १९६७-१९७३ या काळात इस्राईल आणि इजिप्तच्या संघर्षादरम्यान या स्मारकाचे मोठे नुकसान झाले होते, अशी माहिती ‘कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशन’च्या वेबसाईटवर मिळाली. ऑक्टोबर १९८० मध्ये पुन्हा एकदा स्मारक नव्याने बांधण्यात आले; ज्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या नावांचे फलक समाविष्ट करण्यात आले. इजिप्तमधील भारतीय राजदूतांनी याचे उदघाटन केले. स्टेट्समनने दिलेल्या बातमीनुसार, भारतीय सैनिकांची नावे असलेले फलक प्रवेशद्वाराजवळ मोठ्या दिमाखात उभे आहेत. इतिहासातील गोंधळाच्या काळात भारत आणि इजिप्त एकमेकांच्या सोबतीसाठी ठामपणे उभे असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. दोन्ही देशांतील संबंध यातून अधोरेखित होतात.

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हेलिओपोलिस स्मारकाला भेट दिली होती. या भेटीचे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट करून त्यांनी लिहिले होते की, मानवतेची सेवा करण्यासाठी भारतीय नागरिकांनी जगभरात बलिदान दिले आहे. समकालीन आणि न्याय्य जागतिक व्यवस्था निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांसाठी अशी स्मारके आणखी प्रेरणा देतात.

या स्मारकात प्रमुख सैनिक, रेजिमेंट यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. भारतीय सैनिक बदलू सिंह यांना मरणोत्तर व्हिक्टोरिया क्रॉस या सर्वोच्च ब्रिटिश युद्धकालीन शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. इजिप्तच्या स्मारकामध्ये त्याचा उल्लेख आहे. बदलू सिंह हे मूळचे हरियानामधील रोहतक येथे राहणारे होते. ब्रिटिश भारतीय सैनिक दलात रिसलदार (घोड्यावरील सैनिकांचा प्रमुख) म्हणून कार्यरत होते, अशी माहिती ‘स्टेट्समन’ने दिली. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या माहितीनुसार १३ सप्टेंबर १९१८ रोजी त्यांचा युद्धभूमीवर मृत्यू झाला.

याव्यतिरिक्त ५१ व्या शीख बटालियनचे शिपाई नझारा सिंग, ‘कुमाऊ रायफल्स’चे हवालदार नारायण सिंग, सप्पेर भागुजी, शिपाई निक्का सिंग अशा विविध बटालियनमधील सैनिकांचा स्मारकामध्ये उल्लेख केलेला आढळतो. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वीच्या काळात असेलल्या भारतीय सैन्यदलातील रेजिमेंट आणि राज्य दलाच्या कर्तृत्वाचे आजही स्मरण या ठिकाणी केले जाते. त्यापैकी ४२वी देवळी रेजिमेंट, ५८वी वॉन रायफल्स, तिसरी क्वीन अलेक्झांड्रा गुरखा रायफल्सची दुसरी बटालियन, ५१वी शीख रेजिमेंट, ५०व्या कुमाऊ रायफल्सची पहिली बटालियन, जोधपूर (शाही सेवा) लान्सर्स, तिसरी सॅपर्स व मायनर्स दलाचे स्मरण या ठिकाणी केलेले दिसते.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने लेखिका वेदिका कांत यांच्या लिखाणाचा हवाला देत सांगितले की, पहिल्या महायुद्धात इजिप्तमधील सुएझ कालवा सुरक्षित करण्यासाठी भारतीय सैनिकांनी मोलाची कामगिरी केली होती. तसेच पॅलेस्टाईन येथे झालेल्या १९१८ च्या हायफा लढाईतही भारतीय सैनिकांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.

भारतीय पंतप्रधानांचा इजिप्त दौरा

पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार- इजिप्तमधील स्थानिकांशी वार्तालाप करताना ते म्हणाले की, भारतीय पंतप्रधान हेलिओपोलिस स्मारकाला भेट देत आहेत, याचा त्यांना मनापासून आनंद होत आहे. महमौद नावाचे इसम स्मारकाच्या शेजारी काम करतात, त्यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले की, महायुद्धात लढलेल्या भारतीय सैनिकांचे स्मारक या नावानेच या कॉमनवेल्थ स्मशानभूमीची ओळख झाली आहे. इजिप्तमध्ये येणाऱ्या सर्वांचेच आम्ही मनापासून स्वागत करतो. विशेषकरून भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करतो.

‘स्टेट्समन’ने दिलेल्या बातमीनुसार- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कैरोमधील हा दौरा प्रतीकात्मक आहे. भारत आणि इजिप्तदरम्यान इतिहास काळापासून जवळचे नाते असल्याचे दाखवणे आणि या भूमीवर बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांना नमन करणे, हे दोन उद्देश या दौऱ्याच्या माध्यमातून साधण्यात आले. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह एल-सिसी यांनी या वर्षी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इजिप्तला येण्याचे निमंत्रण दिले होते.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याबाबत माहिती देताना परराष्ट्रमंत्री काही काळापूर्वी म्हणाले होते की, राष्ट्रपती अब्देल फताह एल-सिसी यांच्यासोबत अधिकृत बैठक घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्त सरकारमधील मान्यवरांशीही चर्चा करणार होते.

Story img Loader