पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (रविवार, २५ फेब्रुवारी) गुजरातमधील ‘सिग्नेचर ब्रिज’ अर्थात ‘सुदर्शन सेतू’चे उद्घाटन करण्यात आले. ४.७ किमी लांबी असलेला हा सेतू राष्ट्रीय महामार्ग ५१ चाच एक भाग असून, हा पूल द्वारका बेटाला थेट गुजरातच्या मुख्य भूमीशी जोडणार आहे. दरम्यान, सुदर्शन सेतूची नेमकी वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्त्व काय आहे? आणि गुजरातमधील धार्मिक पर्यटनाला याचा कसा फायदा होईल? याविषयी जाणून घेऊ.
गुजरामधील सर्वात लांब केबल ब्रिज
‘सुदर्शन सेतू’ हा गुजरातमधील पहिला सी-लिंक आणि केबल ब्रिज असून, हा पूल कच्छच्या खाडीतून द्वारका जिल्ह्यातील ओखा शहराला थेट द्वारका बेटाशी जोडणार आहे. गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, या पुलाची एकूण लांबी ४.७ किमी इतकी आहे. समुद्रसपाटीपासून १८ मीटर उंचीवर असलेल्या या पुलावर २२ मीटर उंचीचे दोन मोठे टॉवर बसविण्यात आले आहे. याशिवाय या चार पदरी पुलाच्या दोन्ही बाजूंना पायवाटदेखील आहे. तसेच या पुलाच्या खांबांवर भगवद गीतेतील श्लोक आणि प्रभू श्रीकृष्णाची छायाचित्रं लावण्यात आली आहेत. या पुलाची निर्मिती केंद्र सरकारद्वारे करण्यात आली असून, त्यासाठी एकूण ९७८ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, या सेतूवर १ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असलेली सौरउर्जा प्रणालीदेखील बसवण्यात आली आहे.
शिवाय गुजरातमध्ये आणखी दोन पूल आहेत. मात्र, ते ‘सुदर्शन सेतू’च्या तुलनेत अतिशय लहान आहेत. यापैकी एक पूल भावनगरमध्ये तर दुसरा पूल भरुचमध्ये नर्मदा नदीवर आहे.
हेही वाचा – मुस्लीम समाजातील जात व्यवस्था? मुस्लिमांमधील कनिष्ठ वर्गाची स्थिती अद्याप का सुधारलेली नाही?
गुजरातमधील धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा पूल :
छत्तीस चौरस किमी क्षेत्रफळ असलेले द्वारका हे बेट गुजरातच्या किनाऱ्यावरील दीवनंतरचे दुसरे मोठे बेट आहे. हा भाग ओखा नगरपालिकेच्या अखत्यारीत येतो. येथून जवळच गीर सोमनाथ तीर्थक्षेत्रदेखील आहे. सद्य:स्थितीत गुजरातच्या मुख्य भूमीपासून द्वारका बेटावर जाण्यासाठी केवळ बोट फेरी सेवा उपलब्ध आहे. मात्र, अनेकदा खराब हवामानामुळे ही बोट सेवा बंद असते. आता सुदर्शन सेतूच्या निर्मितीनंतर द्वारका बेटावर जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.
द्वारका हे बेट हिंदू धर्मीयांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी श्रीकृष्णाचे मंदिर आहे. येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. याशिवाय येथे इतर मंदिरेदेखील आहेत. तसेच गुरुद्वारा आणि मशिदीदेखील आहेत. त्यामुळे द्वारका बेट हे धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असे ठिकाण आहे. या बेटावर काही प्रमाणात शेतीही केली जाते. तसेच पर्यटनाशिवाय मासेमारी हा या भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.
सुदर्शन सेतूच्या निर्मितीवरून वाद
सरकारने या पुलाचे काम एस. पी. सिंगला कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले होते. ही पंचकुलातील एक खासगी कंपनी आहे. महत्त्वाचे म्हणजे या कंपनीला बिहारमधील अगुवानी-सुलतानगंज गंगा ब्रिजचे कामही देण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच हा पूल कोळसला होता. त्यामुळे अनेकांनी कंपनीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुजरातमधील अधिकाऱ्यांनी या संदर्भात बोलताना, अशी दुर्घटना घडल्यास कंपनीबाबत विचार करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली होती.
महत्त्वाचे म्हणजे सुदर्शन सेतूच्या निर्मितीदरम्यान उदभवलेला हा पहिला वाद नव्हता. यापूर्वी द्वारका बेटाच्या किनाऱ्यावरील १०० पेक्षा जास्त घरे, दुकाने आणि धार्मिक स्थळे पाडण्यात आली होती. यापैकी बहुतांश घरे अल्पसंख्यांकांची होती. त्यामुळे यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या पुलाच्या निर्मितीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने ही घरे आणि दुकाने पाडण्यात आल्याची प्रतिक्रिया त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली होती.
बोटचालकांच्या उदरनिर्वाहावर संकट
सुदर्शन सेतूच्या निर्मितीमुळे द्वारका बेटावरील बोटचालकांनी चिंता व्यक्त केली आहे. या सेतूमुळे फेरी वाहतुकीत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया द्वारकाधीश टुरिझम फेरीबोट असोसिएशन, ओखाचे अध्यक्ष इब्राहिम कुरेशी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.
हेही वाचा – शत्रूच्या कवट्या गोळा करणाऱ्या राजाचे मतपरिवर्तन कसे झाले? काय होते मध्ययुगीन जैन धर्माचे स्वरूप?
सध्या ओखा आणि द्वारका बेटादरम्यान सुमारे १७० फेरी बोटी कार्यरत आहेत. त्यामध्ये ९० बोटींची प्रवासी क्षमता १०० पेक्षा जास्त; तर २० बोटींची प्रवासी क्षमता ७० ते १०० इतकी आहे. तसेच ६० छोट्या बोटी अशा आहेत; ज्यांची प्रवासी क्षमता ७० इतकी आहे. या पुलाच्या निर्मितीनंतर बोट फेरी वाहतुकीत घट होईल आणि त्याचा परिणाम आमच्या उदरनिर्वाहावर होईल, असेही ते म्हणाले. त्याशिवाय सरकारने बोटचालकांना प्रवासी शुल्कात वाढ करू द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.