PM Narendra Modi receiving Mauritius’ highest award: पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर होते. दरम्यान मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ देण्याची घोषणा केली. मॉरिशसचा हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

दरम्यान नरेंद्र मोदींच्या १९९८ च्या मॉरिशस भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नरेंद्र मोदी हे तत्कालीन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. त्यावेळी त्यांनी मॉरिशसचा दौरा केला होता. Modi Archive या एक्स पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्याच पोस्टमध्ये एका शतकापूर्वी भारतातील काही समुदाय मजूर म्हणून मॉरिशसमध्ये गेले होते. ते आपल्याबरोबर तुलसीदास यांचे रामायण, हनुमान चालीसा आणि हिंदी भाषा घेऊन गेले, असाही उल्लेख करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मॉरिशस, रामायण आणि भारतीय संस्कृती यांच्यातील ऋणानुबंधाचा घेतलेला हा आढावा.

मॉरिशस ही रामायणाची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. २ नोव्हेंबर १८३४ पासून गिरमिटिया मजुरांनी मॉरिशसला स्थलांतर करण्यास सुरुवात केली. या स्थलांतराबरोबर त्यांनी हस्तलिखित आणि मुद्रित स्वरूपातील तसेच मौखिक परंपरेतील रामचरितमानस आणि हनुमान चालिसा आदी देशात नेले. गेल्या १९० वर्षांत मॉरिशसामध्ये रामायण पठणाची एक विशिष्ट परंपरा विकसित झाली आहे. रामचरितमानस हे अवधी भाषेत लिहिलेलं असून ती भोजपुरीच्या जवळची भाषा आहे. रामचरितमानस हे हिंदू स्थलांतरितांच्या जाणीवेत खोलवर रुजलेले आहे. मॉरिशससह इतर वृक्षलागवडीच्या वसाहतींमध्ये (त्रिनिदाद आणि टोबॅगो, मॉरिशस, फिजी, सुरिनाम, आणि दक्षिण आफ्रिका) गिरमिटिया भारतीय मजूरांनी आपल्या कठीण काळात अपमान, अन्याय, दडपशाही आणि वसाहत काळातील अत्यंत कठीण परिस्थितीत रामचरितमानसकडे आधार म्हणून पाहिले. नवीन आणि जुने गिरमिटिया प्रवासी केवळ पारंपरिक राम कथा आणि रामलीला सांगून थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार नवीन कथा तयार करून नावीन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारला.

रामायण आणि मारीच देशाची निर्मिती

पहलाद रामसुरन यांनी आपल्या Folk Tales of Mauritius या ग्रंथात मोत्यांच्या बेटांचा जन्म ही कथा सांगितली आहे. ती त्यांनी आपल्या आईकडून ऐकली होती. या कथेप्रमाणे रामायणातील मारीच नावाच्या मायावी राक्षसाने सोन्याच्या हरणाचा भास निर्माण करून सीतेला फसवले होते. त्याचा वध झाल्यानंतर त्याचे प्रेत मोत्यांमध्ये रूपांतरित झाले आणि रामाने हे मोती भारताच्या दक्षिण भागाकडे भिरकावले. नंतर एका भीषण चक्रीवादळामुळे हे मोती हिंद महासागरात वाहून गेले आणि त्यांनी मास्करेन बेटांचे (Mascaregnas) रूप घेतले. मारीच देश म्हणजेच मॉरिशस मानले गेले. ही कथा सततच्या स्थलांतराच्या लाटांबरोबर लोकांच्या मनात दृढ होत गेली आणि मौखिक परंपरेनुसार वेगवेगळ्या कथाकारांनी वेगवेगळ्या रूपांत ती सांगितली. प्रत्यक्षात मॉरिशस हे गिरमिटिया प्रथेच्या ‘महान प्रयोगाचा’ (Great Experiment) पहिला केंद्रबिंदू होते. कोलकाता बंदराच्या डेपोमध्ये गिरमिटिया मजुरांसाठी हे ठिकाण टापू (TAPU) या संकल्पनेचे प्रतीक ठरले.

बैठका, रामायणी आणि रामायण मंडळी

गिरमिटिया मजुरांच्या आगमनानंतर सर्व वसाहतींतील तळांवर आणि भारतीय वसाहतींमध्ये बैठका स्थापन केल्या गेल्या. गिरमिटिया मजुरांनी या बैठकीत एकत्र येऊन रामचरितमानसच्या ओव्या गात आपल्या दुःख आणि अपमानाला विसरण्याचा प्रयत्न केला. हे अनुभवी परंपरा वाहक रामायण उत्तम प्रकारे हृदयस्थ करून होते. त्यांना रामायणी म्हणत आणि आजही ते या नावाने ओळखले जातात. २० व्या शतकापर्यंत रामायणींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्या काळातील बैठकीत विद्यार्थ्यांना रामचरितमानस मुखोद्गत करण्यासाठी, वाचण्यासाठी, पठण करण्यासाठी आणि भोजपुरी भाषेत त्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी शिकवले जात असे. बर्तनी (Bartani) शिक्षणाचा हेतू हा गिरमिटियांच्या मुलांना रामायण शिकवणे हाच होता. रामायण आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम हिंदू मानसिकतेत खोलवर रुजलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात किमान एक रामायण मंडळी (Ramayana Mandali) असते, तर पोर्ट लुईस शहरात वीसहून अधिक अशा मंडळी कार्यरत आहेत.

स्वामी कृष्णानंदजींचे योगदान: प्रत्येक घरासाठी रामायण

१९६० आणि १९७० च्या दशकात सेवा शिविर आणि ह्यूमन सर्व्हिस ट्रस्टचे संस्थापक स्वामी कृष्णानंदजी महाराज यांनी संपूर्ण बेटावर १,००,००० लहान (खिशात ठेवता येतील) रामायण प्रतांची मोफत वाटणी केली. ही वाटणी घराघरांत जाऊन केली गेली आणि यासाठी गावोगावी रामायणाच्या ओव्यांसह ढोलकाच्या साथीने शोभायात्रा काढण्यात आल्या. जे लाभार्थी रामायण स्वीकारत ते आरतीसह त्याचे पूजन करत.

पंडित राजेंद्र अरुण यांचे नवीन दृष्टिकोनातून विवेचन

पंडित राजेंद्र अरुण यांच्या मॉरिशस आगमनाने रामचरितमानस सत्संगांना एक नवा आयाम दिला. त्यांनी MBC रेडिओवर रामायण विषयक प्रवचने सुरू केली आणि संपूर्ण मॉरिशसभर राम कथा आयोजित केल्या. या चळवळीमुळे रामायण केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि संसदेने एकमताने पारित केलेल्या रामायण केंद्र अधिनियमाद्वारे हे केंद्र अस्तित्वात आले. नियमितपणे रामायणतज्ज्ञांना आमंत्रित करून व्याख्याने आयोजित केली जातात. तसेच, शाळा, महाविद्यालये आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागाने राष्ट्रीय स्तरावर रामायण पठण स्पर्धा घेतल्या जातात. मॉरिशसच्या शेजारील रियूनियन बेटावर (Reunion Island) रामायण बॅले (ballet) फ्रेंच भाषेत सादर केला जातो.

जीवन प्रसंगांमध्ये रामायण पठण

भोजपुरी संस्कार गीतांना गीत गवाई म्हणून ओळखले जाते. गेल्या १८० वर्षांपासून जतन केलेल्या भोजपुरी गीतांमध्ये शेकडो गीते समाविष्ट आहेत. ज्यात विशेषतः सीतेच्या विवाहाचे आणि राम-सीता या आदर्श दाम्पत्याचे उल्लेख आढळतात. हे मंत्रमुग्ध करणारे झुमर (Jhumar) विवाहसोहळ्यांत गायले जातात. सोहर (Sohar) ही जन्मविषयक संस्कारांशी संबंधित गीते असून छठी (चट्टी) आणि बारशा (बारही) समारंभांमध्ये गाऊन रामायणातील प्रसंगांचे स्मरण केले जाते. मॉरिशसची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे अंत्यसंस्काराच्या वेळी रामायण पठण करण्याची प्रथा. मृत आत्म्याच्या प्रियजनांना शोक सहन करण्यासाठी आणि त्यांना मानसिक आधार देण्यासाठी हा विधी केला जातो. MBC TV आणि रेडिओनेही अनेक वर्षे रामायणावर आधारित बॅलेट सादरीकरणे, प्रवचने, नाटके, संगीत रचना तसेच कीर्तन आणि भजन सत्रे प्रसारित केली आहेत.

हनुमान उपासना

मॉरिशसमध्ये हिंदूंची घरे ओळखण्याचा एक सहजदृश्य सिग्नल म्हणजे हनुमानजींचा लाल झेंडा (झंडी). हा झेंडा लांब बांबूच्या काठावर फडकत असतो आणि तो प्रामुख्याने हनुमानाच्या छोट्या देवळाजवळ किंवा चौथऱ्यावर (भोजपुरीत चवत्रा) लावलेला असतो. हनुमान जयंतीला (हनुमान दिवस) हा झेंडा बदलण्याची प्रथा आहे. ही परंपरा नवचैतन्य आणि नवी ऊर्जा दर्शवते. मॉरिशसमध्ये हनुमान गिरमिटिया प्रवाशांसाठी साहस आणि बळाचे प्रतीक आहे. हनुमान चालीसा नियमितपणे पठण केली जाते आणि बहुतेक हिंदूंना ती तोंडपाठ असते.

रामायणाची जाणीव आणि सामाजिक-राजकीय गतिशीलता

रामायणाची जाणीव मॉरिशसच्या सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग झाली आहे. गिरमिटियांच्या पिढ्यांनी सातत्याने ही परंपरा टिकवून ठेवली आहे. त्यात काळानुसार इलेक्ट्रॉनिक वाद्यांची भर पडली. मॉरिशसच्या सार्वजनिक जीवनात रामायणाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव सर्वत्र दिसून येतो. रामाच्या रावणावरील विजयाचा उल्लेख नेहमी ‘चांगल्याच्या वाईटावरील विजयाचे प्रतीक’ म्हणून केला जातो.

मॉरिशसमधील भारतीय समाजाने गेल्या काही दशकांत लक्षणीय सामाजिक आणि राजकीय उन्नती केली. या प्रवासात रामायणाच्या शिकवणींनी संस्कृती, राजकारण आणि हिंदू कुटुंबाच्या सामाजिक-धार्मिक संवादात मार्गदर्शक भूमिका बजावली. मूल्यसंवर्धन आणि सभ्यता जपण्याच्या दृष्टिकोनातून रामायण हा एक महत्त्वाचा प्रेरणास्रोत राहिला आहे

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi receiving mauritius highest award ramayana recitation traditions among mauritian hindus svs