PM Narendra Modi Vist RSS Headquarters Nagpur : २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदींनी अनेकदा नागपूरचा दौरा केला. या काळात त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले आणि दीक्षाभूमीलाही भेट दिली. परंतु, संघ मुख्यालय किंवा रेशीमबागच्या स्मृती मंदिराकडे त्यांचा ताफा कधी वळलाच नाही. अखेर ११ वर्षांनंतर पहिल्यांदाच मोदींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भेटीचा मुहूर्त गवसला आहे. आज (३० मार्च) पंतप्रधान मोदी हे रेशीमबागेत जाणार आहेत. जिथे आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींची समाधी आहे. येथून काही मिनिटांच्या अंतरावरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. येथे असलेले संग्रहालय हे एकेकाळी बंदी घातलेल्या संघटनेच्या अनेक शोकांतिकांची कहाणी सांगतं. दरम्यान, संघाच्या या दोन पवित्र संस्थांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ…
१९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना
नागपूरच्या रहदारीच्या गर्दीपासून काही किलोमीटरच्या अंतरावर एक इमारत आहे. हिरवीगार झाडे आणि फुलांच्या रोपांनी वेढलेल्या या परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे स्मारक आहे, ज्यांना लोकप्रियपणे ‘डॉक्टरजी’ म्हणून ओळखले जाते. एकेकाळी काँग्रेस कार्यकर्ते असलेले हेडगेवार १९२० च्या दशकात पक्षापासून वेगळे झाले. १९२३ मध्ये नागपूर आणि राज्यातील इतर काही शहरांत हिंदू-मुस्लीम दंगल झाली. यानंतर १९२५ मध्ये हेगडेवार यांनी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. ही संघटना हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी समर्पित होती.
आणखी वाचा : सागांग फॉल्ट म्हणजे काय? त्यामुळे भूगर्भात काय होतं? म्यानमारमध्ये मोठा भूकंप का झाला?
रेशीमबागेत संघाच्या प्रमुखांचे स्मृतीमंदिर
१९४० मध्ये हेगडेवार यांचं निधन झालं. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत या संघटनेचं नेतृत्व केलं होतं. हेडगेवार यांच्यावर नागपूर येथील रेशीमबाग परिसरातील मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले, जिथे १९६२ मध्ये त्यांच्या सन्मानार्थ एक समाधी (स्मारक) बांधण्यात आली, ज्याचे उद्घाटन त्यांचे उत्तराधिकारी गोळवलकर यांनी केले. १९७३ मध्ये गोळवलकर यांच्या निधनानंतर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक बांधले. गेल्या काही वर्षांत सर्व स्तरातील लोकांनी या दोन दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या रेशीमबागेतील स्मारकांना भेटी दिल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा हा डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीमंदिराजवळील रेशीमबाग मैदानावर होतो. यानिमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत हे जनतेला संबोधित करत असतात. हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या स्मारकांव्यतिरिक्त या संकुलात अनेक प्रशासकीय कार्यालये, प्रशिक्षण केंद्रे आणि एक अत्याधुनिक सभागृह आहे. संघातील नेत्यांच्या सर्व बैठका व प्रशिक्षण शिबिरे याच ठिकाणी होत असतात.
सरसंघचालकांचे निवासस्थान
नागपुरात असताना सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इतर वरिष्ठ नेते संघाच्या मुख्यालयातच राहतात. महालच्या गजबजलेल्या गल्ल्यांमध्ये वसलेल्या या इमारतीची स्थापना १९२५ मध्ये करण्यात आली होती. अनेक दशकांपूर्वी उभारलेली ही इमारत आजही जशीच्या तशीच आहे. या इमारतीमध्ये साध्या पद्धतीने अनेक खोल्या बांधण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये मूलभूत गरजेसाठी लागणाऱ्या वस्तू आणि थोडेसे फर्निचर लावण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे, नागपूरच्या कडक उन्हापासून वाचण्यासाठी इमारतीत कोणतेही एअर कंडिशनर लावण्यात आलेले नाही. तिथे फक्त साध्या पद्धतीचे वॉटर कूलरच दिसून येतात.
संघाच्या मुख्यालयातील संग्रहालय
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक संग्रहालय उभारण्यात आलं आहे. जिथे संघाच्या विविध प्रमुखांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या वस्तू, त्यांच्या आठवणी, लिहिलेली पत्रे आणि भेटवस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. या वस्तू एकेकाळी बंदी घातलेल्या संघटनेनं अडचणींना कसं तोंड दिलं याच्या आठवणींना उजाळा देतात. स्वतंत्र भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीन वेळा बंदी घालण्यात आली होती. यातील पहिली बंदी महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर १९४८ मध्ये घालण्यात आली. दुसरी बंदी १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात घालण्यात आली, तर तिसरी बंदी १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर घालण्यात आली. त्यानंतर ती उठवण्यातही आली.
गोळवलकरांनी मृत्यूपूर्वी कोणता संदेश दिला?
२ एप्रिल १९७३ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात, त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना आणि सदस्यांना भारतीय समाजाच्या सशक्तीकरणावर आणि हिंदू धर्माच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा संदेश दिला. त्यामध्ये त्यांनी हिंदू धर्माचे अस्तित्व आणि त्याच्या एकतेच्या महत्त्वावर जोर दिला. गोळवलकरांच्या पत्रात त्यांचे मुख्य विचार हे हिंदू समाजाचे ऐक्य आणि सामाजिक समता साधणारे होते. गेल्या अनेक दशकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेगवेगळ्या कार्यक्रमातून हिंदू समुदायात एकता वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. संघानं दलित आणि मागास जातींची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत.
हेही वाचा : दक्षिण कोरियातील ‘दत्तक घोटाळा’ काय आहे? हा देश लहान मुलांचा सर्वांत मोठा ‘निर्यातदार’ कसा बनला?
संघाच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला
नागपुरातील हेडगेवार स्मृती मंदिर आणि संघाचे मुख्यालय सर्वसामान्यांसाठी खुले आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणांवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यामागचं कारण म्हणजे, २००६ मध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी संघाच्या या दोन्ही ठिकाणांना लक्ष्य केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी तीन अतिरेक्यांना ठार केलं होतं. आरएसएसप्रमुख मोहन भागवत यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ही भारतातील सर्वोच्च श्रेणीची सशस्त्र व्हीआयपी सुरक्षा आहे.
संघाचे आणि भाजपाचे अतूट नाते
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अतूट नाते आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेले अनेक स्वयंसेवक नंतर भाजपामधून राजकारणात सक्रिय झाले आहेत. आजही भाजपाचा संघटन मंत्री हा संघाकडून दिला जातो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक वर्षे संघ प्रचारक होते. परंतु, पंतप्रधान झाल्यावर त्यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयाच्या भेटीपासून काहीसा दुरावा ठेवला होता. दर तीन वर्षांनी संघाच्या नागपुरात होणाऱ्या प्रतिनिधी सभेला गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतात. विजयादशमी उत्सव आणि तृतीय वर्ष संघ शिक्षावर्गाचा समारोपीय कार्यक्रम हे संघाचे वर्षातील दोन महत्त्वाचे कार्यक्रम असतात. या दोन्ही कार्यक्रमांना राजकीय, उद्योग, सामाजिक आणि अन्य क्षेत्रातील अनेक नामवंत हजेरी लावतात.