पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या १०२ व्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात मियावाकी वृक्षारोपणाबाबत भाष्य केले. मियावाकी ही जपानमधील लोकप्रिय वृक्षलागवड करण्याची पद्धत असून शहरांमध्ये छोट्या जागेत घनदाट जंगल निर्माण करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. पंतप्रधान मोदी यांनी केरळमधील शिक्षक रफी रामनाथ यांचेही उदाहरण दिले. रामनाथ यांनी मियावाकी तंत्र वापरून नापिक जमिनीवर जंगल फुलवले. या छोट्याश्या जंगलाला त्यांनी विद्यावनम असे नाव दिले असून त्याठिकाणी ११५ प्रकारची वेगवेगळी वृक्ष आहेत. दरम्यान हवामान बदलाचा सामना करणे, प्रदुषणाच्या पातळीवर अंकुश लावणे आणि शहरातील हरितपट्ट्यामध्ये वाढ करावी हा उद्देश डोळयासमोर ठेवून मुंबई महानगरपालिकेनेही मुंबईच्या मोकळ्या जागांवर मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली आहे. ही पद्धत नेमकी कशी असते? याचा काय फायदा होतो, याबद्दल जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मियावाकी वृक्षलागवडीची पद्धत कशी आहे?

जपानचे प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांच्या नावाने ही पद्धत सुरू झाली. प्रत्येक चौरस मीटर क्षेत्रात स्थानिक प्रजातीच्या दोन ते चार झाडांची लागवड केली जाते. या पद्धतीमुळे झाडांची वाढ स्वयंपूर्ण पद्धतीने होते, तसेच झाडांची वाढ अतिशय वेगाने होत असून तीन वर्षातच झाड पूर्ण मोठे होते. १९७० च्या दशकात या पद्धतीने वृक्षारोपण करण्यास सुरुवात झाली. छोट्या जागांमध्ये वृक्षाच्छादित परिसर वाढवा या उद्देशाने ही पद्धत पुढे प्रचलित झाली. मियावाकी वनामध्ये वृक्षांची निवड महत्त्वाची असते. वाढीच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या म्हणजेच ज्यांना खत आणि पाण्याची फार आवश्यकता लागणार नाही, अशा वृक्षांची लागवड केली जाते.

हे वाचा >> कुतूहल : मियावाकी जंगलांचे प्रणेते कोण?

मुंबईमध्ये मागच्या काही वर्षांपासून अतिशय कमी खर्चामध्ये हरितपट्टा वाढविण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरत आहे.

मियावाकी किती फायदेशीर?

शहराच्या मध्यात असलेल्या स्थानिक प्रजातीच्या छोट्याश्या वनराईमुले पर्यावरणाला चांगला फायदा होतो. ही झाडे आसपास असलेल्या धुळीचे कण शोषूण घेतात. तसेच भूपृष्ठावरील तापमान नियत्रंणात ठेवण्यातही ही झाडे मदत करतात. लोकसत्तानेच याआधी दिलेल्या लेखामध्ये अशा वनात लावण्यात येणाऱ्या झाडांची माहिती दिली होती. चिंच, पळस, करंज, बेहडा, सावर, रतनगुंज, साग, सिताफळ, बेल, पारिजातक, कडूनिंब, बांबू, पेरू, पुत्रजीवा, सीता अशोक, हरडा, खैर, जांभूळ, मोह, बहावा, सुरू, बदाम, रिठा, शिसम, बकुळ, अर्जुन, फणस, आवळा, कदंब यांसारख्या देशी झाडांची मियावाकी वनामध्ये लागवड केली जाते.

मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले पायाभूत सोयी सुविधांचे प्रकल्प जसे की, मेट्रो निर्माण, बांधकाम प्रकल्पामुळे मुंबईच्या काही भागांमध्ये पृष्ठभागावरील तापमानात प्रचंड वाढ झालेली दिसते. अशा समस्यांचा सामना करण्यासाठी मियावाकीसारखे वने अतिशय फायदेशीर ठरणार आहेत.

मुंबईच्या अंधेरी भागात असलेल्या मरोळ परिसरात अनेक उद्योगधंदे आहेत. मुंबई महानगरपालिकेने याठिकाणी मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड केली आहे. “मुंबईतील हरितपट्टे त्या त्या परिसरातील कार्बन पातळीला नियंत्रणात ठेवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हवा स्वच्छ ठेवण्यासाठीही अशी वने फायदेशीर ठरतात. तसेच अशा वनांमुळे आसपासच्या परिसरात जैवविविधता आणि परिसंस्था विकसित होण्यास मदत होते. तसेच या वनांमुळे जमिनीची सुपीकता वाढून पृष्ठभागावरील तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते”, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

मुंबईतील कोणत्या भागात मियावाकी वने आहेत?

मुंबई महानगरपालिकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत ६४ मियावाकी वने लावण्यात आली आहेत. २ जानेवारी २०२० रोजी मुंबई महानगरपालिकेने शहरी वनीकरण प्रकल्पातंर्गत मियावाकी वनांना प्रोत्साहन दिले. तसेच या उपक्रमातंर्गत चेंबूर येथील भक्ती पार्कमध्ये अशाप्रकारचे पहिले वन विकसित केले.

हे वाचा >> विश्लेषण: मियावाकी शहरी जंगल म्हणजे नेमके काय? मुंबई महापालिकेकडून याची सक्ती का?

या उपक्रमातंर्गत चांदिवलीमधील नाहर अमृत शक्ती उद्यान येथील मियावाकी वनात सर्वाधिक झाडे लावण्यात आली आहेत. याठिकाणी १३ एकर परिसरात ४१ हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. सर्व ६४ मियावाकी वनांमध्ये आतापर्यंत चार लाख वृक्षारोपण करण्यात आल्याचीही माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. २०२० साली मनपाच्या उद्यान समितीने मुंबईमधील १,१०० जागा अशा वनांची उभारणी करण्यासाठी निवडल्या होत्या. त्यापैकी आतापर्यंत ६० जागांवर मियावाकी वने विकसित केली गेली आहेत.

मनपाची भविष्यातील योजना काय आहे?

पुढच्या वर्षभरात आणखी १४ ठिकाणी मियावाकी वने विकसित करून त्याठिकाणी ८०,४०० हजार स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्याचे लक्ष्य महानगरपालिकेने ठेवले आहे. परदेशी म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वर्षीच्या अखेरपर्यंत एक लाख वृक्षारोपण करण्याचे लक्ष्य आमच्यासमोर ठेवले आहे. या प्रकल्पासाठी आम्ही अनेक जागांची पाहणी केली असून त्याठिकाणी वृक्षलागवड करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, बेस्ट कॉलनीच्या आसपास असलेल्या मोकळ्या जागांवरही मियावाकी वने विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. चांदिवलीमधील स्वामी विवेकानंद उद्यान आणि जोगेश्वरीमधील महाकाली केव्हज मार्गावरील जागेवर जवळपास ३० हजार वृक्षारोपण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi talks of miyawaki forests in mann ki baat program what is miyawaki method how many trees in mumbai kvg