पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बुधवार, १५ जानेवारी रोजी ‘आयएनएस सुरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौका आणि ‘आयएनएस वगशीर’ ही पाणबुडी नौदलात दाखल होत आहे. देशाच्या युद्धसज्जतेत त्यामुळे वाढ होणार आहे. नौदलाच्या या प्रमुख युद्धनौका आणि पाणबुडीच्या निर्मितीमुळे जागतिक पातळीवर संरक्षण क्षेत्रातल्या आणि सागरी सुरक्षेशी संबंधित उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित होणार आहे. नौदलाच्या वाढत्या युद्धसज्जतेचा हा आढावा. ‘आयएनएस सुरत’ युद्धनौका- ही युद्धनौका ‘प्रकल्प १५ बी’ अंतर्गत विनाशिका प्रकारातील आहे. गेल्या तीन वर्षांत नौदलात दाखल झालेल्या ‘आयएनएस विशाखापट्टणम’, ‘मोरमुगाओ’ आणि ‘इम्फाळ’ या युद्धनौकांनंतर ‘आयएनएस सुरत’ ही युद्धनौका आता नौदलात दाखल होत आहे. या प्रकल्पातील ही अंतिम युद्धनौका आहे. सर्वांत मोठी आणि अतिशय आधुनिक अशा विनाशिकांपैकी ही एक. ती ७५ टक्के देशी बनावटीची आहे. ‘प्रकल्प १५’ अंतर्गत १९९७ ते २००१ या काळात तीन ‘दिल्ली’ वर्गातील, त्यानंतर ‘प्रकल्प १५ ए’ अंतर्गत २०१४ ते २०१६ या काळात तीन ‘कोलकाता’ वर्गातील आणि ‘प्रकल्प १५ बी’ अंतर्गत २०२१ ते २०२४ या काळात चार ‘विशाखापट्टणम’ वर्गातील युद्धनौका नौदलात दाखल झाल्या आहेत. युद्धनौकेचे वजन ७४०० टन असून ती १६४ मीटर लांब आहे. अद्ययावत शस्त्रांनी सज्ज आहे. युद्धनौकेवर चार गॅस टर्बाइन असून ३० नॉटिकल मैल (तासाला ५६ किलोमीटर) वेगाने ती जाऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची क्षमता असलेली ही पहिलीवहिली युद्धनौका आहे. यामुळे नौकेची कार्यक्षमता काही पटींनी वाढली आहे.
हेही वाचा >>>शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या ‘नाग’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; पाकिस्तान-चीनच्या कारवायांना चाप बसणार?
‘आयएनएस निलगिरी’ युद्धनौका
शिवालिक वर्गातील (प्रकल्प १७) प्रकल्पानंतर ‘पी-१७ ए’ प्रकल्प नौदलाने हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत ‘आयएनएस निलगिरी’ ही पहिली स्टेल्थ फ्रिगेट (नौकेचा प्रकार) आहे. ही युद्धनौका बहुउद्देशीय असून, अशा प्रकारच्या आणखी सात युद्धनौका नौदलात दाखल होणार आहेत. मुंबईतील माझगाव गोदीत या युद्धनौकांचे काम प्रगतिपथावर आहे. सुदूर महासागरात (ब्लू वॉटर) संचार करण्यास सक्षम अशी ही नौका आहे. भारताचे सागरी हितसंबंध असलेल्या क्षेत्रात पारंपरिक आणि अपारंपरिक आव्हानांचा सामना करण्यास ही नौका सक्षम आहे. ‘एकात्मिक बांधणी’ तत्त्वानुसार या नौकेची बांधणी केली आहे. यामध्ये नौकेची बांधणी अधिक सोपी जावी, यासाठी ब्लॉक स्तरावर नौकेची बाहेरील बांधणी आधी केली जाते. डिझेल इंजिन आणि गॅस टर्बाइनचा समावेश यात असतो. स्वनातीत (ध्वनीहून अधिक) वेगाने जाणाऱ्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा, मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, अद्ययावत तोफा आदींचा समावेश युद्धनौकेवर आहे. नौकेची लांबी १४२.५ मीटर असून, ६३४२ टन वजन आहे. ३० नॉटिकल मैल (तासाला ५६ किलोमीटर) वेगाने ती जाऊ शकते.
‘आयएनएस वागशीर’ पाणबुडी
कलवरी वर्गातील ‘प्रकल्प ७५’ अंतर्गत स्कॉर्पिन वर्गातील ‘आयएनएस वागशीर’ ही सहावी पाणबुडी आहे. फ्रान्सच्या नौदलाच्या गटाबरोबर संयुक्तपणे या पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ‘कलवरी’, ‘खांदेरी’. ‘करंज’, ‘वेला’, ‘वागीर’ या पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या आहेत. शत्रूला चकवा देणारी अनेक वैशिष्ट्ये नव्याने दाखल होत असलेल्या ‘वागशीर’ पाणबुडीमध्ये आहेत. अत्याधुनिक ध्वनिशोषक तंत्रज्ञान पाणबुडीवर आहे. तसेच, पाणबुडीची आवाजाची पातळी अतिशय कमी आहे. शत्रूला टिपायचे असल्यास अचूकतेने पाणबुडी हल्ला करते. टॉर्पिडोसह पाण्यावर असताना जहाजविरोधी क्षेपणास्त्राचाही मारा ही पाणबुडी करू शकते. हिंदी महासागरातील ‘सँड फिश’ या शिकारी माशाच्या नावावरून पाणबुडीला हे नाव दिले आहे. पहिली वागशीर पाणबुडी रशियाकडून भारताने घेतली होती. १९७४ मध्ये ती नौदलात दाखल झाली होती आणि १९९७ मध्ये ती निवृत्त झाली. नव्याने दाखल होणारी ‘आयएनएस वागशीर’ ६७.५ मीटर लांब असून, वजन १६०० टन आहे. २० नॉटिकल मैलाने ती जाऊ शकते. डिझेल आणि विद्युत ऊर्जेवर चालणारी ही आक्रमक पाणबुडी आहे. पाणबुडीविरोधी, जहाजविरोधी, गुप्तवार्ता मिळविण्यासाठी, टेहळणी आदी विशेष मोहिमांसाठी या पाणबुडीचा वापर होईल.
हेही वाचा >>>अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
चीनचे आव्हान
हिंदी महासागर क्षेत्रात चीनचा वाढता वावर पाहता नौदलाच्या अधिकाधिक सक्षमीकरणाची भारताला गरज आहे. त्यानुसार विविध प्रकल्पांवर काम सुरू असून आणखी युद्धनौका येत्या काळात नौदलात दाखल होतील. आफ्रिकेमधील जिबुती, पाकिस्तानमधील ग्वादार, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार येथील चीनचा वावर भारताची डोकेदुखी वाढविणारा आहे. चीनच्या नौदलाचीही क्षमता वेगाने वाढत आहे. गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणावर युद्धनौका चीनच्या नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. २०३० पर्यंत ४३५ हून अधिक युद्धनौका चिनी ताफ्यात असण्याची शक्यता आहे. याउलट, २०३५ पर्यंत भारताच्या नौदलाकडे १७० ते १७५ युद्धनौका आणि पाणबुड्या असण्याची शक्यता आहे. अर्थात नौदलाच्या एकत्रित ताफ्यापेक्षा त्यांचा दर्जा आणि राष्ट्रीय हितसंबंध असलेले क्षेत्र आणि इतर बाबीही तुलनात्मक पातळीवर महत्त्वाच्या ठरतात. चीनचे आव्हान पाहता जहाजबांधणी प्रक्रियेला वेग देऊन सर्व अडथळे, लालफितीचा कारभार दूर होण्याची आवश्यकता आहे.
आत्मनिर्भर भारत
नौदलामध्ये देशी बनावटीच्या युद्धनौकांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत आहे. देशी साहित्याचा वापर ७० टक्क्यांहून अधिक होत आहे. आता दाखल होणाऱ्या युद्धनौकांची रचना नौदलाच्या युद्धनौका रचना विभागाने केली आहे. देशी साहित्याच्या वापराचे प्रमाण आणखी वाढविण्याची गरज आहे. आत्मनिर्भरतेसह जहाजबांधणी क्षेत्रातही गतिमानतेचा प्रवास गरजेचा असून, नजीकच्या काळात तो महत्त्वाचा ठरणार आहे.
prasad.kulkarni@expressindia.com