येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी केली जात आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी फक्त अयोध्येतील राम मंदीरच नव्हे तर अबू धाबीतील एका हिंदू मंदिराचेही लोकार्पण करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अबू धाबीताल या मंदिराची विशेषता काय आहे. या मंदिराचे कधीपासून बांधकाम केले जात होते? हे जाणून घेऊ या…

अबू धाबीतील पहिले हिंदू मंदीर

अबू धाबीत बीएपीएस हिंदू मंदिराचे लवकरच लोकार्पण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मोदी यांना आमंत्रित करण्यात आलेले असून मोदींनी ते आमंत्रण स्वीकारले आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी या मंदिराचे लोकार्पण केले जाणार आहे. बीएपीएस हिंदू मंदीर हे अबू धाबीतील पहिले हिंदू मंदीर आहे. अबू धाबीची राजधानी अबू मुरैखा या भागात हे मंदीर उभारण्यात आलेले आहे. या मंदिराला एकूण सात शिखर आहेत. या सात शिखरांकडे सात अमिरातींचे प्रतिक म्हणून म्हणून पाहिले जात आहे. या प्रत्येक शिखरातून हिंदू देव-देवतांच्या कथा, शिकवणी दर्शवलेल्या आहेत. याबाबत मंदिराचे प्रकल्प संचालक प्रणव देसाई यांनी अधिक माहिती दिली. “संयुक्त अरब अमीरातीच्या नेतृत्वाचे आभार म्हणून मंदिरातील सात शिखरे प्रतिकात्मकरित्या सात अमीरातींचे प्रतिनीधीत्व करतात,” असे देसाई यांनी सांगितले.

२००० कारागिरांची ३ वर्षांपासून मेहनत

या मंदिरात एका वेळी ८ ते १० हजार भाविक येऊ शकतात. हे मंदीर स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असल्याचे म्हटले जात असून यावर देव-देवतांच्या कथा कोरलेल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या मंदीरनिर्मीतीचे काम सुरू आहे. या मंदिरावरील संगमरवरी खांबांवर कोरीव काम करण्यासाठी राजस्थान आणि गुजरातमधील २००० कागागिरांनी गेल्या तीन वर्षांपासून काम केलेले आहे. यातील प्रत्येक खांब वेगळा असून त्यात भारतीय धर्मग्रंथातील वेगवेगळ्या कथा कोरलेल्या आहेत. या खांबांवर धर्मग्रंथात आढळणारे प्राणी, पक्षी कोरण्यात आलेले आहेत. मंदीर उभारणीसाठी एकूण २० हजार टन दगड आणि संगमरवर अबू धाबीकडे पाठवण्यात आलेले आहेत.

मंदिरासह ग्रंथालय, सभागृह

अबू धाबीतील या मंदीर परिसरात मंदिराव्यतिरिक्त अन्य इमारतीही आहेत. यामध्ये प्रार्थनेसाठी सभागृह, कम्यूनिटी सेंटर, ग्रंथालय, लहान मुलांना खेळण्यासाठी बाग, अॅम्फीथेटर अशा अनेक इमारती येथे उभारण्यात आल्यात.

या मंदिराचे महत्त्व काय?

येत्या १४ फेब्रुवारी रोजी लोकार्पण केले जाणारे यूएईतील पहिले हिंदू मंदीर आहे. या मंदिराला अनेक अर्थांनी महत्त्व असून यामुळे दोन देशांतील मैत्रिसंबंध आणखी दृढ होणार आहेत. यूएईमध्ये वेगवेगळ्या देशातील लोक राहतात. यात सर्वाधिक लोक भारतातील आहेत. भारतातील साधारण ३.५ दशलक्ष लोक यूएईमध्ये स्थायिक आहेत. त्यानंतर अमेरिका (२.७ दशलक्ष) सौदी अरेबिया (२.५ दशलक्ष) यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे यूएईमध्ये हिंदू मंदीर असणे हे यूएईसाठीच फायद्याचे आहे.

मोदींच्या दौऱ्यादरम्यान मंदिरासाठी दिली जमीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ साली अबू धाबीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर तब्बल ४३ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानाने तेव्हा आखाती देशाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान अबू धाबीने पहिल्या हिंदू मंदिरासाठी ही जमीन देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर भारत सरकारन यूएई सरकारचे आभार मानत हे फार महत्त्वाचे पाऊल आहे, असे म्हटले होते. मोदींची ही भेट राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाची ठरली होती.

५.४ हेक्टर परिसरात मंदीर

त्यानंतर २०१८ साली मोदी यांनी या मंदीर उभारणीचा प्रकल्प सार्वजनिक केला. त्यावेळी संयुक्त अरब अमीरातीतील सात अमीराती दर्शवणारी शिखरं दाखवण्यात आली होती. तसेच हे मंदीर दगड आणि संगमरवरापासून बनवण्यात येईल, असेही तेव्हा सांगण्यात आले होते. ‘हे मंदीर असे पवित्र स्थळ असेल जेथे सद्भावना आणि मानवता एकत्र येईल,’ असे मोदी म्हणाले होते. हे मंदीर एकूण ५.४ हेक्टर परिसरात उभारण्यात आलेले आहे. ही जमीन अबुधाबीचे तत्कालीन क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद यांनी तेथील भारतीय समुदायाला भेट दिली होती.

मोदींच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण

या मंदिराचे लोकार्पण १४ फेब्रुवारी २०२४ रोजी केले जाणार आहे. याबाबत देसाई यांनी सविस्तर सांगितले आहे. “१४ फेब्रुवारीच्या सकाळी या मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापणा होईल. तर संध्याकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण केले जाईल,” असे देसाई यांनी सांगितले.

Story img Loader