पद्मानने पद्म- ऊरु पद्म संभवे ।
तन्मे भजसि पद्माक्षी, येन सौख्यं लभाम्यहम् ।।१।।

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे, पद्मप्रिये पद्मदलायताक्षी ।
विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व ।।३।।

हे श्रीसूक्तातील श्लोक असून या सूक्ताचा कर्ता कमलमुखी देवीचे आवाहन करत आहे. जगतप्रिया कमलपत्रारूढे, कमलप्रिया, कमलनयन, कमलजा देवीकडे तो सौख्याची मागणी करताना तिची सदैव कृपादृष्टी राहावी यासाठी ‘तुझे चरण कमल माझ्या ठायी ठेव’ अशी आळवणी करत आहे. एकूणच या सूक्ताचा कर्ता श्रीलक्ष्मीची आराधना करत आहे. लक्ष्मी ही समृद्धीची देवता आहे. या देवीचा वास ज्या ठिकाणी असतो, त्याठिकाणी सदैव आनंद व सुख नांदते. याच लक्ष्मीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे या दिवशी नव्या संसद भवनात करणार आहेत. कदाचित येथे अनेकांना प्रश्न पडला असेल हे कधी ठरलं? असं काही ऐकिवात नाही, परंतु अशा स्वरूपाची घोषणा खुद्द केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी २४ मे रोजी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेत संसद भवनाच्या उद्घाटनाविषयी त्यांनी रीतसर माहिती दिली आणि ऐतिहासिक सेंगोल हा राजदंड उद्घाटनाच्या दिवशी नव्या संसदेत स्थापन करणार असल्याचे त्या राजदंडाच्या इतिहासासह स्पष्ट केले. त्यानंतर जगभरात या राजदंडाच्या इतिहासाविषयी चर्चा होताना दिसत आहे, त्या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेणे म्हणूनच महत्त्वाचे ठरावे.

राजदंडाची ऐतिहासिक परंपरा

या राजदंडाला चोल राजवंशाची ऐतिहासिक परंपरा आहे. चोल राजवंश हा दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन राजवंश असून मौर्य सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये चोल राजवंशाचा प्राचीन संदर्भ सापडतो. ऐतिहासिक पुराव्यांनुसार चोलांचा स्वतंत्र देश अस्तित्त्वात होता. या राजवंशाने प्रदीर्घ काळासाठी दक्षिण भारत व आग्नेय आशियावर राज्य केले होते. चोलांनी कला, स्थापत्य, साहित्य अशा सर्वच क्षेत्रात आपली अद्वितीय छाप सोडली. चोल राजे हे शिवोपासक होते. त्यांच्या काळात अनेक शिवालये बांधण्यात आली. अशा या समृद्ध राजवंशाचा ऱ्हास चौदाव्या शतकात झाला. याच राजवंशात राजसत्तेचे हस्तांतरण होत असताना राजदंड विधिविधानासह वर्तमानातील राजाकडून भविष्यातील राजाकडे सुपूर्त करण्याची परंपरा होती. त्याच ऐतिहासिक परंपरेचा दाखला सेंगोल या राजदंडाच्या प्रतिष्ठापन संदर्भात देण्यात येत आहे.

आणखी वाचा : विश्लेषण: डीपफेक तंत्रज्ञान ठरतेय धोकादायक ! महिलांनी का राहायला हवं सावध?

सेंगोलची व्युत्पत्ती

‘सेंगोल’’ हा राजदंड कायमस्वरूपी नव्या संसद भवनात स्थापन करण्यात येणार आहे. तमिळ भाषेत ‘राजदंडा’लाच ‘सेंगोल’ असे म्हटले जाते. सेंगोल या शब्दाची व्युत्पत्ती तमिळ शब्द ‘सिनमई’ या शब्दापासून झाली आहे. १९४७ साली भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांनी इंग्रजांकडून ‘सेंगोल’ स्वीकारून सत्ता परिवर्तनाची नांदी दिली होती. सेंगोल (राजदंड) हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या सालंकृत सोन्याच्या राजदंडाची तत्कालीन किंमत १५ हजार रुपये इतकी होती. हा राजदंड पाच फूट असून समृद्ध कारागिरीसह भारतीय कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या राजदंडाच्या शीर्षस्थानी शिवाचे वाहन ‘नंदी’ विराजमान आहे. तर राजदंडाच्या घटावर लक्ष्मी विराजमान आहे.

राजदंड म्हणजे नेमके काय?

राजाने किंवा एखाद्या राजसत्तेने धारण केलेल्या दंडाला ‘राजदंड’ असे म्हणतात. मुख्यतः धर्मदंड व राजदंड असे दोन दंड अधिकार दर्शविण्यासाठी वापरले जात होते, किंबहुना वापरले जात आहेत. पृथ्वीवरील प्राणीमात्रांच्या रक्षणासाठी साक्षात ईश्वराने या दोन सत्तांची पायाभरणी केल्याचे दाखले अनेक धर्मग्रंथांनी दिले आहेत. साम, दाम, दंड, भेद या उपायांपैकी दंड हा महत्त्वाचा आहे. दंड याचाच अर्थ शासन. त्या दंडाचे म्हणजेच शासनाचे प्रतीक म्हणून राजदंड स्वीकारण्याची परंपरा होती. हा राजदंड वस्तुतः खुद्द ‘राजाच’ अशी संकल्पना मनुस्मृतीत आढळते. हा दंड प्रजेचे शासन व रक्षण करतो. राजदंड हा मुख्यतः अधिकार व सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये राजा हा राजदंड धारण करतो अशा परंपरा अस्तित्त्वात होत्या व आहेत, हे आपण इंग्लंडचा राजा चार्ल्स याच्या राज्याभिषेकाच्या वेळीही पहिले. युरोपियन इतिहासात कॅरोलिंगियन लोकांनी प्रथम काष्ठाचा राजदंड वापरला होता असे मानले जाते, पुढे रोमन राजांकडून त्याची पुनरावृत्ती झाली. भारतीय संकल्पनेनुसार या मृत जगताचे दोन स्वामी (राजे) आहेत. एक भूमीवर चक्रवर्ती सम्राट म्हणून वावरतो, तर दुसरा अध्यात्मिक जगतावर आपल्या ज्ञान-साधनेने वर्चस्व गाजवतो, म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये राजदंड व धर्मदंड यांचे साहचार्य योजले आहे.

सेंगोलवरील समृद्धदायिनी लक्ष्मी

सेंगोलवर असणारी लक्ष्मी कमलारूढ आहे. कमला हे लक्ष्मीचेच एक नाव आहे. कमल आणि कमला यांचा चिरंतन संबंध असल्याचे दाखले वैदिक वाङ्‌मयात सापडतात. लक्ष्मी ही पृथ्वीचेच प्रतीक मानले जाते. पृथ्वी आणि कमळ यांच्यातील निकटचा संबंध ऋग्वेदातील खिलसूक्त असलेल्या श्रीसूक्तात पाहायला मिळतो. श्रीसूक्तातील ‘श्री’ देवी ही लक्ष्मीच आहे. कमळ हे सर्जनाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे, तसेच ते लक्ष्मीरुपाचेही आहे. दीपावलीच्या काळात लक्ष्मीला कुबेराची सहचारिणी म्हणून पुजण्यात येते. कुबेर हा नवनिधींचा प्रमुख आहे. त्याची शक्ती लक्ष्मी आहे. ‘महापद्म’ हे कुबेराच्या अनेक नावांपैकी एक नाव. लक्ष्मीचे एक नाव ‘महापद्मा किंवा महापद्मजा’ आहे. म्हणजेच खुद्द ‘पद्म’ हे लक्ष्मीचेच रूप मानले जाते.

सर्जनाची परिणिती

लक्ष्मी म्हणजे समृद्धी, समृद्धी ही सर्जनाची परिणिती आहे. वैदिक परंपरेनुसार पृथ्वी ही साऱ्या विश्वाची जननी आहे. पृथ्वीचे वर्णन महीपद्मा असे वैदिक परंपरेत करण्यात येते. एकूणच लक्ष्मी ही पृथा आहे. तीच या विश्वाची जननी आहे. म्हणूच या महीपद्मेची उपासना सृजनता व समृद्धी आणण्यासाठी करतात. तसेच भारतीय संकल्पनेनुसार राजा हा भूमीचा स्वामी असतो. या भूमीत महीपद्मेचा वास आहे. ज्या राज्यात ही लक्ष्मी नांदते त्या राज्यात सुख समृद्धी नांदते. म्हणूनच अनेक पौराणिक कथांमध्ये लक्ष्मी सोडून जाता क्षणी त्या राज्यावर दुर्दैवाचे संकट कोसळल्याचे दाखले देण्यात आले आहे. यावरूनच लक्ष्मीची ‘सेंगोल’वरची उपस्थिती काय सांगू पहाते याची प्रचिती येते.

सेंगोलवरील नंदी

नंदी म्हणजे वृषभ, पौराणिक संदर्भानुसार वृषभ हा शिवाचे वाहन आहे. परंतु वैदिक उल्लेखांनुसार रुद्र शिव हा वृषभरूपी होता. नंतरच्या काळात वृषभ व शिव यांचे वेगळे अस्तित्त्व निर्माण झाले. वृष या संस्कृत शब्दाची व्युत्पत्ती ‘वृष्’ या धातूपासून झाली आहे. वृष् म्हणजे सिंचन करणे. वृषभ हा पौरुषाचे प्रतीक मानला जातो. प्रसिद्ध अभ्यासक डॉ. रामचन्द्र चिंतामण ढेरे यांनी नमूद केल्याप्रमाणे ‘द्यावा पृथ्वीच्या संबंधात वृषभ हा दयुलोकाचे प्रतिनिधित्त्व करतो आणि जलवृष्टीच्या द्वारा पृथ्वीला सुफलित करतो. म्हणजे समष्टीच्या संदर्भात तो जलवृष्टी करणारा द्यौ आहे , तर व्यष्टीच्या संदर्भामध्ये तो वीर्यवृष्टी करणारा पुरुष आहे. जल हे पृथ्वीला सुफलित करणारे पुरुषाचे वीर्य आहे. अशी धारणा प्रचलित असल्याचे दिसते.”

आणखी वाचा : विश्लेषण: मोहम्मद बिन तुघलकला ‘लहरी मोहम्मद’ का म्हणायचे? जितेंद्र आव्हाडांनी थेट नोटबंदीच्या निर्णयाशी त्याचा संबंध का लावलाय?

नंदी म्हणजे आनंदी

डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांनी आपल्या “शिव महादेव” या पुस्तकात नंदी अथवा वृषभरुप शिव हाच ‘महानग्न’ असल्याचे सूचित केले आहे. नंदी म्हणजे आनंदी-आनंददायी. निर्मितीप्रक्रियेत स्त्रीतत्त्वाबरोबर रत होताना त्याचे हे ‘नंदी’ रूप प्रकट होते. या रुपाला डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांनी ‘ आनंददायी सर्जनक्षम बीज’ असे म्हटले आहे. एकूणच पृथ्वीच्या सर्जनाच्या प्रक्रियेत नंदी म्हणजेच वृषभ मोलाची भूमिका पार पडतो. या आधी नमूद केल्याप्रमाणे समृद्धी ही सर्जनाची परिणिती आहे. म्हणूनच या विश्वाच्या सर्जनाची प्रक्रिया निरंतर , निर्विघ्न असली तरच समृद्धता अनुभवास मिळते. म्हणूच वृषभ हा राजदंडावर विराजमान होवून पौरुषत्त्व , सृजनता यांचे प्रतिनिधित्त्व करत आहे.

लक्ष्मी आणि नंदी

सर्वसाधारण लक्ष्मीचा संबंध विष्णूशी जोडण्यात येतो. परंतु येथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा की लक्ष्मी ही भूमीचे – स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. भारतीय इतिहासात प्राचीन काळापासून सर्व धर्म- संप्रदायांमध्ये लक्ष्मीची उपासना करण्याची परंपरा आहे. बौद्ध, जैन, हिंदू या तीनही धर्मात लक्ष्मी पूजनीय आहे. विशेष म्हणजे लक्ष्मी -भू देवी या तीनही धर्मात सृजनाचेच प्रतीक म्हणूनच सन्मानित आहे. प्रारंभिक काळात ती आपले स्वतंत्र अस्तित्त्व टिकवून होती. परंतु नंतरच्या काळात तिचा संबंध वैष्णव पंथाशी जोडला गेला. तरीही तिचे शक्ती म्हणून इतर देवतांशी आलेले संबंध ऐतिहासिक पुराव्यांच्या माध्यमातून ठळकपणे दिसणारे आहेत. नंदी व लक्ष्मी यांच्या साहचर्यातून शिव व शक्ती यांचे अस्तित्त्व तसेच सर्जन व समृद्धी व्यक्त होणारी आहे. म्हणूनच राजदंडावर या दोन्हींचे एकत्रित स्थान राज्यात सुख व समृद्धी अबाधित राहावी याचेच प्रतीक आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi will install chola empire style sengol sceptre in the new parliament of india svs
First published on: 25-05-2023 at 15:24 IST