दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली केली आहे. यामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह आणि त्याची व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षांनंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. विधिमंडळात या प्रकरणांची चर्चा झाली. दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी काय संबंध, याबाबत काय तपास झाला होता, ते जाणून घेऊया.
अभिनेता सुशांत सिंहचा मृत्यू
१३ जून २०२० रात्री व १४ जून पहाटेपर्यंत बहुतेक काळ सुशांत त्याच्या बंद खोलीमध्येच होता. १३ जून रात्री सुशांतचा नोकर दिपेश सावंतने सुशांतचा जेवणाबद्दल विचारले. त्याला सुशांतने नकार देऊन बाकीच्यांना जेवण्यास सांगितले. साडेदहाच्या सुमारास दिपेशने सुशांतच्या मोबाइलवर दूरध्वनी केला. सुशांतने दूरध्वनी उचलला नाही. तेव्हा सुशांत झोपला असल्याचे गृहित धरून दिपेश झोपला. १४ जूनला पहाटे दिपेश सुशांतच्या खोलीत गेला. सुशांत त्यावेळी झोपेतून उठून पलंगावर बसला होता. त्यावेळी दिपेशने त्याला चहाबद्दल विचारले असता सुशांतने चहा व नाश्त्याला नकार दिला.

सकाळी सातच्या सुमारास घरातील स्वयंपाकी केशव व मदतनीस नीरज दोघे उठले. आठ-सव्वा आठच्या सुमारास सुशांत जिन्याजवळ आला व त्याने केशवकडे थंड पाण्याची मागणी केली. तासाभरानंतर सव्वानऊच्या सुमारास केशव डाळिंबाचा रस व नारळ पाणी घेऊन सुशांतच्या खोलीत गेला. ही सुशांतबरोबरची शेवटची भेट ठरली. नंतर सुशांतला जेवणासाठी काय पाहिजे, विचारण्यासाठी केशव केला, त्यावेळी सुशांतची खोली आतून बंद होती. नोकरांनी सुशांतचा दरवाजा ठोठवल्यानंतरही त्याने प्रतिसाद न दिला नाही. सुशांतचा मित्र व क्रिएटीव्ह आर्ट डिझायनर सिद्धार्थ पिठानी हादेखील मृत्यूच्या दिवशी त्याच घरात होता. दिपेशने सकाळी साडेदहाच्या सुमारास सिद्धार्थला सुशांतचा दरवाजा बंद असल्याचे सांगितले. घरात उपस्थित सिद्धार्थ, केशव, मदतनीस नीरज व दिपेश या सर्वांनीच दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. तोपर्यंत सव्वाअकरा वाजले होते. त्यांनी खोलीची दुसरी चावी शोधण्यास सुरुवात केली, त्यासाठी सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडालाही दूरध्वनी करण्यात आला. चावीवाल्याच्या मदतीने दरवाजा उघडण्याचे ठरले. चावीवाला आला. त्याने दरवाजा उघडल्यानंतर दिपेश व सिद्धार्थ सर्वप्रथम सुशांतच्या खोलीत शिरले. दिवे बंद होते व पडदे खाली केलेले होते. दिवे लावल्यानंतर सुशांत लटकलेल्या अवस्थेत आढळला. सिद्धार्थने सर्वप्रथम सुशांतची बहीण मितूला दूरध्वनी करून याची माहिती दिली. नीरज व केशव तोपर्यंत सुशांतच्या खोलीच्या बाहेरच होते. सिद्धार्थने १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून डॉक्टर व रुग्णवाहिकेची मागणी केली. सुशांतला खाली उतरवून बेडवर ठेवण्यात आले. पाच मिनिटांनी सुशांतची बहीण मितून तेथे पोहोचली. सुशांतला शुद्धीत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला, पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. काही वेळाने पोलीसही सुशांतच्या घरी पोहोचले.

दिशा सालियन मृत्यूप्रकरणाशी संबंध?

८ जून २०२० रोजी म्हणजे सुशांतच्या मृत्यूच्या सहा दिवस आधी दिशा सालियनचा मालाडमधील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. तो अपघाती मृत्यू होता अशी नोंद पोलिसांनी केली. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचे धागे दोरे दिशा सालियन मृत्यूप्रकरणाशीही जोडले जात आहेत. दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालात इमारतीवरून पडल्यामुळे झालेल्या जखमांमुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच, अनेकांनी दावा केला, तसे लैंगिक अत्याचाराचेही कोणतेही पुरावे नसल्याचे डॉक्टरांनी यात म्हटले आहे. सुशांत सिंहच्या शवविच्छेदनातही हत्येचा संशय फेटाळण्यात आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी १५ जुलैला मुंबई पोलिसांनी भगवती रुग्णालयाला एक प्रश्नावली पाठवण्यात आली होती. त्यात लैंगिक अत्याचार झाला आहे का, तसेच हत्येबाबत काही पुरावे सापडले आहेत का, असे थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावर हत्या व लैंगिक अत्याचाराचे कोणतेही पुरावे नाहीत, तसेच वरून पडल्यामुळे झालेल्या सहा जखमांमुळे मृत्यू झाल्याचे उत्तर देण्यात आले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी ५ ऑगस्टला मुंबई पोलिसांना लेखी तक्रार केली होती. त्यात आपल्या मुलीची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. सालियन कुटुंबियांनी त्यानंतर काही प्रसिद्धिमाध्यमांपुढे येऊन हे सर्व आरोप खोडून काढले होते. ८ जूनला मृत्यूनंतर दोन दिवसांनी दिशावर शवविच्छेदन करण्यात आला. त्यावरही अनेक तर्कवितर्क करण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात त्यावेळी कोविडचे संकट असल्यामुळे सुरुवातील कोविड चाचणी कण्यात आली.

अहवालात दिशाला कोविड नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ११ जूनला डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. तसेच दिशा सालियनच्या पार्टीत मोठा अभिनेता व रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती सामील झाल्याचा दावा करण्यात येत आहे. सीसीटीव्हीच्या तपासणीत चार मित्रांव्यतिरिक्त कोणीही सदनिकेमध्ये गेलेले आढळले नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. सुशांतच्या मृत्यूपूर्वी १३ जूनला त्याच्या घरी पार्टी होती. त्यात एक युवा नेता सामील झाल्याचा दावाही करण्यात आला होता. पिठाणीच्या जबाबात त्याने सुशांतच्या घरी अशी कुठलीही पार्टी नसल्याचे सांगितले. मुंबई पोलीस, सीबीआय व बिहार पोलिसांच्या तपासातही अशी कोणतीही माहिती आलेलेली नाही. त्यानंतर सुशांत सिंहचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका बदलण्यात आली, असा आरोपही करण्यात येतो. पण प्रत्यक्षात सुरुवातीला आलेल्या रुग्णवाहिकेच्या स्ट्रेचर व्हील खराब झाल्यामुळे मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे दुसरी रुग्णवाहिका बोलवण्यात आली. त्यानंतर या रुग्णवाहिकेच्या पाठोपाठ प्रसिद्धी माध्यमांची वाहनेही जात होती. त्यामुळे भर रस्त्यात रुग्णवाहिका बदलण्यात आली, हा दावाही चुकीचा असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

समाज माध्यमांद्वारे गुंता वाढला?

समाज मााध्यमांवर करण्यात आलेल्या या दाव्यामुळे सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत संभ्रम आणखी वाढला. त्यावेळी तपास मुंबई पोलिसांकडे असताना त्यांनी वेळीच माध्यमांसमोर येऊन या प्रश्नांची उत्तरे देण्याची आवश्यकता होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना अधिक उधाण आले. बिहार पोलीस याप्रकरणी मुंबईत दाखल झाल्यानंतर या चर्चांना अधिकच खतपाणी मिळाले. महाराष्ट्र विरुद्ध बिहार पोलीस असे चित्रही रंगवण्यात आले. त्यासाठी अंधेरीत मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या बातम्याही चालवण्यात आल्या. पण प्रत्यक्षात प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी पाहून बिहार पोलिसांनीच मुंबई पोलिसांची मदत मागितली. त्यामुळे बिहार पोलिसांना गर्दीतून मुंबई पोलिसांनी बाहेर काढून त्यांच्या गाडीत बसवून काही अंतर पुढे सोडल्याचे तथ्य पुढे आले. पुढे कोविड नियमावलीनुसार बिहार पोलिसांना विलगीकरणात ठेवल्यानंतर या प्रकरणाला मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असे वळण प्राप्त झाले.

सुशांत सिंह प्रकरणात काय तपास?

सुशांत सिंह प्रकरणात मुंबईत पोलिसांनी सुमारे ५६ जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात सुशांतवर उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांचाही समावेश आहे. नैराश्यातून सुशांतने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. मृत्यूपूर्वी सुशांत स्वतःविषयी ऑलाइन बातम्या, दिशा सालियन व मानसिक आजाराबद्दल सर्वाधिक गुगल सर्च करत होता. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांचा तपास सुरू होता. पण समाज माध्यमांवर मात्र त्याच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. वास्तविक पाहता याप्रकरणी सीबीआयचे विशेष पथकही चौकशी करत आहे. पण दिशा व सुशांत या दोघांच्याही मृत्यूचा तपास हा मुंबई पोलिसांच्या कागदोपत्री पुराव्यांवरच अवलंबून आहे. ईडीचाही तपास हा पूर्णपणे आर्थिक गैरव्यवहारांवर अवलंबून होता. मुंबई पोलिसांनी तपासात कमालीची गुप्तता पाळली. दुसरीकडे समाज माध्यमांवरून नियमित विविध संशयास्पद माहिती लोकांपर्यंत पोहोचत होती. त्यात सुशांतच्या कुटुंबियांनीही मुंबई पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केल्यामुळे याप्रकरणातील गूढ अधिकच वाढले होते. त्यातच समाज माध्यमांवर प्रश्न उपस्थित करून हॅश टॅग मोहिमा राबवण्यात आल्या. राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांवर यावर प्राईम टाईम डिबेट घडवल्या जात होत्या. परिणामी सध्या हा विषय देशात सर्वात चर्चित विषय ठरला. पण याप्रकरणात कोणतेही निष्कर्ष अद्याप जारी न करण्यात आल्यामुळे हे प्रकरण आजही समाज माध्यमांवर धगधगत आहे.

दिशा सालियन प्रकरणी काय तपास?

८ जून २०२० ला दिशासह तिचे चार मित्र रोहन रॉयच्या घरी आले होते. यावेळी त्यांच्यात घरात एक पार्टी झाली होती. रात्री उशिरा दिशा ही बाराव्या मजल्यावरून पडली, ही माहिती समजताच तिला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते, प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे रोहन रॉयसह इतर चार मित्र दिप अजमेरा, इंद्रनील वैद्य, रिशा पडवळ, हिमांशू शिखरे तसेच दिशाची आई वासंती आणि वडील सतीश सालियन यांची पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला होता, त्यावेळी त्यांनी जबाबात त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. तसेच दिशाच्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरले नव्हते. त्यामुळे मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली होती. हा तपास सुरू असतानाच दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी समाज माध्यमांवर, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्याद्वारे विविध बातम्या प्रसिद्ध होत होत्या. दिशाच्या मृत्यूचा संबंध सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येशी जोडण्यात आला होता. त्यामुळे मालवणी पोलिसांनी या प्रकरणात कोणालाही काहीही तक्रार, पुरावे सादर करायचे आहे, किंवा पोलिसांना काही महत्त्वाची माहिती सांगायची असेल तर संपर्क साधावा असे आवाहन केले होते.

उत्तर प्रादेशिक विभागाचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ ११ चे तत्कालीन पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, मालवणी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप यादव, मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदेव कालापाड यांच्याशी संबंधित व्यक्तीने संपर्क साधावा असे आवाहन करूनही कोणीही दिशाविषयी काहीही माहिती देण्यास पुढे आले नाही. तसेच कोणीही तिच्या कथित मृत्यूप्रकरणी पुरावे सादर केले नव्हते. याप्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबानुसार, एप्रिल ते मे २०२० दरम्यान दिशाचे दोन करार रद्द झाले होते, त्यामुळे तिला प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. ती मानसिक तणावात होती. अनेकदा दूरध्वनीवरून बोलताना ती निराश असल्याचे निदर्शनास आले होते. भविष्यात सर्वकाही ठीक होईल, असे सांगून कुटुंबियांनी तिची समजूत काढत होत्या. त्यानंतर ही घटना घडली होती. दिशाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करून त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे पोलिसांनी केवळ अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता दिशाच्या वडिलांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेऊन दिशाच्या मृत्यूप्रकरणी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

Story img Loader