हृषिकेश देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुस्तीगीर विनेश फोगटला वजनावरून पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत अपात्र ठरवण्यात आले. आता हरियाणाच्या या खेळाडूवरून राजकारणाच्या आखाड्यात खडाखडी सुरू आहे. हरियाणात येत्या दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. राज्यात भाजप विरुद्ध काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच थेट सामना होतोय. राज्यात भाजप गेली दहा वर्षे सत्तेत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत राज्यातील १० पैकी ५ जागा भाजपला, तर ५ काँग्रेसला मिळाल्या. यापूर्वी सर्व दहाही जागा भाजपकडे होत्या. थोडक्यात लोकसभा निकालानंतर हिंदी भाषिक पट्ट्यातील या राज्यात काँग्रेसला सत्तेची संधी दिसतेय. यामुळेच विनेशच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक आहे.

राज्यसभेचा प्रस्ताव

विनेशला अपात्र ठरविल्याने देशभर संताप व्यक्त झाला. त्यात ती हरियाणाची असल्याने भाजपला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरला. आमच्याकडे विधानसभेत पुरेसे संख्याबळ असते तर विनेशला राज्यसभेवर पाठवले असते, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदरसिंह हुड्डा यांनी केले. भूपिंदर यांचे पुत्र दीपेंदर यांची लोकसभेवर निवड झाल्याने त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली. तेथे सर्व पक्षांनी विनेशला बिनविरोध निवडून द्यावे अशी दीपेंदर यांनी मागणी केली. अर्थात या मागणीवर विनेशचे काका महावीर फोगट यांनीच टीका केली. जर खेळाडूंची चिंता आहे तर मग, गीताला राज्यसभेवर संधी का दिली नाही, असा सवाल त्यांनी केला. गीता ही विनेशची चुलत बहीण असून, महावीर यांची कन्या आहे. कुस्तीगीर असलेल्या गीताच्या नावे अनेक विक्रम आहेत. इतकेच काय सरकारने तिला पोलीस उपअधीक्षपदीही नेमले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मात्र काँग्रेस नेत्यांची विनेशच्या मुद्द्यावरील वक्तव्ये राज्यातील सत्ताधारी भाजप नेतेही सावध झाले.

हेही वाचा >>> शेख हसीना भारतात! भारताचे निर्वासितांबाबतचे धोरण काय सांगते?

भाजप सरकारकडून मदत

विनेश ही राज्याची शूर कन्या आहे. तिला अंतिम फेरीत संधी मिळाली नसली तरी, ती आमच्यासाठी विजेती आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी दिली. राज्य सरकार पदक विजेत्याप्रमाणेच तिचा सन्मान करेल असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सरकारच्या पदक विजेत्यांसाठी ज्या सोयीसुविधा आहेत त्या विनेशला दिल्या जाणार आहेत. हरियाणात त्यांच्या क्रीडा धोरणानुसार सुवर्णपदक विजेत्याला सहा कोटी, रौप्यपदक विजेत्यास चार कोटी, तर कांस्यपदक जिंकणाऱ्याला अडीच कोटींचे बक्षीस दिले जाते. विनेशच्या मुद्द्यावर भाजप सरकारनेही काँग्रेसला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात हरियाणा तसेच शेजारच्या पंजाब राज्यातून विविध क्रीडा प्रकारांतून खेळाडू राष्ट्रीय संघात असतात. या राज्यांमध्ये क्रीडा संस्कृती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विनेशची अंतिम फेरीतील संधी हुकणे हा जनतेसाठी भावनिक मुद्दा आहे. यामुळेच राजकीय नेते समाजमाध्यमावरूनही अधिकाधिक व्यक्त होत आहेत.

सहानुभूतीसाठी प्रयत्न

भाजप व काँग्रेसबरोबर राज्यातील अन्य पक्षांचे नेतेही आपण या मुद्द्यावर मागे नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय लोकदलाचे अभय चौताला यांनी आमचा पक्ष सत्तेत आल्यावर विनेशला सात कोटी रुपयांचे बक्षीस तसेच कुस्ती अकादमीसाठी जागा देऊ असे जाहीर केले. पंजाबचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान यांनी चरखी दादरी येथील विनेशच्या गावी भेट दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत मान यांच्याकडे हरियाणातील प्रचाराची धुरा आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी विनेशला भारतरत्न द्या किंवा राष्ट्पतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त करा, अशी मागणी केली.

राजकीय आखाडा?

भाजप नेते व कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातील निदर्शनांचे नेतृत्व विनेशने केले होते. या वादाची किनारदेखील राजकीय पक्षांच्या भूमिकेमागे आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी भाजपच्या विरोधात कुस्तीगिरांच्या आंदोलनाचा मुद्दा प्रमुख होण्याची चिन्हे आहेत. त्यातच काँग्रेसने गुरुवारीच एका माजी महिला हॉकी प्रशिक्षकाला पक्षात प्रवेश दिला. त्यांनी हॉकी संघाचे माजी कर्णधार व माजी क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्यावर दोन वर्षांपूर्वी आरोप केले होते. भाजपने संदीप सिंह यांना पेहोवा मतदारसंघातून उमेदवारी दिली, तर रिंगणात उतरणार असल्याचे या माजी प्रशिक्षकांनी स्पष्ट केले. राज्यसभेतही विनेशचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस नेते भूपिंदरसिंह हुडा यांनी केली. एकूणच विनेशला अपात्र ठरविल्यानंतर हरियाणाच्या राजकारणात याचे पडसाद उमटले आहेत. राजकारणाच्या आखाड्यात एकमेकाला चीतपट करण्यासाठी याचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. hrishikesh.deshpande@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political games play out in haryana over wrestler vinesh phogat after olympic disqualification print exp zws
Show comments