काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या आसाममध्ये असून ते सोमवारी (२२ जानेवारी) नागाव जिल्ह्यातील संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळी बाटाद्राव थान येथे दर्शनासाठी गेले. मात्र, त्यांना या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच हैबरगाव येथे रोखण्यात आलं. तसेच काँग्रेस नेते गौरव गोगोई आणि बाटाद्रावचे आमदार सिबामोनी बोरा यांनाच या ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे रविवारी बाटाद्राव थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी आमदार सिबामोनी बोरा यांना पत्र लिहीत, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमामुळे राहुल गांधी यांना दुपारी ३ वाजण्यापूर्वी आत प्रवेश करता येणार नाही, असे सांगण्यात आले होते. तसेच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीही राहुल गांधी यांनी दुपारी ३ नंतर या ठिकाणी भेट द्यावी, असे म्हटलं होते. दरम्यान, राहुल गांधी ज्या ठिकाणी भेट देणार होते, ते बाटाद्राव थान हे ठिकाण आणि त्याचे महत्त्व नेमकं काय आहे? याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण : पंतप्रधान मोदींनी नुकतीच जाहीर केलेली ‘सूर्योदय’ योजना नेमकी काय? ही योजना भारतासाठी महत्त्वाची का?

बाटाद्राव थान हे ठिकाण नेमकं काय आहे?

आसामच्या नागाव जिल्ह्यात स्थित, बाटाद्राव थान हे आसाममधील वैष्णव धर्मासाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण वैष्णव धर्म सुधारक संत शंकरदेव (१४४९-१५६८) यांचे जन्मस्थळ आहे. नागाव जिल्ह्याच्या वेबसाइटनुसार, “आसाममध्ये १५ व्या शतकात वैष्णव धर्माचा अभ्यास आणि प्रसार करण्यासाठी शंकरदेव यांनी बोर्डोवा येथे पहिल्या कीर्तन घराची स्थापना केली होती. तसेच त्यांनी एक सरन नाम धर्माचा प्रसार केला. “

श्रीमंत शंकरदेव यांचे विचार नेमके काय होते?

शंकरदेव यांनी स्थापन केलेल्या एक सरन नाम धर्माने कायम भगवान कृष्णाची भक्ती केली. शंकरदेव यांनी जातीय भेदाविरोधात समता व बंधुता या तत्वांवर आधारित समाजाचे समर्थन केले. त्यांनी मूर्तीपूजेऐवजी प्रार्थनेवर भर दिला. त्यांचा धर्म देव, नाम (प्रार्थना), भक्त आणि गुरु या चार घटकांवर आधारित होता.

शंकरदेव यांनी एक सरन नाम धर्माच्या प्रसारासाठी राज्यभर प्रवास केला. त्यावेळी त्यांनी ठिकठिकाणी मठ सुरू केले, त्यांनाच ‘थान’ असे म्हटले जाते. त्यांनी सुरू केलेली नव-वैष्णव सुधारणावादी चळवळ आसाममध्ये अनेक ठिकाणी असलेल्या ‘थान’ नावाच्या मठांमध्ये बघायला मिळते. विशेष म्हणजे १६ व्या शतकात ही सर्व मठं/थान धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणांची केंद्रे म्हणून ओळखली जात.

हेही वाचा – विश्लेषण : युगांडा येथे पार पडलेली ‘अलिप्ततावादी चळवळ परिषद’ नेमकी काय आहे? ती सुरू करण्यामागचा उद्देश काय होता?

बाटाद्राव थानाचे राजकीय महत्त्व काय?

श्रीमंत शंकरदेव यांनी स्थापन केलेली थान ही आसामची ओळख आहे. तसेच या थानांकडे आसामची अस्मिता म्हणून बघितले जाते. त्यामुळे ही थानं नेहमी आसामच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली आहेत. राज्यभरात असलेल्या या थांनापैकी सर्वात महत्त्वाचे आणि प्रमुख थान असलेल्या बाटाद्रवा थानाला अनेक राजकीय नेते भेट देतात. गेल्या निवडणुकीत या थान परिसरातील जागा राज्याबाहेरील लोकांनी विकत घेतल्यानंतर भाजपाने हा निवडणुकीचा मुद्दा बनवला होता.

गेल्या वर्षी आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी बाटाद्रवा थानच्या परिसरात बाहेरील राज्यातील लोकांना जमीन विकत घेण्यापासून रोखण्यासाठी कायदा आणणार असल्याची घोषणा केली होती. तसेच जोपर्यंत हा कायदा होत नाही, तोपर्यंत स्थानिक लोकांव्यतिरिक्त कोणालाही इथे जागा विकत घेण्याची परवानगी देऊ नये, असे आदेश प्रशासनाला दिले होते. २०२१ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही बाटाद्रवा थान येथे सुशोभीकरणासाठी १८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political significance batadrava than in asam where rahul gandhi was prevented from visiting spb