सुनील कांबळी
खलिस्तानवादी अतिरेकी गुरुपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येच्या कथित कटप्रकरणी अमेरिकेने भारताकडे बोट दाखवले आहे. कॅनडातील निज्जर प्रकरण ताजे असतानाच पन्नू प्रकरणामुळे भारताची कोंडी होईल का, भारत-अमेरिका संबंधात तणाव निर्माण होईल का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. कॅनडासमोर विलक्षण आक्रमक राहिलेला भारत अमेरिकेसमोर मात्र नमते घेताना का दिसतो, याची कारणेही शोधण्याचा हा प्रयत्न…
अमेरिकेचा आरोप काय?
अमेरिकेच्या न्याय विभागाने न्यूयॉर्क न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रानुसार, एका भारतीय गुप्तचर अधिकाऱ्याने मे २०२३ च्या आसपास न्यूयॉर्कमध्ये पन्नू याच्या हत्येची सुपारी निखिल गुप्ता याला दिली. आरोपपत्रात या कथित भारतीय गुप्तचर अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख नाही. मात्र, त्याचा उल्लेख सीसी १ (चीफ काॅन्स्पिरेटर) अर्थात मुख्य कारस्थानी/सूत्रधार असा करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थापन आणि गुप्तचराशी संबंधित वरिष्ठ अधिकारी असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्याने केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. आपण केंद्रीय राखीव पोलीस दलात काम केले असून, युद्धशास्त्र आणि शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतल्याचे या अधिकाऱ्याने निखिल गुप्ता याला सांगितल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. निखिल गुप्ता याला ३० जूनला चेक प्रजासत्ताकमध्ये अटक करण्यात आली. अमेरिकेत आरोपपत्र दाखल होण्याआधी त्याला अमेरिकेच्या हवाली करण्यात आले. एकूणच, पन्नू याच्या हत्येच्या कटात भारताचा हात असल्याचे अमेरिकेने सूचित केले आहे.
हेही वाचा… विश्लेषण : हवामानबदल संकटांबद्दल गरीब राष्ट्रांना मिळणार नुकसानभरपाई… कशी, किती, कोणाकडून?
भारताची भूमिका काय?
अमेरिकेचा आरोप चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त केली. एका भारतीय व्यक्तीवर आरोप आणि त्याचा संबंध भारतीय सरकारी अधिकाऱ्याशी जोडला जाणे चिंतेची बाब असून, मित्रराष्ट्राच्या भूमीवर असे कृत्य करणे हे सरकारी धोरणाविरुद्ध असल्याचा पुनरुच्चार बागची यांनी केला. या कथित कटाबाबत अमेरिकेने काही माहिती दिली असून, चौकशी समिती नेमण्यात आल्याचे बागची यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली नसली तरी निज्जर हत्येच्या कॅनडाच्या आरोपापेक्षा अमेरिकेचा आरोप गांभीर्याने घेतल्याचे बागची यांनी सूचित केले.
गुरुपतवंतसिंग पन्नू कोण?
पन्नू हा कॅनडा आणि अमेरिकेचा दुहेरी नागरिक. खलिस्तानवादी चळवळीचा भाग म्हणून दहशतवादी कारवाया आणि कट-कारस्थान रचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. भारत सरकारने २०२० मध्ये त्याला दहशतवादी घोषित केले. जानेवारी २०२१ मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचारास चिथावणी दिल्याचा गुन्हा त्याच्याविरोधात नोंदविण्यात आला होता. भारत सरकार आणि राज्यकर्त्यांविरोथात चिथावणी देणाऱ्या चित्रफिती तो समाजमाध्यमावरून प्रसृत करतो. एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका, असे त्याने अलिकडेच एका चित्रफितीद्वारे धमकावले होते. १९८५ मध्ये कॅनडाहून भारताकडे निघालेले विमान खलिस्तानी फुटीरवाद्यांनी पाडले होते. त्यात सुमारे ३०० भारतीयांना प्राण गमवावे लागले होते, या घटनेचे यानिमित्ताने स्मरण झाले. खलिस्तानबाबत जगभरातील शिखांचे सार्वमत घेण्याचा प्रयत्न करत असल्याने भारत सरकार माझी हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पन्नू याने बुधवारी नव्या चित्रफितीद्वारे केला.
हेही वाचा… विश्लेषण : ‘आयपीओं’साठी २०२३ साल बहारदार! पण…
हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी पन्नू प्रकरणाचा काय संबंध?
खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याची १८ जानेवारीला कॅनडातील एका गुरुद्वाराजवळ हत्या करण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी भारताने त्याला दहशतवादी जाहीर केले होते. या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केला होता. निज्जरच्या हत्येनंतर निखिल गुप्ता याने निज्जर आपले लक्ष्य होता, असे सांगितले होते, असा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. या आरोपपत्राच्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी आपल्या आरोपाला बळकटी मिळाल्याचा दावा केला आहे. निज्जर हत्येच्या तपासासाठी भारताने कॅनडाशी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भारत-अमेरिका संबंधांवर कितपत परिणाम?
पन्नू प्रकरणाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही महिन्यांपूर्वीच माहिती दिली होती. शिवाय, अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांनी भारतातील समपदस्थांशी चर्चा केली आहे. अमेरिकेच्या आरोपपत्रामुळे भारत-अमेरिका संबंधात काही प्रमाणात तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र, या आरोपपत्रात भारतीय अधिकाऱ्याचा नावानिशी आरोपी असा उल्लेख नसून, केवळ सीसी१ असा उल्लेख करण्यात आला आहे. ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे. भारत-अमेरिका यांच्यातील संबंध दृढ असून, त्यात बाधा येणार नाही, याची काळजी दोन्ही देश घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पन्नू प्रकरणाचा तात्कालिक परिणाम झाला तरी, द्विपक्षीय संबंधांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाही.
हेही वाचा… विश्लेषण : अखेर पाकिस्तानचा भारतावर विजय… पण ‘युनेस्को’त! काय होता ‘सामना’?
कॅनडाला दरडावले, मग अमेरिकेसमोर सबुरीची भाषा का?
याला कारण अर्थातच या दोन देशांचे भूसामरिक प्रतलातील ‘वजन’ हे आहे. कॅनडा हा आकाराने मोठा असला, समृद्ध लोकशाही असला, तरी तो महासत्ता नाही. शिवाय शीख फुटीरतावाद्यांचे आश्रयस्थान अशीही कॅनडाची एक ओळख आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे भारतातील सरकारांनी या मुद्द्यावर कॅनडाला प्रसंगी कठोर बोल ऐकवले आहेत. ट्रुडो हे स्थानिक शीख मतांच्या राजकारणासाठीही भारताला डिवचत असतात, अशी दिल्लीतील अनेकांची खात्री आहे. अमेरिकेचे तसे नाही. कित्येक वर्षांनंतर भारत आणि अमेरिका हे मोठे लोकशाही देश आर्थिक आणि सांस्कृतिक कारणांबरोबच सामरिक कारणांसाठीही परस्परांजवळ आले आहेत. चीनचा विस्तारवाद हा या जवळीकीमागील समान दुवा आहे. अमेरिकेने ब्रिटन आणि कॅनडाप्रमाणेच काही शीख फुटीरतावाद्यांना राजाश्रय दिला आहे. त्यांना अमेरिकी नागरिकत्व बहाल केले आहे. त्यामुळे अमेरिकी नागरिकाच्या हत्येचा कट अमेरिकी भूमीवरच अमलात आणण्यासाठी हालचाली होतात हे अमेरिकेला मान्य होण्यासारखे नाही. अमेरिकेचा दरारा आणि अलीकडच्या काळात भारताबरोबर वृद्धिंगत झालेली मैत्री हे भारताच्या या प्रकरणातील नेमस्त, सबुरीच्या पवित्र्यामागील कारण आहे. अमेरिकेनेही एका मर्यादेपलीकडे या प्रकरणी फार खळखळाट केलेला नाही हेही उल्लेखनीय आहे.