India-Pompeii connection: पोम्पेई त्याच्या अपवादात्मक पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. इसवी सन ७९ मध्ये झालेल्या वेसुव्हियस पर्वतावरील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ते लाव्हारसाखाली गाडले गेले. ज्वालामुखीच्या राखेने संपूर्ण शहरच झाकून टाकल्याने पोम्पेईतील गाडले गेलेले शहर त्याच अवस्थेत जतन झाले. ज्यात घरे, सार्वजनिक स्नानगृहे, मंदिरे, बाजारपेठा आणि नाट्यगृहे यांचा समावेश होता. भिंतींवर आढळणाऱ्या कोरीव लेखांमधून त्या काळातील विनोद, राजकारण आणि लोकांचे वैयक्तिक विचार समजतात. पोम्पेईमध्ये प्रगत नागरी रचना दिसते. त्यात जलवाहिन्या, सार्वजनिक स्नानगृहे, फोरम, ऍम्फीथिएटर आणि उत्तम रस्ते यांचा समावेश आहे. वेसुव्हियसच्या उद्रेकामुळे पोम्पेई ज्वालामुखीच्या ठिसूळ खडकांच्या अनेक मीटर खाली गाडले गेले आणि अनेक रहिवाशांचा मृत्यू झाला. प्लास्टर कास्टद्वारे जतन केलेले अवशेष त्या काळातील मानवी शोकांतिकेचे जिवंत पुरावे आहेत. १९९७ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट पोम्पेई दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते आणि जगातील सर्वाधिक भेट दिलेल्या पुरातत्त्व स्थळांपैकी एक आहे. सतत सुरू असलेल्या उत्खननांमुळे पोम्पेईतील रोमन जीवनाच्या नवीन बाजू उलगडल्या जात आहेत. अलीकडील शोधांमध्ये प्राचीन फास्ट-फूड काउंटर (थर्मोपोलिया) आणि खासगी थर्मल बाथ कॉम्प्लेक्स यांचा समावेश आहे.

Karl Brullov, The Last Day of Pompeii
The Last Day of Pompeii चित्रकार: कार्ल ब्रुलोव्ह (विकिपीडिया)

नव्याने उघडकीस आलेले खासगी थर्मल बाथ कॉम्प्लेक्स श्रीमंत रेजिओ IX परिसरातील व्हिया दी नोला येथील घरात सापडले. हे कॉम्प्लेक्स पोम्पेईतील उच्चभ्रू व्यक्तीचे असल्याचे मानले जाते. पाहुण्यांना प्रभावित करून आपले सामाजिक स्थान मजबूत करण्यासाठी आणि कदाचित निवडणुकांमध्ये मते मिळवण्यासाठी याचा उपयोग झाला असावा असा कयास आहे. या बाथ कॉम्प्लेक्समध्ये ३० लोकांना सामावून घेण्याची क्षमता होती. येथे तीन प्रकारचे कॅल्डेरियम (गरम पाणी), टेपिडेरियम (कोमट पाणी) आणि फ्रिजिडेरियम (थंड पाणी) पूल होते. प्रशस्त अंगण आणि पोर्टिको असलेल्या या बाथ कॉम्प्लेक्सचे वैभवपूर्ण स्वरूप लक्षणीय होते. हा कॉम्प्लेक्स भव्य मेजवान्या आणि पाहुण्यांच्या विश्रांतीसाठी वापरला जात असे. भव्य मेजवानी कक्षाला ब्लॅक रूम असे म्हणतात. कारण त्याच्या गडद भिंती दिव्यांच्या धुरामुळे काळवंडलेल्या दिसतात. या कक्षात ग्रीक पौराणिक कथांवरील भित्तिचित्रे होती. त्यात हेलन ऑफ ट्रॉयची पहिली पॅरिसभेट दर्शविणारे दृश्य महत्त्वाचे आहे. या कक्षाला अंगणाशी जोडणारा एक लांब जिना आहे.त्यावर ग्लॅडिएटरची रेखाचित्रे आणि शैलीबद्ध प्रतीके दिसतात. पोम्पेई पुरातत्त्व उद्यानाचे संचालक गॅब्रिएल झुचत्रीगेल यांनी नमूद केले की, अशी रोमन घरे सांस्कृतिक मंच म्हणून वापरली जात होती. जिथे मालक कला, वैभव आणि आदरातिथ्य यांचे प्रदर्शन करीत असे. रेजिओ IX च्या उत्खननात २०२३ पासून इतर अनेक शोध लागले आहेत. त्यात एक बेकरी असलेले घर सापडले आहेत. जिथे गुलाम कामगारांना कोंडून ठेवले जात असे आणि ब्रेड तयार करण्यास भाग पाडले जात असे.

भारत आणि पोम्पेई

१९३८ साली प्राचीन रोमन शहर पोम्पेईच्या उत्खननादरम्यान इटालियन पुरातत्त्वज्ञ अमेडियो मायुरी (Amedeo Maiuri) यांनी एक विलक्षण पुरातत्त्वीय वस्तू शोधून काढली. ही वस्तू नाजूक हस्तिदंताची मूर्ती होती. जी ‘पोम्पेई लक्ष्मी’ म्हणून ओळखले जाते. या शोधामुळे जगाच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश पडला. या मूर्तीने पहिल्या शतकातील रोमन साम्राज्य व भारत यांच्यातील व्यापार व सांस्कृतिक देवाणघेवाणीसंबंधी एक वेगळा दृष्टिकोन प्रदान केला आहे.

शोध आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी

पोम्पेई लक्ष्मी ही मूर्ती ‘कासा देई क्वात्रो स्तिली’ या पोम्पेईतील एका घराजवळ सापडली. हे प्राचीन शहर इसवी सनाच्या पहिल्या शतकातील (इसवी सन ७९) असून माउंट वेसुवियसच्या विनाशकारी ज्वालामुखी उद्रेकात राखेखाली गाडले गेले होते. वायिया देल’अबोंडांझा या गजबजलेल्या रस्त्यावर असलेल्या या घराचा मालक एक श्रीमंत व्यापारी असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे. या घरात सापडलेल्या भारतीय वस्तू तसेच इतर मौल्यवान वस्तूंमुळे रोमन लोकांना दूरदेशातील दुर्मिळ आणि भव्य वस्तूंबद्दल आकर्षण होते हे स्पष्ट होते. ही मूर्ती पहिल्या शतकातील असल्याचे मानले जाते. ही मूर्ती पोम्पेईमध्ये सापडल्याने त्या काळातील भारत-रोम व्यापारसंबंध किती भरभराटीस आलेले होते हे अधोरेखित होते. ही देवाणघेवाण भूमध्यसागराच्या क्षेत्राला दक्षिण आशियाशी जोडणाऱ्या लांब पल्ल्याच्या व्यापाराचा भाग होती.

The Pompeii Lakshmi
पोम्पेई लक्ष्मी

पोम्पेई लक्ष्मी म्हणजे काय?

ही मूर्ती केवळ ०.२५ मीटर (९.८ इंच) उंच असून हस्तिदंतात कोरलेली आहे. ही मूर्ती अर्धनग्न स्त्रीची आहे. ती दागिन्यांनी मढलेली असून तिची केशभूषा लक्षवेधी आहे. तिच्या दोन्ही बाजूंना दोन लहान स्त्रियांच्या प्रतिमा दर्शवल्या आहेत. त्या तिच्या मदतनीस आहेत. त्यांनी कदाचित सौंदर्यप्रसाधनांच्या डब्या हातात धरल्या आहेत. मूर्तीच्या माथ्यावर असलेल्या छिद्रावरून असे मानले जाते की, ही मूर्ती कदाचित एखाद्या भव्य आरशाच्या दांड्याचा भाग असावी. परंतु, ही मूर्ती नक्की कोणाची आहे, याविषयी अनेक तर्कवितर्क व्यक्त केले गेले आहेत. प्रारंभिक कालखंडात ही मूर्ती लक्ष्मीची असावी असा अंदाज व्यक्त केला गेला. देवी लक्ष्मी ही हिंदू, बौद्ध आणि जैन या तीनही परंपरेत संपत्ती, सौंदर्य आणि फलप्राप्तीची देवी मानली गेली आहे.परंतु, तिच्या विवस्त्र अस्तित्त्वामुळे ती भारतीय संस्कृतीतील प्रजननाशी संबंधित वृक्षदेवता यक्षीशी अधिक साधर्म्य दर्शवत असल्याचे काही अभ्यासकांनी सूचित केले आहे. यामुळे काही विद्वानांचे मत आहे की, पोम्पेई लक्ष्मी ही भारतीय व ग्रीको-रोमन कलात्मक परंपरांचा संगम असलेली एक समन्वित मूर्ती असू शकते. म्हणूनच तिचे वर्णन ‘व्हीनस-श्री-लक्ष्मी’ असेही करण्यात येते.

भारत-रोम व्यापार

पोम्पेईमध्ये सापडलेली ही मूर्ती भारत आणि रोमन साम्राज्याला जोडणाऱ्या विस्तृत व्यापारी मार्गांचा ठळक पुरावा आहे. हे व्यापारी जाळे पहिल्या आणि दुसऱ्या शतकात प्रचंड फुलले होते. याला पेरिप्लस मॅरिस इरिथ्राई आणि इसिडोर ऑफ चॅरॅक्सच्या पार्थियन स्टेशन्स यांसारख्या ऐतिहासिक ग्रंथांमधून आधार मिळतो. मसाले, कापड, हस्तिदंत आणि रत्न यांसारख्या वस्तू भारताकडून पश्चिमेला पाठवण्यात आल्या, तर रोमन साम्राज्याकडून सोने, दारू आणि काचेची भांडी पूर्वेकडे पोहोचवली जात होती. रोमन लेखक प्लिनी द एल्डर यांच्या मते, भारत, चीन आणि अरब देश यांना रोमन साम्राज्याकडून दरवर्षी १० कोटी सेस्टेर्स पाठवले जात असत, यामुळे या देवाणघेवाणीचे आर्थिक महत्त्व अधोरेखित होते. पोम्पेई लक्ष्मी ही मूर्ती पश्चिम भारतातील बंदर बारिगाझा येथून पश्चिम क्षत्रप नहपानाच्या कारकिर्दीत नेण्यात आली असावी. तेथून ती लाल सागर मार्गे स्थापित समुद्री मार्गांचा उपयोग करत रोमन बाजारपेठांपर्यंत पोहोचली असण्याची शक्यता आहे.

The Pompeii Lakshmi
पोम्पेई लक्ष्मी (विकिपीडिया)

हस्तकला आणि मूळ

प्रारंभी विद्वानांचा असा विश्वास होता की, ही मूर्ती प्राचीन भारतातील सांस्कृतिक आणि कलात्मक केंद्र असलेल्या मथुरेमध्ये तयार करण्यात आली होती. मात्र, अलीकडच्या संशोधनानुसार ही मूर्ती सातवाहन साम्राज्यातील भोकरदन या ठिकाणची असावी, जिथे अशाच प्रकारच्या इतर मूर्ती सापडल्या आहेत. सातवाहन राजवंश स्थानिक तसेच लांब पल्ल्याच्या व्यापारामध्ये सक्रिय सहभागासाठी ओळखले जात होते. विशेष म्हणजे पोम्पेई लक्ष्मीच्या तळभागावर खरोष्टी लिपीमध्ये लिहिलेला कोरीव लेख आढळतो. जो प्राचीन भारतातील वायव्य भाग, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये प्रचलित होता. या तपशीलावरून असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, ही मूर्ती रोममध्ये पोहोचण्यापूर्वी ग्रीको-बौद्ध कला प्रसिद्ध असलेल्या गांधार क्षेत्रातून गेली असावी.

रोमन हस्तकलेतील हस्तिदंताची भूमिका

हस्तिदंत रोमन जगात अत्यंत मौल्यवान मानले जात असे, हस्तिदंताचा वापर फर्निचर, वाद्ये आणि वैयक्तिक दागिने तयार करण्यासाठी केला जात असे. हस्तिदंताच्या आयातीत वाढ झाल्यामुळे एबोरारीई या राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आयव्हरी कारागिरांच्या संघटनेचा उदय झाला. नाजूकपणे कोरलेल्या पोम्पेई लक्ष्मी मूर्तीने या व्यापाराशी संबंधित असलेल्या उच्च दर्जाच्या हस्तकलेचे उत्तम उदाहरण पुरावा म्हणून दिले आहे.

सांस्कृतिक देवाणघेवाण आणि धार्मिक समन्वय

पोम्पेई लक्ष्मी दर्शवते की कला आणि धर्म भौगोलिक व सांस्कृतिक सीमा ओलांडून कसे फोफावत गेले. रोमन देवतांना परदेशी देवतांशी एकरूप करण्याची पद्धत, ज्याला इंटरप्रेटेशियो रोमाना (Interpretatio Romana) म्हणतात, ती रूढ पद्धत होती. इजिप्तच्या आयसिस आणि ओसिरिस यांसारख्या देवतांना रोमन पूजेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते आणि पोम्पेई लक्ष्मी ही भारतीय व रोमन आध्यात्मिक संकल्पनांच्या अशाच प्रकारच्या मिश्रणाचे प्रतीक असू शकते असे काही तज्ज्ञ मानतात.

The Pompeii Lakshmi
पोम्पेई लक्ष्मी (विकिपीडिया)

प्राचीन जोडणीचे दर्शन

रोमन शहरात पोम्पेई लक्ष्मीच्या शोधामुळे प्राचीन संस्कृतींमधील परस्पर जोडणीचा ठोस पुरावा मिळतो. हा शोध रोमन आणि भारताला समृद्ध करणाऱ्या आर्थिक, कलात्मक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित करतो. भारतात तयार झाल्यापासून पोम्पेईत सापडण्यापर्यंतच्या या मूर्तीच्या प्रवासामुळे प्राचीन जगाच्या जागतिक स्वरूपाचे प्रतीक उलगडते.

सध्याची स्थिती आणि वारसा

आज पोम्पेई लक्ष्मी नेपल्स नॅशनल आर्किओलॉजिकल म्युझियममधील सिक्रेट म्युझियममध्ये जपून ठेवण्यात आली आहे. ही मूर्ती विद्वान आणि पर्यटकांना अद्याप मोहिनी घालते आणि प्रेरणा देते. तिची कहाणी मानवी सांस्कृतिक वारशाच्या आणि काळ-स्थळांच्या पलीकडे झालेल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून मिळालेल्या प्रभावाचा जिवंत आठव आहे. पोम्पेई लक्ष्मी केवळ एक पुरातत्त्वीय वस्तू नाही. ती दोन महान संस्कृतींना जोडणारा एक सेतू आहे आणि मानवी सर्जनशीलता व देवाणघेवाणीच्या कायमस्वरूपी सामर्थ्याचा पुरावा आहे.

Story img Loader