समाजमाध्यमांवर कायम चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे नुकतीच चर्चेत आली होती. सर्व्हायकल कॅन्सरमुळे (गर्भाशयमुखाचा कर्करोग) तिचे निधन झाल्याची पोस्ट तिच्या इन्स्टाग्रामवरून शेअर करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तिच्या कुटुंबीयांकडून तिच्या मृत्यूबाबत कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. अखेर २४ तास सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पूनम पांडे जिवंत असल्याचे समोर आले. सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आपण ही कृती केल्याचे तिने सांगितले. अशा प्रकारे लोकांचे लक्ष वेधून घेऊन आपल्याच मृत्यूचे नाटक रचल्याबद्दल तिच्यावर भरपूर टीकाही झाली. या सगळ्या प्रकाराला इंग्रजीमध्ये ‘सॅड फिशिंग’ अशी संज्ञा वापरली जाते. तुम्ही बरेचदा समाजमाध्यमांवर अशा प्रकारचे ‘सॅड फिशिंग’ करणारे लोक नक्कीच पाहिलेले असतील. हे लोक आपल्या दु:खाचे भांडवल करतात आणि त्यातून आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. बरेचदा दु:खाचे वा एखाद्या समस्येचे केलेले हे भांडवल खोटे असते. फक्त लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून रचलेले ते नाटक असते. “मला या आयुष्याचा कंटाळा आला आहे”, “सगळे जण मला दुखावतातच” वा “मला आता अजिबात चांगले वाटत नाहीये; पण मला नक्कीच कधीतरी चांगले वाटेल” अशा प्रकारच्या पोस्ट्स शेअर करून आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेणारे अनेक लोक असतात. यालाच ‘सॅड फिशिंग’ असे म्हणतात. पूनम पांडेने केलेले कृत्य हा ‘सॅड फिशिंग’चा कहर होता, असे म्हणता येईल.

हेही वाचा : EVM ‘बर्न्ट मेमरी व्हेरिफिकेशन’ काय असतं? सर्वोच्च न्यायालयाने का दिला आदेश?

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
99 Accused from Nagpur City Tadipaar Assembly Election 2024
निवडणुकीच्या धामधुमीत ९९ आरोपी तडीपार…गेल्या १० वर्षात पहिल्यांंदाच…
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?

सॅड फिशिंग ही संज्ञा कुठून आली?

जानेवारी २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये पत्रकार रेबेका रीड यांनी सर्वांत पहिल्यांदा ही संज्ञा वापरली होती. त्यांनी केलेल्या व्याख्येनुसार, “जेव्हा एखादी व्यक्ती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आपल्या भावनिक समस्यांचा वापर करते, तेव्हा त्याला सॅड फिशिंग असे म्हणतात.” थोडक्यात, आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी वा सहानुभूती मिळविण्यासाठी ऑनलाइन माध्यमांवर दुःख व्यक्त करणे.

सॅड फिशिंगची सुरुवात कधी झाली?

अमेरिकेतील माध्यम जगतातील सुप्रसिद्ध व्यक्ती क्रिस जेनर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्यांची मुलगी केंडल जेनर एका पांढऱ्या टी-शर्टमध्ये बसलेली दिसत होती. ती कळकळीने आपले म्हणणे मांडताना दिसत होती. या लहानशा व्हिडीओमध्ये ती सांगताना दिसते की, आता जे सामान्य वाटते, ते तिच्यासाठी लहानपणी तितके सोपे नव्हते. वयाच्या १४ व्या वर्षी ती फार लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हती; मात्र आता वयाच्या बाविशीमध्ये ती अनेकांना मदत करू शकते. तिच्या या वक्तव्यांमागचा अर्थ काय असावा, असे अंदाज समाजमाध्यमांवर लावले जाऊ लागले. दुर्दैवाने जेनर अशा प्रकारच्या व्हिडीओतून सॅड फिशिंग करीत होती. ती एका अमेरिकेन स्कीनकेअर ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी असे व्हिडीओ करीत होती.

थोडक्यात, तिला असे सांगायचे होते की, लहानपणी वाढत्या वयात चेहऱ्यावर येणाऱ्या मुरमांचा त्रास अनेकांना होतो. हा त्रास दूर करण्यासाठी आता मी तुम्हाला मदत करू शकते. या माध्यमातून ती एका स्किनकेअर प्रॉडक्टची जाहिरात करीत होती. या जाहिरातीसाठी ती आपल्या दु:खाचे भांडवल करून लोकांचे लक्ष वेधून घेताना दिसून आली. हल्ली अशा प्रकारे दु:खाचे भांडवल करून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रकार फारच सामान्य होताना दिसतो आहे. भारतात हाच प्रकार अगदी अलीकडे फेब्रुवारी महिन्यात पूनम पांडे या मॉडेलने केला. तिने आपल्याच मृत्यूचे नाटक रचून लोकांचे लक्ष वेधून घेतले. या माध्यमातून आपल्याला सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करायची असल्याचा खुलासाही तिने नंतर केला. सर्व्हायकल कॅन्सरबाबत जागृती करणे ही बाब चांगली असली तरीही त्यासाठी अशा पद्धतीचा वापर करण्यावरून बरीच टीका झाली. कारण- हा सॅड फिशिंग या प्रकाराचा अतिरेक होता. “सेलिब्रेटी त्यांच्या स्वत:च्या फायद्यासाठी जाणूनबुजून थोडी माहिती रोखून ठेवतात.” असेही पत्रकार रेबेका रीड यांनी आपल्या लेखामध्ये म्हटले आहे.

सॅड फिशिंगची चर्चा आता कशासाठी?

हल्ली सॅड फिशिंग करणे ही एक परवलीची बाब होऊन बसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा ट्रेंडमागची कारणे आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचा अभ्यासही अनेक संशोधकांकडून केला जात आहे. मार्च महिन्यामध्ये या संदर्भात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून असे निष्पन्न झाले की, ज्यांच्यामध्ये समस्या नाकारण्याची वृत्ती असते, ते अशा प्रकारे लक्ष वेधून घेताना अधिक दिसतात. तसेच ज्यांना हिस्ट्रिओनिक पर्सनॅलिटी डिस-ऑर्डर, तसेच नशेत असताना समाजमाध्यमांचा वापर करण्याची सवय असते, ते अशा सॅड फिशिंगमध्ये गुंतण्याची अधिक शक्यता असते. लोक सॅड फिशिंग कधी आणि का करतात, हे नीटपणे समजून घेणे गरजेचे आहे. कारण- तरच त्यामध्ये हस्तक्षेप कधी करायचा, याबाबत माहिती मिळू शकते. या अभ्यासात ज्यांना सॅड फिशिंगची सवय असते, ते या सवयीवर कशा प्रकारे मात करू शकतात, याचीही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : ‘एनडीए’ किंवा ‘इंडिया’… दोन आघाड्याच ठरतात लाभदायी… ‘तिसऱ्यां’साठी राजकारण कठीण!

लोक सॅड फिशिंग का करतात?

सहानुभूतीसाठी लोक सॅड फिशिंग करतात, हे एक प्रमुख कारण आहेच. त्याशिवाय २०२३ मध्ये बीएमसी सायकोलॉजीमध्ये झालेल्या एका अभ्यासाने असे दाखवून दिले आहे की, चिंता, नैराश्य आणि लक्ष वेधून घेण्याची प्रवृत्तीदेखील सॅड फिशिंगला कारणीभूत असते. याउलट, या अभ्यासात असेही आढळून आले आहे की, ज्यांना लोकांकडून अधिक चांगल्या प्रकारे मदत मिळते, ते अशा प्रकारच्या सॅड फिशिंगमध्ये कमी गुंततात. वयाच्या १२ व्या वर्षी‌ मुलींपेक्षा मुलांमध्ये सॅड फिशिंग करण्याची प्रवृत्ती जास्त नोंदवली गेली आहे. मात्र, ते जसजसे मोठे होतात तसतसे त्यांच्यातील सॅड फिशिंगचे हे प्रमाण कमी कमी होत गेल्याचे दिसून आले आहे. पत्रकार रेबेका रीड यांना लक्ष वेधून घेण्याच्या कृतीमध्ये काही वाईट आहे, असे वाटत नाही. लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावे, असे वाटण्यात काहीही गैर नाही, असे त्या म्हणतात. आपल्यापैकी बरेच जण बरेचदा सॅड फिशिंग करतात आणि त्यात काहीही गैर नाही, असेही त्यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

ही मदतीसाठीची याचना असू शकते का?

होय. ही मदतीसाठीचीही याचना असू शकते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे आपण सगळेच जण कधी ना कधी सॅड फिशिंग करीत असतो आणि ही गोष्ट अगदी सामान्य आहे. मात्र, जेव्हा याचा अतिरेक होतो, तेव्हा ही बाब अडचणीची ठरते. खरोखर आपल्याकडे कुणीतरी लक्ष द्यायला हवे, या जाणिवेतून सॅड फिशिंग करणे वेगळे आणि समाजमाध्यमांवर निव्वळ लाइक्स आणि कमेंट्स मिळविण्यासाठी सॅड फिशिंग करणे वेगळे. “हे असे माझ्यासोबतच का घडते? मला आता याचा कंटाळा आला आहे.” अशी एखादी पोस्ट समाजमाध्यमांवर शेअर करणे सॅड फिशिंग असू शकते. मात्र, एखाद्या मानसिक समस्या असलेल्या व्यक्तीचे असे म्हणणे तिला खरोखरच आधार हवा असल्याचे लक्षण असू शकते. अशा वेळी ती व्यक्ती सॅड फिशिंग करते आहे, असे म्हणण्याऐवजी तिला मदतीसाठी हात पुढे करणेच योग्य ठरते. ज्या व्यक्ती खासकरून सेलिब्रिटी आपला फायदा करून घेण्यासाठी वा एखाद्या जाहिरातीसाठी अशा प्रकारे दु:खाचे भांडवल करून लक्ष वेधून घेतात आणि आपला फायदा साधतात, त्यांच्यासाठी ही संज्ञा योग्य आहे. मात्र, खरोखरच दु:ख व्यक्त करणारे आणि सॅड फिशिंग करणारे यांच्यामधील सीमारेषा अगदी धूसर आहे. ती ओळखता येणे गरजेचे आहे.