लोकसत्ता टीम
कॅथलिक धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्याचे २१ एप्रिल रोजी व्हॅटिकनच्या वतीने जाहीर करण्यात आले. पोप फ्रान्सिस हे ८८ वर्षांचे होते आणि गेले काही आठवडे श्वसनविकाराने ग्रस्त होते. पोप या पदाला सर्वसमावेशक आणि कालसुसंगत आयाम देणारी व्यक्ती ख्रिस्तवासी झाली, अशा सार्वत्रिक प्रतिक्रिया पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर उमटली.
निधनाची घोषणा
व्हॅटिकन सिटी प्रशासनाने सोमवार, २१ एप्रिल रोजी ‘एक्स’ समाजमाध्यमावर एक संदेश प्रसृत केला. ‘पोप फ्रान्सिस यांचे स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता निधन झाले’ असे या संदेशात नमूद आहे. पोप यांच्या निधनवार्तेला व्हॅटिकनच्या आरोग्य विभागाचे प्रमुख आणि होली रोमन चर्चचे कार्डिनल चेंबरलेन या दोघांकडून पुष्टी मिळावी लागते. पोप फ्रान्सिस गेले अनेक आठवडे दुहेरी फुप्फुसविकाराने आजारी होते आणि उपचारासाठी रुग्णालयातही भर्ती होते. प्रदीर्घ उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते. पण विकाराचा थकवा कायम होता. तरीदेखील त्यांनी अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावली. आदल्याच दिवशी म्हणजे २० एप्रिल रोजी ईस्टर संडेला व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स चौकातही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गेली काही वर्षे काठी आणि व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत असूनही पोप फ्रान्सिस सक्रिय राहिले.
लॅटिन अमेरिकेतील पहिलेच पोप
सन २०१३मध्ये तत्कालीन पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी अचानक पदत्याग केला. गेल्या ६०० वर्षांत प्रथमच अशा प्रकारे एखाद्या पोपनी निवृत्ती जाहीर केली होती. त्यावेळी ठरलेल्या रिवाजांनुसार नवीन पोप निवडण्याची प्रक्रिया पार पडली आणि काहीशी अनपेक्षितरीत्या फ्रान्सिस यांची निवड झाली. पोप फ्रान्सिस हे मूळचे अर्जेंटिनामधील होते. त्यांच्या निवडीच्या निमित्ताने या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदावर प्रथमच दक्षिण गोलार्धातील आणि लॅटिन अमेरिकेतील एखाद्या व्यक्तीची निवड झाली. पोप फ्रान्सिस यांचे मूळ नाव होर्गे मारिओ बेर्गोग्लिओ (Jorge Mario Bergoglio). याशिवाय आठव्या शतकातील पोप ग्रेगरी तिसरे या मूळ सीरियन पोपनंतर युरोपबाहेर जन्माला आलेले किंवा वाढलेले ते दुसरे पोप ठरले. पोप म्हणून सूत्रे स्वीकारण्याआधी ते अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्स येथे आर्चबिशप होते. ‘सोसायटी ऑफ जीझस’ (जेझुइट्स) या विचारधारेशी संलग्न असलेलेही ते पहिलेच पोप ठरले. त्यांनी फ्रान्सिस हे नाव स्वीकारले, जे ‘सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी’ या संतांच्या नावावरून घेतले गेले.
साधी राहणी, प्रसन्न व्यक्तिमत्त्व
पोप म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकनमधील अनेक परंपरांना फाटा दिला. त्याबद्दल काही वेळा परंपरावाद्यांची नाराजीही पत्करली. व्हॅटिकन आणि पोप या दोन्ही संस्था अधिक सर्वसमावेशक बनल्या पाहिजेत, असे त्यांना वाटायचे आणि हा बदल ते कृतीत उतरवायचे. पेहरावात त्यांनी साधेपणा जपला. शुभ्र झगा आणि काळे बूट ही त्यांची सुपरिचित छबी. पोप यांच्यासाठी व्हॅटिकनमध्ये राखीव असलेल्या मोठ्या निवासस्थानाचाही त्यांनी त्याग केला आणि एका गेस्ट होस्टेलमध्ये दोन खोल्यांच्या सुइटमध्ये राहणे पसंत केले. होस्टेलमध्ये ते सर्वांसमवेत भोजन घेत. पोप फ्रान्सिस हे फुटबॉलचे चाहते होते आणि लिओनेल मेसी त्यांचा आवडता फुटबॉलपटू होता. पोप यांचे विशेष वाहन म्हणून ओळखले जाणारे बुलेटप्रुफ पोपमोबिल त्यांनी नाकारले. लोकांमध्ये मिसळणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्याबरोबर सेल्फी घेणे, लहान मुलांबरोबर थट्टामस्करी करणे याला पोप फ्रान्सिस यांनी इतर जबाबदाऱ्यांच्या बरोबरीने प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय व्यापक होती.
महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका
निर्वासितांबाबत त्यांनी अतिशय थेट भूमिका घेतली. साउथ सुदान, सीरिया येथील निर्वासितांना मदत करणे, तेथील तसेच जगभरातील निर्वासितांना मिळणाऱ्या वागणुकीवरून नाराजी व्यक्त करणे किंवा राष्ट्रप्रमुखांना खडेबोल सुनावणे हेही पोप फ्रान्सिस यांनी केले. गर्भपात, समलिंगी संबंध या मुद्द्यांवर त्यांनी पारपंरिक भूमिकेत बदल केला नाही, हे खरे असले तरी लैंगिक छळाचा आरोप असलेल्या धर्मगुरूंवर कारवाई होईल यासाठी पुढाकार घेतला. समलिंगी जोडप्यांना आशिर्वाद देणे अयोग्य नाही किंवा गर्भपाताचा पुरस्कार करणारे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांचा ‘चांगले कॅथलिक’ असा उल्लेख करणे पोप यांच्या पदासाठी क्रांतिकारीच होते. पण कोणतीही भीडभाड न बाळगता पोप फ्रान्सिस यांनी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर भूमिका घेतली. त्यातून त्यांच्यावर टीका झाली, तशीच लोकप्रियताही लाभली.
नवीन पोप कसा निवडणार?
येत्या १५ ते २० दिवसांमध्ये व्हॅटिकनमध्ये नवीन पोप निवडण्यासाठी कॉनक्लेव्ह किंवा परिषद होईल. पोप यांचे निधन ते नवीन पोप यांची निवड यादरम्यानच्या कालखंडास ‘द सीट इज व्हेकंट’ असे संबोधले जाते. व्हॅटिकन चर्चची प्रसासकीय जबाबदारी या काळात कॉलेज ऑफ कार्डिनल्सचीच असते. व्हॅटिकनमधील, तसेच बाहेरून आलेले सगळे कार्डिनल सिस्टिन चॅपेल येथे जमतील. चर्चा करतील आणि मतदान करतील. या कार्डिनलवृंदातर्फे दोन तृतियांश बहुमताने नवीन पोपची निवड केली जाईल. या संपूर्ण काळात मतदार कार्डिनल हे चॅपेलमध्ये जवळपास विलगीकरणात राहतात.
पांढरा धूर, काळा धूर
कार्डिनल मतदान करतात. प्रत्येक मतदानानंतर मतचिठ्ठ्या एका शेगडीत टाकून जाळल्या जातात. त्याबरोबर एक पदार्थही टाकला जातो. या पदार्थाने धुराचा रंग ठरतो. दोन तृतियांश बहुमत नसेल, तर मतचिठ्ठ्यांच्या ज्वलनाने धुरांड्यातून आलेला धूर काळा असतो, जो व्हॅटिकनमध्ये उपस्थित विशाल जनसमुदायाला दिसतो. यावरून निवड प्रलंबित असल्याचेही समजते. दोन तृतियांश बहुमताने निवड झाली, तर धुरांड्यातून बाहेर पडणारा धूर पांढरा असतो. याचा अर्थ नवीन पोप यांची निवड झाली, हे व्हॅटिकनवासियांना आणि जगाला समजते.