भारतामधील करोना प्रादुर्भावाचा वेग पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येमध्ये दिवसोंदिवस वाढ होताना दिसत आहे. ५ जानेवारी ते ६ जानेवारी दरम्यानच्या २४ तासांमध्ये भारतात करोनाचे ९० हजार ९२८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर १९ हजार २०६ जणांनी करोनावर मात केलीय. देशातील पॉझिटिव्हिटी रेट हा ६.४३ इतका आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता वरील परिच्छेदामधील सर्व गोष्टी सहज समजण्यासारख्या असल्या तरी पॉझिटिव्हिटी रेट हा प्रकार काय आहे याबद्दल नक्कीच तुमच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल. पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे काय आणि तो कसा मोजतात हे अनेकांना ठाऊक नसतं. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता हा शब्द अनेकदा वाचायला, बातम्यांमध्ये ऐकायला मिळणार आहे. म्हणूनच या पॉझिटिव्हिटी रेटचं गणित कसं असतं? पॉझिटिव्हिटी रेट हा ६.४३ म्हणजे नेमका किती? यासारख्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. पाहूयात पॉझिटिव्हिटी रेटची एबीसीडी आणि सविस्तर माहिती…

पॉझिटिव्ही रेट म्हणजे काय?
पॉझिटिव्ही रेटला टीपीआर असं म्हणतात. टीपीआरचा फूलफॉर्म टोटल पॉझिटीव्हीटी रेट असा आहे. एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये करण्यात आलेल्या एकूण करोना चाचण्यांपैकी किती जणांच्या करोना चाचण्यांचा निकाल पॉझिटिव्ह आलाय याची टक्केवारी म्हणजे टीपीआर. पॉझिटिव्ही रेट काढण्याचं सूत्र अगदी साधं आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येने एकूण केलेल्या चाचण्यांच्या संख्येने भागल्यास जो आकडा येईल त्याला १०० ने गुणावे. या आकडेमोडीनंतर येणाऱ्या उत्तराला त्याला पॉझिटिव्ही रेट असं म्हणतात. म्हणजेच ५ जानेवारी रोजी देशामध्ये जितक्या चाचण्या झाल्या त्या संख्येने ९० हजार ९२८ ला भाग दिल्यास उत्तर ०.०६४३ हे उत्तर मिळतं. त्यावरुनच सध्याचा भारताचा पॉझिटिव्हिटी रेट काढण्यात आलाय.

नक्की वाचा >> बुस्टर डोस आधी घेतलेल्याच लसीचा घ्यायचा की इतर लसींचा चालणार?; केंद्र सरकारने दिलं उत्तर

पॉझिटिव्ही रेटचं गणित मांडताना एकूण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सर्व चाचण्यांचा विचार केला जातो. त्यामुळे एखाद्या ठिकाणाच्या संसर्गाचा अंदाज केलेल्या चाचण्यांच्या प्रमाणात मांडता येतो. जागतिक आरोग्य संघटनेने २०२० साली मे महिन्यात दिलेल्या नियमांनुसार पॉझिटिव्हिटी रेट काढण्यात येतो. एखाद्या परिसरामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्या भागामधील करोना संसर्ग नियंत्रणात आहे असं मानलं जातं. त्यामुळेच सध्याचा भारताचा पॉझिटिव्हिटी रेट पाहता रुग्ण संख्या नियंत्रणात आहे असं म्हणता येणार नाही कारण हा दर पाचहून अधिक आहे.

पॉझिटिव्हिटी रेट महत्वाचा का आहे?
एखाद्या विशिष्ट भागामध्ये करोनाचा प्रादुर्भाव होतोय की मंदावलाय हे जाणून घेण्यासाठी पॉझिटिव्हिटी रेटचा फायदा होतो. उदाहरणार्थ जर भारताचा करोना पॉझिटिव्हिटी रेट हा २० वरुन १८ वर आला तर करोनाचा संसर्ग कमी प्रमाणात होतोय असं म्हणता येईल. म्हणूनच करोनासंदर्भातील नियम किती शिथिल करावेत हे ठरवण्यासाठी पॉझिटिव्हिटी रेटचा वापर केला जातो. पॉझिटिव्हिटी रेटमुळे एखाद्या परिसरामध्ये एकूण चाचण्या केलेल्यांपैकी किती जण पॉझिटिव्ह आलेत हे टक्केवारीच्या प्रमाणात ठरवता येते. कमी पॉझिटिव्हिटी रेट हा सकारात्मक संकेत समजला जातो. पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्यास संसर्गचे प्रमाण कमी झाले असून त्या परिसरामध्ये थोडी मोकळीत देता येण्याच्या शक्यता प्रशासनाला पडताळून पाहता येतात. मात्र पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने वाढत असेल तर प्रशासन निर्बंध लावू शकतं.

नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण: ‘फ्लोरोना’ म्हणजे काय? संसर्गाचा सर्वाधिक धोका कोणाला? लक्षणं कोणती? उपचार काय?

जास्त पॉझिटिव्हिटी रेटचा अर्थ काय?
या उलट पॉझिटिव्हिटी रेट अधिक असेल तर मोठ्या प्रमाणात करोना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. अशा ठिकाणी कठोर निर्बंध लादून कमीत कमी लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येतील किंवा घराबाहेर पडतील यासंदर्भातील दक्षता घेतली जाते. पॉझिटिव्हिटी रेट अधिक असणाऱ्या भागांमध्ये करोनाचा धोका हा सर्वाधिक असतो. म्हणूनच असा प्रदेशांमध्ये कठोर निर्बंध, लॉकडाउन लागू करण्याला प्रशासन प्राधान्य देतं. जिथे पॉझिटिव्हिटी रेट अधिक असेल तिथे दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढवणे गरजेचे असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण असतील तर त्याचं निदान होऊन त्यांच्यावर उपचार करता येतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Positivity rate meaning and how it is calculated everything you want to know in surging covid cases in india scsg