उद्या मंगळवारी (४ जून) लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासूनच मतमोजणीस सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर विरोधी इंडिया आघाडीने रविवारी (२ जून) निवडणूक आयोगाकडे काही मागण्या केल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी जाहीर करण्याआधी टपाली मतपत्रिकांद्वारे (Postal Ballots) प्राप्त झालेल्या मतांची मोजणी पूर्ण करावी, असे आदेश निवडणूक आयोगाने सर्व अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी प्रमुख मागणी इंडिया आघाडीकडून करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी टपाली मतपत्रिकांद्वारे मिळालेल्या मतांच्या मोजणीसंदर्भातील नियमांमध्ये काही बदल केले होते. त्या पार्श्वभूमीवर विरोधी आघाडीने ही मागणी केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वांत आधी टपाली मतपत्रिकांमधून प्राप्त झालेल्या मतांची मोजणी पूर्ण केली जात असे आणि त्यानंतर ३० मिनिटांनी ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी सुरू होत असे. त्याशिवाय ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी सुरू करण्यापूर्वीच टपाली मतपत्रिकांमधील सर्व मतांची मोजणी पूर्ण होणे गरजेचे ठरत होते. निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रतिनिधींसाठी (Counting Agents) फेब्रुवारी २०१९ मध्ये जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे, “कोणत्याही परिस्थितीमध्ये टपाली मतपत्रिकांमधील मतांची मोजणी पूर्ण झाल्याखेरीज ईव्हीएम मतमोजणीच्या सर्व फेऱ्यांचे निकाल जाहीर केले जाऊ नयेत.” सध्या ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात करण्याच्या ३० मिनिटे आधी टपाली मतपत्रिकांमधील मतांची मोजणी सुरू होते. मात्र, सध्याच्या नियमानुसार, ईव्हीएमच्या मतांची मोजणी सुरू होण्यापूर्वी टपाली मतपत्रिकांची संपूर्ण मोजणी पूर्ण झालीच पाहिजे, अशी आवश्यकता आता उरलेली नाही.
हेही वाचा : विठ्ठल मंदिरात सापडलेल्या तळघरातील मूर्तींबद्दल दावे-प्रतिदावे; वास्तव आणि मिथक काय?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने आपल्याच मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. इलेक्ट्रॉनिकली ट्रान्स्मिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमचा (ETPBS) वापर सुरू झाल्यानंतर टपाली मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील किमान पाच मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्समधील मतांच्या मोजणीची पडताळणी VVPAT स्लिप्सबरोबर करणे आवश्यक ठरते. काही दिवसांपूर्वी १०० टक्के ईव्हीएम मतांची पडताळणी VVPAT स्लिप्सबरोबर व्हावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, हे शक्य नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निवडणूक आयोगाने १८ मे २०१९ रोजी सर्व मुख्य निवडणूक आयुक्तांना दिलेल्या निर्देशांमध्ये आपले पूर्वीचे मार्गदर्शक तत्त्व मागे घेतले. टपाली मतपत्रिकांमधील मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी सुरू करण्यात यावी, हे आधीचे मार्गदर्शक तत्त्व होते. ते मागे घेऊन, टपाली मतपत्रिकांमधील मतांची मोजणी कुठेपर्यंत आली आहे, याचा विचार न करता ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी वेळेत सुरू केली जाऊ शकते, असे निर्देश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले.
ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी पूर्ण झाली की, मग VVPAT स्लिप्सची मोजणी करून पडताळणी केली जाऊ शकते. तसेच टपाली मतपत्रिकांची पुनर्मोजणी अनिवार्य करण्याच्या नियमामध्येही सुधारणा करण्यात आली आहे. याआधी जर विजयासाठीचे मताधिक्य एकूण टपाली मतपत्रिकांमधील मतांच्या संख्येपेक्षा कमी असेल, तर खात्री करण्यासाठी टपाली मतपत्रिकांची पुन्हा मोजणी केली जायची. आता मतमोजणीदरम्यान अवैध म्हणून नाकारण्यात आलेल्या टपाली मतपत्रिकांच्या संख्येपेक्षा विजयासाठीचे मताधिक्य कमी असल्यास अशा मतपत्रिकांची पडताळणी पुन्हा केली जाते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण २२.७१ लाख टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या होत्या. एकूण ६०.७६ कोटी वैध मतदारांपैकी ०.३७ टक्का मतदारांनी टपाली मतपत्रिकांचा वापर करून मतदान केले होते. यावेळी ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने ऑक्टोबर २०१९ पासून टपाली मतपत्रिकांची सुविधा सुरू केली. या एक प्रकारच्या मतपत्रिकाच असतात. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मेलद्वारे मतदानाचा अधिकार बजावता येतो. केंद्रीय दलांमध्ये असणारे सरकारी कर्मचारी, लष्करातील सैनिक, परदेशांमधील दूतावासात वास्तव्याला असलेले सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच ८० वर्षे वयावरील वयोवृद्ध आणि दिव्यांग अशा काही ठराविक लोकांना अशा प्रकारे मतदान करण्याचा अधिकार देण्यात येतो. ज्या उमेदवाराला मत द्यायचे आहे, त्याबाबतची माहिती भरून मतपत्रिका मतमोजणीपूर्वी तपासणी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतात. मात्र, आता ज्येष्ठांसाठीची वयोमर्यादा ८५ वर्षे करण्यात आली आहे आणि टपाली मतपत्रिकांसाठी पात्र असलेल्यांच्या यादीत कोविड-१९ रुग्णांचाही समावेश करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रतिनिधींसाठी २०२३ साली जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, “टपाली मतपत्रिकांमधील मतांची मोजणी सुरू केल्यानंतर ती पूर्ण झाली आहे अथवा नाही, याचा विचार न करता, ३० मिनिटांनंतर ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी सुरू करण्यात यावी. ईव्हीएम मशीनमधील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर VVPAT स्लिप्सची मोजणीही सुरू केली जाऊ शकते.”
हेही वाचा : पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्नभांडारातील चावीचे गूढ; रत्नभांडारात दडलंय तरी काय?
या लोकसभा निवडणुकीमध्ये टपाली मतपत्रिकांच्या माध्यमातून अधिक मतदान झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मतमोजणीच्या प्रक्रियेबद्दल विरोधकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ होऊ नये, अशी अपेक्षा विरोधक निवडणूक आयोगाकडून करीत आहेत. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये विरोधकांनी काही मुद्दे अधोरेखित केले आहेत. त्यामध्ये त्यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे की, २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाचे मताधिक्य १२,७०० मतांचे होते; तर टपाली मतपत्रिकांमधील मतांची संख्या ५२,००० होती.
“ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी केल्यानंतर टपाली मतपत्रिकांमधील मतांची मोजणी करण्यात आलेली ही पहिलीच निवडणूक ठरली होती. त्यामुळे त्याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या,” असेही इंडिया आघाडीने आपल्या पत्रामध्ये नमूद केले आहे. मे २०२९ मध्ये दिलेले निर्देश मागे घेऊन निवडणूक आचारसंहिता, १९६१ च्या नियम ५४ अ नुसार मतमोजणीची प्रक्रिया पार पाडण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने टपाली मतपत्रिकांमधील मतांची मोजणी सर्वांत आधी पूर्ण करणे अनिवार्य आहे.