राहुल खळदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपावरून ३ मे रोजी अटक करण्यात आली. कुरुलकरांविरुद्ध राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नुकतेच आरोपपत्र दाखल केले. त्यांनी सुरक्षाविषयक नियमावलीचे उल्लंघन करून शत्रुराष्ट्राला गोपनीय माहिती पुरविल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. कुरुलकर हे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात कसे सापडले आणि त्यांनी कोणती माहिती त्या यंत्रणेला पुरवली याविषयी…

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात कुरुलकर कसे अडकले?

कुरुलकर हे पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिच्या संपर्कात आले होते. तिने इंग्लडमध्ये संगणक अभियंता असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिने अश्लील संदेश आणि ध्वनिचित्रफीत पाठवून कुरुलकरांशी मैत्री वाढविली. झाराने मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्यांना अडकवले. फेब्रुवारी २०२३ मध्ये डॉ. कुरुलकर यांनी झाराचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला होता. तिने अनोळखी क्रमांकावरून माझा मोबाइल ब्लॉक का केला, असा प्रश्न डॉ. कुरुलकर यांना विचारला होता. झारा हिच्याशिवाय कुरुलकर हे पाकिस्तानी हेरांना परदेशात भेटल्याचाही संशय एटीएसने व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.

कुरुलकरांनी कोणती गुप्त माहिती पुरविली?

डीआरडीओत संरक्षण दलासाठीच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर संशोधन केले जाते. अग्नी, रुस्तम, आकाश, ब्रह्मोस या क्षेपणास्त्रांची माहिती कुरुलकरांनी झारा दासगुप्ताला दिली. दोघांमधील संवादाची प्रत एटीएसने आरोपपत्रात समाविष्ट केली आहे. ‘तू इथे आल्यानंतर ब्रह्मोसचे डिझाइन रिपोर्ट दाखवितो,’ असे कुरुलकरांनी झाराला सांगितले हाेते. जून २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात कुरुलकर यांनी झारा दासगुप्ताशी संवाद साधला होता. त्या संवादाची प्रत एटीएसने न्यायालयात सादर केली आहे. याशिवाय क्षेपणास्त्रांच्या चाचणीबाबतची माहिती, तसेच ड्रोनद्वारे घेण्यात आलेली छायाचित्रे, ध्वनिचित्रफीत कुरुलकरांनी तिला पाठविली. अग्नी- ६ क्षेपणास्त्राची रचना मी केली आहे, असेही कुरुलकरांनी झाराला सांगितले होते. त्यांनी डीआरडीओच्या विश्रामकक्षातही एका महिलेची भेट घेतली होती. तसेच ते सहा वेळा परदेशात जाऊन आल्याचे एटीएसने म्हटले आहे.

स्पा, जिम, वृद्धत्व रोखणारी मशीन आणि बरेच काही; कशी आहे पुतिन यांची गुप्त ट्रेन?

कुरुलकरांच्या मोबाइलमध्ये काय?

संरक्षण दलातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर डीआरडीओ काम करते. संस्थेच्या आवारात डीआरडीओतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन वापरण्याची मुभा देण्यात आलेली नाही. सुरक्षाविषयक नियमावलींची माहिती डीआरडीओकडून वेळोवळी ‘मयूरपंख’ पुस्तिकेद्वारे देण्यात येते. कुरुलकर समाजमाध्यमातील संपर्क सुुविधेचा वापर करून एका महिलेच्या संपर्कात होते. त्यांनी डीआरडीओतील गोपनीय माहिती, छायाचित्रे स्वत:च्या मोबाइलमध्ये ठेवली होती. डीआरडीओतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतचा संशय आला होता. डीआरडीओतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कुरुलकरांची चौकशी केली होती. कुुरुलकर चौकशीत दोषी आढळल्यानंतर त्यांचा मोबाइल संच, लॅपटाॅप, संगणक, हार्ड डिस्क डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले. २३ फेब्रुवारी रोजी डीआरडीओने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत कुरुलकरांकडून जप्त केलेली इलेक्ट्राॅनिक वस्तू तपासणीसाठी पाठविल्या होत्या. त्यानंतर डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी याबाबत एटीएसला माहिती दिली आणि कुरुलकरांनी गोपनीय माहिती शत्रुराष्ट्राला पुरविल्याची फिर्याद डीआरडीओकडून देण्यात आली.

आरोपत्रात आणखी काय?

एटीएसने विशेष न्यायालयात एक हजार ८३७ पानांचे आरोपत्रात नुकतेच दाखल केले. तसेच २०३ साक्षीदारांची यादीही आरोपपत्रात जोडण्यात आली आहे. शत्रुराष्ट्राला संवेदनशील गोपनीय माहिती दिल्यास देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. गोपनीय माहिती शत्रुराष्ट्राला पुरविणे गंभीर गुन्हा आहे, याची जाणीव कुरुलकर यांना होती. कुरुलकरांविरुद्ध शासकीय गुुपिते अधिनियम १९२३ चे कलम ३ (१) नुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे

rahul.khaladkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pradip kurulkar honeytrap case drdo chief senior scientist print exp pmw
Show comments