हृषिकेश देशपांडे

सर्वसमावेशक राजकारणी अशी सरदार प्रकाशसिंग बादल यांची ओळख. १९२७ मध्ये जन्मलेल्या बादल यांनी वयाच्या २० व्या वर्षी सरपंच म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. सरपंच होण्यापूर्वी त्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा होती. महसूल अधिकारी म्हणून नियुक्तिपत्रही मिळाले. मात्र त्यांच्या एका नातेवाईकाने हे नियुक्तिपत्र फाडले. नोकरी करण्यापेक्षा, ‘नोकरी देणारा हो’ असा सल्ला दिला. त्यामुळे ते राजकारणात उतरले.

numerology
Numerology : शुक्र ग्रहाचा अतिशय प्रिय असतो ‘हा’ मूलांक, आयुष्यभर लाभते गडगंज श्रीमंती, मिळतो अपार पैसा, पद व प्रतिष्ठा
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Top climate scientist declares 2C climate goal dead
अन्वयार्थ : तापमान नियंत्रणाची गाडी चुकली?
nuclear energy production information in marathi
कुतूहल : अणुऊर्जा – एक अपरिहार्य पर्याय
asteroid 2024 YR4 may hit Earth
फुटबॉल मैदानाएवढा अशनी २०३२ मध्ये पृथ्वीला धडकणार? नासाचा इशारा
What is Doomscrolling?
Doomscrolling : डूमस्क्रोलिंग म्हणजे नेमकं काय? यापासून बचाव कसा करता येईल?
Indian astronomers discover a giant cosmic web filament Spread over eight and a half million light years
खगोलशास्त्रज्ञांचे महत्त्वाचे संशोधन; शोधला वैश्विक जाळ्याचा तंतू
Astro Lovers , Moon, Planets Positions, Planets ,
सर्व ग्रहांच्या दर्शनाचा ‘चंद्र असेल साक्षीला’, अवकाश प्रेमींसाठी पर्वणी

काँग्रेस ते अकाली दल…

१९५७मध्ये पहिल्यांदा बादल काँग्रेसकडून आमदार झाले. पुढे १५ मार्च १९६० मध्ये अकाली दलाच्या कार्यकारी समितीने काँग्रेसकडून जे निवडून आले आहेत त्यांनी राजीनामे द्यावेत असे फर्मान काढले. बादल यांनी त्या वेळी राजीनाम्यास नकार दिला. पुढे १९६७मध्ये अकाली दलाकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. गिरीधरबहा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराकडून ते केवळ ५७ मतांनी पराभूत झाले. याच वेळी त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. तीन आघाडी सरकारे या कालावधीत गडगडली. अखेर बादल यांनी २६ मार्च १९७० रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुढे मात्र त्यांचे संपूर्ण राजकारण काँग्रेसविरोधाचे राहिले.

फुटीरतावाद्यांच्या विरोधात…

पंजाबमध्ये दहशतवाद वाढीस लागला असतानाही, बादल यांनी देशाच्या बाजूने राहात फुटीरतावाद्यांना चपराक लगावली. फुटीरवादाची भाषा करणाऱ्या सहकाऱ्यांनाही त्यांनी कधी थारा दिला नाही. नेहमी उदारमतवादी राजकारणाला प्राधान्य दिले. वैचारिक मतभेद असतानादेखील जनसंघाबरोबर त्यांनी सर्वप्रथम आघाडी केली. १९६६मध्ये पंजाब राज्याची स्थापना झाल्यानंतर त्यांच्या अकाली दलाची वाटचाल एक धार्मिक गट ते पंजाबी जनतेचे हित जोपासणारा पक्ष अशी झाली.

भाजपला पाठिंबा देणारा पहिला पक्ष

१९९६मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या अल्पमतातील केंद्र सरकारला पाठिंबा देणारा त्यांचा पक्ष पहिला होता. पुढे वर्षभरात अकाली दल-भाजप यांची आघाडी झाली. ही आघाडी २५ वर्षे टिकली. दीर्घकाळ आघाडी टिकण्याचे देशाच्या राजकारणातही हे एक वैशिष्ट्य ठरले. नंतर कृषी कायद्यांवरून अकाली दल हा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रकाशसिंग बादल यांचे संबंध सौहार्दाचे होते. बादल यांच्या नेतृत्वात अकाली दलाने २००७ व २०१२ अशी दोन वेळा सलग पंजाब विधानसभेची निवडणूक जिंकली. ही राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक घटना आहे.

प्रदीर्घ कारकीर्द…

केंद्रात मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात बादल यांनी जबाबदारी सांभाळली. राष्ट्रीय पातळीवर विविध नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. वयाच्या २५व्या वर्षी ते आमदार झाले. ते देशातील सर्वात तरुण आमदार ठरले. तर १९७०मध्ये ४३व्या वर्षी ते प्रथम मुख्यमंत्री बनले. २०२२मध्ये विधानसभा निवडणूक लढवणारा वयोवृद्ध राजकारणी असा लौकिक त्यांचाच. वयाच्या ९४ व्या वर्षी लांबी या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून १३व्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र आम आदमी पक्षाच्या लाटेत त्यांचा पराभव झाला. विक्रमी पाच वेळा त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद भूषवले. सतत जनतेत राहणारा राजकारणी अशी त्यांची ओळख. मात्र कुटुंबातील व्यक्तींना पुढे आणण्याच्या प्रयत्नात घराणेशाहीचा अकाली दलाला फटका बसला. कारकीर्दीच्या अखेरीस पंजाबमध्ये त्यांच्या पक्षाची स्थिती बिकट झाली. २०२२च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत अकाली दलाचा दारुण पराभव झाला. २०१५मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. कृषी कायदे आणल्याच्या निषेधार्थ त्यांनी २०२०मध्ये हा पुरस्कार परत केला. साधेपणा, विचारांशी निष्ठा ही प्रकाशसिंग बादल यांची वैशिष्ट्ये. राजकारणात क्षणिक लाभासाठी भडक विधाने सुरू असतात. बादल यांनी मात्र हा मार्ग कधी अनुसरला नाही. घटनेच्या चौकटीत राजकारण करून पंजाबमध्ये ८० च्या दशकात बिकट कालखंडात शिख-हिंदू ऐक्य कायम टिकावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बादल यांच्या निधनाने स्वातंत्र्योत्तर काळात सुरुवातीपासून समाजहिताचे राजकारण करणाऱ्या एका युगाचा अंत झाला आहे.

Story img Loader